लघुउद्योग ते यशस्वी उद्योजिका!

30 Jan 2022 21:18:20

Nirmala Joshi
 
 
 
संसाराचा गाडा चालविण्यासाठी पापड, मसाले तयार करणे, यासारख्या लघुउद्योगापासून सुरुवात करून त्याला आज एका उंचीवर नेण्याचे काम कल्याणमधील निर्मला अरविंद जोशी यांनी केले आहे. सध्या त्यांच्या पोळीभाजी केंद्रात अत्याधुनिक अशी पोळी आणि भाकरी बनविणारी मशीन असून त्यावर काम चालते. निर्मला यांच्या या संघर्षमय प्रवासावर टाकलेला प्रकाश.


 
निर्मला या मूळच्या करवले या गावातील आहेत. त्यांचे बालपण या गावात गेले. करवले या गावातच त्यांचे सातवीपर्यंतचे शिक्षण झाले. या गावात तेव्हा चौथीपर्यंत शाळा होती. चौथीनंतरचे शिक्षण त्यांना उसाटणे गावात जाऊन घ्यावे लागत होते. त्यासाठी त्यांना तीन मैल पायपीट करावी लागत होती. सातवीपर्यंत तिकडे शिक्षणाची सोय होती. त्यांचा भाऊ वरळी येथे राहण्यास होता. त्यामुळे निर्मला यांनी पुढील शिक्षणासाठी मराठा मंदिरमध्ये ‘नाईट हायस्कूल’ला प्रवेश घेतला. दहावीनंतर त्यांचे लग्न झाले. लग्नानंतर त्या कर्जत येथे १२ वर्षे वास्तव्यास होत्या. कल्याणमध्ये आल्यावर त्यांनी अकरावी करण्याचा प्रयत्न केला. पण कौटुंबिक जबाबदारीमुळे त्यांना ते फारसे शक्य नव्हते. त्यांचे घराणे पूर्वीचे सावकार होते. मात्र, कूळ कायद्याने त्यांची आर्थिक परिस्थिती बदलली. त्यांचे पती खोपोली येथे नोकरी करीत होते. निर्मला यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले आहेत. कर्जतमध्ये शिक्षणाच्या फारशा सोईसुविधा नव्हत्या. त्यामुळे त्यांनी कल्याणमध्ये येण्याचा निर्णय घेतला. पतीच्या एकट्याच्या पगारात भागणे कठीण होते. त्यामुळे निर्मला यांनीदेखील कौटुंबिक गाडा ओढण्यासाठी कंबर कसली. निर्मला यांच्या आई सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्यांनी निर्मला यांना प्रौढ शिक्षण वर्ग घेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार १९८३ मध्ये त्या प्रौढ शिक्षण वर्ग घेऊ लागल्या. त्यातून त्यांना महिन्याकाठी १५० रुपयेदेखील मिळत होते.
 
 
 
निर्मला यांनी प्रथम मिरची पावडर आणि विविध प्रकारचे मसाले तयार करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला मसाले ते आपल्या नातेवाईक आणि आजूबाजूच्या परिसरात देण्याचे काम करीत होत्या. त्यांची तिखट, हळद आणि मसाले यांची उत्पादने अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. या उत्पादनांना मोठ्या प्रमाणात मागणी येऊ लागली. उत्पादनातील गुणवत्ता आणि दर्जा या आधारावर निर्मला यांचा व्यवसाय यशस्वी होत होता. निर्मला या दहा बाय दहाच्या खोलीत राहत होत्या. त्या खोलीतच त्यांचा व्यवसायही यशाची एक-एक शिखरे चढत यशस्वी होत होता. सुरुवातीला खलबत्यामध्ये निर्मला या मसाले कुटत असत. त्यांचे पापड खवय्यांच्या विशेष पसंतीस उतरत होते. त्यांचे पती काम करीत असलेल्या कंपनीच्या ‘कॅन्टिन’मध्ये निर्मला यांनी ‘ट्रायल’ म्हणून काही पापड तयार करुन दिले. ते सगळ्यांना आवडत असल्याने ‘कॅन्टिन’मधून त्यांच्या पापडाची विक्री होऊ लागली. चकली करण्यासही त्यांनी सुरुवात केली. कालांतराने त्यांच्या आई अन्नापूर्णा जोशी यांनी त्यांचे राहते घर, तर बाजूलाच राहणार्‍या परांजपेच्या आई सुमती बिवलकर यांनी त्यांना एक घरघंटी घेऊन दिली. घरघंटीमुळे निर्मला यांच्या कामाचा वेग वाढला. त्यांच्या दर्जेदार उत्पादनाचा कल्याणमध्ये हातोहात खप होऊ लागला. त्यांच्या उत्पादनाची मागणी वाढत होती. हळूहळू त्यांच्या व्यवसायाचा व्यापक विस्तार झाला. त्यांच्या कामाचे स्वरूप वाढत होते, तसे त्यांनी मदतीसाठी इतर स्त्रियांना कामावर घेतले. त्यामुळे इतरांना रोजगार उपलब्ध झाला. निर्मला यांनाही कामात मदत होऊ लागली. टिळक चौकात त्यांना एका नवीन इमारतीत जागा घेण्याची संधी चालून आली. त्यावेळी त्यांच्याकडे पैसे नव्हते. पण बिल्डरने स्वत: जागा भाड्याने घेण्याचा प्रस्ताव दिला. पण शक्यतो जागा विकत घेण्याचा सल्ला दिला. सुरुवातीला भाडेही वेळेत देता येईल की नाही, अशी परिस्थिती होती. पण नंतर त्यांना बँकांकडून कर्ज उपलब्ध झाले. त्यांनी ती जागा विकत घेतली. चकली, पापड याबरोबरच पीठ विकण्याचे कामही त्या करतात. ‘अपना बाजार’, डोंबिवलीतील ‘क्रांती स्टोअर’ अशा विविध ठिकाणी त्यांच्या उत्पादनांना मागणी आहे.
 
 
 
निर्मला यांनी टिळक चौकातील एका जागेत आता पोळी-भाजी केंद्र सुरू केले आहे. त्यांचा मुलगा, सून आणि मुलगी त्यांना या व्यवसायात मदत करतात. टिळक चौकात २००२ ला त्यांनी पोळी-भाजी केंद्र सुरू केले. २०२० मध्ये बेतुकरपाडा येथे ‘निर्मला फूड केंद्र’ सुरू केले. सध्या त्यांच्याकडे दहा बायका काम करतात. टिळक चौकातील पोळी-भाजी केंद्र या एकाच ठिकाणी पोळी-भाजी आणि इतर पदार्थ तयार केले जातात. त्यांची केवळ विक्री टिळक चौक आणि बेतुरकर पाडा येथे केली जाते. पोळी-भाजी केंद्रात ‘राईस प्लेट’, कोंथिबीर वडी, गुलाबजाम, गोड पदार्थ, चार ते पाच भाज्या, वरण भात, पुरणपोळी आणि पापड अशा विविध पदार्थांची चव चाखता येते. सण-समारंभासाठी त्या ‘ऑर्डर’ही स्वीकारतात. प्रत्येक सणाला त्यानुसार पदार्थ बनविणे ही त्यांची खासियत आहे. गुळपोळी, पुरणपोळी आणि मोदकही त्यांच्या पोळी-भाजी केंद्रात सण-समारंभानुसार मिळत असतात. निर्मला यांनी भाकरी आणि पोळी बनविण्यासाठी प्रत्येकी एक-एक मशीन खरेदी केले आहे. या मशीनमधून एका वेळेला ७०० ते ८०० पोळ्या बाहेर येतात. भाकरीच्या मशीनमध्ये ‘डाय’ बदली केल्यास त्यात पापडही करता येतात. कमी मनुष्यबळात मशीनच्या साहाय्याने निर्मला यांचा व्यवसाय यश गाठत आहे. कल्याण-डोंबिवलीत पोळी आणि भाकरी यांसाठी कोणाकडे मशीन नाही, असा दावा निर्मला यांनी केला आहे. स्वत:च्या कष्टाने लघुउद्योगांपासून पोळी-भाजी केंद्र असा प्रवास करणार्‍या निर्मला यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरूण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा...!
 
 
Powered By Sangraha 9.0