रेल्वे, हडप्पा, मोहेंजोदडो आणि जॉन मार्शल

29 Jan 2022 13:29:13

hadappa
 
 
आज १०० वर्षांनंतर हडप्पा आणि मोहेंजोदडो ही सरस्वती सिंधू सभ्यतेमधली अतिशय प्रगत शहर होती नि सन पूर्व तीन हजार वर्षांनंतर सरस्वती नदी हळूहळू कोरडी पडल्यामुळे, तिथल्या नागरिकांना स्थलांतर करावं लागलं, हा सिद्धांत सर्वमान्य झाला आहे. फक्त भारतातले कथित बुद्धिमंत आणि विचारवंत सोडून. ते हे सत्य कधीच मान्य करणार नाहीत.
दि. १६ एप्रिल, १८५३ या दिवशी भारतात रेल्वे सुरू झाली, हे आपल्याला माहितच आहे. मुंबईहून सुटलेली ही तीन इंजिन आणि १४ डब्यांची पहिली गाडी, चारशे पाशिंजरांना घेऊन ४५ मिनिटांनी ठाण्याला पोहोचली. साधारणपणे दरवर्षी दि. १६ एप्रिलला या घटनेचं स्मरण वृत्तपत्र किंवा इतर माध्यमं करीतच असतात.
या घटनेमुळे देशभरात सर्वत्रच रेल्वे संबंधात एक जागृती निर्माण झाली. सत्ताधारी इंग्रज आणि संपूर्ण व्यापारी वर्गाला रेल्वेचं महत्त्व लक्षात आलं.ठिकठिकाणी रेल्वेमार्ग सुरु करण्याच्या योजना आखल्या जाऊ लागल्या. यावेळेस हेन्री बार्टल फ्रिअर हा कर्तबगार इंग्रज अधिकारी सिंध प्रांताचा चीफ कमिशनर होता. त्याने सिंध प्रांतातलं महत्त्वाचं बंदर जे कराची तिथपासून पंजाब प्रांताची राजधानी जे लाहोर, तिथपर्यंत रेल्वेमार्ग टाकण्याची महत्त्वाकांक्षी योजना सुरु केली. सन १८५५ मध्ये लाहोरपासून मुलतानपर्यंत रूळ टाकण्याचं काम सुरु झालं. रूळ टाकण्यासाठी खालची जमीन ठाकूनठोकून मजबूत करावी लागते. त्यासाठी माती आणि भाजक्या विटांचा चुरा वापरतात. प्रत्यक्ष काम करणाऱ्या कंत्राटदाराला स्थानिक मंडळींनी माहिती दिली की, आपल्या रेल्वेमार्गाच्या वाटेवरच हडप्पा नावाचं एक छोटसं गाव आहे. तिथे जुन्या गावाचे उद्ध्वस्त अवशेष आहेत नि त्या अक्षरश: हजारो विटा अशाच विखरुन पडल्या आहेत.
 
कंत्राटदाराला आनंदच झाला. त्याने त्या बेवारशी विटा मोडून त्यांच्या मलब्याने जमीन छान सपाट मजबूत करुन घेतली नि वर रूळ टाकले. आपण काय करीत आहोत, याची कुणालाच कल्पना नव्हती. ते उद्ध्वस्त गाव नि तिथल्या विटा इसवी सन पूर्व तीन हजार वर्षांपूर्वीच्या होत्या. आज हे हडप्पा रेल्वे स्थानक पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातल्या साहिवाल या शहरापासून २४ किमी अंतरावर आहे. आधुनिक हडप्पा गावाची लोकसंख्या अवघी १५ हजार आहे. ते प्राचीन उद्ध्वस्त हडप्पा गाव या आधुनिक गावापासून साधारण एक किमी अंतरावर आहे. पुरातत्त्वशास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार त्या प्राचीन गावाची लोकसंख्या २३ ते २५ हजार असावी. म्हणजे ते नुसतं गाव नसून नगर असावं. पण, हे सगळं उजेडात यायला आणखी ५० वर्षे अवकाश होता.
 
अलेक्झांडर कनिंगहॅम हा एक स्कॉटिश तरूण होता. लंडनमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करून तो ‘ईस्ट इंडिया कंपनी’च्या नोकरीत शिरला. कंपनी सरकारच्या सैन्यातल्या ‘बेंगॉल इंजिनिअर्स’ पथकातून तो ‘सेकंड लेफ्टनंट’ म्हणून भारतात आला, तेव्हा तो अवघा १९ वर्षांचा होता. इथे त्याची गाठ जेम्स प्रिन्सेप या विद्वानाशी पडली आणि त्याला इतिहास विषयाची गोडी लागली. जेम्स प्रिन्सेपने ‘ब्राह्मी’ आणि ‘खरोष्ठी’ या प्राचीन लिपींचा उलगडा करून मोठीच कामगिरी केली होती. पुढे कनिंगहॅम गव्हर्नर जनरल लॉर्ड ऑकलंड याचा ए.डी.सी. (अ‍ॅटेशे डि कॅम्प) म्हणजे कार्यवाह बनला. सैन्यातल्या विविध जबाबदाऱ्या पार पाडताना त्याने भारतभर खूप प्रवास केला. त्याच्या असं लक्षात आलं की, या देशामध्ये अशा अक्षरश: अगणित वास्तू आणि वस्तू आहेत की, ज्या अनमोल आहेत. त्यांचं सर्वेक्षण करून त्या जपल्या पाहिजेत, टिकवल्या पाहिजेत. पुनःपुन्हा त्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर प्रस्ताव मांडला की,असं सर्वेक्षण करणारी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करा. पण, प्रत्यक्षात घडून यायला १८६१ साल उजाडलं. १८५८ साली भारताचा राज्यकारभार ‘ब्रिटिश पार्लमेंट’ने कंपनी सरकारकडून स्वत:कडे घेतला. मग ‘बेंगॉल इंजिनिअर्स’चं नाव ‘रॉयल इंजिनिअर्स’झालं. १८६१ साली कनिंगहॅम त्या पथकातून मेजर जनरलच्या पदावरून निवृत्त झाला आणि त्याच वर्षी व्हॉइसरॉय लॉर्ड कॅनिंग याने ‘आर्किओलॉजिकल सर्व्हेयर टू गव्हर्नमेंट ऑफ इंडिया’ असं पद निर्माण करून त्या जागेवर कॅनिंगहॅमची नेमणूक केली.
 
१८६१ ते १८६५ आणि पुन्हा १८७० ते १८८५ या आपल्या भारतातल्या कार्यकाळात कॅनिंगहॅमने अनेक महत्त्वपूर्ण उत्खननं केली. त्यातलं सर्वात नावाजलेलं उत्खनन म्हणजे तक्षशीला. पंजाब प्रांतातलं तक्षशीला हे गाव म्हणजेच भारताचं प्रख्यात प्राचीन विद्यापीठ तक्षशीला, हे त्याने शोधून काढलं. सध्या हे गाव पाकिस्तानची राजधानी रावळपिंडी उर्फ इस्लामाबादपासून २५ किमी अंंतरावर आहे. अशा प्रकारे भारतात आधुनिक पुरातत्त्वशास्त्राचा पाया घालतानाच कनिंगहॅमने भारताच्या इतिहासाचं भरपूर विकृतीकरण करून ठेवलं. पण, आपल्या आजच्या लेखाचा विषय तो नाही.
 
१८८५ साली कनिंगहॅम निवृत्त होऊन इंग्लंडला परतल्यावर पुरातत्त्व क्षेत्रात बजबजपुरी झाली. अनेकांनी उत्खननं केली. त्यात सापडलेल्या मौल्यवान वस्तू खिशात घालून उत्खननं कार्य अर्धवट सोडली. केलेल्या कामाचा अहवाल नीट लिहिला नाही. पुढची १७ वर्षे अशीच गेली. १९०२ साली भारताचा व्हॉईसरॉय लॉर्ड कर्झन याने जॉन मार्शल या पंचवीशीतल्या तरण्याबांड पुरातत्त्वशास्त्राची ‘आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’चा प्रमुख म्हणून नेमणूक केली. जॉन मार्शल हा अतिशय काटेकोर, शिस्तबद्ध पद्धतीने काम करणारा मनुष्य होता. शिवाय उत्खननाच्या कामात फक्त इंग्रज किंवा अन्य गोऱ्या अधिकाऱ्यांबरोबरच स्थानिक लोकांना सामील करुन घेण्याचंही त्याच धोरण होतं. परिणामी तो लोकप्रिय झाला तरी सुरुवातीला पाच वर्षांपुरती झालेली त्याची नेमणूक वाढत-वाढत २५ वर्षं झाली. देवदत्त भांडारकर, राखालदास बंडोपाध्याय (बानर्जी), दयाराम सहानी, माधोस्वरूप वत्स, हिरानंद शास्त्री, काशिनाथ दीक्षित हे जॉन मार्शलचे भारतीय सहकारी पुढच्या काळात फारच मोठी मान्यता पावले.
 
१९१३ साली मार्शलने प्रथम तक्षशीलेच्या उत्खननाचं अर्धवट राहिलेले काम पुन्हा हाती घेतलं. १९२१ साली त्याने राखालदास बानर्जी करवी हडप्पाचं उत्खनन सुरु केलं. बानर्जीकडूनच त्याला समजलं की, हडप्पाच्या नैऋत्येला सिंध प्रांतात लारकाना शहरापासून २८ किमीवर मोहेंजोदडोे म्हणजे मृतांची टेकडी नावाचं ठिकाण आहे. तिथे हडप्पासारख्याच विटा सापडतात. पण, हडप्पापेक्षाही तिथले उद्ध्वस्त अवशेष खूपच विस्तृत परिसरात पसरलेले आढळतात. मार्शलने ताबडतोब दयाराम साहनी या आपल्या दुसऱ्या साहाय्यकाकरवी मोहेंजोदडोमध्ये उत्खनन सुरु केलं आणि भारताच्या इतिहासाला एक विलुप्त अध्याय पुन्हा प्रकाशात येऊ लागला. सुमारे पाच किमी एवढ्या विस्तीर्ण परिसरात पसरलेलं एक उत्कृष्ट शहरच भूगर्भातून किंवा मातीच्या ढिगाऱ्यांमधून बाहेर आलं. भारतात किंवा युरोपातही अशी अनेक शहरं गेल्या चारशे-पाचशे वर्षांत उभारलेली आपल्याला दिसतात की, तिथे प्रथम एक किल्ला असतो आणि मग त्या संरक्षक दुर्गाभोवती हळूहळू एक भरभराटलेलं नगर उभं राहतं, अगदी तसंच या मोहेंजोदडोमध्ये एक संरक्षक दुर्ग म्हणजे भुईकोट आहे नि त्याच्याभोवती वस्तीचे सात थर सापडले. म्हणजे एक सोडून दुसरं, तिसरं अशी सात किंवा थोडीशी एकावर एक अशी सात नगरं सापडली आहेत. सगळ्यांची नगररचना आधुनिक वाटेल इतकी उत्कृष्ट आहे. काटकोन चौकोनात आखलेले रस्ते, रुंद राजपथ, थोड्या कमी रुंद आडव्या गल्ल्या; पक्क्या भाजलेल्या विटांच्या दुमजली इमारती; प्रत्येक घरात किमान तीन खोल्या, स्वयंपाकघर आणि स्नानगृह, पाणी आणि सांडपाणी यांची उत्कृष्ट व्यवस्था; सार्वजनिक स्नानगृहे असा सगळा थाट आहे. दयाराम साहनी यांच्या नेतृत्वाखाली हे उत्खनन १९२२ साली झालं, म्हणजे १९२१ साली हडप्पा आणि १९२२ साली मोहेंजोदडो अशी ठिकाणं पाठोपाठच उजेडात आली. त्यांचा काळ इसवी सन पूर्व सुमारे अडीच ते तीन हजार वर्ष असा निश्चित झाला. म्हणजे लंडन या राज्यकर्त्यांच्या राजधानीत १७व्या शतकातसुद्धा रस्त्याकडेची गटारं उघडी असत नि दारूडे भरपूर पिऊन तराट होऊन त्यात पडत. यात बायकासुद्धा असत. हे वर्णन त्यांच्याच लोकांनी लिहून ठेवलेलं आहे. पण, वाघा-सापांचा आणि नागड्या सांधूचा, जादूगारांचा देश असणाऱ्या गुलाम भारतात पाच हजार वर्षांपूर्वी बंद गटरांची संकल्पना अस्तित्वात होती.
 
 
हे सगळं सिद्ध व्हायला मात्र १९२४ साल उजाडलं. हडप्पा आणि मोहेंजोदडोचा बारकाईने अभ्यास केल्यावर जॉन मार्शलच्या लक्षात आलं की, ही दोन्ही शहरं एकाच जीवनशैलीची आहेत, त्याने त्यांना नाव दिलं ‘इंडस सिव्हिलायझेशन’- ‘सिंधू सभ्यता.’ कारण, तो परिसर सिंधू नदीच्या खोऱ्यात येत होता. १९३४ साली जॉन मार्शल निवृत्त होऊन इंग्लंडला परतला.
 
१९४४ साली व्हॉईसारॉय लॉर्ड वेव्हेल याने मॉर्टिमर व्हीलर या इसमाला पुरातत्त्व खात्याचा प्रमुख म्हणून भारतात आणलं. हा माणूस आपल्या कामात कुशल होताच, शिवाय भारताच्या इतिहासाची इंग्रजांना अपेक्षित तोडमोड करण्यात तर तो भलताच कुशल होता. हडप्पा आणि मोहेंजोदडो ही द्रविड संस्कृतीची शहरं असून आक्रमक आर्यवंशीय लोकांनी ती उद्ध्वस्त केली असावीत, हा मिथ्य सिद्धांत शास्त्रीय सिद्धांत म्हणून प्रचलित करणारा हाच तो व्हीलर!
 
 
पुढे १९५० साली तर त्याने खोटेपणाची कमालच करुन सोडली, पाकिस्तान सरकारच्या विनंतीवरुन त्याने पाकिस्तानचा इतिहास आणि संस्कृतीची महती सांगणारं ‘फाईव्ह थाउजंड इयर्स ऑफ पाकिस्तान’ हे पुस्तकच लिहून प्रसिद्ध केलं. जो देश फक्त तीन वर्षांपूर्वी जन्मला होता, तो पाच हजार वर्ष प्राचीन आहे, असं ठणकावून सांगण्यासाठीच बहुधा १९५२ साली त्याला ‘सर’की देण्यात आली.
असो. आज १०० वर्षांनंतर हडप्पा आणि मोहेंजोदडो ही सरस्वती सिंधू सभ्यतेमधली अतिशय प्रगत शहर होती नि सन पूर्व तीन हजार वर्षांनंतर सरस्वती नदी हळूहळू कोरडी पडल्यामुळे, तिथल्या नागरिकांना स्थलांतर करावं लागलं, हा सिद्धांत सर्वमान्य झाला आहे. फक्त भारतातले कथित बुद्धिमंत आणि विचारवंत सोडून. ते हे सत्य कधीच मान्य करणार नाहीत. कारण, ते खुल्या विचारांचे नसून भाडोत्री आहेत.
 
Powered By Sangraha 9.0