प्रतिक्रियावादी पक्ष बनण्यापेक्षा क्रियावादी पक्ष झाले पाहिजे आणि क्रियावादी पक्ष व्हायचे असेल आणि महाराष्ट्रापुरता विचार करायचा तर भविष्यकाळातील महाराष्ट्र कसा असेल, याचा आराखडा समोर ठेवला पाहिजे. ज्याला ‘व्हिजन डॉक्युमेंट’ म्हणतात.
सामान्यत: राजकीय पक्षांची दोन भागांत विभागणी करता येऊ शकते. पहिल्या भागात अधिकारवादी, अधिसत्तावादी, कमालीची असहिष्णू विचारधारा ठेवणारे राजकीय पक्ष येतात. भारतात डावे आणि उजवे कम्युनिस्ट या प्रकारात मोडतात. त्यांना सत्ता हवी असते. कारण, त्यांना समाज एकवर्गीय करायचा असतो. समाज एकवर्गीय करण्याचा त्यांचा मार्ग हिंसक असतो. श्रमिक वर्ग सोडून अन्य वर्गाला जीवंत राहण्याचा अधिकारदेखील ते नाकारतात, हे कसे घडवून आणायचे, याचा आराखडा लेनिनने ठेवला, त्याची अंमलबजावणी रशियात सुरू केली आणि स्टॅलिन याने तो सर्वशक्तिनिशी अंमलात आणला. रशियात एकवर्गीय समाज कम्युनिस्टांना निर्माण करता आला की नाही, हे सांगता येणार नाही, पण यासाठी त्यांनी अडीच कोटी माणसे ठार मारली, हे ऐतिहासिक सत्य आहे. उद्या कम्युनिस्ट जर देशाच्या सत्तास्थानी आले, तर ते लेनिन आणि स्टॅलिनच्या मार्गाने जाणार नाहीत, असे सांगता येणार नाही. महाराष्ट्राचा विचार करता या पक्षांना महाराष्ट्रात तसे काही स्थान नाही. त्यांना लोकाश्रय नाही. परंतु, नक्षलवादी चळवळीच्या बुरख्याआड त्यांची विचारधारा शहरातूनही काम करीत असते. कोरेगाव-भीमाच्या दंगलीचा विषय आणि त्यातील नक्षलवाद्यांचा सहभाग सध्या न्यायालयीन कक्षेत आला आहे. त्याबद्दल आपण वाचत असतो. यासाठी कम्युनिस्टांपासून सावध राहिले पाहिजे, एवढा धडा आपल्याला घ्यायला हरकत नाही. दुसर्या प्रकारात लोकशाही मूल्यांना मानणारे, व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर करणारे, विचारस्वातंत्र्य स्वीकारणारे राजकीय पक्ष येतात. महाराष्ट्राचा विचार करता भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, शेकाप, रिपब्लिकन पार्टी बहुजन समाजपक्ष, समाजवादी पक्ष, आप पक्ष इत्यादी अनेक पक्ष यात येतात. सत्तेसाठी त्यांची आपापसात जबरदस्त स्पर्धा असते. सत्ता मिळविण्यासाठी कधी कधी यातील काही पक्ष एकत्र येतात आणि मतांचे गणित जर बरोबर सुटले, तर सत्तेवर येतात. आज महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे शासन आहे. या तीन पक्षांनी अगोदर युती केली नव्हती. निवडणूक निकालानंतर युती केली. संख्येचे गणित त्यांनी जमविले आणि ते सत्तेवर आले.
भाजप सत्तेपासून दूर झाले. त्यामुळे रोज आघाडीतील घटक पक्ष आणि भाजप यांच्या शाब्दिक चकमकी घडत असतात. चारही पक्षांचे नेते न चुकता एकमेकांवर सर्व प्रकारचे आरोप करीत असतात. आघाडीतील पक्ष सत्तेत असल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या कृती कराव्या लागतात, निर्णय करावे लागतात. हे निर्णय जनहिताच्या विरोधी कसे आहेत, हे भाजप नेते सांगत राहतात. आघाडी सरकारची क्रिया होते आणि भाजपची प्रतिक्रिया होते, म्हणून भाजपची प्रतिमा आता ‘प्रतिक्रिया देणारा पक्ष’ अशी झालेली आहे. प्रतिक्रिया देणारा पक्ष काही काळ लोकांना बरा वाटतो. पण, नंतर लोक त्याबाबतीत उदासीन होतात. याचे सर्वोत्तम उदाहरण राहुल गांधी आहेत. नरेंद्र मोदी यांनी काहीही केले की, त्यावर राहुल गांधींची प्रतिक्रिया येते. लोक ती वाचतात, अनेकजण हसतात आणि खूपजण असे म्हणतात की, हा राजपुत्र बालिश आहे. कुठे काय बोलावे, त्याला समजत नाही. हीच प्रतिक्रिया भाजपच्या कोणत्या कोणत्या नेत्यांवर व्यक्त करतात, याचा भाजप नेते कधी शोध घेतात का? आपल्याच प्रतिक्रिया वर्तमानपत्रात वाचून, फोटो बघून, आनंद मानत त्यांचा वेळ जातो का? हा अतिशय गंभीर विषय आहे. येथे त्याचे गांभीर्य व्यक्त करणे एवढेच काम आपण करू शकतो. राजकीय पक्ष सत्तेवर येण्यासाठी तो ‘सर्वसमावेशक’ असावा लागतो. ‘सर्वसमावेशक’ हा शब्द लिहायला आणि बोलायला खूप सोप्पा आहे, पण त्याचा अर्थ कोणता? याचा खूप खोलवर विचार करावा लागतो. भाजपपुरता विचार केला, तर भाजप एक विचारधारा घेऊन चालणारा पक्ष आहे. ही विचारधारा पक्षातील प्रमुख नेतेमंडळींना अवगत झालेली असते. अनेक कार्यकर्त्यांनादेखील ती समजते. प्रश्न असा आहे की, ती ‘सर्वसमावेशक’ या गटात येणार्या किती वर्गांना समजते? समाज कधीही कोणत्याही एखाद्या राजकीय विचारसरणीचा असत नाही, तो होऊ शकत नाही. समाजामध्ये हितसंबंधाचे वेगवेगळे गट असतात. या गटांना आपल्या पक्षाकडे आकर्षित करून घेणे त्यांना पक्षामध्ये स्थान आहे, असा विश्वास देणे, याला ‘राजकीय सर्वसमावेशकता’ म्हणतात.
मतसंख्येच्या भाषेत अशा गटांची मोजदाद करायची, तर पहिला गट वेगवेगळ्या जातींचा होतो. मराठा, माळी, महार, चर्मकार, मातंग, ब्राह्मण या मतसंख्येच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या जाती आहेत. या सर्वांपुढे जातिनिर्मूलनाच्या प्रवचनांचा महापूर येऊन गेलेला आहे, आताही तो चालू आहे आणि उद्याही तो चालू राहणार आहे. प्रवचन महापुरात ज्या टिकून असतात, त्यांना ‘जाती’ म्हणतात, हे समाजाचे वास्तव आहे. त्याकडे पाठ फिरविणे म्हणजे सत्तेकडे पाठ फिरविणे आहे. या प्रत्येक गटाचे सामूहिक काही विषय आहेत. कुणाला आरक्षण पाहिजे, कुणाला सन्मान पाहिजे, कुणाला सुरक्षा पाहिजे, शिक्षण आणि नोकर्या हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्या क्रमवारीत नंतर निवार्याचा विषय येतो. या सर्वांची अपेक्षा या सर्व गोष्टी राजसत्तेने केल्या पाहिजेत. सत्ता आल्यानंतर जसे राजकीय पक्षाला सत्ता मिळणार आहे, तसे आम्हाला काय मिळणार, हा प्रत्येक गटाचा प्रश्न असतो. त्याला उत्तर द्यावे लागते. भाजपकडे याचे उत्तर कोणते? त्याचा आराखडा आहे का? असे प्रश्न रोजच्या निरर्थक प्रतिक्रिया वाचल्यानंतर मनात उत्पन्न होतात. दुसरा गट वनवासी, भटके-विमुक्त यांचा होतो. त्यांची मतदार संख्यादेखील फार मोठी आहे. त्यांचे प्रश्न जातींच्या प्रश्नांपेक्षाही वेगळे आहेत. सुरक्षा, मग ती जीवनाची असेल की अन्नाची असेल, हे त्यांचे प्रधान विषय आहेत. भटके-विमुक्तांचा विचार केला, तर त्यांना गावात जागा नाही. गावकुसाबाहेर त्यांना स्थान नाही. निश्चित व्यवसाय नाही. सतत भटकंती त्यांच्या नशिबी असते. त्यांना स्थिर करणे, त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करणे, त्यांचा रोजगाराचा विचार करणे आणि तशा प्रकारचा एक आराखडा सर्वांपुढे ठेवणे गरजेचे आहे. त्याला ‘ब्ल्यू प्रिंट’ म्हणतात. अशी ‘ब्ल्यू प्रिंट’ कोणती? या गटात येणारा समूह तुमच्या क्रिया आणि प्रतिक्रिया वाचतही नाही आणि त्याकडे लक्षही देत नाही. आजचा दिवस गेला, उद्याचा कसा जाईल, ही ज्यांची चिंता आहे, त्यांना मुख्यमंत्री जागे आहेत की झोपले आहेत, घरी आहेत की मंत्रालयात आहेत, याच्याशी काही देणेघेणे नसते. त्याच्या प्रश्नांना उत्तर कोणते?
मतदारांच्या संख्येचा विचार करता फार मोठा गट हा महिलांचा आहे. महिलांचा गट हा एकजिनसी गट नाही. वनवासी पाड्यावरील महिला, गावकुसाबाहेरील महिला, खेड्यात राहणारी महिला, शहरातील झोपडपट्टीत राहणारी महिला आणि उच्चभ्रू वस्तीत राहणारी महिला, ‘महिला’ या नात्याने जरी समान असली तरी प्रत्येकाचे प्रश्न वेगवेगळे आहेत. काही गोष्टी समान आहेत. पहिली गोष्ट महिला सुरक्षेची आहे. दुसरी गोष्ट महिला सन्मानाची आहे. तिसरी गोष्ट एकूणच समाजव्यवस्थेतील तिच्या स्थानाची आहे. या सर्वच गोष्टी सर्व ठिकाणच्या महिलांना लागू होतात. कुठे महिलेवर अत्याचार झाला की, महिला आघाडीचे मोर्चे काढायचे, पत्रके काढायची. या सर्व गोष्टी चटावरील श्राद्धासारख्या असतात. लोक आता हुशार झालेले आहेत. हे मोर्चे का निघाले आहेत, तर मोर्चे काढणार्यांना घटनेचे भांडवल करुन राजकीय लाभ उठवायचा आहे, हे लोकांना समजते. म्हणजे पक्षीय स्वार्थासाठी हे सर्व चाललेले आहे. प्रश्न सोडवणुकीच्या दृष्टीने त्याचा काही उपयोग नाही, हे सामान्य माणसाला उमगू लागले आहे. प्रश्न असा आहे की, राजकीय पक्षांतील नेत्यांना हे उमगतं का? मग त्या महिला नेत्या असतील किंवा पुरुष नेते असतील? समाजातील मतदारांच्या संख्येचा विचार करता अतिशय दुर्लक्षित असा चौथा गट आहे. या गटात फुटपाथवर राहणारे लोक येतात. सिग्नलला गाडी थांबली की, गाडीभोवती छोट्या-मोठ्या वस्तू विकायला येणारे लोक किंवा भीक मागायला येणारी मुले आणि मुली येतात. ‘झोमॅटो’, ‘अॅमेझॉन’, ‘फ्लिपकार्ट’ वगैरे कंपन्यांची ‘डिलिव्हरी’ करणारे ‘डिलिव्हरी बॉय’ येतात. घरकाम करणार्या महिला येतात. बांधकाम मजूर येतात. समाजातील सर्वात अन्यायग्रस्त वर्ग जर कोणता असेल, तर तो हा वर्ग आहे. सामाजिक न्यायाची प्रवचने देणे हे खूप सोपे काम आहे. जे सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत, चातकासारखी ते त्याची वाट पाहतात, त्यांचा विचार कुणी करायचा? ‘सायरन’ वाजवत मंत्र्याची गाडी रस्त्याने जाते, तेव्हा रस्त्यावरील या सर्व लोकांना हाकललं जातं. लोकशाही राज्यव्यवस्थेत यांचा सहभाग कोणता? हे जीवघेणे प्रश्न समोर उभे राहतात. राजकीय पक्षांना त्याची उत्तरे द्यायची आहेत.
प्रतिक्रियावादी पक्ष बनण्यापेक्षा क्रियावादी पक्ष झाले पाहिजे आणि क्रियावादी पक्ष व्हायचे असेल आणि महाष्ट्रापुरता विचार करायचा तर भविष्यकाळातील महाराष्ट्र कसा असेल, याचा आराखडा समोर ठेवला पाहिजे. ज्याला ‘व्हिजन डॉक्युमेंट’ म्हणतात. अशी ‘व्हिजन डॉक्युमेंट’ एका दिवसात तयार होत नाही. विविध पातळ्यांवर त्याची चर्चा करावी लागते. तळागाळातून माहिती संकलित करावी लागते. कृती आराखडा निश्चित करावा लागतो. हे करण्याची ‘कोअर टीम’ तयार करावी लागते. त्यातील नेते एकमेकांचे स्पर्धक असून चालत नाही तर एकमेकांचे सहकारी बनून काम करावे लागते. सत्तेच्या राजकारणात स्पर्धा अनिवार्य असली, तरी विजयासाठी सहकाराशिवाय दुसरा मार्ग नाही. एकमुखाने बोलणारे दहा नेते असावे लागतात. आज हे चित्र आहे का? याचादेखील गंभीरपणे विचार केला गेला पाहिजे. लोकशाहीत सत्ता येते आणि जाते. सत्तेत असताना जसा सत्तेचा माज करु नये, तसे सत्ता गेल्यानंतर वैफल्यग्रस्तदेखील होऊ नये. हे दोन्ही दोष जेव्हा निर्माण होतात, तेव्हा कुठेतरी ध्येयवाद पातळ झाला आहे, विचारधारा तोंडी लावण्यापुरती राहिली आहे, असा त्याचा अर्थ करावा लागतो. प्रत्येकजण जर स्वत:च्या स्थानाची आणि त्याच्या सुरक्षितेची चिंता करु लागला, तर पक्षाची वाढ कशी होणार आणि सत्ता कशी मिळणार, हे प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाहीत. विचारधारेचा एक शिपाई म्हणून भाजप सर्वसमावेशक पक्ष व्हावा, ‘व्हिजन’ असणारा पक्ष म्हणून उभा राहावा, असे जर वाटले, तर त्यात काही गैर आहे, असे म्हणता येणार नाही.
९८६९२०६१०१