मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाची समृद्ध परंपरा असलेल्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा टिपू सुलतानच्या उदात्तीकरणाचा प्रयत्न होताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे, राज्याची राजधानी असलेल्या मुंबई महापालिका क्षेत्रामधील मालाडच्या मालवणी परिसरामध्ये बांधण्यात आलेल्या एका क्रीडा मैदानाचे ‘वीर टिपू सुलतान क्रीडासंकुल’ असे नामकरण करण्याचे प्रयत्न सत्ताधारी काँग्रेसकडून केले जात असल्याचे दिसून येत आहे. स्थानिक आमदार आणि काँग्रेसचे नेते तथा मुंबई शहराचे पालकमंत्री असलम शेख यांच्या आमदार निधीतून हे सर्व काम पूर्णत्वास येत आहे. याचा लोकार्पण सोहळा बुधवार, दि. 26 जानेवारी रोजी करण्यात येणार असल्याच्या आशयाचे फलक मालवणी परिसरात लावण्यात आले आहेत. हा सर्व प्रकार होत असला, तरी आमची हिंदुत्वाची भूमिका कायम असल्याच्या वल्गना करणाऱ्या शिवसेनेने मात्र यावर सोयीस्कररीत्या मौन बाळगले आहे.
स्थानिकांसह अनेकांचा विरोध
मालवणी परिसरात टिपूचे नाव देऊन होत असलेल्या क्रीडा संकुलाच्या लोकार्पण कार्यक्रमावर आता टीकेची झोड उठवली जात आहे. मुंबईत टिपू सुलतानच्या उदात्तीकरणाच्या या प्रयत्नामुळे स्थानिक नागरिक, विविध सामाजिक कार्यकर्त्यांसह समाजाच्या अनेक स्तरांमधून या प्रकारचा तीव्र शब्दांत निषेध केला जात आहे. आमचा टिपूच्या नावाला विरोध असून क्रीडा संकुलाच्या उभारणीला आक्षेप नाही, अशी आक्रमक भूमिका स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
राज्य छत्रपतींचे मात्र जयजयकार टिपू सुलतानचा!
महाराष्ट्रात आणि विशेषतः मुंबईत मागील काही महिन्यांपासून विविध ठिकाणांना टिपू सुलतानचे नाव देण्याच्या मागणीवरून राजकारण रंगताना दिसून येत आहे. काही महिन्यांपूर्वी गोवंडीमधल्या एका उद्यानाला शिवसेनेच्या ‘एम-पूर्व’ प्रभाग क्र. 136 मधील नगरसेविकेने टिपू सुलतानचे नाव देण्यात यावे, अशी मागणी केली होती. मात्र, तेव्हा या मागणीवर भाजपकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला होता. हिंदूंचा ज्याने क्रूर पद्धतीने छळ केला, अशा हिंदूद्वेष्ट्या टिपू सुलतानचे नाव वॉर्ड क्र. 136 च्या उद्यानाला द्यावे, अशी शिवसेनेने मागणी केली आहे. जनाबसेनेची ही मागणी अत्यंत चमत्कारिक आहे, अशी टीका मुंबई भाजपतर्फे करण्यात आली होती.
कर्नाटकात शिवरायांची अवहेलना तर टिपूचा सन्मान
डिसेंबर 2021 मध्ये कर्नाटकाची राजधानी असलेल्या बंगळुरुमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा घृणास्पद प्रकार करण्यात आला होता. तत्कालीन परिस्थितीत या सर्व प्रकारात स्थानिक काँग्रेस नेत्यांचा अप्रत्यक्ष, तर काही काँग्रेस कार्यकत्यांचा थेट सहभाग असल्याचे आरोप प्रत्यारोप करण्यात आले होते. काँग्रेसची सत्ता असलेल्या महाराष्ट्रात आता उघडपणे टिपूचा उल्लेख वीर टिपू सुलतान असा करत त्याचे नाव क्रीडा संकुलाला देण्याचे प्रयत्न काँग्रेसतर्फे करण्यात येत आहेत. त्यामुळे कर्नाटकात शिवरायांचा अपमान आणि महाराष्ट्रात टिपूचा सन्मान अशी दुहेरी भूमिका काँग्रेसकडून घेतली जात असल्याचे दिसून येत आहे.
सदर संकुल कांदळवनाच्या जागेवर!
सदरील संकुलाच्या कामाला एक वर्षांपासून सुरुवात करण्यात आलेली आहे. या मैदानात टेनिस, क्रिकेट खेळण्याची सुविधा करून देण्यात आली आहे. मात्र, महत्त्वपूर्ण बाब म्हणजे हे मैदान कांदळवनाच्या जागेवर भराव टाकून अनधिकृतरित्या उभारण्यात आले आहे. या सर्व प्रकाराला स्थानिक लोकप्रतिनिधींसह काही वरिष्ठ नेत्यांचाही आशीर्वाद आहे, अशी भूमिका काही स्थानिक नागरिकांनी नाव न घेण्याच्या अटीवर दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना मांडली.
तुष्टीकरणाचे खेळ हा सत्ताधाऱ्यांचा अजेंडा
मुंबईसह राज्यभरात काही विशिष्ट समाज घटकांचे तुष्टीकरण करण्याचे प्रयत्न सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून केले जात आहेत. मालाड-मालवणी भागात मागील अनेक वर्षांपासून स्थानिक हिंदूंना त्या भागातून हद्दपार करण्याचे डाव आखले जात आहेत. हिंदू समाजाला छळण्याचे, त्यांच्या मालमत्तांना नुकसान पोहोचविण्याचे प्रयत्न सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने काही समाजघटक करत आहेत. मात्र, अशाप्रकारे मुंबईसह महाराष्ट्रातील हिंदूंसह इतर कुठल्याही घटकाला अशाप्रकारे हद्दपार करण्याचे सत्ताधाऱ्यांचे मनसुबे आम्ही कदापि पूर्ण होऊ देणार नाहीत.
- आ. मंगलप्रभात लोढा, अध्यक्ष, मुंबई, भाजप
मालवणीत हिंदू-बौद्ध असुरक्षित
मालवणी परिसरात मागील काही वर्षांपासून हिंदू आणि बौद्ध समाज भीतीच्या दडपणाखाली जगत आहे. या भागात हिंदूंना आणि बौद्धांना मागील काही कालावधीपासून जाणीवपूर्वक ‘टार्गेट’ करण्यात येत आहे. आमच्या घरे, इमारती, मालमत्ता या ठिकाणी असुरक्षित असून काही घटकांमुळे आमच्या जीवालाही आता धोका निर्माण झाला आहे. काही विशिष्ट घटकांकडून अन्य समाजाची प्रार्थना मंदिरे अनधिकृतरित्या पाडण्याचे कामही या ठिकाणी राजरोसपणे केले जात आहेत.
-शुभांगी जाधव, सामाजिक कार्यकर्त्या, मालवणी
आक्षेप उद्यानाला नाही, पण नावाला आहे!
राज्यात अनेक थोर व्यक्तिमत्त्व होऊन गेली त्यांचे नाव या मैदानाला देण्यात यावे, अशी आमची आणि स्थानिकांची मागणी आहे. टिपू सुलतान हा काही महाराष्ट्राचा सुपुत्र नव्हता, तर तो एक आक्रमणकारी राजा होता आणि तो हिंदूविरोधी होता. त्यामुळे अशांची नावे देण्यापेक्षा महाराष्ट्रासाठी सदैव श्रद्धास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, पराक्रमी पहिले बाजीराव पेशवे, चिमाजीअप्पा यांचे नाव देण्याची आमची मागणी आहे.
- दीपक कांबळे, स्थानिक