बाबाविषयी...

29 Jan 2022 22:14:12

Anil Avchat
 
 
 
ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ता, पत्रकार अनिल अवचट यांची गुरुवार, दि. २७ जानेवारी रोजी वयाच्या ७८व्या वर्षी प्राणज्योत मालवली. त्यानिमित्ताने त्यांना वाहिलेली ही शब्दसुमनांजली...
 
 
अनेक वाचकांचा वाचनप्रवास हा सर्वसाधारणपणे मन रिझवणार्‍या, चार घटका मनोरंजन करणार्‍या आणि अलंकारिक भाषा असणार्‍या पुस्तकांपासून सुरु होते. तो तसा असण्यात गैर काहीच नसून ती बरीचशी स्वाभाविक गोष्ट असते. मीही याला अपवाद नव्हतो. पण, महाविद्यालयात असताना ’धागे उभे आडवे’ हे पुस्तक वाचले आणि त्या पुस्तकाने मला आतून हलवले. आपल्याच आजुबाजूला असणार्‍या, पण आपल्याला कधीही न दिसलेल्या प्रश्नांचे अनिल अवचटांनी असे काही ताणेबाणे गुंफले होते की त्यात गुरफटून, गुदमरून गेल्यासारखे झाले. लिखाणाला सत्याचा पाया असेल तर अकृत्रिम भाषा ही किती परिणामकारक ठरू शकते, याचा प्रत्यय आला. हातमाग, हळद व्यवसायांमधले पिचून गेलेले कामगार; वेश्या, देवदासी अशा समाजाच्या खालच्या पायरीवरील माणसांची विदारक शब्दचित्रे त्यांनी आपल्या अनलंकृत भाषेत रेखाटली होती. त्या पुस्तकाच्या वाचनामुळे अवचटांच्या साध्या सोप्या भाषेनेही मनात वेगळे स्थान निर्माण केले. ती लेखनशैली कुणाचेही अनुकरण न करता त्यांच्यात आलेली होती. एका मनस्वी माणसाचे प्रतिबिंब त्यांच्या लिखाणात आणि जगण्यातही दिसायचे.
 
 
 
अभिनिवेशापासून दूर
आपल्याला हवे ते मनापासून लिहिणे आणि ते आहे तसे लोकांना आवडणे ही फार कठीण गोष्ट आहे. ‘मी मला वाटेल ते लिहितो’ असे म्हणणारे लेखक बघता बघता व्यावसायिक गणितांप्रमाणे लिहू लागल्याची अनेक उदाहरणे असताना अनिल अवचट मात्र कायम स्वतःला योग्य वाटेल त्या विषयावर लिहित राहिले. याचे मुख्य कारण त्यांनी कधीही ‘मला लेखक म्हणून मान्यता मिळवायची आहे’ या भावनेने लिहिले नाही. अलीकडेच ‘ई-साहित्य संमेलना’चे अध्यक्षपद त्यांच्याकडे आले, तेव्हा त्यांचे लिखाण त्या लायकीचे नाही, अशी शेरेबाजी झाली. तेव्हाही ‘मला लेखक समजू नका आणि माझ्या लिखाणाला साहित्य समजू नका,’ असे सहज म्हणण्याइतके त्यांचे जगणे अभिनिवेशविरहित होते. अनिल अवचटांची ही वृत्ती त्यांच्या जगाकडे डोळे उघडे ठेवून बघण्याच्या सवयीतून आली होती. ही सवय त्यांना कशी लागली, याबद्दल त्यांच्या ‘स्वतःविषयी’ या पुस्तकातून कळते. ‘स्वतःविषयी’हे मला मराठीतल्या सर्वोत्तम पुस्तकांपैकी एक वाटते. अनिल अवचटांमधला माणूस कसा घडत गेला, हे या पुस्तकामधून जाणून घेतले की, त्यांच्यातला लेखक कसा घडला, हे आपल्याला नीट समजू शकते. ओतूरसारख्या छोट्या गावामध्ये गेलेले बालपण, नववीपासून शिक्षणासाठी पुण्यासारख्या मोठ्या शहरात आल्यानंतरचे भांबावलेपण, त्यातून आत्मविश्वासाला गेलेले तडे, वैद्यकीय महाविद्यालयातले शिकवून जाणारे अनुभव, श्रद्धा-अंधश्रद्धांचा गुंता, आपल्या मित्रांच्या साथीने चळवळीमध्ये उतरणे, कौटुंबिक तणावाचे प्रसंग आणि या सगळ्या टप्प्यांमधून जात स्वतः एक कुटुंबवत्सल पिता होणे, असा आपल्या जडणघडणीचा आलेख त्यांनी मांडला आहे. आपल्या अडखळण्या-सावरण्यासह त्यांनी ज्या प्रांजळपणे आपला प्रवास रेखाटला आहे, ते वाचणे विलोभनीय आहे. स्वतःकडेही त्रयस्थपणे, अलिप्तपणे कसे पाहावे, याचा ‘स्वतःविषयी’हा वस्तुपाठ आहे. हे पुस्तक जसे त्यांचा माणूस म्हणून प्रवास उलगडते, तसेच ‘माझ्या लिखाणाची गोष्ट’ हे त्यांचा लेखक म्हणून प्रवास उलगडते. अनिल अवचटांबद्दल विस्ताराने जाणून घ्यायचे असेल, तर ही दोन्ही पुस्तके वाचायलाच हवीत.
 
 
 
सामाजिक प्रश्नांवर क्ष-किरण
ज्या लेखनप्रकारामुळे अनिल अवचटांचे नाव सुपरिचित झाले, तो म्हणजे ‘रिपोर्ताज.’ ऐन तारुण्यात बिहारला केलेला प्रवास आणि तिथले दैन्य, गरिबी, शोषण पाहून आलेल्या अस्वस्थतेतून त्यांनी एक लेखमाला लिहिली आणि त्यातूनच पुढे त्यांचे ‘पूर्णिया’ हे पुस्तक जन्माला आले. समस्या आहे त्या ठिकाणाला भेट देणे, संबंधितांशी संवाद साधणे आणि त्याचे सविस्तर वृत्त तयार करणे, या गोष्टी कुठलाही पत्रकार करतोच. पण, अवचटांच्या ‘रिपोर्ताज’स्वरूपाच्या लिखाणाने लोकांचे लक्ष वेधून घेतले, याचे कारण त्यांनी त्यासाठी दिलेला वेळ आणि आपल्या निरीक्षणांची त्यांनी केलेली मांडणी. सुरुवातीच्या काळामध्ये अवचटांनी पत्रकारिता करताना तात्कालिक विषयांवर लिहिले आणि समस्यांना वाचाही फोडली. पण, ज्या समस्या दीर्घकालीन आहेत, त्यांच्यावर लिहिण्यासाठी विशेष प्रयत्न केले. एखाद्या ठिकाणी पुन्हा पुन्हा भेटी दिल्या, संबंधितांचा विश्वास संपादन करुन समस्यांचे मूळ समजून घेण्याचा प्रयत्न केला. जिथे समस्याग्रस्त लोक सविस्तर बोलत नसत, तिथे डोळे उघडे ठेवून निरीक्षण केले. लोकांची घरे, त्यांचे कपडे इथपासून ते त्यांच्या चेहर्‍यावर हलकेच तरळून जाणारे भाव किंवा त्यांनी केलेली अल्पशब्दी टिप्पणी यांचीही मनात नोंद घेतली आणि ती आपल्या लेखामध्ये मांडली. सोपी शब्दरचना आणि छोटी छोटी वाक्ये यांमुळे वाचक त्यांच्या लिखाणाच्या अधिक जवळ जाऊ शकले, असे मला वाटते. ‘आत्मीय अलिप्तता’ हे मला अवचटांच्या ‘रिपोर्ताज’चे वैशिष्ट्य वाटते. समस्यांना भिडताना त्यांच्यातल्या माणसाने समस्याग्रस्तांकडे आत्मीयतेने पाहिले. पण, त्याबद्दल लिहिताना मात्र त्यांच्यातल्या लेखकाने उमाळे, कढ न आणता फक्त निरीक्षणे आणि काही टिप्पण्या नोंदवल्या आणि बाकीचे वाचकांवर सोडले. त्यांच्या लेखणीत एक मोकळेपणा मला कायम जाणवतो. विषयाच्या अनुषंगाने लिहिताना अकारण खोटा ’पॉलिटिकल करेक्टनेस’ न बाळगता संबंधित जातींचे ते स्पष्ट उल्लेख करत, तसेच एखाद्या समाज घटकाच्या चुकीच्या धारणांवर टिप्पणीही करत असत (एका जातिसंमेलनावर त्यांनी लिहिलेला वृत्तांत मला याठिकाणी विशेषकरून आठवतो आहे).
 
 
 
‘रिपोर्ताज’ हा लेखनप्रकार प्रकार मराठीत आणण्याचे श्रेय अनिल अवचटांना दिले जाते. गंमत म्हणजे ‘रिपोर्ताज’ नावाचे काही जगाच्या पाठीवर आहे, याचीही त्यांना कल्पना नव्हती. ‘मला जे दिसले ते मी लिहित गेलो, त्या साहित्यप्रकाराला विशिष्ट नाव आहे हे इतरांनी सांगितले तेव्हा मला कळले’ हेही अवचट प्रांजळपणे सांगत असत. ‘साधना’, ‘मनोहर’, ‘माणूस’, ‘किर्लोस्कर’अशा नियतकालिकांमध्ये लिहिलेल्या लेखांमधून अनिल अवचटांनी पांढरपेशा वाचकांना संपूर्ण अपरिचित विश्वाचे दर्शन घडवले आणि अंतर्बाह्य हादरवले. त्यांच्या लिखाणामुळे असंख्य पिचलेल्या, पिडलेल्या मूक श्वासांना आवाज मिळाला. हे लेख पुढे ‘माणसं’, ‘वाघ्या मुरळी’, ‘प्रश्न आणि प्रश्न’, ‘धागे उभे आडवे’ या पुस्तकांच्या स्वरुपात प्रसिद्ध झाले. ते वाचून अनेकांनी मदतीचे हात पुढे केले. विशेष म्हणजे, कष्टकरी वर्गातल्या लोकांना अवचटांच्या लेखामुळे इतरांच्या कष्टांचीही जाणीव झाली. हमालांवरचा लेख वाचल्यानंतर धान्याची पोती वाहणार्‍या हमालाने मिरच्यांची पोती वाहणार्‍या लोकांचे हाल काय असतात, हे प्रथमच कळल्याची कबुली दिली.
 
 
 
संवेदनशील लेखक, कृतिशील कार्यकर्ता
एकेकाळी ‘युक्रांद’सारख्या संघटनेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून कार्य केलेल्या आणि पुढे ‘आपल्याला हे झेपणारे नाही’ असे प्रामाणिकपणे मान्य करून त्यातून बाजूला झालेल्या अनिल अवचटांनी आपल्यातल्या कार्यकर्त्याला ग्लानी मात्र येऊ दिली नाही. लेखणीच्या माध्यमातून तो कार्यकर्ता प्रकट होतच राहिला. ‘आणखी काही प्रश्न’ हे त्यांचे शेवटचे ठरलेले पुस्तकही याचीच साक्ष देते. इतरांना न दिसलेल्या गोष्टी ते बरोबर टिपत असत. पुण्याबद्दल लिहिता बोलताना काही ठरावीक पेठाच लोकांच्या अभिमानाच्या अथवा चेष्टेच्या आणि टीकेच्या विषय ठरतात. पण, अनिल अवचटांनी पुण्यावर लिहिले तेव्हा मात्र पूर्व भागातल्या पेठांमधल्या जीवनाचे चित्र रेखाटले आणि तिथे प्रामाणिकपणे काम करणार्‍या कारागिरांच्या कामाचे कौतुक केले. अमली पदार्थांच्या नादी लागून चांगल्या घरांमधले तरूणही आयुष्यातून उठत असलेले पाहून अनिल अवचटांनी लिखाण सुरु केले, त्याचेच पुढे ‘गर्द’ हे पुस्तक झाले. सुनीताबाई आणि पुलंच्या प्रोत्साहनातून आणि आर्थिक साहाय्यातून आपली पत्नी डॉ. सुनंदा यांच्यासोबत त्यांनी पुण्यामध्ये ‘मुक्तांगण’ हे व्यसनमुक्ती केंद्र सुरू केले आणि शेकडो लोकांना गर्तेतून बाहेर काढले. ‘मुक्तांगण एक दिवस बंद करावे लागेल, अशा निर्व्यसनी स्थितीत समाज येईल’ असे त्यांचे स्वप्न असताना प्रत्यक्षात मात्र व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढलेले पाहून ते व्यथित होत असत. पूर्वी लोक दारू पीत नसत असे नाही, पण तेव्हा दारूला प्रतिष्ठा नव्हती. आता मात्र चांगल्या घरांमध्येही दारू पिण्याला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे, हे ते व्यथित अंतःकरणाने बोलून दाखवत असत. त्यातून समाजाच्या स्वास्थ्याविषयी तळमळ असणारा कार्यकर्ताच डोकावतो.
 
 
 
समृद्ध लेखनप्रवास
सतत कार्यकर्त्याच्या भूमिकेमध्ये वावरणार्‍या काही जणांच्या रोजच्या वागण्यातही जगाबद्दलचा कडवटपणा अकारण डोकावताना दिसतो. सतत संघर्षाच्या भूमिकेत राहणेच त्यांच्या अंगवळणी पडून गेलेले असते. तरुण वयात अनिल अवचटांची जडणघडण ज्या वैचारिक वर्तुळामध्ये झाली, त्यामध्येही अशा लोकांची कमतरता नाही. पण, अनिल अवचट मात्र त्यांच्यात वेगळे ठरले. त्यांच्यातला लेखक आणि संवेदनशील माणूस नुसताच टिपे गाळत राहिला नाही. तो फुलत, बहरत गेला. श्रेष्ठ गायकाला जशा दोन सुरांच्यामधल्या जागा दिसतात आणि त्यांचा विस्तार तो करत जातो, तशा अवचटांना रोजच्या जगण्यातल्या असंख्य सुंदर जागा दिसू लागल्या. माणसांमधल्या चांगल्या जागा त्यांनी शब्दांत उतरवल्या, त्यातून उत्तम व्यक्तिचित्रे उभी राहिली. निसर्गामधल्या सुंदर जागांनी त्यांना खुणावले, तेव्हा त्यांनी त्यांच्याशी गप्पा मारल्या. कधी त्यातून ‘सृष्टीत-गोष्टीत’, ‘वनात-जनात’ सारखे खेळकर बालसाहित्य निर्माण झाले, तर कधी ‘बहर शिशिराचे सारखे’ छायाचित्रांचे पुस्तक झाले. आपल्या जगण्यातला आनंद त्यांनी कधी ‘जगण्यातील काही’ सारख्या ललित लेखसंग्रहातून तर कधी ‘मस्त मस्त उतार’ सारख्या कवितासंग्रहातून मांडला. आपल्याला जे जे आवडले, ते दुसर्‍याला सांगण्याच्या ऊर्मीतून ते शेवटपर्यंत लिहित राहिले. ज्या अंगभूत कुतूहलाने अनिल अवचट सामाजिक समस्यांच्या अंतरंगात डोकावले, त्याच कुतूहलाने त्यांनी शब्दांच्या, कॅमेर्‍याच्या, कुंचल्याच्या, सुरांच्या माध्यमातून भोवतालाची गळाभेट घेतली. आयुष्याच्या उत्तरार्धातही एखाद्या लहान मुलाच्या औत्सुक्याने ते जगाकडे बघत राहिले. सतत नवीन काहीतरी शिकत राहिले. बासरी, ओरिगामी, लाकूडकाम... कितीतरी गोष्टींमध्ये त्यांनी मन रमवले. कर्करोगाने पत्नी सुनंदा यांना ओढून नेल्यानंतर बसलेल्या हादर्‍यातून त्यांना या छंदांनीच सावरले. उतारवयामध्ये अवचटांना शरीरातल्या घडामोडींविषयी कुतूहल वाटू लागले आणि त्यातून केलेल्या शोधाशोधीतून ‘कुतुहलापोटी’ नावाचे पुस्तक साकारले!
 
 
 
लोभस व्यक्तिमत्व
अनिल अवचटांचे लिखाण जसजसे वाचत गेलो, तसतसा त्यांच्याबद्दल आदर वाढत गेलाच. पण, त्यांच्याबद्दलच्या आदराचे आपलेपणामध्ये रुपांतर व्हायला कारणीभूत ठरले ते त्यांचे बोलणे! जाहीर कार्यक्रम, मुलाखती यांमधले अनिल अवचटांचे बोलणे ऐकताना नेहमी कुटुंबातले प्रेमळ आजोबा बोलत आहेत असे वाटायचे. आपल्या घरातल्या लहानग्यांना त्यांच्याकडे निर्धास्तपणे सोपवावे असे त्यांचे प्रसन्न व्यक्तिमत्व होते. शांतपणे, कुठलेही बोजड शब्द न वापरता ते बोलायचे. बोलण्याच्या ओघात ते किंचित लांबलेल्या सुरात ‘हं’ असे म्हणायचे, ते ऐकायला अतिशय गोड वाटायचे. एक विलक्षण आश्वासक सूर त्यामध्ये जाणवायचा. एकदा आमच्या घरापाशी राहाणार्‍या एका साहित्यप्रेमी गृहस्थांनी आपल्या घराच्या गच्चीमध्ये अनिल अवचटांशी मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. पण, बोलता बोलता त्याचे गप्पांमध्ये कधी रुपांतर झाले कळलेच नाही. बोलता बोलता अनिल अवचट एकीकडे हातांनी कधी रुमालाचा उंदीर करत होते, तर कधी कागद दुमडून ओरिगामीमधले हंसाचे रूप साकारत होते. त्यांचे ओरिगामीमधले कौशल्य नुसत्या हौशी पातळीवरचे नव्हते. ओरिगामीमध्ये आधीपासूनच असणार्‍या शेकडो कलाकृती शिकता शिकता नव्या कलाकृती घडवण्याएवढे प्रभुत्व त्यांनी मिळवले होते. त्यांनी ओरिगामी गणपतीसुद्धा आम्हाला दाखवला! त्यांचे बोलणे त्यांच्या लिखाणासारखेच होते. अगदी मनापासून, कुठलाही आव न आणता... त्यांना कुठल्याही वयोगटातील व्यक्ती अगदी सहजपणे ‘ए बाबा’ का म्हणू शकते, हे त्या दिवशी मला अगदी ‘याची देहीं..’ अनुभवायला मिळाले. हळूहळू बाबाचे बोलणे कमी होत गेले... मग त्याने बासरी काढली आणि तिन्ही सांजेचे शेंदरी अवकाश सुरांनी भारून टाकले. जातिवंत हापूस आंबा पिकत जातो तसा अधिकाधिक मधुर होत जातो, तो एकवेळ सुरकुतेल पण किडत, सडत नाही... बाबा तसाच पक्व भासला होता त्या संध्याकाळी... परवा कुणाच्या ध्यानीमनी नसताना बाबा आपल्या सर्वांना सोडून गेला खरा, पण जाताना तोत्याच्या जगण्यातले टवटवीत सूर आपल्याला गुणगुणण्यासाठी मागे सोडून गेला आहे याचा विसर पडू नये.
 
 
 
Powered By Sangraha 9.0