कोकणातील सागरी कासवांना लावले 'सॅटेलाईट ट्रान्समीटर'; भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील पहिलाच प्रयोग

25 Jan 2022 12:55:20
Kokan Sea Turtle
 
 
 
मुंबई : कोकण किनारपट्टीवर विणीसाठी येणाऱ्या सागरी कासवांना (Konkan Sea Turtle) 'सॅटेलाईट ट्रान्समीटर' लावून त्यांच्या स्थलांतराचा अभ्यास करण्यास सुरुवात झाली आहे. या अभ्यासाकरिता २५ जानेवारी रोजी मध्यरात्री दोन कासवांना सॅटेलाईट ट्रान्समीटर लावून त्यांना पुन्हा समुद्रात सोडण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर प्रथमच समुद्री कासवांना 'सॅटेलाईट ट्रान्समीटर' लावून त्यांचा स्थलांतराचा अभ्यास करण्यात येत आहे. हा अभ्यासप्रकल्प कांदळवन कक्ष, मँग्रोव्ह फाऊंडेशन आणि 'भारतीय वन्यजीव संस्थान'मार्फत (डब्लूआयआय) राबविण्यात आला आहे.
 
 
 
दरवर्षी नोव्हेंबर ते मार्च महिन्यादरम्यान 'ऑलिव्ह रिडले' प्रजातीची मादी कासवे कोकण किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी येतात. अरबी समुद्रातील त्यांचा अधिवास आणि स्थलांतर जाणून घेण्यासाठी त्यांना 'सॅटेलाईट ट्रान्समीटर' लावण्याचा निर्णय 'मँग्रोव्ह फाऊंडेशन'ने घेतला. याअंतर्गत पाच मादी कासवांना 'सॅटेलाईट ट्रान्समीटर' लावण्यात येणार आहेत. यामधील दोन कासवांना मंगळवारी मध्यरात्री 'सॅटेलाईट ट्रान्समीटर' लावण्यात आले. मंडणगड तालुक्यातील वेळासच्या किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी आलेल्या 'ऑलिव्ह रिडले' मादी कासवाला डब्लूआयआयचे शास्त्रज्ञ डॉ.आर.सुरेश कुमार यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत 'सॅटेलाईट ट्रान्समीटर' लावण्यात आले. तिच्या पाठीवर हे ट्रान्समीटर बसवण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी तिला पुन्हा समुद्रात सोडण्यात आले. पश्चिम किनारपट्टीवर प्रथमच सागरी कासवाला 'सॅटेलाईट ट्रान्समीटर' लावण्यात तिचे नाव ‘प्रथमा’ ठेवण्यात आले. यावेळी कांदळवन कक्षाचे रत्नागिरी वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पाटील, मँग्रोव्ह फाऊंडेशनचे उपसंचालक डॉ. मानस मांजरेकर, सागरी जीवशास्त्रज्ञ हर्षल कर्वे, धनश्री बगाडे, संशोधन समन्वयक मोहन उपाध्ये उपस्थित होते.
 
 
 
याच चमूच्या माध्यमातून दापोली तालुक्यातील आंजर्ले किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी आलेल्या 'ऑलिव्ह रिडले' मादी कासवाला 'सॅटेलाईट ट्रान्समीटर' लावण्यात आले. तिचे नामकरण ‘सावनी’ असे करण्यात आले असून मंगळवारी दुपारी तिला समुद्रात सोडण्यात आले. या कासवांच्या स्थलांतरावर 'डब्लूआयआय’चे संशोधक नजर ठेवून असणार आहेत. 'सॅटेेलाईट ट्रान्समीटर' लावलेल्या मादी श्वास घेण्यासाठी समुद्राच्या पृष्ठभागावर आल्यानंतर 'सॅटेलाईट ट्रान्समीटर' हे त्यांच्या स्थानांचे संकेत उपग्रहाला पाठवतील. त्यानंतर संशोधकांना त्यांच्या स्थानांची माहिती मिळेल. या प्रकल्पाचा खर्च ९ लाख ८७ हजार रुपयांचा असून याअंतर्गत अजून तीन माद्यांना येत्या काळात 'सॅटेलाईट ट्रान्समीटर' लावणार असल्याची माहिती ‘कांदळवन कक्षा’चे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विरेंद्र तिवारी यांनी दिली.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0