एखादा व्यवसाय काही लाख रुपयांत सुरू होतो आणि काही वर्षांतच कोटी रुपयांची उड्डाणे घेण्यास सुरुवातसुद्धा करतो. १५-२० वर्षांपूर्वी १०० कोटी रुपयांची उलाढाल असणारी कंपनी शोधणे जरा अवघड होते. आता मात्र हजार कोटी रुपयांची उलाढाल करणार्या कंपन्यांच्या संख्या वाढलेल्या आहेत. अशीच एक कंपनी म्हणजे ‘स्विगी.’ स्वत:चं एकही हॉटेल नसतानादेखील अन्नपदार्थ क्षेत्रात ही कंपनी काही हजार कोटी रुपयांची उलाढाल करत आहे. अवघ्या तिशीतल्या संस्थापकांची ही कंपनी ‘ऑनलाईन फूड डिलिव्हरी’मध्ये शीर्षस्थानी आहे.
श्री हर्ष मॅजेती यांचा जन्म १९८८ मध्ये बंगळुरू येथे झाला. उद्योजकांच्या कुटुंबातून आलेल्या श्रीहर्ष मजेती याला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा लहानपणापासूनच होती. ‘बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अॅण्ड सायन्स, पिलानी’ येथून अभियंता म्हणून हर्षने पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. पुढे ‘आयआयएम-कोलकाता’ येथून ‘एमबीए’ केले. लंडनमध्ये ‘इन्व्हेस्टमेंट बँकर’ म्हणून काही काळ काम केल्यानंतर, श्रीहर्ष पुन्हा भारतात परतला. श्रीहर्षला प्रवासाची भारी आवड आहे. प्रवासाच्या प्रेमामुळे तो आशिया आणि युरोपमधील अनेक देश फिरला. या काळातील अनुभवामुळेच त्याचा उद्योजकीय प्रवास सुरू झाला.
शिक्षण पूर्ण झाल्यावर स्टार्टअपमध्ये हवे तसे काम न मिळाल्याने श्रीहर्षने स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. हर्षने आपल्या महाविद्यालयीन मित्र नंदन रेड्डी याला सोबत घेतले. नेमक्या कोणत्या क्षेत्रात ‘स्टार्टअप’ सुरू करता येईल, याविषयी त्यांनी अभ्यास सुरू केला. भरभराट होत असलेला भारतीय ‘ई-कॉमर्स’ उद्योग हा त्यांना योग्य वाटला. ‘लॉजिस्टिक’ आणि ‘शिपिंग डोमेन’च्या क्षेत्रात ‘स्टार्टअप’ सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यातून सुरू झाली ‘बंडल’ नावाची - एक कुरिअर सेवा अॅग्रीगेटर कंपनी. निव्वळ ‘सॉफ्टवेअर’ कंपनी किंवा फक्त ‘ऑफलाईन’ कंपनी सुरू न करता, या क्षेत्रातील स्पर्धात्मक वातावरणाचा फायदा मिळेल या हेतूने ‘बंडल’ सुरू करण्यामागचा विचार होता.
मात्र, एका वर्षातच ही कंपनी बंद करावी लागली. याचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे, ‘ई-कॉमर्स’चा तज्ज्ञ माणूस त्यांच्यासोबत नव्हता आणि दुसरे एक कारण म्हणजे, त्यांना या उद्योगातून आनंद मिळत नव्हता. कोणताही व्यवसाय करताना आनंद, समाधान मिळत नसेल, तर तो व्यवसाय आकारास येत नाही. पुन्हा नव्याने काहीतरी सुरू करण्याचा श्रीहर्ष आणि नंदन विचार करू लागले. एव्हाना ‘स्मार्टफोन’ हा प्रत्येकाच्या हातात खेळू लागला होता. या ‘स्मार्टफोन’चा वापर करुन काय व्यवसाय करता येईल, याचा ते विचार करु लागले. ‘ओला’, ‘उबेर’ सारख्या कंपन्या निव्वळ मोबाईल तंत्रज्ञानाचा वापर करून जागतिक दर्जाच्या बनल्या, ही ‘केसस्टडी’ त्यांनी अभ्यासली होती.
किंबहुना, या दोन कंपन्यांची तंत्रप्रणाली या दोघांसाठी आकर्षक केंद्रबिंदू होता. याचवेळी स्थानिक खाद्यपदार्थ ‘ऑनलाईन’ मागविणारे क्षेत्रसुद्धा विस्तारत होते. ‘फूड डिलिव्हरी’ उद्योगात आपण उतरायचे, हे श्रीहर्ष आणि नंदन यांनी निश्चित केले. मात्र, यामागे मोठा तांत्रिक व्याप होता. हा तांत्रिक व्याप सांभाळण्यासाठी राहुल जैमिनी यांची ‘स्मार्टफोन’साठी ‘वेबसाईट्स’ आणि अॅप्सच्या विकासासाठी ‘कोडर’ म्हणून नियुक्ती करण्यात आली. राहुल ‘मिंत्रा’मध्ये नोकरीस होता. त्याने ‘आयआयटी’मधून सॉफ्टवेअर इंजिनिअरची पदवी प्राप्त केली होती.
स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधी दि. १४ ऑगस्ट, २०१४ ही ‘स्विगी’ सुरु झाली. सुरुवातीला कोरमंगला, बंगळुरू येथे एका छोट्या जागेत ‘स्विगी’ कार्यालय उभारण्यात आले. ‘स्टार्टअप’ची सुरुवात झाली. २५ रेस्टॉरंट्स आणि सहा ‘डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह’ यांच्या सहकार्याने आजुबाजूस ‘फूड डिलिव्हरी’ सुरु करण्यात आली. ‘स्विगी’ने अनेक ‘रेस्टॉरंट्स’ मालकांमध्ये या आपल्या नवीन ‘फूड डिलिव्हरी’ प्रणालीविषयी विश्वास निर्माण केला.
सुरुवातीच्या ‘सेटअप’पासून, कंपनीने २५ टक्के दर महिन्याला वाढीसह विस्तार केला. त्यांचे ‘बिझनेस मॉडेल’ अखंडपणे काम करत असल्याचे पाहून, अनेक गुंतवणूकदारांना या उपक्रमासाठी निधी देण्यात रस निर्माण झाला आणि ‘स्विगी’ला ‘एक्सेल’ (अललशश्र) आणि ‘सेफ’ (डअखऋ) भागीदारांकडून १५ कोटी रुपयांचा पहिला ‘चेक’ मिळाला. तोपर्यंत, ‘स्विगी’कडे १०० पेक्षा जास्त ‘रेस्टॉरंट्स’ होते आणि ते महिन्याला ७० हजारांहून अधिक ‘ऑर्डर’ वितरित करत होते. ‘स्विगी’ने ‘लॉजिस्टिक नेटवर्क’ मजबूत करण्यावर भर दिला.
‘थर्ड-पार्टी लॉजिस्टिक’ कंपन्यांसोबत सहकार्य करार करून काहीप्रमाणात ‘लॉजिस्टिक नेटवर्क’चे ‘आऊटसोर्सिंग’ केले. पुढे सिंगापूर आणि न्यूयॉर्क स्थित कंपन्यांनीदेखील ‘स्विगी’मध्ये गुंतवणूक केल्या. ‘नॅस्पर्स लिमिटेड’ ही दक्षिण आफ्रिकेतील बहुराष्ट्रीय ग्राहक इंटरनेट कंपनी आहे. तिच्या सहकार्याने ‘स्विगी’ने मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली. फेब्रुवारी २०१९ मध्ये, ‘स्विगी’ने लहान ‘स्टार्टअप्स’ घेण्यास सुरुवात केली आणि सर्वप्रथम बंगळुरू-आधारित ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ तंत्रज्ञानावर आधारित ‘स्टार्टअप किंट आयओ’ (घळपीं.ळे) ताब्यात घेण्यात आले.
‘स्विगी’ सुरू झाल्यापासून तीन वर्षांत सहापट वाढीसह, ग्राहकांची समज आणि अनुकूलतेमुळे ‘स्विगी’ भारतीय खाद्य तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर होती. २०१७ पर्यंत, ‘स्विगी’ अत्यंत भिन्न सेवा आणि ‘ऑफर’ ग्राहकांना सादर करत होते. काळाची गरज समजून, ‘कोअर’ अभियांत्रिकी, ‘ऑटोमेशन’, ‘डेटा सायन्सेस’, मशीन ‘लर्निंग’ आणि वैयक्तिकीकरण यामध्ये ‘स्विगी’ने गुंतवणूक वाढवली. ‘क्लाऊड किचन’ आणि ‘स्विगी पॉप’ सुरु केले.
२०१८ मध्ये ‘स्विगी’ने ‘स्विगी सुपर’, ‘स्विगी स्टोअर’, ‘स्विगी गो’, ‘स्विगी डेली’ अशा अभिनव सेवा ग्राहकांना देण्यास सुरुवात केली. २०१९ हे वर्ष ‘स्विगी’साठी चांगलंच लाभदायी ठरलं. एका वर्षांत १०० शहरांमध्ये असलेली ‘स्विगी’ ५०० शहरांमध्ये पोहोचली. सध्या ती ५०० शहरांपेक्षा अधिक ठिकाणी कार्यरत आहे. १ लाख, २५ हजार ‘रेस्टॉरंट्स’ सोबत ‘स्विगी’चे ‘टाय-अप’ आहे. पाच हजारांपेक्षा अधिक कर्मचारी वर्ग आणि दोन लाखांहून अधिक ‘डिलिव्हरी बॉईज’ना ‘स्विगी’ रोजगार देत आहे.
२०२०च्या अहवालानुसार, ‘स्विगी’चा एकूण महसूल २ लाख, ७७६ कोटी रुपये इतका होता. कोरोना काळात निव्वळ ‘होम डिलिव्हरी’ला मागणी असल्याने यामध्ये किती वाढ झाली असेल, याचा विचार केलेलाच बरा! ‘स्विगी’ आपल्या सोबत काम करणार्यांना ‘ग्रुप पर्सनल अपघात विमा’, ‘ग्रुप वैद्यकीय विमा’, ‘प्री लोडेड फूड कार्ड’, ‘मोबाईल अलाऊन्स’, ‘पितृत्व रजा’, गुंतवणूक आणि करविषयी मोफत सल्ला देण्याचा दावा करते.
एक साधी कल्पना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रत्यक्षात उतरवली, तर किती व्यापक स्वरुप धारण करते, हाच धडा ‘स्विगी’ आपल्याला देते. त्यामुळे सतत नावीन्याचा ध्यास घ्या आणि अपयश आले, तरी आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा मात्र करत राहा.