अग्नितांडवात मुंबई पुन्हा होरपळली

22 Jan 2022 21:01:38
 
kamala building in fire
 
 
 
मुंबई : मुंबई महापालिका क्षेत्रातील आगीच्या घटनांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात मुंबईतील आगीच्या घटनांच्या संदर्भात अत्यंत धक्कादायक आणि विचार करायला भाग पडणारी आकडेवारी समोर आली होती. त्यातच, ताडदेव परिसरात उभ्या असलेल्या 'कमला' इमारत परिसराला शनिवार, दि. २२ जानेवारी रोजी भीषण आग लागल्याची गंभीर घटना घडली. शनिवारी सकाळी लागलेल्या या आगीमुळे मुंबईतील अग्निसुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून महापालिका या सर्व आगीच्या घटनांवर प्रत्यक्ष स्वरूपात कधी कारवाई करणार याचे उत्तर अद्यापही मुंबईकर जनतेला मिळालेले नाही.
 
 
 
कमला इमारतीच्या १८ व्या मजल्यावर आग
ताडदेवमधील नाना चौक गवालीया टॅंक येथील कमला इमारतीला शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास आग लागली होती. सुमारे २० मजली इमारत असलेल्या या वास्तूच्या १८ व्या मजल्यापासून या अग्नितांडवाला सुरुवात झाली होती. सकाळी सुमारास साडेसातच्या सुमारास आग लागली असून आग लेव्हल 3 ची असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.
 
 
 
अग्निशमन दलाच्या १३ गाड्या दाखल
शनिवारी कमला इमारत परिसराला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या १३ गाड्यांसह सात जंम्बो टॅंकर घटनास्थळी दाखल झाले होते. प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, शॉर्ट सर्किट झाल्यामुळे इमारत परिसराला आग लागल्याची घटना उद्भवली. दरम्यान, आग लागल्याच्या काही तासांनंतर या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन विभागाला यश आले.
 
 
 
आगीत सहा जणांचा मृत्यू
नाना चौक गवालिया टँक येथील कमला इमारतीला लागलेल्या आगीत सहा जणांचा मृत्यू झालाय. नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या पाच जणांचा मृत्यू झालाय. तर, कस्तुरबामध्ये दाखल केलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये मितेश मिस्त्री, मंजूबेन कंठारिया, पुरूषोत्तम चोपडेकर यांच्यासह इतर तिघांचा समावेश आहे. तर, हंसा चोक्सी, फालगुणी चोक्सी, धावेल, यश चोक्सी, शुभांगी साळकर, दिलीप साळकर, ममता साळकर, तनिषा सावंत, अंकिता चौधरी, धनपत पंडित, गोपाळ चोपडेकर, स्नेहा चोपडेकर, वेदांगी चोपडेकर, मीना चव्हान, प्रतिमा नाईक, कल्पना नाडकर्णी, स्मीता नाडकर्णी, रुदया चोपडेकर यांच्यासह इतरांचा जखमींमध्ये समावेश आहे.
 
 
 
'रुग्णालयांकडून जखमींवर उपचाराला नकार'
ताडदेव परिसरातील कमला इमारतीला लागलेल्या आगीतील जखमींवर उपचार करण्यासाठी रिलायन्स, व्होकार्ट आणि मसिना या तीन रुग्णालयांनी नकार दिल्याचा आरोप स्थानिकांसह अनेकांनी केला आहे. त्यामुळे आगीत होरपळलेल्या रुग्णांवर उपचार करण्यास नकार देणाऱ्या दक्षिण मुंबईतील रुग्णालयांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. रिलायन्स, व्होकार्ट आणि मसिना या तीन रुग्णालयांनी जखमींना रुग्णालयात दाखल करुन घेण्यास नकार दिला असून यातून रुग्णालय प्रशासनाच्या अमानवी वृत्तीचे दर्शन झाल्याची उद्विग्न प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली आहे. उपचारासाठी दिलेल्या नकारानंतर या तीनही रुग्णालयावर आणि प्रशासनावर टीकेची झोड उठवली जात आहे.
 
 
 
कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना : राष्ट्रपती
'मुंबईतील एका इमारतीला लागलेल्या आगीच्या घटनेबद्दल कळल्यावर दुःख झाले. या दुर्दैवी अपघातात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या मनापासून संवेदना. जखमींना लवकरात लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे.'
- राष्ट्रपती रामनाथ कोविंद
 
 
 
पंतप्रधानांकडून पीडितांना मदत जाहीर
मुंबईतील तारदेव येथील इमारतीला लागलेल्या आगीमुळे दु:ख झाले आहे. शोकाकुल कुटुंबियांच्या संवेदना आणि जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो. ताडदेव येथील इमारतीला लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय सहायता फंडातून प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना रु. प्रत्येकी ५०,००० दिले जातील.'
- पंतप्रधान नरेंद्र मोदी
 
 
 
संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी : देवेंद्र फडणवीस
'ताडदेव येथे घडलेल्या अग्निकांडात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. दुर्घटनेत जखमी झालेल्या काही बाधितांना उपचारासाठी दाखल करून घेण्यास काही रुग्णालयांनी नकार दिल्याचे समजले आहे. जखमींना वेळेत उपचार न मिळाल्याने मृतांचा एकदा वाढल्याचीही माहिती आहे. जर यात सत्य असेल तर महापालिका प्रशासन आणि सरकारने संबंधितांवर योग्य ती कठोर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. यातील जबाबदार व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात यावी.'
 
 
 
तर रुग्णालयांविरुद्ध कारवाई करू : महापौर
या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मसिना, रिलायन्स आणि व्होकार्ट रुग्णालयावर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. 'आम्ही सर्वप्रथम या तिन्ही रुग्णालयांच्या प्रशासनाला रुग्णांना का भरती करुन घेतले नाही, याचा जाब विचारु. त्यांचे उत्तर समाधानकारक नसेल तर रुग्णालयांविरोधात कठोर कारवाई केली जाईल,' असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0