‘स्टेट’ आणि ‘डीप स्टेट’ : इमरान खान आणि जनरल बाजवा

22 Jan 2022 13:42:19

pakistan
 
 
 
गोलंदाजीत इमरान त्याच्या ‘रिव्हर्स स्विंग’साठी आजही प्रसिद्ध आहे. राजकारणातही इमरानने जनरल बाजवांवर हा धारदार ‘स्विंगर’ सोडला आहे. पण, बाजवांच्या हातात ‘बॅट’ नव्हे, बंदूक आहे. ते चेंडूसह गोलंदाजालाही स्टेडियमच्या छपरावर टोलवू शकतात.
 
 
 
‘स्टेट’ म्हणजे शासन. मग ते लोकनियुक्त असो वा राजेशाही, हुकूमशाही कसंही असो. जे कोणी लोक एखाद्या देशाचा प्रत्यक्ष कारभार चालवत असतील, तेच शासन किंवा सरकार किंवा ‘स्टेट.’ ‘डीप स्टेट’ म्हणजे सर्वांसमोर शासन म्हणून उघडपणे काम करणाच्या लोकांच्या पाठीमागून जे खरीखुरी सत्ता राबवत असतात ते! ‘डीप स्टेट’ हा शब्द साधारण १७व्या-१८व्या शतकात युरोपमध्ये वापरला गेला. रोमन कॅथलिक चर्चचे प्रमुख जे पोप महाशय, त्याचं असं म्हणणं असायचं की, ख्रिश्चॅनिटी मानणार्‍या देशांचे जसे आपण धार्मिक प्रमुख आहोत, तसेच राजकीय प्रमुखही आहोत. तेव्हा सर्व राजे, जहांगिरदार, सरदार वगैरे मंडळींनी राजकीय निर्णयदेखील आपल्या सल्ल्याने घ्यावेत. यालाच युरोपीय राजकीय पंडितांनी ‘स्टेट विदीन स्टेट’, ‘शॅडो स्टेट’ आणि ‘डीप स्टेट’ असे विविध शब्द वापरले. नंतरच्या काळात अमेरिकेत यासाठी ‘किचन कॅबिनेट’ हा शब्द जास्त प्रचलित झाला. आपल्याकडेदेखील इंदिरा गांधी पंतप्रधान असताना हा शब्द लोकप्रिय झाला होता. लोकांना दाखवायला केंद्रीय मंत्री होते. पण, प्रत्यक्षात सर्व खात्यांचे निर्णय पंतप्रधान इंदिरा गांधी, त्यांच्या खास मर्जीतले काही मंत्री आणि काही प्रशासकीय अधिकारीच घेत असत. संबंधित मंत्र्यांना फक्त त्या निर्णयावर सही करणं, एवढंच काम उरलेलं असे. १९७५च्या कुप्रसिद्ध आणीबाणीत तर इंदिराजींचे हे ‘किचन कॅबिनेट’ फारच भयावह झालं होतं. माताजींचे युवराज संजय गांधी, पंतप्रधान कार्यालयातले एक अधिकारी प्राणनाथ हक्सर आणि दोन केंद्रीय मंत्री बन्सीलाल नि विद्याचरण शुक्ल यांच्या नुसत्या नामोच्चाराने अन्य केंद्रीय मंत्री आणि अवघी नोकरशाही चळाचळा कापत होती. असाच प्रकार २००४ ते २०१४ या काळात होता. मनमोहन सिंग हे सलग दोन कार्यकाळ पंतप्रधान होते, पण नावापुरते! खरं शासन सोनिया गांधीच चालवत होत्या, यालाच म्हणतात ‘डीप स्टेट.’ पाकिस्तान हा अशा ‘डीप स्टेट’चा आदर्श नमुना आहे. असं इतर कुणी नव्हे, तर खुद्द अमेरिकन माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्विंटन यांनीच म्हटलंय. वर्षानुवर्षं पाकिस्तानात लष्कर हेच खरे सत्ताधारी आहे. दि. १४ ऑगस्ट १९४७ या दिवशी पाकिस्तान निर्माण झालं आणि ११ सप्टेंबर, १९४८ या दिवशी त्याचे निर्माते मोहम्मद अली जिना मरण पावले. बहुधा एवढाच काळ खरी सत्ता राजकीय नेतृत्त्वाकडे होती. जिनांच्या पश्चात राजकीय नेत्यांमध्ये इतकी सुंदोपसुंदी चालू झाली की, खरी सत्ता आपोआपच लष्कराकडे गेली. दहा वर्षं गेल्यावर लष्करप्रमुख जनरल मोहम्मद अयुब खान यांना बहुतेक मागून सूत्रं हलवण्याचा कंटाळा आला असावा. त्यांनी नामधारी राज्यप्रमुख इस्कांदर मिर्झा यांना कायमचं घरी पाठवून उघडपणे सत्ता स्वतःकडे घेतली, ते १९५८ साल होतं.
 
 
 
यानंतर पाकिस्तानात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका होण्यास १९७०चा डिसेंबर उजाडावा लागला. पुढच्या काळात पाकिस्तानात अनियमितपणे निवडणुका होत राहिलेल्या आहेत. अयुब खाननंतर जनरल याह्या खान, जनरल झिया-उल-हक्, जनरल परवेझ मुझर्रफ एवढे लष्करी हुकूमशहा होऊन गेले. त्यांच्या कारकिर्दीच्या मधल्या काळाच्या सांदीकोपर्‍यांमध्ये झुल्फिकार अली भुत्तो, बेनझीर भुत्तो, नवाझ शरीफ ही राजकीय नेते मंडळी कशीबशी राज्य करून गेली. ‘कशीबशी’ हा शब्द एवढ्याचसाठी वापरला की, हे नेते निवडणूक जिंकून पंतप्रधान झाले खरे, पण त्यांचं सत्तेवर टिकून राहणं, हे जनतेच्या नव्हे तर लष्कराच्या मर्जीवर अवलंबून होतं. लष्कराला सोईचं होतं, तोवर त्यांची सत्ता चालू होती. लष्कराला गैरसोईचे ठरताक्षणी त्यांची सत्ता संपवण्यात आली. आता या पाकिस्तानी लष्कराची पण अशी गंमत आहे की, त्याच्या रचनेत पंजाबी भाषिक लोकांचं जबरदस्त वर्चस्व आहे. त्यामुळे पाकिस्तान या देशातल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावरच पंजाबी भाषिक लोकांची पकड किंवा सुयोग्य शब्द म्हणजे दादागिरी चालते. पाकिस्तानात पंजाबी, सिंधी, बलुची, पठाण हे प्रमुख भाषिक गट आहेत. सर्व क्षेत्रांत पंजाबी भाषिक लोक अत्यंत उद्दामपणे अन्य भाषिक गटांना चेपून टाकत असतात. भारतातल्या उत्तर प्रदेश आणि बिहारमधून गेलेल्या मुसलमानांचा एक मोठा गट तिथे आहे, त्यांना ‘मुहाजीर’ म्हणजे ‘बाहेरचे’ असंच म्हटलं जातं. इस्लाममध्ये सर्व समान आहेत, असं म्हणतात. केवढी ही विशाल समानता. २०१८ सालच्या मे महिन्यात पाकिस्तानात निवडणुका झाल्या. ‘पाकिस्तान मुस्लीम लीग’ (नवाझ) हा सत्ताधारी पक्ष हरला. ‘पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ’ (पीटीआय) हा पक्ष जिंकला आणि त्याचा प्रमुख इमरान अहमदखान नियाझी हा ऑगस्ट २०१८ पासून पंतप्रधान बनला. इमरान खान हा फारच प्रसिद्ध आणि लोकप्रिय क्रिकेटपट्टू होता. कसोटी क्रिकेटमध्ये तीन हजार धावा आणि ३०० बळी हा त्याचा विक्रम खरोखरच नेत्रदीपक आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हींमध्ये प्रतिपक्षाचा कर्दनकाळ ठरण्याची त्याची क्षमता गारफिल्ड सोबर्स आणि इयान बोथम यांच्याच तोडीची आहे. १९९२ साली क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर तो राजकारणाकडे वळला. ‘पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ’ हा स्वतःचा पक्ष त्याने काढला. इमरानचं नियाझी हे पितृकुळ आणि बर्की हे मातृकुळ. ही मुसलमानांमधली इतिहासप्रसिद्ध घराणी आहेत, पण तरी तो पंतप्रधान झाला म्हटल्यावर अनेकांना आश्चर्य वाटलं होतं. कारण एकच, इमरान कितीही लोकप्रिय असला, तरी अखेर तो पठाण आहे, पंजाबी नव्हे.
 
 
 
तसे नवाझ शरीफदेखील मूळ काश्मिरी. काश्मीरमधल्या अनंतनागमधून त्यांचे वाडवडील प्रथम अमृतसरला आणि तेथून लाहोरला आले. परंतु, आता ते पूर्णपणे पंजाबी बनून गेले आहेत. पाकिस्तानातल्या गर्भश्रीमंत, अतिश्रीमंत घराण्यांपैकी एक असं शरीफ घराणं आहे. पाकिस्तानात तर सोडाच, पण लंडन आणि अरबस्तानात त्यांच्या स्वत:च्या मालकीचे टोलेजंग प्रासाद आहेत. मग नवाझ शरीफाचा पक्ष २०१८ मध्ये हरला कसा? सलीम साफी हे पाकिस्तानातले एक ज्येष्ठ पत्रकार आहेत. मोहसीन बेग यांनी सलीम साफींना मुद्दाम बोलवून एक मुलाखत दिली. मोहसीन बेग हे गृहस्थ पाकिस्तानी सरसेनापती जनरल कमर जावेद बाजवा यांचे निकटवर्तीय मानले जातात. बेग यांनी साफी यांना दिलेल्या मुलाखतीचा मुख्य भाग असा की, २०१८च्या निवडणुकीत इमरान खान यांचा ‘पीटीआय’ पक्ष जिंकला आणि इमरान खान पंतप्रधान बनू शकले. कारण, लष्कराची तशी इच्छा होती. २०१७ मध्ये नवाझ शरीफ आणि जनरल बाजवा यांच्यात मतभेद झाले. बाजवांनी नेहमीची खेळी केली. एका खोट्या खटल्यात अडकवून स्वत: नवाझ शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम यांना तुरुंगात टाकण्यात आले. निवडणुकीत तर भलत्याच रंगतदार चाली करण्यात आल्या. उमेदवारी अर्जाची शेवटची तारीख उद्या आहे, तर नवाझ शरीफांच्या पक्षाच्या अनेक नियुक्त उमेदवारांनी आज पक्षाच्या मुख्यालयात येऊन तिकीट परत दिले. परिणामी, कुणाही गण्यागंप्याला पकडून ती जागा लढवण्याची वेळ आली आणि अर्थातच ती जागा गेली. मोहसीन बेग यांच्या तोंडून आणि सलीम साफींच्या लेखणीतून आता तीन वर्षांनंतर हा रहस्यस्फोट करण्याचं काय कारण? तर लष्करप्रमुख जनरल बाजवांनी पंतप्रधान इमरान खान यांना ही तंबी पोहोचवली आहे, ‘जास्त गडबड करु नका, तुमचं राज्य आमच्या दयेवर अवलंबून आहे.’ आता बाजवा आणि इमरान यांच्यात मतभेद होण्याचं काय कारणं, तर बहुधा इमरानच्या डोक्यात यशाची हवा गेली असावी. खेळाडू म्हणून अफाट यश, अफाट लोकप्रियता, प्रचंड संपत्ती, ‘ऑक्सफर्ड’मधलं शिक्षण या सगळ्या गोष्टींमुळे इमरान हा मुळातच मिजासखोर आहे, त्यात तो पंतप्रधान झाला. त्यात त्याची सध्याची अधिकृत तिसरी बायको ही म्हणे, आध्यात्मिकदृष्ट्या अधिकारी अशी स्त्री आहे. तिला म्हणे भूत-वर्तमान-भविष्य कळतं. तिचा असा स्वत:चा शिष्यवर्ग आहे. इमरानने म्हणे, प्रथम तिचं शिष्यत्व पत्करलं आणि मग लग्नच करून टाकलं. खुद्द गुरूशीच लग्न. हाय काय अन् नाय काय!
 
 
 
आता यातली एकेक गोष्टसुद्धा माणसाचं डोकं हवेत न्यायला पुरेशी आहे. मग इथे तर सगळ्याच एकत्र आल्या आहेत. अलीकडेच ‘आयएसआय’ या पाकिस्तानच्या अत्यंत बलिष्ठ अशा गुप्तहेर खात्याच्या प्रमुखपदावर आपला माणूस बसवण्याचा निकराचा प्रयत्न इमरानने केला. तो विफल होऊन अखेरीस जनरल बाजवांना हवा असलेला लेफ्टनंट जनरल नदीम अंजुम हाच ‘आयएसआय’ प्रमुख बनला. पण, इमरानच्या या चोंबडेपणामुळे जनरल बाजवांची (नसलेली) दाढी ओढली गेली. १९९९ साली जनरल परवेझ मुशर्रफ यांनी ‘नॅशनल अकाऊंटेबिकिटी ब्युरो’ उर्फ ‘नॅब’ची स्थापना केली. सार्वजनिक क्षेत्रांतील भ्रष्टाचाराचा छडा लावणं आणि संबंधितांवर सरळ खटले भरणं, असे अधिकार ‘नॅब’ला देण्यात आले. आता पाकिस्तानची सगळीच संरक्षण दलंही भरपूर भ्रष्टाचार करतात. हे उघड गुपित आहे. इमरान खान यांनी पाक सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त प्रमुख न्यायाधीश साकिब निसार यांची गुप्तपणे भेट घेऊन त्यांना ‘नॅब’चं प्रमुखपद स्वीकारण्याची गळ घातली. म्हणणेच लष्करासह कोणत्याही क्षेत्रातल्या नकोशा माणसाला ‘नॅब’करवी उचलायचा आणि भ्रष्टाचाराच्या खटल्यात सडवायचा, अशी ही प्रतिचाल आहे. गोलंदाजीत इमरान त्याच्या ’रिव्हर्स स्विंग’साठी आजही प्रसिद्ध आहे. राजकारणातही इमरानने जनरल बाजवांवर हा धारदार ‘स्विंगर’ सोडला आहे. पण, बाजवांच्या हातात ‘बॅट’ नव्हे, बंदूक आहे. ते चेंडूसह गोलंदाजालाही स्टेडियमच्या छपरावर टोलवू शकतात. वरील मुलाखतीनंतर राजकीय निरीक्षकांमध्ये अशी उत्सुकता आहे की, एप्रिल २०२२ पर्यंत इमरान खान नव्या सेनाप्रमुखांना पदावर आणतात की, जानेवारी किंवा फार तर फेब्रुवारी २०२२ पर्यंत जनरल बाजवा पुन्हा एकदा नवाझ शरीफांना पंतप्रधान बनवतात? देखते रहिए क्या होता हैं आगे आगे!
 
 
Powered By Sangraha 9.0