एका हिंदू मुलीस ख्रिस्ती मिशनऱ्यांकडून दिल्या गेलेल्या त्रासाबद्दल माध्यमांनी जे मौन बाळगले, त्याबद्दल समाजमाध्यमांवर संताप व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, या आत्महत्या प्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडू पोलिसांना फटकारले आहे. सदर व्हिडिओ घेणाऱ्यास त्रास देण्यापेक्षा कोणत्या परिस्थितीत त्या अल्पवयीन मुलीस आत्महत्या करावी लागली, यावर आपले लक्ष केंद्रित करावे, असे मद्रास उच्च न्यायालयाने सुनावले.
एका अल्पवयीन हिंदू मुलीने ख्रिश्चन शाळेमध्ये केल्या जाणाऱ्या धर्मांतराच्या सक्तीला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तामिळनाडू राज्यातील तंजावर येथे नुकतीच घडली. शाळेमध्ये केल्या जात असलेल्या धर्मांतराच्या सक्तीमुळे गेल्या दि. ९ जानेवारी रोजी त्या अल्पवयीन मुलीने विषप्राशन केले. त्या मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, अखेर गेल्या दि. २० जानेवारी रोजी त्या मुलीची प्राणज्योत मालविली. त्या दुर्दैवी मुलीचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर ‘व्हायरल’ झाल्यानंतर या घटनेबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटू लागली. पण, ज्या ख्रिश्चन शाळेमध्ये त्या मुलीवर धर्मांतराची सक्ती करण्यात आली होती, त्या शाळेकडून वा चर्चकडून या घटनेसंदर्भात मात्र मौन बाळगण्यात आले. तसेच या घटनेबाबत माध्यमांनीही अळीमिळी गुपचिळीचे धोरण अवलंबिल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे.
आत्महत्या केलेल्या त्या हिंदू मुलीने सदर व्हिडिओमध्ये, शाळेने आपल्यावर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणला. ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यास पुढील शिक्षणाची सोय करण्यात येईल, असे शाळेकडून सांगण्यात आले. पण, तसे करण्यास नकार दिल्याने माझा छळ केला जाऊ लागला, असा आरोप केला होता. त्या मुलीचा हा व्हिडिओ सर्वत्र ‘व्हायरल’ झाल्यानंतर त्याबद्दल अधिक तपास करण्याऐवजी त्या व्हिडिओच्या खरेपणाबद्दल शंकाकुशंका उपस्थित करण्यात येऊ लागल्या. सक्तीच्या धर्मांतर करण्याच्या या प्रकारासंदर्भात चर्चला आणि सदर शाळेला जाब विचारण्याऐवजी माध्यमांकडून सदर व्हिडिओच्या सत्यासत्यतेसंदर्भात जास्त चर्चा केली गेली. सदर व्हिडिओ ‘फेक’ असल्याचेही आरोप करण्यात आले.
या सर्व प्रकाराबद्दल त्या दुर्दैवी मुलीच्या आईने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. “माझ्या मुलीने जो मृत्यूपूर्व जबाब दिला आहे, तो खोटा आहे, असे तुम्हाला म्हणावयाचे आहे का,” असा प्रश्न त्या मातेने माध्यमांना विचारला. या घटनेबाबत माध्यमांनी चर्चला धार्जिणी भूमिका घेतली त्याबद्दल नेटिझन्सनी तीव्र नाराजी व्यक्त केली. एका हिंदू मुलीस ख्रिस्ती मिशनऱ्यांकडून दिल्या गेलेल्या त्रासाबद्दल माध्यमांनी जे मौन बाळगले, त्याबद्दल समाजमाध्यमांवर संताप व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, या आत्महत्या प्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडू पोलिसांना फटकारले आहे. त्या दुर्दैवी मुलीच्या व्हिडिओच्या सत्यतेचा शोध घेत बसण्यापेक्षा आणि सदर व्हिडिओ घेणाऱ्यास त्रास देण्यापक्षा कोणत्या परिस्थितीत त्या अल्पवयीन मुलीस आत्महत्या करावी लागली, यावर आपले लक्ष केंद्रित करावे, असे मद्रास उच्च न्यायालयाने सुनावले. सदर दुर्दैवी हिंदू मुलीच्या मृत्यूपूर्व जबाबात आणि पोलिसांमध्ये जो गुन्हा नोंदविण्यात आला त्यामध्ये, धर्मांतरासाठी झालेल्या छळातून त्या मुलीने दि. ९ जानेवारीस आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, असा स्पष्ट उल्लेख असताना खरे म्हणजे पोलिसांनी त्या दिशेने प्रयत्न करायला हवा.
हा सर्व प्रकार लक्षात घेता गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न पोलीस यंत्रणेकडून होत असल्याचे दिसत आहे. त्या मुलीचा जबाब असतानाही या आत्महत्येमागे धर्मांतराचा प्रकार नसल्याचे तंजावर पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले, यास काय म्हणायचे! पण, या प्रकरणी वाढत चालेल दबाव लक्षात घेऊन यासंदर्भात धर्मांतरासह सर्व बाजूंचा विचार करून तपास करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षकांकडून सांगण्यात आले. तामिळनाडूमधील द्रमुक सरकार धर्मांतराची सक्ती केल्यामुळे एका अल्पवयीन हिंदू मुलीस आत्महत्या करावी लागली, याचा मुळापासून तपास करून या घटनेस जबाबदार असलेल्या शाळेविरुद्ध आणि ख्रिस्ती धर्मप्रसारकांविरुद्ध कारवाई न करता, त्यांच्या कृत्यावर पांघरूण घालण्याचा कसा प्रयत्न करीत आहे, ते या घटनेवरून दिसून येते.
द्रमुक सरकारचे हुकूमशाही वर्तन!
तामिळनाडूमधील द्रमुक सरकार एखाद्या हुकूमशाही राजवटीप्रमाणे वागत आहे की, काय असे तेथे घडणाऱ्या घटनांवरून दिसून येत आहे. तामिळनाडू सरकारने राज्यातील गरीब जनतेला ‘पोंगल’ सणानिमित्त काही अन्नधान्य आणि हा सण साजरा करण्यासाठी लागणारे पदार्थ भेटवस्तूंच्या स्वरूपात दिले. आपण राज्यातील जनतेला किती उपकृत केले, असा स्टॅलिन सरकारचा समज झाला असला तरी जे पदार्थ जनतेला देण्यात आले, त्यांचा दर्जा त्या सरकारने तपासून पाहिला होता का? या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असेच आहे. ‘पोंगल’साठी दिलेल्या पदार्थांमध्ये चिंचेचाही समावेश होता. एका नागरिकास जी चिंच देण्यात आली होती, त्यामध्ये मेलेली पाल आढळली. त्या नागरिकाने या संदर्भात तक्रार केली असता, पोलिसांनी तक्रार करणाऱ्या नागरिकासच अटक केली. ‘पोंगल’ सणानिमित्त तामिळनाडू सरकारने शिधापत्रिकेवर हा सण साजरा करण्यासाठी २० वस्तू देऊ केल्या होत्या. पण, त्या वस्तूंचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याच्या नागरिकांच्या आणि अण्णाद्रमुक आणि भाजप कार्यकर्त्यांच्या तक्रारी होत्या. नागरिकांना सरकारने ‘पोंगल’साठी भेटवस्तू देण्याची जी योजना आखली होती, ती पूर्णपणे फसली असल्याचा आरोप अण्णाद्रमुक आणि भाजपने केला आहे. या किराणा वस्तू चढ्या भावाने खरेदी करण्यात आल्या, त्यांचा दर्जाही निकृष्ट होता आणि या सर्व प्रकारांमध्ये ३० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी केला आहे. जे पदार्थ दिले गेले, त्यामध्ये अळ्या आढळून आल्या, अशीही माहिती यानिमित्ताने बाहेर आली आहे. चिंचेमध्ये मेलेली पाल सापडल्याची तक्रार केल्याबद्दल एम. नंदन या अण्णाद्रमुकच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. खोट्या बातम्या पसरवीत असल्याबद्दल विविध कलमांखाली त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. या घटनेमुळे झालेल्या मानहानीमुळे एम. नंदन यांचा मुलगा कुप्पुस्वामी याने पेट्रोल ओतून स्वतःला जाळून घेतले. त्यात त्याचा मृत्यू झाला. विरोधकांनी आपल्याविरुद्ध भाष्य केल्यास तामिळनाडूचे स्टॅलिन सरकार हुकूमशहाप्रमाणे कसे वर्तन करते, हे या घटनेवरून लक्षात येते.
तामिळनाडू सरकारची हुकूमशाही वृत्ती दाखविणारे आणखी एक उदाहरण त्या राज्यात घडले. साहाय्य्क पोलीस निरीक्षक शेखर यांनी समाजमाध्यमांवरील पंतप्रधान मोदी यांना पाठिंबा देणारी पोस्ट शेअर केल्याबद्दल द्रमुक सरकारने तातडीने त्या पोलीस अधिकाऱ्यास निलंबित केले. पण, हीच तत्परता पंतप्रधान मोदी यांच्यावर जे द्रमुक, डावे पक्ष, मुस्लीम नेते वाट्टेल तशी टीका करतात, त्यावेळी त्यांच्यावर कारवाई करताना त्या सरकारकडून ही तत्परता का दाखविली जात नाही, असा प्रश्न स्टॅलिन सरकारला विचारला जात आहे. स्टॅलिन हे नावाप्रमाणेच एखाद्या हुकूमशहासारखे वागत असल्याचे अशा घटनांवरून दिसून येते.
बांगलादेशात हिंदू देवतांची विटंबना सुरुच!
गेल्या वर्षी दुर्गापूजेच्या वेळी बांगलादेशमधील धर्मांध मुस्लिमांनी दुर्गामातेच्या अनेक मूर्तीची विटंबना केली होती. त्या घटनेस काही महिने लोटले नाहीत तोच पुन्हा तेथील धर्मांध शक्तींनी डोकेवर काढले आहे. आता यावेळी तेथील धर्मांधांनी सरस्वतीच्या मूर्तीची विटंबना करण्याचा प्रकार केला आहे. चितगाँव जिल्ह्यातील बौलखाली भागात धर्मांध मुस्लिमांनी सरस्वतीच्या ३५ मूर्तीची विटंबना केली. येत्या दि. ५ फेब्रुवारी रोजी सरस्वती पूजा करण्यासाठी या मूर्ती तयार करण्यात आल्या होत्या. पण, धर्मांधांनी त्यांची विटंबना केली. वासुदेव पाल नावाचा मूर्तिकार आपल्या कारखान्यात सरस्वतीच्या मूर्ती दरवर्षी तयार करतो. पण, मूर्तीची विटंबना करण्याचा असा प्रकार आपल्या आयुष्यात प्रथमच घडल्याचे त्याने सांगितले. हिंदू देवदेवतांची विटंबना करण्याच्या घटनेच्या निषेधार्थ गेल्या शुक्रवारी ढाक्यामध्ये हिंदू समाजाने उग्र निदर्शने केली. एका अन्य घटनेत धर्मांध मुस्लीम गुंडांनी ‘हिंदू महाज्योत’च्या एका नेत्यावर हल्ला केला. त्या घटनेच्या निषेधार्थही ढाक्यामध्ये निदर्शने करण्यात आली. शेजारच्या बांगलादेशामध्ये हिंदू समाज किती असुरक्षित आहे त्याची अशा घटनांवरून कल्पना येते.