भारतीय महिला हॉकी संघाचे १०० सामन्यांमध्ये प्रतिनिधित्त्व करणाऱ्या गुरजीत कौरच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाबद्दल...
गेल्या काही वर्षांत भारतीय महिलांनी अनेक क्षेत्रांमध्ये आघाडी घेतल्याचे पाहायला मिळते. मागील काही दशकांमध्ये सामाजिक, राजकीय, औद्योगिक अशा काही पुरुषप्रधान समजल्या जाणाऱ्या क्षेत्रांमध्ये महिलांनी स्वकर्तृत्वाने आपले वर्चस्व सिद्ध केले. यात विशेष म्हणजे क्रीडा क्षेत्रातही महिला संघाच्या कामगिरीमध्ये बदल दिसून येतो. आधी भारतीय महिला क्रिकेट संघाने हळूहळू जागतिक क्रिकेटमध्ये देशाचे नाव उंचावले आहे, तर भारतीय महिला हॉकी संघानेदेखील गेल्या काही वर्षांमध्ये उत्तम कामगिरी करत जगाचे लक्ष स्वतःकडे वेधण्यास भाग पाडले आहे. अशातच सध्या सुरु असलेल्या महिला आशियाई चषक २०२२ स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने उपांत्य फेरीत धडक दिली. अर्थात यामध्ये संघाला पराभव स्वीकारावा लागला असला तरी, या स्पर्धेत एका नावाची चांगलीच चर्चा झाली. ती खेळाडू म्हणजे गुरजीत कौर. तिने ‘ड्रॅग फ्लिकर’ म्हणून संघात चांगली कामगिरी बजावत देशासाठी १०० सामने खेळण्याचा कीर्तिमान प्राप्त केला आहे. हॉकीमध्ये पाऊल टाकण्यापासून ते इथपर्यंतचा तिचा हा प्रवास उल्लेखनीय तसेच प्रेरणादायी आहे.
दि. २५ ऑक्टोबर, १९९५ मध्ये पंजाबच्या अमृतसरमधील मियादी कलान या छोट्याशा खेड्यातील एका शेतकरी कुटुंबात गुरजीत कौरचा जन्म झाला. तिला एक प्रदीप कौर नावाची एक मोठी बहीणदेखील आहे. वडील सतनाम सिंह आणि आई हरजिंदर कौर हे शेतकरी असले तरीही आपल्या मुलींनी चांगले शिक्षण घ्यावे, अशी त्यांची इच्छा होती. सुरुवातीला गावातल्याच सरकारी शाळेत मुलीला दाखलाही मिळाला. मात्र, पुढे त्यांनी मुलींना अजनाळ्यातील एका खासगी शाळेत दाखल केले. विशेष म्हणजे, यासाठी त्यांचे वडील दोघींना सायकलवरून १३ किमी दूर असलेल्या शाळेत घेऊन जात आणि शाळा संपेपर्यंत थांबत असत. मात्र, त्यानंतर तिच्या वडिलांनी दोघींना शाळेपासून ७० किमी अंतरावर असलेल्या तरनतारन जिल्ह्यातील कैरॉनमधील बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला. वडिलांच्या याच निर्णयामुळे गुरजीतची हॉकीकडे ओढ लागली. कारण, पंजाबमधील मुलींसाठी सर्वात जुनी हॉकी नर्सरी म्हणून ‘कैरॉन बोर्डिंग स्कूल’ची ओळख होती. त्यामुळे आधी छंद म्हणून तिने हॉकी खेळण्यास सुरुवात केली. गुरजीतच्या हॉकीतील कौशल्यामुळे तिला शाळेच्या सरकारी शाखेत स्थान मिळाले आणि तिच्या खाण्यापिण्याचा व शिक्षकांचा खर्च हा शाळेने उचलला. दोघी बहिणींना मिळालेल्या या संधीमुळे त्यांच्या पालकांची आर्थिक समस्या दूर झाली. २०११ पर्यंत गुरजीतने आपले शिक्षण आणि प्रशिक्षण सुरुच ठेवले. यामधील ताळमेळ बसवण्यास तिला सुरुवातीला दाचानी आल्या, मात्र तरीही तिने कधी जिद्द सोडली नाही.
पुढे २०१४ मध्ये गुरजीतला पहिल्यांदा भारतीय संघात खेळण्याची संधी धावून आली होती. तिला वरिष्ठ राष्ट्रीय शिबिरासाठी बोलावण्यात आले होते. मात्र, तेव्हा तिला संघात स्थान मिळू शकले नाही. मात्र, यानंतर ती खचून गेली नाही, तर तिने स्थानिक पातळीवर चांगली कामगिरी केली. २०१६ मध्ये माजी डच खेळाडू टून सिपमनच्या मार्गदर्शनाखाली ‘ड्रॅग फ्लिकर’ या शैलीत कौशल्य प्राप्त केले. तिच्या याच शैलीने त्यानंतर जगभरात ओळख मिळवून दिली. अनेक स्पर्धांमध्ये तिने उत्तम कामगिरी करत २०१७ मध्ये भारतीय संघात प्रवेश मिळवला. पहिल्या संधीचे सोने करत तिने यावर्षी झालेल्या आशिया चषक स्पर्धेत आठ गोल करत प्रसिद्धी मिळवली. त्यानंतर २०१८ मध्ये डच प्रशिक्षक सजोर्ड मारीज्नेने संघाचा प्रशिक्षक म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर डचमनने गुरजीतला पेनल्टी कॉर्नरची समस्या सोडवण्यात मदत केली. २०१८ मध्ये झालेल्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत तिसरी सर्वाधिक गोल करणारी खेळाडू बनली. विशेष म्हणजे तिने उपांत्यपूर्व फेरीत कझाकिस्तानविरुद्ध हॅटट्रीकसह सात ‘पेनल्टी कॉर्नर’चे रुपांतर गोलमध्ये केले. त्यानंतर आता हीच तिची ओळख बनली आहे. यानंतर ऑस्ट्रेलियात झालेल्या ‘कॉमनवेल्थ गेम्स २०१८’ मध्येही प्रभावी कामगिरी केली. गुरजीत ही भारतीय हॉकी संघाची बचावपटू आणि ‘ड्रॅग फ्लिकर’ म्हणून संघाचा एक भाग आहे. विशेष म्हणजे नुकतेच ओमानमधील मस्कत येथे झालेल्या महिला आशिया चषक २०२२ मध्ये १०० आंतरराष्ट्रीय सामने पूर्ण केले. यापुढेही तिची अशी यशस्वी कामगिरी सुरु राहो, यासाठी तिला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा...