मुंबई महापालिकेच्या ‘दत्तक वस्ती योजने’च्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा ?

31 Jan 2022 00:39:10

vikroli bmc



मुंबई:
चांदिवली येथील संघर्षनगर वार्ड क्रमांक १५७च्या नगरसेविका कोण? हेच येथील स्थानिकांना माहित नसल्याचे स्थानिकांशी चर्चा करताना दै. मुंबई तरुण भारताच्या निदर्शनास आले. तर दुसरीकडे १५ हजार कुटुंब वास्तव्यास असनाऱ्या संघर्षनगरवासियांना मूलभूत सोयी- सुविधांसाठीही संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र याभागात दिसून येते. संघर्षनगरमधील काही भाग झोपडपट्टीसदृश आहे, तर काही भाग हा एसआरए प्रकल्पानी वेढलेला आहेत.


मुंबई महापालिकेच्या ‘दत्तक वस्ती योजने’च्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा


मुंबई महानगर पालिकेने परिसरातील नालेसफाई आणि स्वच्छता गृहाच्या देखभालीसाठी दत्तक वस्ती आवास योजना जाहीर केली. झोपडपट्टीत साफसफाई, घराघरांतून कचऱ्याचे संकलन, छोटी गटारे, सार्वजनिक शौचालये आदींची स्वच्छता करण्याकरिता पालिकेतर्फे ही योजना राबविली जाते. यात प्रत्येक १० हजार घरांमागे एका संस्थेला वस्तीच्या स्वच्छतेची जबाबदारी सोपविली जाते. प्रत्येक सफाई कामगाराला ६ हजार रुपये इतके वेतन पालिका अदा करते. १० हजार कुटुंबाच्या वस्तीकरिता १४ व्यक्तींची नियुक्ती करून संस्थांनी वस्तीच्या स्वच्छतेची सर्व कामे करून घ्यावी, असे या योजनेत अपेक्षित आहे. मात्र संघर्षनगरमध्ये खोट्या संस्था दाखवून सफाई कामगार केवळ कागदावर दाखवून त्यांच्या वेतनाची रक्कम ठेकेदाराने खिशात टाकायची असा सगळा उद्योग सुरू असल्याची टीका स्थानिकांनी केली आहे. तर वस्तीत स्वच्छतेची कामे होत नसल्याने ही योजना केवळ कागदावरच आहे. संस्थांच्या गैरप्रकारांमुळे या भागातील कचरा रोजच्या रोज उचलला जात नाही तर सोसायटयांना सफाई कर्मचारी लावून वेगळा खर्च करून कचऱयाची विल्हेवाट लावावी लागते. येथील शौचालयांमधील घाणपाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था नसल्याने वस्तीत सांडपाणी सर्वत्र साचून राहते. त्यामुळे या वस्त्यांमधील महिलांची गैरसोय होते तर लहान मुलांना आणि वृद्धांना आरोग्याच्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागतोय.

इथे कधीही स्वच्छतागृहे सफाई होत नाही. इथले बाथरूम कायम असेच तुंबलेले असतात. ना गटर साफ कार्याला कोणी येत ना शौचालये साफ कार्याला कोणी येत आमच्या वस्तीत अशीच दुर्गंधी आणि घाण कायम असते. इथे कोणी सामाजिक संस्था पुढे येऊन काम करू पाहत असेल तरी स्थानिक नगरसेवकांच्या माणसांकडून दबाव आणून काम बंद पडले जाते. कारण त्यांच्या प्रभागात त्यांच्या परवानगीने कोणीही कामी करू नये असा दबाव आणला जातो. मात्र आम्हाला राजकारणाशी काही देणं घेणं नाही आम्हाला इथे स्वच्छता हवी आहे. ६ महिन्यानापासून इथले संडास तुंबले आहेत. या शौचालयाचे पाणी अक्षरशा घरात येत आमच्या मात्र कोणीही सफाई करायला येत नाही. कोरोनाने नाही मात्र आमची माणसं या घाणीनेच मरत आहेत. संपूर्ण मन्नुभाई चाळीसाठी केवळ ३ बाथरूम आहेत मात्र त्यापैकी एकही स्वच्छ नाही.

- स्थानिक महिला, मन्नुभाई चाळ


दरवर्षी मी या योजनेवर होत असलेल्या खर्चाची माहिती घेत आहे. वार्ड १५७मध्ये ६ संस्थांना काम देण्यात आलेली आहेत. ९ कर्मचारी प्रत्येकी या संस्थांना महापालिकेने दिलेलं आहेत. मात्र एकही कर्मचारी ना या वस्त्यांमध्ये येतो ना एकही इमारतीत.आटा आपण मन्नुभाई चाळीत आहोत इथे कागदोपत्री ९ कर्माची आहेत मात्र इथल्या स्थानिकांना विचार एकही कर्मचारी थे फिरकत नाही. मागील १० वर्षांपासून हा भ्रष्टाचार सुरु आहे. हा घोटाळा एका वार्डात नाही मुंबईतील सर्वच वार्डात आहे. ४ वर्षांपसून आम्ही ओरडत आहोत मात्र नगरसेविका यावर काहीही उत्तर देत नाहीत. मुंबई महानगरपालिकाही यावर कोणतीही कारवाई देखील करत नाहीत. कंटार्ट देण्यात आलेल्या एकही संस्थेचा पत्ता इथे व्यवस्थित नमूद नाही. ३६ लाख रुपये सहा महिने किंवा वर्षभरासाठी यासंस्थांना दिले जातात. अशाप्रकारे करोडोंचा भ्रष्ठाचार इथे होतोय मात्र लोक खूप त्रस्त आहेत.

- रवी यादव, माहिती अधिकार कार्यकर्ते



Powered By Sangraha 9.0