“ मुस्लीम समाजातील घुसळण मांडणारी ‘इन्शाअल्लाह’:अभिराम भडकमकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jan-2022
Total Views |
abhiram bhdkamar






‘इन्शाअल्लाह’ या कादंबरीत प्रश्न विचारले आहेत, आपल्या रूढींना, आपल्या परंपरांना, धर्मग्रंथांना... प्रश्न विचारण्याची परंपरा त्या समाजात नसल्याने हा त्या समाजासाठी वैचारिक घुसळणीचा काळ आहे. त्यामुळे मला वाटतं की, ही घुसळण या कादंबरीत येणं खूप महत्त्वाचं होतं. म्हणून मी या कादंबरीकडे वळलो. त्यामुळे ही मुस्लीम समाजातील आणि माझ्याही मनातील घुसळण चालू आहे,” असे विचार लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता अभिराम भडकमकर यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलताना व्यक्त केले. समाजातील रूढ समजुतींवर भाष्य करणार्‍या, समकालीन वास्तवाला भिडणार्‍या त्यांच्या ‘इन्शाअल्लाह’ या कादंबरीच्या निमित्ताने अभिराम भडकमकर यांनी लेखनापासून ते चित्रपट दिग्दर्शन, वाचन संस्कृतीपर्यंत विविध विषयांवर आपले परखड मत यावेळी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केले.

 

आजच्या काळात वाचकांची उत्कंठा शेवटपर्यंत टिकवणे, हे प्रत्येक लेखकासमोर एक फार मोठे आव्हान आहे. आपण ‘इन्शाअल्लाह’ कादंबरी लिहिताना हे आव्हान उत्तम पद्धतीने पेलले आहे. तेव्हा, त्याविषयी काय सांगाल?
 
एक गोष्ट खरी आहे की, वाचकांचा ‘अटेन्शन पीरिएड’ आता कमी झाला आहे. सलग वाचनाची लोकांना फारशी सवय राहिलेली नाही. त्यामुळे सलगपणे कादंबरी वाचली,एका रात्रीत कांदबरी वाचून काढली, हे आता अगदी अभावानेच ऐकायला मिळते. अशावेळी वाचकांसाठी कादंबरी लिहिणे, हे सुद्धा एका पद्धतीने आव्हानात्मक आहे, असे मला वाटते.तसेच मोठ्या प्रमाणात वाचक-प्रेक्षक ‘व्हिज्युअल मीडिया’कडे वळत असतानासुद्धा लोकांना अजूनही वाचायला आवडतं. आता ‘इन्शाअल्लाह’ कादंबरीबद्दलच सांगायचं म्हटलं तर ‘लॉकडाऊन’च्या काळामध्ये सुद्धा आठव्या महिन्यामध्ये या कादंबरीची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली. त्यामुळे वाचक मोठ्या प्रमाणात वाचताहेत आणि त्यांना वाचायलं हवं आहे, असं मला वाटतं.

मी जेव्हा ‘इन्शाअल्लाह’ ही कादंबरी वाचायला घेतली, तेव्हा मला ती शेवटपर्यंत हातातून सोडवली नाही. पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेने विशेषत्वाने माझे लक्ष वेधून घेतले. कारण, ज्यांचा साहित्याशी असा काहीच संबंध नाही, त्या विश्वविख्यात खगोलशास्त्रज्ञ गॅलेलियोला आपण आपली ही कादंबरी अर्पण केली आहे. त्यामुळे गॅलेलियोला कादंबरी अर्पण करण्यामागचा आपला नेमका उद्देश काय?



मुळात गॅलेलियोने नेमकं काय केलं की, तर त्याने रूढ समजुती आणि भावनांकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं आणि त्याला आव्हान दिलं. रूढी आणि परंपरांविरोधात गॅलेलियो उभा राहिला. त्याने प्रश्न विचारले. या कादंबरीमध्ये नेमकं तेच होणार होतं. मुस्लीम समाजामध्ये काही रूढ समजुती आणि धर्मग्रंथाबद्दलच्या धारणा आहेत. त्या सगळ्या भावनांना ही माणसं या कादंबरीतून प्रश्न विचारतात. त्यामुळे एकापरीने गॅलेलियोने जी परंपरा सुरु केली, ती परंपरा या कादंबरीत रफिक आणि झुल्फीपर्यंत येऊन पोहोचते. त्यामुळे गॅलेलियो आद्य आहे, असं मला वाटतं आणि म्हणूनच मी गॅलेलियोचे सुरुवातीला स्मरण केले आणि त्याला कादंबरी अर्पण केली.


तुम्ही एका मध्यमवर्गीय आणि सुरक्षित वातावरणात लहानाचे मोठे झालात. पण, आपल्या या कादंबरीतील भाषाशैली मात्र अगदीच वैशिष्ट्यपूर्ण आहे. तेव्हा, कादंबरीतील भाषेच्या छटा आणि त्याचे लहेजे आपल्याला नेमके कसे सुचले? खरंतर ज्या काळात ही कादंबरी जाते, त्या काळातला मध्यमवर्ग हा फार काही सुरक्षित वगैरे नव्हता. तो संघर्षात होता. आपल्या वाडवडिलांनी नोकरीसाठी, आर्थिक स्थैर्यासाठी आणि इतरही संघर्ष केले. पण, त्यांनी त्या संघर्षाचे सावट आमच्या पिढीवर पडू दिले नाही. याचं कारण असं की, त्यांनी त्यांच्या गरजा मर्यादित ठेवल्या होत्या. पुढे आम्ही वडिलांची बदली झाल्यावर कोल्हापूरला राहायला गेलो. जिथे राहायला गेलो ती मुस्लीम वस्ती होती. आर्थिकदृष्ट्या जिथे परवडतं, तिथे आम्ही राहायला गेलो. तिथल्या वातावरणाशी, जनजीवनाशी आम्ही अगदीच मिसळून गेलो. म्हणजे माझे मुस्लीम मित्र आमच्या घरी गणपतीला यायचे आणि मी ईदला त्यांच्या घरी जायचो. अनेकदा तर मी त्या मित्रांसोबत बसून कुराणही वाचले आहे. त्यामुळे ही कादंबरी लिहिताना मला भाषेसाठी विशेष काही प्रयत्न करावे लागले नाही. कारण, त्या वातावरणात राहून राहून ही भाषा माझ्या जिभेवर इतकी चढली होती की, मी गमतीने म्हणतो की, ही भाषा माझी दुसरी मातृभाषाच आहे. ती मी अगदी सफाईने बोलू शकतो, लिहू शकतो. त्यामुळे ही घटना जिथे घडते, ती त्या मोहल्ल्याची भाषा आहे. त्यामुळे आपोआपच ती पात्र त्या भाषेत बोलायला लागली. व्यक्त होऊ लागली. ही भाषा काही प्रथमच या मराठी साहित्यात आलेली नाही, तर इतरही अनेक लेखकांच्या पुस्तकात ती यापूर्वी वाचायला मिळते. आशा आपराद, हुसेन जमादार यांच्या साहित्यामध्ये ही भाषा आली आहे. मराठी, उर्दू, हिंदी आणि थोडी कन्नड अशी ती मिश्र भाषा. गमतीचा भाग म्हणजे, त्यातली जी शिवी आहे की, आई मेल्यानंतर मुडदा दिखाता क्या? पण, मेल्यानंतर मुडदा बसवणे, हे हिंदू किंवा मुस्लीम समाजामध्ये नाही, पण लिंगायत समाजात ती प्रथा आहे. म्हणजे लिंगायत संस्कृतीचा संदर्भ या भाषेत येेतो. त्यामुळे सगळ्या भाषा संस्कृतीचा संदर्भ या भाषेत येतो. त्यामुळे आजुबाजूचा सामाजिक, भौगोलिक धार्मिक प्रभाव पडून ती एक भाषा निर्माण झाली. मी नेहमी म्हणतो की, बंगाली भाषा गोड आहे. पण, मालवणी आणि बागवानी भाषाही तितकीच गोड आहे. खरंतर संपूर्ण कादंबरी आणि त्यातील विश्व हे माझ्याच जगण्याचा एक भाग आहे, असं मला वाटतं. लोक मला म्हणाले, अभिराम आणि ‘इन्शाअल्लाह?’ पण, खरं सांगायचं तर तो माझ्याच जगण्याचा एक भाग आहे आणि तोच या कादंबरीतून उतरला आहे.

‘इन्शाअल्लाह’ कादंबरीत धर्माअंतर्गत तणाव दिसतो. एकप्रकारची अस्वस्थता दिसते. एकंदर अज्ञान, सूड, धर्मांधता हे सगळे आपल्या कादंबरीचे विषय आहेत. तेव्हा नेमकी ही ‘इन्शाअल्लाह’ आपल्याला कुठे सापडली?



खरोखरच आज मुस्लीम समाजात विलक्षण अस्वस्थता आहे. कारण, धार्मिक पगडा एकीकडे आहे, तर दुसरीकडे आजुबाजूच्या वातावरणातून वैज्ञानिक गोष्टी त्यांच्यासमोर आल्या आहेत. इंटरनेटमुळे तर सगळं जगं खुलं झालं आहे. त्यामुळे मुस्लीम समाजाच्या तरूणांमध्ये आणि महिलांमध्ये एकप्रकारची घुसळण सुरू आहे. त्यांच्यामध्ये एक तणाव सुरू आहे की, आपली नेमकी ‘आयडेन्टिटी’ काय? आपण त्या धर्माशी, धर्मग्रंथाशी किती जोडलेले असणार आहोत? बाहेरचं एक जे वारं आहे, त्याला आपण कसे सामोरे जाणार आहोत? ही प्रचंड मोठी घुसळण सुरु आहे आणि त्याच्याविषयी माझ्या मनात यायचं आणि मी सतत माजगावकरांशी बोलायचो. आधीच्या कादंबरीनंतर ते म्हणाले, “आता नवीन काय? ही जी आतली घुसळण आहे, जी मुस्लीम समाजाचीही घुसळण आहे, ती तू अनुभवतो आहेस. म्हणून तीच तुझ्या कादंबरीचा विषय होऊ शकते” आणि मग मी त्या दृष्टिकोनातून या कादंबरीकडे पाहायला सुरुवात केली. त्यानंतर विनया खडपेकर ज्या माझ्या कादंबर्‍यांचे संपादन करतात, त्यांचे मला मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले आणि तिथून ती कादंबरी सुरु झाली.

या कादंबरीत प्रश्न विचारले आहेत, आपल्या रूढींना, आपल्या परंपरांना, धर्मग्रंथांना... प्रश्न विचारण्याची परंपरा त्या समाजात नसल्याने हा त्या समाजासाठी वैचारिक घुसळणीचा काळ आहे. त्यामुळे मला वाटतं की, ही घुसळण या कादंबरीत येणं खूप महत्त्वाचं होतं. म्हणून मी या कादंबरीकडे वळलो. त्यामुळे ही मुस्लीम समाजामधील आणि माझ्या मनातील घुसळण चालू आहे. पण, त्याचबरोबर मला एक दुसरी गोष्ट अशी लक्षात येत होती की, मुस्लीम समाजाकडे पाहण्याची एक ठरावीक चौकट आहे. म्हणजे मुस्लीम समाजाकडे ‘विक्टीम’ म्हणून पाहण्याची किंवा संपूर्ण राजकीय परिप्रेक्ष्यातून मुस्लीम समाजाकडे पाहण्याची आपली एक विशिष्ट चौकट आहे. मला यात लक्षात आलं की, फक्त याकडे राजकीय दृष्टिकोनातूनच पाहायला लागलो, तर मुस्लीम समाजाचेच खूप नुकसान आहे. मग प्रत्येक गोष्टीला अमुक एक पक्ष जबाबदार आहे, अमुक विचारसरणी जबाबदार आहे, असे म्हणून मूळ प्रश्नांपासून पलायन करण्याची वृत्ती दिसते. मग माझ्या लक्षात आले की, राजकीय वातावरण आहे आणि ते सगळीकडेच आहे. पण, मुस्लीम समाजाचे जे प्रमुख प्रश्न आहेत, ते म्हणजे अज्ञान, अंधश्रद्धा आणि धार्मिक बंदिस्तता. याबद्दल एक साधी गोष्ट अशी आहे की, जेव्हा चॅनेलवर मशिदीच्या प्रवेशावरती चर्चा होते, तेव्हा ‘नॅशनल चॅनेल’मध्ये म्हणतात की, “दाखवा कुठे कुराणात लिहिले आहे ते?” त्यावर कादंबरीतील पात्र असलेला रफिक असं म्हणतो की, “मी म्हणतो की पहिल्या पानावर लिहिले आहे की हिंदूंना मशिदीत प्रवेश नको. मी ते का स्वीकारायचं? मला त्याला (धर्मग्रंथाला) प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही? की ते नाकारण्याचा अधिकार नाही?” अशाप्रकारे धर्मग्रंथांना नाकारण्याची एक वेगळ्या प्रकारची ‘मुव्हमेंट’ सुरू झाली आहे आणि त्याकडे आपले दुर्लक्ष होते. त्यामुळे मुस्लीम समाजाचा खरा प्रश्न मी या कादंबरीत मांडायचा प्रयत्न केला आहे आणि त्यामुळे ही कादंबरी खूप सडेतोड झाली आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे, पुरोगामित्व. हे सर्वांत महत्त्वाचे मूल्य आहे आणि म्हणूनच कुठल्याही समाजाला पुढे जायचे असेल, तर पुरोगामित्वाशिवाय पर्याय नाही. म्हणून आंबेडकर असतील, सावरकर असतील, आगरकर असतील, फुले असतील, यांनी समाजात काय रूजवण्याचा प्रयत्न केला, तर पुरोगामित्व. त्यावेळी ‘पुरोगामित्व’ हा शब्द नव्हता, तर ‘सुधारणावादी’ असा शब्द होता. मलाही पुरोगामित्वापेक्षा ‘सुधारणावादी’ हा शब्द अधिक योग्य वाटतो. पण, पुरोगामी असणं म्हणजे एखाद्या ग्रंथालयाचे आजीवन सदस्यत्व घेण्यासारखे. एकदा पैसे दिले की, मी झालो त्या ग्रंथालयाचा सदस्य. तसा मी आजीवन पुरोगामी होऊच शकत नाही. कारण, मला सतत त्या संघर्षातून जावे लागते. तो एक आंतरिक संघर्ष असतो. आजुबाजूच्या विज्ञानाने सांगितलेल्या गोष्टी, निसर्ग या सगळ्यांशी क्षणोक्षणी समतोल साधायचा प्रयत्न करायचा असतो, हे पुरोगामित्व असतं, जे आज संपलेले आहे. आजचे पुरोगामित्व हे साचलेले आहे. आजचे पुरोगामित्व अमुक एका पक्षाला, एका धर्माला नाव ठेवली की, तुम्हाला पुरोगामित्वाचे ‘सर्टिफिकेट’ मिळते. मला असे वाटते की, अशा प्रकारचे ‘सर्टिफिकेट’ देणारे आणि या मोजपट्ट्यांना मानणारी माणसंसुद्धा या कादंबरीत आहेत. बहुसंख्य हिंदू समाजाला पुरोगामित्वाकडे नेण्याची आवश्यकता आहे. पण, जर पुरोगामित्वच साचलेले असेल, तर ते कसे घेऊन जाईल? आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की, आम्ही पुरोगामी आहोत. कारण, आम्ही सगळ्यांना प्रश्न विचारतो. आम्ही सरकारची चिकित्सा करतो, आम्ही विरोधकांची चिकित्सा करतो, साहित्यिकांची चिकित्सा करतो. पण, आम्ही पुरोगामित्वाची चिकित्सा कधी करतो का? पुरोगामित्वाची चिकित्सा करणे आवश्यक आहे, जे आपल्याकडे संपलेले आहे. म्हणून या कादंबरीमध्ये एक पात्र स्पष्ट म्हणते की, “आजचे पुरोगामित्व हे भंजाळलेले आहे. आज पुरोगामी नाही, तर पुरोगामी असल्याचा भ्रम बाळगणारे ‘पुरोभ्रमी’ या समाजात आहेत.” त्यामुळे मुस्लीम समाजाकडे बघताना आपण त्यांच्याकडे ‘व्हिक्टिम’ म्हणून बघतो आणि त्यांना इतकी घट्ट मिठी मारायला जातो की आपल्यालाच गुदमरायला होतं, तर काही लोक अत्यंत अविश्वासाने मुस्लिमांकडे पाहतात. त्यामुळे या दोन्ही टोकांचे ध्रुवीकरण नाकारणारी ही कादंबरी आहे. त्यामुळे ही कादंबरी म्हणते की, ध्रुवीकरण नको. कारण, ध्रुवीकरणामुळे आपल्याला मूळ प्रश्नांकडे वळता येत नाही आणि ही सगळी वैचारिक घुसळण आतमध्ये सुरु होती. हे सगळे माजगावकरांना कळत होते. त्यामुळे माजगावकर म्हणाले, “आता सोशल मीडिया बंद करायचा. त्याला कुलूप लावायचं.” कारण, होते असे की, एकदा तुम्ही सोशल मीडियावर व्यक्त होऊन गेलात ना, तर तुमच्या डोक्यातून तो मुद्दा निघून जातो. त्यामुळे व्यक्त न होता, ते आतल्या आत खळबळ माजवत राहिले ना, तर ते कादंबरीतून बाहेर येते. त्यामुळे मी तेच केले आणि खरोखरच ती वस्ती आणि वातावरण कादंबरीत मला उभे करता आले. कादंबरी वाचणार्‍या अनेकांनी मला सांगितले की, “अरे मला हे माहितीच नव्हते आणि मुस्लीम समाजाबद्दल आमच्या मनात किती गैरसमज होते.” सलीम मुल्ला, ज्याचे कादंबरीच्या मुखपृष्ठावर चित्र आहे, तो माझा मित्रच आहे आणि त्याच मोहल्ल्यात राहतो, त्याला आधी मी ही कादंबरी वाचायला दिली. त्याला मी म्हटले “मला हे सांग की, तुला यामध्ये काही खटकते आहे का?” तसेच कादंबरीतल्या भाषेविषयी देखील आम्ही सखोल चर्चा केली. कारण, मला असं वाटतं की, समाजातल्या झुल्फींनी ही कादंबरी वाचली पाहिजे. इरफान मुजावर यांनी तर मला अभ्यासासाठी कुराणाची प्रत पाठवून दिली. अशा प्रकारे मी कादंबरीत हा सगळा पसारा मांडायचा प्रयत्न केला आहे.
 
त्यामध्ये महाराष्ट्राच्या बाहेरही कसे वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न सुरु आहेत, त्याचाही आढावा घेतला आहे. पण, मी कधीच प्रश्नांवर कादंबरी लिहित नाही, तर मी माणसांची गोष्ट सांगतो. जी माणसं मला आजुबाजूला दिसतात. मला मुमताज दिसली, झुल्फी दिसतो, मला जमिला दिसली. मी त्यांचीच गोष्ट सांगितली. त्या माणसांची गोष्ट जितकी प्रामाणिकपणे मी सांगितली, तितक्या प्रामाणिकपणे ते त्यांचे प्रश्न घेऊन कादंबरीमध्ये आपल्यासमोर उभे राहतात. त्यामुळे मी मुस्लीम समाजाचे प्रश्न मांडलेले नाहीत, तर मी मुस्लीम समाजाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

‘इन्शाअल्लाह’ वाचताना कादंबरीतील व्यक्तिरेखांविषयीही तितकेच कुतूहल निर्माण होते. कादंबरीतील जी रफिक किंवा झुल्फीसारखं पात्र आहेत, त्यांच्यावर समर्थ रामदास स्वामी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा, बहिणाबाई, जीएंसारख्या मोठ्या व्यक्तिमत्त्वांचा प्रभाव दिसतो, तर त्याबद्दल आपण काय सांगाल?



मला एकाने असा प्रश्न विचारला होता की, कादंबरीतील जे जुनेद नावाचे पात्र आहे, त्याला हेच लेखक का आवडतात? त्याला तर ठरावीक चौकटीतील लेखक आवडायला पाहिजे. पण, मला असे वाटते की, या ठरावीक चौकटी मोडणारा हा जुनेद आहे किंवा कादंबरीतील इतरही पात्र आहेत. त्यामुळे जीए काय, रामदास स्वामी काय, बहिणाबाई काय किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर काय, यांनी माणसाच्या मूलभूत प्रवृत्तीबद्दल बोलायचा प्रयत्न केला आहे आणि जेव्हा आपण त्या मूलभूत प्रवृत्तींबद्दल बोलतो, तेव्हा आपण स्थळ, काळ, धर्म, रंग, जात सगळे ओलांडून त्यापलीकडे जातो. ही त्या पद्धतीची माणसं होती. जीए माणसाच्या मूलभूत प्रवृत्तीबद्दल चिंतन करताना दिसतात आणि त्या मूलभूततेचा ध्यास रफिकला आहे, झुल्फीला आहे, जुनेदला आहे आणि म्हणून ते या पात्रांबद्दल बोलत असतात.
आपण म्हणालात की, कादंबरी लिहिताना आपलीही एक वैचारिक घुसळण सुरु होती, तर याला जोडूनच मला असं विचारावसं वाटतं की, आपली ‘इन्शाअल्लाह’ कादंबरी काय किंवा ‘ज्याचा त्याचा प्रश्न’, ‘सुखाशी भांडतो आम्ही’ अशी तुमची नाटकं असतील, या नाटकांमध्ये सतत आपण एक वैचारिक संघर्ष दाखवला आहे, तर नेमका हा संघर्ष साहित्यकृतीतील भूमिकांचा होता की, हा संघर्ष लेखक अभिराम भडकमकर यांचा होता?
हा खरं कर खूप कठीण प्रश्न आहे आणि त्याची सीमारेषा पाहणंही तितकचं अवघड आहे. तो एकाच वेळेला लेखक अभिराम भडकमकरचा देखील संघर्ष असतो आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की, माझी नाटकं ही मी माझ्या सभोवतालला दिलेली एक प्रतिक्रिया असते. पण, त्याचबरोबर एक लेखक म्हणून माझा असाही प्रयत्न असतो की, तो जो सभोवतालचा काळ आहे, त्यापुरती ती प्रतिक्रिया मर्यादित राहू नये. त्यापलीकडे जाऊन जीएंनी जे मूलभूत चिंतन केले, ते मूलभूत चिंतन करण्याचा मी प्रयत्न करतो. म्हणून आजुबाजूच्या काळाबद्दल ज्यावेळी मी एखादा प्रश्न मांडतो, तेव्हा आस्तिक आणि नास्तिक या मूलभूत चिंतनाकडे जाण्याचा मी प्रयत्न करतो. ‘इन्शाअल्लाह’मध्ये सुद्धा आताच्याच मुस्लीम समाजाविषयी बोलत असतानासुद्धा मुळातच आपण सतत आपले धर्म आणि धर्मग्रंथच नव्हे, तर आपल्या आस्था, विचारांनाही सतत प्रश्न विचारत राहिले पाहिजे आणि ते काळाशी अपडेट करत राहिले पाहिजे. त्यामुळे हा संघर्ष माझाही आहे, माझ्या आजुबाजूचाही आहे आणि माझ्या व्यक्तिरेखांचाही आहे. ही कादंबरी वाचल्यानंतर अनेक जण मला म्हणाले की, “झुल्फीला आम्ही तुझ्यामध्ये बघतो!” ही प्रतिक्रिया मला खूप चांगली वाटली. पण, मी ज्या व्यक्तिरेखा लिहितो, त्या प्रत्येक पात्रामध्ये माझ्यातला काही अंश असतो. मी नेहमी माझ्या दृष्टीने पाहण्यापेक्षा हेमिंग्वे म्हणतो, त्याप्रमाणे ‘रायटर हॅज टू अनडस्टॅण्ड’ या दृष्टिकोनातून पाहतो. कोणत्या व्यक्तिरेखेला न्याय देण्यापेक्षा, त्या व्यक्तिरेखेच्या कक्षेमध्ये जाऊन समजून घेण्याचा मी प्रयत्न करतो आणि म्हणून जेव्हा मी रफिकबद्दल लिहितो, तेव्हा रफिक सतत ‘जाळा, तोडा, सगळे धर्मग्रंथ फेका आणि सगळं नाकारा!’ असं मानणारा आहे. त्यामुळे रफिकला क्रांती हवी आहे आणि झुल्फीला उत्क्रांती हवी आहे. मी दोन्ही समजून घेण्याचा प्रयत्न करतो.
लेखकाबरोबर आपण एक दिग्दर्शकही आहात. ‘आम्ही असू लाडके’ हा संवदेनशील चित्रपट आपण प्रेक्षकांसमोर आणला, तर तो चित्रपट करताना विशेष मुलांचे आणि त्यांच्या पालकांचे एक भावविश्व आपण उभे केले, तर त्यावेळी एक दिग्दर्शक म्हणून आपला काय अनुभव होता?



तो अनुभव अत्यंत विलक्षण आणि अकस्मात अनुभव होता. मी एका शाळेच्या स्नेहसंमेलनाला गेलो, तेव्हा मला वाटले की, हे सगळे मांडले पाहिजे. पण, मग ‘डॉक्युमेंटरी’ करायची की चित्रपट? त्या दिवसापर्यंत हा विषय माझ्या डोक्यातही नव्हता. त्या दिवसापासून या विषयाच्या झपाटल्यासारखा मी मागे लागलो. पैसे जमवले आणि चित्रपट तयार झाला. खरंतर या मुलांच्या पालकांना आणि शिक्षकांच्या संयमाचे कौतुक करावे तितके कमीच! मी एका विशेष विद्यार्थ्यांच्या शिक्षिकेला विचारले की, “खरेच तुम्हाला रागच येत नाही का?” त्यावर त्या म्हणाल्या, “रागावून करू काय? चिडचिड करून काय होणार?” मी पाहिले की, एक शिक्षिका दुसर्‍या शिक्षिकेला म्हणाली, “आता तो स्वतःच स्वतःचेकपडे घालतो आणि स्वतःचे स्वतः जेवतो.” त्या मुलाचे वय होते १३ वर्षे! मला असे वाटते की, आपण आपल्या ‘अचिव्हमेंट्स’ एका वेगळ्या नजरेने बघतो आणि ती त्या शिक्षिकेच्यादृष्टीने त्या विद्यार्थ्याची ‘अचिव्हमेंट’ होती. त्यामुळे आपल्या जगण्याच्या मोजपट्ट्या आपल्या यशाच्या मोजपट्ट्या आपल्याला काय मिळाले, या सगळ्या मोजपट्ट्या त्या चित्रपटाने, माझ्या बाबतीत आणि त्या चित्रपटात विविध भूमिका साकारणार्‍या प्रत्येक कलाकाराच्या बाबतीत बदलून टाकल्या. म्हणजे त्या वातावरणामध्ये राहून आम्ही जगण्याकडे वेगळ्या नजरेने पाहायला शिकलो. त्यामुळे या चित्रपटाचे आमच्या आयुष्यामध्ये फार मोठे योगदान आहे, असे मला वाटते.

अनेक चित्रपटांत संवेदनशील विषय मांडले जातात. हे चित्रपट वास्तव दाखवण्याचा प्रयत्न करतात. ‘सिंहासन’ किंवा वजीर’ यांसारख्या चित्रपटामध्ये राजकीय वास्तव प्रतिकात्मक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, हल्ली काही चित्रपटांमध्ये वास्तविकता दाखवण्यासाठी हिंसा किंवा लैंगिकता याचे जे अगदी बटबटीत चित्रण केले जाते, त्याची खरच तशी काही गरज असते का?

 
मुळात मी हिंसा किंवा लैंगिकता दाखवण्याच्या विरोधात नाही. कारण, ते आयुष्याचा एक अंग आहे, जे दुर्लक्षित करता येणार नाही. त्याच्यामुळे ते दाखवणे चुकीचे नाही. पण, जेव्हा आपण ‘सिंहासन’ चित्रपटाविषयी बोलतो, तेव्हा हे लक्षात घ्यायला हवे की,अरुण साधू आणि विजय तेंडुलकर खर्‍या अर्थाने पत्रकारिता जगले आणि राजकारणातलं खरं वास्तव त्यांच्या आजुबाजूला घडत होतं. त्यामुळे त्यांनी चित्रपटातून मांडलेली वास्तविकता ही १०० नंबरी, बावनकशी होते. त्यामुळे या लोकांच्या जगण्याचा हा भाग होता.आणि अश्लिलतेबद्दल मला असं वाटतं की, चंद्रकांत काकोडकरांच्या ‘शमा’ कादंबरीविरोधात खटला दाखल करण्यात आला होता. काकोडकर आपल्याला केवळ रोमॅण्टिक कादंबरीसाठी तसे परिचित आहेत. पण, त्या माणसाच्या सगळ्यात मोठ्या अविष्कार स्वातंत्र्याच्या लढ्याचा आपण कधीच कुठे उल्लेख करत नाही. पण, काकोडकर ‘शमा’ कांदबरीसाठी स्वतः पैसे खर्च करून न्यायालयीन लढाई लढले. तीन न्यायालयांमध्ये ते याविरोधात लढले. पहिल्यांदा ते जिंकले, दुसर्‍यांदा हरले आणि तिसर्‍यांदा सर्वोच्च न्यायालयात त्यांनी ठरवले की, ‘मी पुन्हा लढणार!’ आणि ते एकाकी लढले. त्यावेळी न्यायालयाने असा निकाल दिला होता की, ‘श्लिल’ आणि ‘अश्लिल’ असे काहीचं नसते. आपले हेतू या गोष्टी ठरवत असतात. यामुळे ‘चक्र’ चित्रपटात आपण स्मिता पाटील यांची नग्न आंघोळ बघतो, तर ते आपल्या भावना चाळवण्यासाठी नसते. ‘बॅण्डेड क्विन’मधला तो बलात्काराचा प्रसंग. मी माझ्या आईला घेऊन तो सिनेमा पाहायला गेलो. सिनेमा पाहताना मला जाणवले की, चित्रपट पाहायला सगळी तरूण मुलं चित्रपटगृहात आहेत. आता ते बलात्काराचे दृश्य येताच, या मुलांची प्रतिक्रिया काय असेल? मला वाटले की, आता ही मूलं शिट्ट्या-टाळ्या वाजवतील. हे सगळे पाहून आईला काय वाटेल? पण, खर सांगू, त्या दृश्यावर एकही शिट्टी आली नाही की एकही टाळी वाजली नाही. कारण, त्यामागचा हेतू!

कारण, त्यांना त्या दृश्यातून कोणाच्याही भावना चाळवायच्या नव्हत्या. पण, उलट तो तरूण वर्ग त्या दृश्यामागचा थरार अनुभवत होता. माझा नग्नतेलाही विरोध नाही. परदेशात तर अनेक स्त्री-पुरुष नग्नावस्थेत रंगभूमीवर येतात. त्यामुळे एकूणच त्या कलाकृतीमागचा हेतू काय, तो तपासला पाहिजे आणि हेतू नक्कीच लक्षात येतात. त्यामुळे हेतू चांगला असेल, तर हिंसा अणि लैंगिकतेचा विचारही त्या दृष्टीने व्हायला हवा, असे मला वाटते.
नवोदित लेखकांना आणि अभिजात वाचकांना आपण काय मार्गदर्शन कराल, ज्यामुळे वाचन संस्कृती टिकून राहील, असे आपल्याला वाटते?



मी मार्गदर्शन करणार नाही. पण, लेखक म्हणून मी अपेक्षा जरुर व्यक्त करीन. प्रत्येक कलाकृतीला मोकळेपणाने सामोरे जा! आजकाल काय झाले आहे ना की, साहित्यबाह्य प्रवृत्ती साहित्याकडून वेगळ्या अपेक्षा व्यक्त करायला लागल्या आहेत. लोकं सांगतात की, साहित्यामध्ये हे असले पाहिजे, ते असले पाहिजे, सामाजिक बांधिलकी असली पाहिजे, कशी भूमिका असली पाहिजे, कशी व्यक्तिरेखा असली पाहिजे वगैरे वगैरे. पण, माझं म्हणणं असं आहे की, आमचं आम्हाला करू द्या! त्यामुळे हल्ली होतंय काय की, आजकाल रहस्यकथा वाचायला मिळत नाहीत, आजकाल चांगले विनोद वाचायला मिळत नाहीत, गुढकथा वाचायला मिळत नाहीत. याचे कारण ‘साहित्य अमुक असले की, ते अभिजात साहित्य, अमुक असले की, ते अभिजात नाही’ अशा प्रकारे विचार न करता, प्रत्येक साहित्य हे त्या-त्या साहित्यिकाने आपल्या जीवनाच्या अनुभवाची खिडकी उघडी करुन दिलेली आहे, या पद्धतीने त्याच्याकडे पाहिले पाहिजे. साहित्याची सगळीच दालनं समृद्ध झाली पाहिजे. मग तुम्ही गुढकथा, सामाजिक विषय मांडणारे साहित्य, भावकविता, निसर्ग कविता, मुक्तछंदाकडे, कोणत्याही प्रकारचा पूर्वग्रह न ठेवता वाचायला लागा. मग पाहा, त्यामुळे खूप वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य निर्माण होईल. कारण, अगाथा ख्रिस्तीही महत्त्वाची आणि शेक्सपिअरही महत्त्वाचा! कोणत्याही साहित्यबाह्य प्रवाहांच्या मोजपट्ट्यांतून साहित्याकडे बघू नये, एवढीच माझी वाचकांकडून अपेक्षा. वाचन संस्कृती आहे, पण असे केले तर आणखीन लोकं वाचायला लागतील.

आगामी काळात आपण आम्हा वाचकांसाठी किंवा प्रेक्षकांसाठी काय नवीन प्रकल्प घेऊन येणार आहात?

 
आता सध्या रिकामे झाल्यासारखे वाटत आहे. पण, एक विनोदी नाटक लिहिण्याचा विचार आहे. नवीन कादंबरी सध्या तरी डोक्यात नाही. काही सिनेमांमधल्या भूमिका आहेत, ज्या तयार होऊन पडलेल्या आहेत, त्या लवकरच प्रेक्षकांसमोर येतील.



- वेदश्री दवणे







 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@