मराठी रंगभूमीची कीर्ती!

23 Jan 2022 20:07:08

Kirti Shiledar
 
 
 
 
संगीत नाटकाला ध्यास व श्वास मानून आपल्या अलौकिक स्वरांच्या जादूने गेली ६० वर्षे अव्याहतपणे रंगभूमीची सेवा करणार्‍या ज्येष्ठ रंगकर्मी, गायिका कीर्ती शिलेदार यांचे शनिवार, दि. २२ जानेवारी रोजी पुणे येथे निधन झाले. वयाच्या दहाव्या वर्षी कीर्ती शिलेदार यांनी रंगभूमीवर पहिले पाऊल ठेवले, त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. अनेक नाटकांच्या माध्यमातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार्‍या कीर्ती शिलेदार यांना श्रद्धांजली वाहणारा हा लेख...
 
 
 
बालगंधर्वांनंतर जर नाट्यरसिकांना ‘रुक्मिणी’ नाव उच्चारताच कोणी नजरेसमोर आलं असेल, तर त्या ‘कीर्तीताई’ होय. आपल्या सृजनात्मक नाट्याविष्काराने रसिकांचे मन चोरणारी ही ‘रुक्मिणी’ म्हणजे मराठी रंगभूमीचा आत्मा होता! आपल्या सहज सुंदर अभिनयाने आणि खास ‘शिलेदारी’ गायकीने त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका रसिकांच्या मनात कधीही न पुसल्या जाणार्‍या पाऊलखुणा निर्माण करून गेली आहे. १६ ऑगस्ट, १९५२ रोजी जयराम आणि जयमाला नामक मराठी रंगभूमीच्या दोन शिलेदारांच्या पोटी कीर्तीताईंचा जन्म झाला आणि पुण्यातील प्रभात रोडवर जिथे कुमारगंधर्व, पुल, वपु, वसंतराव, हिराबाई, विक्रम गोखले, अशी साहित्य आणि कलाक्षेत्रातील मान्यवर मंडळी निवास करीत होती, अशा सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध परिसरात त्यांचे बालपण गेले. आई आणि वडिलांच्या ठायी असलेले अभिनयाचे आणि गायकीचे गुण तर त्यांच्यात झिरपलेच. परंतु, याचसोबत मराठी रंगभूमीप्रति असलेली त्या दोघांची असीम निष्ठा व प्रेमाचा वारसादेखील त्यांना लाभला. वयाच्या दहाव्या वर्षी भावंडांसमवेत वडिलांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलेले ‘तीन शिलेदारांचे सौभद्र’ हे नाटक म्हणजे त्यांच्या नाट्यप्रवासातील नांदीच जणू! सुप्रसिद्ध साहित्यिक ना. सी. फडके यांना तर हे नाटक इतकं आवडलं की, त्यांनी जयराम शिलेदारांना पत्र पाठवले व त्यामध्ये, या तीन शिलेदारांच्या रूपात तुम्ही नटेश्वराच्या चरणी त्रिदल अर्पण केले आहे, अशी लाखमोलाची दाद या तीन भावंडांना दिली. वयाच्या दहाव्या वर्षी जरी त्यांनी रंगभूमीवर पहिले पाऊल टाकले असले, तरी त्यांच्या वेळी गरोदर असताना जयमालाबाईंनी सावंतवाडी येथे ‘सौभद्र’चा प्रयोग केला होता. त्यामुळे ‘मी जन्माच्या आधीपासून रंगभूमीवर कार्यरत आहे’ असे त्या गंमतीने म्हणत असत.
 
 
 
१९६२ मध्ये जे त्यांनी रंगमंचावर पहिले पाऊल टाकले त्यानंतर अविरतपणे त्या रंगदेवतेची सेवा करत आल्या. अगदी कोरोनाकाळात ‘थिएटर’ बंद असताना युट्यूबच्या माध्यमातून त्यांनी ‘नाट्य फंदी’ नावाचा कार्यक्रम सादर केला. चौदाव्या वर्षी ‘संगीत शारदा’ या नाटकातील शारदेची भूमिका, अठराव्या वर्षी खाडिलकरांच्या गाजलेल्या ‘स्वयंवर’ नाटकात रूक्मिणीची भूमिका, त्यानंतर ‘संगीत शाकुंतल’, ‘संगीत मानापमान’, ‘संगीत संशयकल्लोळ’, ‘संगीत सौभद्र’, ‘कान्होपात्रा’, ‘द्रौपदी’, ‘अभोगी’, ‘श्रीरंग प्रेमरंग’, ‘मंदोदरी’, ‘चंद्रमाधवी’ यासारख्या अनेक नाटकांमधून आपल्या अभिनयाची व गायकीची छाप त्यांनी प्रेक्षकांवर पाडली. ‘संगीत स्वरसम्राज्ञी’ हे नाटक म्हणजे त्यांच्या नाट्यप्रवासातील एक अतिशय मोलाचा टप्पा. विद्याधर गोखलेंनी खास त्यांना डोळ्यासमोर ठेवून लिहिलेलं नाटक. त्यातील ‘कशी केलीस माझी दैना’ हे गाणं प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले. त्यांनी साकारलेल्या विविधांगी भूमिकांपैकी त्यांना सर्वात प्रिय कुठली, असा प्रश्न एका मुलाखतीत विचारला असता, त्यांनी स्वरसम्राज्ञीतील ‘मैनेचाच’ उल्लेख केला होता. इतकी ही भूमिका त्यांच्या जवळची होती. एकीकडे वर उल्लेख केलेल्या नाटकांमध्ये त्यांनी सकारात्मक भूमिका साकारल्या, तर ‘रामराज्य वियोग’ या नाटकात ‘मंथरे’ची नकारात्मक भूमिकादेखील साकारली. प्रेक्षकांनी तिलाही उचलून धरले हे वेगळे सांगायला नकोच. त्यांच्या ६० वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीत एकूण २४ संगीत नाटकांतून ४२ वेगवेगळ्या भूमिका कीर्तीताईंनी बजावल्या आहेत व ‘मराठी रंगभूमी, पुणे’ या त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेल्या संस्थेने दहा हजारांहून अधिक प्रयोगांचा आकडा पार केला आहे.
 
 

Kirti Shiledar 1 
 
 
 
अशा संगीत नाटकांवर आणि रंगभूमीवर निरतिशय प्रेम करणार्‍या कीर्तीताईंनी मराठी, संस्कृत आणि मानसशास्त्र विषय घेऊन ‘बीए’ ही पदवी संपादन केली आहे. याशिवाय ‘शशांक लालचंद शिष्यवृत्ती’ मिळवून डॉ. ग. ह. तारळेकर व गायक पं. दिनकर कायकिणी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘उत्तर भारतीय अभिजात संगीतात ताला-सुराइतकेच शब्दांचे महत्त्व’ या विषयावर संशोधनदेखील केले आहे.त्याच संशोधनाचे फलस्वरूप म्हणजे ‘स्वर-ताल शब्द संगती’ हे त्यांचे पुस्तक होय. या दोन्ही गोष्टी त्यांच्या ध्येयाला पूरकच ठरल्या. एकीकडे गावोगावी नाटकांचे प्रयोग सुरू असताना तरुणांनी मराठी रंगभूमीकडे वळावे, त्यांना त्याविषयी माहिती मिळावी म्हणून व्याख्याने देत होत्या. नाट्य शिबीर आयोजित करून नवीन गायक-नटांचा चमू निर्माण करीत होत्या. अशाच नवीन चमूला घेऊन त्यांनी ‘संगीत स्वरविभ्रम’ या नाटकाचे यशस्वी प्रयोग सादर केले. त्यांच्या या बहुमूल्य योगदानाबद्दल त्यांना ‘बालगंधर्व पुरस्कार’, ‘नाट्यसेवाव्रती पुरस्कार’, ‘विद्याधर गोखले पुरस्कार’ यासारख्या अनेक नामवंत पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यावर कळस म्हणजे आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनीदेखील २०१८ साली ९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले. मराठी रंगभूमीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहावी, अशी ही घटना होती की जिथे आईने व लेकीने दोघांनीही अध्यक्षस्थान भूषविले आहे. शनिवारी कीर्तीताईंनी घेतलेली ‘एक्झिट’ सगळ्यांच्याच मनाला चटका लावून गेली. शिलेदार नावाचा वारसा त्यांनी समर्थपणे सांभाळला आणि मराठी रंगभूमीची भरभराट झाली. त्यांच्या गायकीतील बेहलावे, स्वर लगाव, मुर्की, लयबद्ध आलापी, गाण्याचा रसभंग न करणार्‍या ताना नाटकातील स्त्रीभूमिकेला अगदी साजेशा होत्या. त्या भूमिका त्या जगत आहेत, असाच भास प्रेक्षकांना व्हायचा.‘रेवती’चा खट्याळपणा, ‘शारदे’ची व्यथा, ‘रुक्मिणी’ची अधीरता, ‘कान्होपात्रे’ची अलिप्तता सगळं त्या एकट्या व्यक्तिमत्त्वात उतरले होते.
 
 
 
कीर्तीताईंच्या आयुष्याकडे बघताना बोरकरांच्या ओळी आठवतात,
 
देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके
चांदणे ज्यातून फाके शुभ्र पार्‍यासारखे!
 
मराठी रंगभूमीची सेवा करताना त्या इतक्या समाधानी होत्या की, अनेक मोठ्या मोठ्या चित्रपटांच्या ‘ऑफर’ त्यांनी नाकारल्या व ‘रेकॉर्डिंग’, ‘अल्बम’ यांच्या प्रलोभनाला बळी न पडता व्रतस्थपणे मराठी रंगभूमी आणि संगीत नाटकांकरिता आपले आयुष्य अर्पण केले. त्यांच्या कार्याला अभिवादन म्हणून ही शब्दांजली लिहिते आहे. त्यांच्या जाण्याने मराठी नाट्यसृष्टीत कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. पण त्यांच्या कार्यामुळे त्या ‘यावद्चंद्रदिवाकरौ’ रसिकांच्या स्मरणात राहतील, यात यत्किंचितही शंका नाही.
 
 
 - मृण्मयी गालफाडे
 
 
Powered By Sangraha 9.0