बर्फ वितळणे हे हवामानासमोरील संकट?

02 Jan 2022 22:05:08

Antarctica
 
 
 
अंटार्क्टिकामध्ये फ्रान्सपेक्षाही मोठ्या आकाराचा हिमनग वितळल्याची माहिती समोर आल्याने जागतिक स्तरावर चिंता व्यक्त होत आहे. हवामानबदलामुळे जगात हळूहळू मोठे बदल होत आहेत. त्याचा परिणाम अमेरिकेसह जगातील अनेक भागात स्थानिक पातळीवरही दिसत आहे. अलीकडे, याचा मोठा परिणाम अमेरिकेच्या पश्चिम भागात दिसून आला आहे, जो भविष्यात अमेरिकेत बर्फाचा दुष्काळ असल्याचे सूचित करतो. ‘नेचर’ या विज्ञान जर्नलमध्ये ’रिव्ह्यूज अर्थ अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंट’ या शीर्षकासह नुकतेच यासंबंधीचे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे. यानुसार, अमेरिकेच्या पश्चिमेकडील कॅलिफोर्नियासारख्या राज्यांमध्ये बर्फाच्या उपलब्धतेचे संकट उद्भवण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे झाडे, वनस्पती, प्राणी, पक्षी, नदीचे तलाव आणि जंगलात आग लागण्याच्या घटना झपाट्याने वाढू शकतात. संशोधकांचा दावा आहे की, जीवाश्म इंधनाचे उत्सर्जन थांबवले नाही, तर २०५० पर्यंत काही पर्वतराजींमधील बर्फ ४५ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो.
 
 
 
भारतातील हिमालयीन प्रदेशातही बर्फ झपाट्याने क्षीण होत आहे. अमेरिकेच्या पश्चिमेकडील भागात चिंताजनक बदल दिसून येत आहेत. संशोधनानुसार, सीएरामधील ७० टक्क्यांहून अधिक स्थानिक जल व्यवस्थापकांचा असा विश्वास आहे की, पश्चिम ‘युएस’मध्ये अवलंबलेली जल व्यवस्थापन धोरणे भविष्यातील हवामान बदलासाठी योग्य नाहीत. परिणामी, पश्चिम ‘युनायटेड स्टेट्स’च्या ‘सीएरा-नावेदा’मध्ये पडणारा बर्फ कॅलिफोर्नियाच्या ३० टक्के पाण्याची मागणी पूर्ण करतो. पण, आता राज्यात अनेक वेळा बर्फाचा दुष्काळ पडत आहे. २०२१ च्या वसंत ऋतूमध्ये, ‘सीएरा’ला फक्त ६९ टक्के बर्फाळ पाणी मिळाले. मे महिन्यातील उष्णतेने दहा टक्के बर्फाचे बाष्पात रूपांतर करण्याचे काम केले. जूनमध्ये सर्व बर्फ वितळेपर्यंत पाण्यात वाहून गेला. ही बर्फाच्या दुष्काळाची स्पष्ट चिन्हे आहेत. या अभ्यासाचे प्रमुख संशोधक अ‍ॅलन र्‍होड्स आणि त्यांच्या सहकार्‍यांनी अमेरिकेच्या पश्चिमेकडील राज्यांमध्ये होणारे बर्फाचे प्रमाण कमी आणि वाढीचा कालबद्ध अभ्यास केला. अभ्यासातून असे दिसून आले की, २०५० पर्यंत अमेरिकेतील सर्व प्रदेशांमध्ये बर्फाच्या शिखरांची झपाट्याने झीज होईल. ज्यामुळे या प्रदेशात बर्फाचा दुष्काळ पडू शकतो. खरेतर, उष्ण प्रशांत महासागरातील सीएरा, नेवाडा आणि कॅस्केड्ससारख्या प्रदेशातून येणारे आर्द्र वारे, जे कॅलिफोर्नियाच्या पर्वतराजींचा बर्फ वेगाने वितळण्याचे कार्य करतात. जागतिक कार्बन उत्सर्जन मोठ्या प्रमाणात थांबवले नाही, तर ३५ ते ६० वर्षांनंतर या हिमखंडांची धूप नियमितपणे दिसून येईल. हा अभ्यास वाढत्या जागतिक तापमानाचा स्थानिक हवामानावर कसा परिणाम होत आहे, हे दाखवते. ही परिस्थिती भविष्यात लोकसंख्येच्या मोठ्या भागासाठी जलसंकटाचे कारण बनू शकते. त्यामुळे इंधन आणि ऊर्जास्रोतांचे रूपांतरण योग्य पद्धतीने झाले नाही, तर बर्फाचा दुष्काळ पसरत राहील.
 
 
 
हवामान बदलाचे अनेक दुष्परिणाम होत आहेत. उत्तर आणि दक्षिण ध्रुव प्रदेशात वाढत्या तापमानामुळे बर्फ वितळणे यापैकी एक आहे. अतिउष्णता किंवा थंड हवामान हेदेखील यामागचे कारण असल्याचे मानले जाते. अंटार्क्टिकामधील प्रचंड हिमनदी आतापर्यंतच्या अंदाजापेक्षा खूप वेगाने वितळत आहे. त्यामुळे समुद्राची पातळी वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. ‘युएस नॅशनल स्नो अ‍ॅण्ड आईस सेंटर’, ‘सेंट्रल वॉशिंग्टन’ विद्यापीठाच्या पॉल बिनबेरी यांनी केलेल्या अभ्यासात दावा केला की, उत्तर ध्रुवावरील बर्फ ३२.९० दशलक्ष चौरस किलोमीटर क्षेत्रातून वितळला आहे. ‘युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड’चे भूभौतिकशास्त्रज्ञ डॅनियल लॅथ्रोप म्हणतात की, याचे कारण पृथ्वीच्या बाहेरील थरातील हालचाल आहे. पृथ्वीच्या मध्यभागी लोह आणि निकेल धातूंचा गरम द्रव महासागर आहे आणि या हालचालीमुळे विद्युत क्षेत्र निर्माण होते. तथापि, चुंबकीय ध्रुव वेगाने सरकण्याचे नेमके कारण भूगर्भशास्त्रज्ञांना अद्याप समजलेले नाही. विसाव्या शतकात, उत्तर ध्रुव, टोरंटो आणि पनामा सिटी यांना जोडणारी रेखांश रेषा कॅनडाच्या हडसन खाडीकडे सरकत आहे. जागतिक स्तरावर हवामान बदलाच्या बाबत घडणार्‍या घडामोडींची नेमकी दखल घेण्याची गरज यामुळे पुन्हा एकदा प्रतिपादित होत आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0