मुंबई : मुंबईतील कोरोना संसर्गातील अस्थिरता दिवसेंदिवस प्रकर्षाने उल्लेखित होत आहे. कोरोनाबाधित रुग्णसंख्येतील या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका प्रशासनातर्फे नवीन निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता शहरातील विवाह नोंदणी सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. त्यामुळे समाजातील विविध घटकांवर विपरीत परिणाम करणाऱ्या कोरोनामुळे विवाहांवरही संक्रांत आल्याचे दिसून येत आहे.
शहरातील कोरोना बाधितांच्या संख्येत होणारी वाढ आणि त्यातील असमतोल यामुळे प्रशासनाने मुंबईतील विवाह नोंदणी सेवा तात्पुरती थांबवली आहे, असे मुंबई पालिकेतर्फे सांगण्यात आले आहे. मुंबई पालिकेनं यासंदर्भात ट्विट केले आहे. 'मुंबईतील सध्याची कोरोनाची स्थिती पाहता महापालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे शहरातील विवाह नोंदणी सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे.' असे मुंबई महापालिकेने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.