‘झाले बहु, होतील बहु, परंतु या सम हाच!’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jan-2022
Total Views |

Madhukar Mantri1
 
 
 
मधुकरराव मंत्री यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या अद्वितीय कार्याचा आढावा घेणारा हा लेख...
  
 
‘झाले बहु, होतील बहु, परंतु या सम हाच!’ अशी शब्दांजली अर्पण करत एका बहुआयामी व्यक्तिमत्वाचा जीवनपट उलगडते! एक उत्तम प्रशासक, एक उत्तम कार्यकर्ता, जनता व नेता, एक उत्तम समाजकारणी, कुटुंबवत्सल व निसर्गप्रेमी व्यक्तिमत्वाचे पैलू मधुकररावांच्या रुपात उलगडताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या नावातले प्रत्येक अक्षर त्यांच्यातील गुणांवर प्रकाश टाकत आहे. म-मृदु, मधुर, धु-धाडसी, धोरणी, धीरोदात्त, क-कर्तव्यदक्ष, कुटुंबवत्सल, क-करारी, काटकसरी, र-ऋतुजापूर्ण, रमणीय असं हे उमदं व्यक्तिमत्त्व! त्यांचा जन्म २६ जानेवारी १९२२ रोजी वेंगुर्ले या कोकणातील गावात झाला. योगायोगाने हाच दिवस १९५० सालापासून प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा होण्याचं लौकिकही ठरलं. बालवयात अवघ्या दुसर्‍या वर्षीच पितृछत्र हरपलं व अवघ्या १७व्या वर्षापासून त्यांच्या मातेने या मधुकरला व नुकत्याच जन्मलेल्या श्रीरामला मोठ्या धैर्याने व कर्तबगारीने एकेरी पालकत्वाच्या भूमिकेत सुसंस्काराने वाढवले. शालेय शिक्षणाबरोबर वाचन, मैदानी खेळ, पोहणे, गावातील व्याख्यानमाला ऐकणे अशी मधुकररावांची जडणघडण. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत गेल्यामुळे त्यांचं शरीर व मन बळकट झालं. संघाच्या कार्यकर्त्यांनी सतत ज्ञानसाधना चालू ठेवावी व सेवाकार्यासाठी ती वापरावी, ही वैचारिक बैठक व आचरण हाच धर्म, हे संस्कार मनावर भिनले व त्यातूनच लहान वयात स्वावलंबी होऊन त्यांनी स्वबळावर मुंबईला आगेकूच केली. अवघ्या सतराव्या वर्षी मुंबईत दादरमध्ये लहान जागा घेऊन ते स्थायिक झाले. संघ-जनसंघ यांच्याशी नाळ जोडलेली होतीच.
 
 
 
बी.ए.एल.एल.बी. ‘डिप्लोमा इन लेबर वेलफेअर मॅनेजमेंट’च्या पदव्या धारण करून निरपेक्ष भावनेने समाजसेवा करीत असतानाच १९६२ साली महानगरपालिकेत ‘जगरपिता’ म्हणून निवडून आले व विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत महानगरपालिका गाजवली. मुंबई जनसंघाच्या उपाध्यक्षपदी धुरा वाहिली जनतेचे लाडके नेते म्हणून जनसेवा केली. मुळात राजकारणीवृत्ती नसून सेवाभावीवृत्तीने निस्वार्थी बुद्धीने स्वच्छ कारभार करणारी कार्यशील व्यक्ती ही प्रतिमा पुढील कारकिर्दीत मोलाची ठरली. अनेक नोकर्‍यांचे अनुभव गाठीशी बांधून धडाडीने स्वतःचा व्यवसाय करण्याची गरुडझेप तर घेतलीच, पण जोडीला सामाजिक बांधिलकी चालूच होती. त्यांचा जनसंपर्क वाढत होता. दीनदयाळ उपाध्याय, जगन्नाथराव जोशी, अटलबिहारी वाजपेयींसारख्या महान प्रभूतींचं घरात स्वागत करण्याची संधीही मिळाली. राजकीय क्षेत्रात येणार्‍या अनुभवांमुळे मात्र त्यांचे मन तिथे जास्त रमले नाही. अधिक अर्थपूर्ण, चिरस्थायी व सृजनशील कार्य हातून घडवण्याचा ध्यास मधुकररावांना स्वस्थ बसू देत नव्हता. रा. स्व. संघाचे तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी संघाच्या बैठकीत मांडलेल्या विचारांवर ते मनन करू लागले. १९७४ मध्ये बिंदुमाधव जोशी यांच्या प्रेरणेने पुण्यात अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची स्थापना झाली. मुंबईतही या कार्याचा प्रसार व्हावा म्हणून पा. वा. गाडगीळ, सुधीर फडके व मधुकरराव मंत्रींनी पुढाकार घेतला व १९७५ मध्ये ‘मुंबई ग्राहक पंचायत’ स्थापन झाली व कार्यवाह पद मधुकररावांकडे सोपविण्यात आले.
 
 
 
नीतिमूल्ये, श्रमप्रतिष्ठा, विश्वस्त भावना, देशाशी बांधिलकी या चार मूल्यांच्या आधारे ही भक्कम चळवळ उभी राहिली. मधुकररावांनी रात्री-अपरात्री दूरदूर प्रवास करून अथक परिश्रमाने जागोजागी ग्राहक संघ स्थापन करून ग्राहकराजाला जागे केले. सहकर्‍यांच्या साहय्याने एक अनोखी वितरण व्यवस्था अस्तित्वात आली. आज संस्थेचे ३३ हजार सदस्य आहेत व आज अशिया खंडातील ही सर्वात मोठी संस्था म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून त्यांच्या प्रयत्नांनी उभ्या राहिलेल्या ‘ग्राहक भवन’ या वास्तूजवळ संत ज्ञानेश्वर रोडच्या जंक्शनच्या चौकाला ‘मधुकरराव मंत्री चौक’ असे नामकरण करून गौरविण्यात आले. त्यांच्या पुण्यस्मृतींना मन:पूर्वक अभिवादन!
 
 
 - डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी
 
@@AUTHORINFO_V1@@