रवीश कुमार यांनी ‘स्वस्तिक या हिंदूंच्या चिन्हाची तुलना थेट नाझीच्या ‘हाकेन्क्रुझ’ या चिन्हाशी केली आहे. हिंदू, बौद्ध, जैन समाजामध्ये ‘स्वस्तिक’ चिन्ह पवित्र आणि शुभ मानले जाते. पण, इस्लामधर्मीय आणि साम्यवादी विचारसरणीच्या प्रवृत्तींनी, या चिन्हाची हिटलरच्या चिन्हाशी तुलना करून हिंदू धर्माची बदनामी करण्याचा प्रयत्न जागतिक पातळीवर चालविला आहे.
आपल्याच देशात हिंदू समाजास कमी लेखणारे, हिंदू धर्मास संधी मिळेल तेव्हा अपमानित करणारे अनेक नतद्रष्ट अस्तित्त्वात आहेत. हिंदू समाजास, हिंदू धर्मास दूषणे दिली की, आपण अधिक पुरोगामी ठरत असल्याचा अशा मंडळींचा समज असावा! अशा महाभागांपैकी एक आहेत एनडीटीव्हीचे संपादक रवीश कुमार. त्यांनी अलीकडेच आपल्या वाहिनीवरील एका कार्यक्रमात, हिंदूंना पवित्र असलेल्या ‘स्वस्तिक’ या चिन्हाचा उल्लेख ‘नाझी के चिन्ह स्वस्तिक’ असा केला. हिंदू धर्मामध्ये शेकडो शतकांपासून जी पवित्र चिन्हे पुजली जातात, त्यामध्ये ‘स्वस्तिक’ या चिन्हाचाही समावेश असतो, हे या संपादक रवीश कुमार महाशयांना माहित नाही काय? पवित्र ‘स्वस्तिक’ चिन्हाचा उपयोग सर्व शुभ कार्यांमध्ये करण्यात येत असतो, याची अशिक्षित हिंदूंनाही माहिती असते. पण, भारतात राहणार्या रवीश कुमार नावाच्या, आपली अक्कल पाजळणार्या कथित बुद्धीवाद्यास माहिती नसावे? रवीश कुमार यांनी ‘स्वस्तिक या हिंदूंच्या चिन्हाची तुलना थेट नाझीच्या ‘हाकेन्क्रुझ’ या चिन्हाशी केली आहे. हिंदू, बौद्ध, जैन समाजामध्ये ‘स्वस्तिक’ चिन्ह पवित्र आणि शुभ मानले जाते. पण, इस्लामधर्मीय आणि साम्यवादी विचारसरणीच्या प्रवृत्तींनी, या चिन्हाची हिटलरच्या चिन्हाशी तुलना करून हिंदू धर्माची बदनामी करण्याचा प्रयत्न जागतिक पातळीवर चालविला आहे.
काँग्रेसचे नेते अभिषेक मनू सिंघवी यांनीही ‘स्वस्तिक’ हे हिंदूंचे पवित्र चिन्ह असल्याचे म्हटले असून, त्याबद्दल गैरसमज पसरविणार्यांचा निषेध करायला हवा, असे म्हटले होते. नाझींनी या चिन्हाचा दुरुपयोग केला, असेही त्यांनी म्हटले होते. रवीश कुमार यांनीच केवळ ‘स्वस्तिक’चा संबंध नाझींशी जोडलेला नाही. अमेरिकेत २०२० साली न्यूयॉर्क सिनेटमध्ये एक विधेयक येऊ घातले होते. द्वेषमूलक अशी जी चिन्हे आहेत, त्याचा वापर न करण्यासंदर्भातील ते विधेयक होते. अशा चिन्हांमध्ये ‘स्वस्तिक’ चिन्हाचा समावेश असल्याचे लक्षात येताच अमेरिकेतील विश्व हिंदू परिषदेने सिनेटकडे निवेदन सादर करून आपला विरोध दर्शविला. ‘स्वस्तिक’ चिन्हाचा या विधेयकात समावेश करण्याचा प्रकार हा जगातील १.८ अब्ज हिंदू आणि बौद्ध समाजाचा अपमान करणारा आहे. ‘स्वस्तिक’ चिन्हाचा द्वेषमूलक चिन्हांमध्ये समावेश केल्यास हिंदू समाजाबद्दल गैरसमज पसरेल, असेही अमेरिकेच्या विश्व हिंदू परिषदेने आपल्या निवेदनात म्हटले होते. अमेरिकेतील ज्यू समाजानेही ‘स्वस्तिक’ चिन्हाचे पावित्र्य विशद करणारे एक पत्रक प्रसिद्ध केले होते. फेब्रुवारी २००८ मध्ये जेरुसलेम येथे हिंदू आणि ज्यू नेत्यांची जी शिखर परिषद झाली होती, त्यामध्येही ‘स्वस्तिक’ चिन्हाचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला होता. हजारो वर्षांपासून हिंदू समाजासाठी हे पवित्र धार्मिक चिन्ह असल्याचेही या शिखर परिषदेत सहभागी झालेल्यांनी नमूद केले आहे, असे सर्व असताना आपल्याच देशातील काही महाभागांना या चिन्हाबद्दल इतका दुस्वास का? या पवित्र चिन्हाची तुलना नाझींच्या चिन्हांशी करून कोणता संदेश हे पुरोगामी देऊ इच्छितात? एका वृत्तवाहिनीच्या संपादकपदी असलेली व्यक्ती इतका हिणकस विचार कसा काय करू शकते? जागृत हिंदू समाजच अशा नतद्रष्ट व्यक्तींना वठणीवर आणू शकेल!
‘दारुल उलूम’चे बेकायदेशीर फतवे!
पश्चिम उत्तर प्रदेशातील देवबंद येथील ‘दारुल उलूम’ या मुस्लीम धार्मिक संस्थेकडून अनेक प्रकारचे फतवे मुस्लीम समाजासाठी काढले जातात. त्यातील काही फतवे हे आक्षेपार्ह, बेकायदेशीर आणि गैरसमज पसरविणारे असतात. या ‘दारुल उलूम’ने मुलांच्या संदर्भातील काही फतवे जारी करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. ‘दारुल उलूम’ने दत्तक घेतल्या जाणार्या मुलांसंदर्भात जे फतवे काढले आहेत, ते भारतीय कायद्यांशी विसंगत आहेत. तसेच अशा फतव्यांद्वारे दत्तक घेतलेल्या मुलास संपत्तीमधील अधिकार नाकारण्यात आला आहे. दत्तक घेतलेले मूल खरे वारस नसल्याचेही एका फतव्यात म्हटले आहे. ‘दारूल उलूम’च्या या फतव्यासंदर्भात करण्यात आलेल्या तक्रारीनंतर बालहक्क संरक्षणविषयक राष्ट्रीय आयोगाने सहारनपूर जिल्हा दंडाधिकार्याना पत्र लिहून, आक्षेपार्ह फतवे काढणार्या ‘दारुल उलूम’ या संस्थेवर कारवाई करण्यात यावी, असा आदेश दिला आहे. मुलांच्या संदर्भात बेकायदेशीर, गैरसमज पसरविणारे फतवे आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणार्या या धार्मिक संस्थेवर कारवाई करावी आणि काय कारवाई केली, या संदर्भातील अहवाल दहा दिवसांच्या आत आयोगास सादर करावा, असे आयोगाने आपल्या आदेशात म्हटले आहे. ‘दारुल उलूम’कडून जे वादग्रस्त फतवे काढले जातात, त्यामुळे विविध कायद्यांचे उल्लंघन होते. तसेच अशा फतव्यांमुळे लोकांना कायद्यांचे उल्लंघन करण्यास प्रवृत्त केले जाते. हे सर्व पाहता अशा धार्मिक संस्थांच्या आक्षेपार्ह फतव्यांवर निर्बंध आणण्याची आवश्यकता आहे. शासनाचा कठोर अंकुश अशा संस्थांवर असेल, तर असे आक्षेपार्ह फतवे त्यांच्याकडून काढले जाणार नाहीत. मुस्लीम समाजास विद्यमान भारतीय कायद्यांचे उल्लंघन करण्यास प्रवृत्त करणारे फतवे काढणार्या ‘दारुल उलूम’सारख्या धार्मिक संस्थांवर डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे.
सूर्यनमस्कार उपक्रमात ७५ लाख नागरिकांचा सहभाग!
योग, सूर्यनमस्कार याबद्दल जगामध्ये मोठ्या प्रमाणात आकर्षण वाढत चालले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे आता सर्वत्र ‘जागतिक योग दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. विविध देशांमधील नागरिक मोठ्या संख्येने ‘जागतिक योग दिना’सारख्या उपक्रमात सहभागी होत आहेत. धार्मिक कारणे पुढे करून या उपक्रमात मोडता घालण्याचे प्रयत्न काही विघ्नसंतोषीकडून केले गेले. पण, त्या प्रयत्नांना कोणीच धूप घातली नसल्याचेच दिसून आले. ‘जागतिक योग दिना’प्रमाणेच सूर्यनमस्कार हा व्यायामप्रकारही जागतिक पातळीवर लोकप्रिय होत चालला आहे. शरीर आणि मनाचे आरोग्य उत्तम ठेवणार्या या व्यायाम प्रकाराचे अलीकडेच जागतिक पातळीवर आयोजन करण्यात आले होते. कोरोना महामारीच्या काळात आभासी पद्धतीने योजण्यात आलेल्या या उपक्रमात विविध देशांमधील ७५ लाखांहून अधिक नागरिक सहभागी झाले होते. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाकडून नुकतीच या उपक्रमाची माहिती देण्यात आली. उद्घाटनाच्या कार्यक्रमास बाबा रामदेव, रविशंकर, आचार्य बाळकृष्ण, सदगुरु जग्गी वासुदेव यांच्यासह जगभरातील विविध मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना केंद्रीय आयुष्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी, सूर्यनमस्काराच्याद्वारे सूर्योपासना केल्याने शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सुधारण्यास मदत होते, असे सांगितले. ‘ईशा फाउंडेशन’चे सदगुरु जग्गी वासुदेव म्हणाले की, “या जगातील प्रत्येक गोष्ट ही सौरऊर्जेद्वारे संचालित केली जाते. रोज सूर्यनमस्कार घातल्यास शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सुधारण्यास मदत होते.” इटलीच्या योग संस्थेचे डॉ. रोसी यांनी, आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी सूर्यनमस्कार घालण्याचे आवाहन जगभरातील जनतेला केले. योग आणि सूर्यनमस्कार या उपक्रमांना जागतिक पातळीवर मिळालेला प्रतिसाद पाहता, शरीर आणि मन या दोन्हींचे आरोग्य उत्तम राखणारे हे व्यायाम प्रकार जागतिक पातळीवर अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत हेच दिसून येते.
९८६९०२०७३२