मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात विविध मंत्रालये आणि विभाग नावीन्यपूर्ण संकल्पनांसह आपापले चित्ररथ सादर करत असतात. या वर्षी भारतीय टपाल विभागानेदेखील अत्यंत आगळ्यावेगळ्या पद्धतीने रंगीबेरंगी चित्ररथाची रचना केली आहे. भारतीय टपाल विभाग गेली १६७ वर्षे देशाची सेवा करीत आहे. संपूर्ण देश यावर्षी स्वातंत्र्यप्राप्तीला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अमृतमहोत्सव साजरा करत असताना भारतीय टपाल विभागाने प्रजासत्ताक दिनाच्या चित्ररथातून विभागात कार्यरत तसेच टपाल कार्यालयांच्या माध्यमातून महिला सशक्तीकरणाप्रति कटिबद्धता पुन्हा अधोरेखित केली आहे.
महिला सशक्तीकरणाच्या निश्चयाची ७५ वर्षे ही टपाल विभागाच्या या वर्षीच्या चित्ररथाच्या देखाव्याची मध्यवर्ती संकल्पना आहे. भारतीय टपाल विभागाचा आधुनिक चेहरा आणि सशक्त संपर्क सेवा ठळकपणे दाखविण्यासाठी या चित्ररथात संपूर्ण महिला कर्मचाऱ्यांद्वारे संचलित कार्यालये दर्शविण्यात आली आहे. या चित्ररथावर हजारो ग्राहकांचा विश्वास असलेल्या ‘स्पीड पोस्ट’, ‘ई-वाणिज्य’, ‘एटीएम कार्ड्स’ यांसारख्या सेवा उभारण्यात आल्या आहेत तसेच समाजाप्रति बांधिलकी जपणारी दिव्यांग-स्नेही रॅम्प सुविधेने सुसज्जित असलेली टपाल कार्यालये दर्शविण्यात आली आहेत.
चित्ररथाच्या मागच्या भागात, पंतप्रधानांच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ उपक्रमाअंतर्गत सुरु करण्यात आलेल्या ’सुकन्या समृद्धी योजने’वर भर देणाऱ्या श्रीनगर येथील तरंगत्या टपाल कार्यालयाचा नमुनादेखील ठेवण्यात आला आहे. या चित्ररथाचे आणखी एक वेगळेपण म्हणजे रथाच्या खालील भागात खऱ्या पोस्टमन आणि पोस्ट वुमनच्या उंचीचे पुतळे बसविण्यात आले आहेत. भारतीय टपाल विभागामध्ये फार पूर्वीच्या काळी असलेले हरकारे, त्यानंतर सायकलवरून घरोघरी जाणारे पोस्टमन आणि आता ई-बाईकवरून फिरणारे आधुनिक पोस्टमन अश्या टपाल विभागाच्या प्रवासाचे प्रतीक म्हणून हे पुतळे बसविण्यात आले आहेत.
भारतीय टपाल विभागाच्या या चित्ररथाची मध्यवर्ती संकल्पना आणि आरेखन टपाल विभागाचे सचिव विनीत पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली असून या कार्यात मुंबई विभागाच्या मुख्य पोस्ट मास्तर स्वाती पांडे आणि इतर काही अधिकाऱ्यांनी सर्जनशील सूचनांचे योगदान दिले आहे.