मागील दोन भागांमध्ये आपण आंध्र प्रदेश आणि तेलंगणमधील काही मंदिरे, त्यांचा संक्षिप्त इतिहास, मंदिरांची स्थापत्त्य शैली यांची धावती ओळख करुन घेतली. तेव्हा, आजच्या ‘दर्शन’च्या या शेवटच्या भागात माहिती करुन घेऊया श्री क्षेत्र पीठापुरम आणि परिसरातील मंदिरांविषयी...
श्री क्षेत्र पीठापुरम
श्री क्षेत्र पीठापुरम हे आंध्र प्रदेशमधील श्री दत्त क्षेत्रांपैकी एक पवित्र स्थान. श्री दत्तात्रेयांचा कलियुगातील श्रीपाद श्रीवल्लभ हा प्रथम अवतार पीठापुरम या गावी इसवी सन १३२० मध्ये झाला. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींची ही जन्मभूमी असल्याने येथील परिसरात एक अनामिक चैतन्याची अनुभूती येते. पीठापुरम शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. पीठापुरमचे मूळ नाव ‘पिथिकापुरम’ असे होते. शहराचा उल्लेख करणारा सर्वात जुना अस्तित्त्वात असलेला शिलालेख म्हणजे चौथ्या शतकातील राजा समुद्रगुप्ताचा अलाहाबाद स्तंभ शिलालेख होय, ज्यामध्ये त्याने पीठिकापुरमचा राजा महेंद्र याचा पराभव केला असल्याचा उल्लेख आहे. चौथ्या आणि पाचव्या शतकातील वसिष्ठ आणि मथरा राजघराण्यातील शिलालेखांमध्येही ‘पिष्टपुरा’चा उल्लेख आहे, ज्याचे वर्णन कलिंगाचा एक भाग असे आहे. सातव्या शतकात चालुक्य राजा पुलकेशीन द्वितीय याने पिष्टपुरा आपल्या राज्याला जोडले. नंतर पिठापुरम हे वेंगी चालुक्यांचे प्रशासकीय विभाग असलेल्या राष्ट्रांपैकी एक होते. तसेच पीठापुरम शहरात ‘पुरुहितिका’ देवीचे मंदिर आहे. हे १८ शक्तिपीठांपैकी एक आहे. अशा या प्राचीन शहरामध्ये श्री श्रीपाद श्रीवल्लभ सर्व जगताच्या दु:ख निवारणासाठी अवतारित झाले होते. श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान येथे श्रीपाद श्रीवल्लभांचे मूळ मंदिर १९९२ साली स्थापित झाले. भगवान श्रीदत्त, त्यांच्या उजव्या बाजूला श्रीपाद श्रीवल्लभ आणि डाव्या बाजूला श्रीनृसिंह सरस्वती आहेत. तसेच गाभार्यात श्रीगणेशही विराजमान आहेत. प्रशस्त असा सभामंडप असून समोर अंगणात औदुंबराचे झाड आहे. या पवित्र औदुंबराच्या पायथ्याशी श्रीपाद श्रीवल्लभांची स्मितहास्य करणारी मूर्ती तसेच काळ्याकुळकुळीत दगडातील श्रीपादांच्या कोरीव पादुका लक्ष वेधून घेतात. या पारावर तुपाचा दिवा लावण्याची प्रथा आहे. अनेक भाविक आपली सुखदु:खे घेऊन श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरणी येतात. इथे ‘श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत’ हा ग्रंथ सर्व भाषांमध्ये उपलब्ध असून ज्यांना पारायण करायचे आहे, त्यांच्या बैठकीचीही व्यवस्था इथे करण्यात येते.
या मंदिरात सकाळी पूजा आणि काकड आरती, नंतर सवत्स गोपूजा, नंतर अभिषेक तथा रुद्राभिषेक, विशिष्ट वार-तिथींना दत्तयाग, नक्षत्रांनुसार पूजा तसेच सायंपूजा, पालखी आणि शेजारती असते. येथील खास वैशिष्ट्य म्हणजे, कोणीही भाविक त्याला जी दत्तसेवा करायची असेल, ती तो करू शकतो. उदा. भोजनगृहात भाज्या निवडण्यापासून प्रसाद वाटण्यापर्यंत नि:संकोच कोणतेही काम लोक श्रद्धेने करतात. तसेच येथे सकाळी प्रसाद असतो, दुपारी भोजन, संध्याकाळी प्रसाद आणि रात्रीही भोजन असते. इथे राहाण्याचीही सोयही नि:शुल्क असते, केवळ ४५ दिवस आधी त्यांना ‘ई-मेल’ करून ‘बुकिंग’ करावे लागते. मंदिराच्या स्थापत्त्याविषयी खास वैशिष्ट्यपूर्ण असे जरी नसले तरी दाक्षिणात्य पद्धतीचे हे मंदिर आहे. इथे लोक हे कोणतेही स्थापत्त्यशास्त्र किंवा मंदिर बघण्यासाठी येत नसून श्रद्धेने येतात. या क्षेत्राला ‘पादगया’ असेही म्हणतात. येथे एक तलाव असून तेथे पिंडदान केल्यास आत्म्यांना मुक्ती मिळते, अशी श्रद्धा आहे.
पीठापुरमला आल्यावर आजुबाजूच्या मंदिरांचेही जरुर दर्शन घ्यावे. ज्यांनी ‘श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत’ आधीच वाचलेले असेल, त्यांना या मंदिरांची नावे आणि महात्म्य परिचयाचेच. पीठापुरम क्षेत्री चार महत्त्वाची मंदिरे आहेत. त्यातील प्रथम आहे श्री कुक्कुटेश्वर मंदिर. श्री श्रीपाद श्रीवल्लभ त्यांच्या बालपणीच्या काळात पूजा-अर्चनेसाठी या मंदिरात जायचे. पुराणांमध्ये उल्लेख असल्याप्रमाणे जी चार मोक्ष देणारी स्थाने आहेत, त्यातील एक पीठापुरम आणि ज्या जलक्षेत्री पिंडदान करून मुक्ती मिळते, ते जलक्षेत्र या कुक्कुटेश्वर मंदिराजवळ आहे. या मंदिरामध्ये आद्य शंकराचार्य, काशिविश्वनाथ, नवग्रह, अय्यप्पा स्वामी, श्री सरस्वती मंदिर अशीही अन्य मंदिरे या परिसरात आहेत. मंदिरामध्ये प्रवेश करतानाच प्रथम दिसतो, तो ‘एकशिला नंदी.’ एका काळ्या मोठ्या दगडामध्ये नंदी कोरलेला असून समोर शंकराचे एक लहान मंदिर आहे. या ध्वजद्वारासमोरच आहे तो ‘पादगया’ हे नाव ज्यामुळे पडले, तो मुक्ती देणारा विशाल तलाव. या तलावात गयासुर आणि यज्ञ करणारे ब्रह्मदेव आदी साकारलेले आहे. या गयासुराच्या यज्ञाची तलावातील प्रतिमा प्रथम लक्ष वेधून घेते. या तलावाच्या काठी श्री कुक्कुटेश्वराचे भव्य काळ्या दगडातील मंदिर आहे. या मंदिरातील शिवलिंग हे स्फटिकाचे आहे. पांढर्या संगमरवराचे हे स्वयंभू लिंग असून, त्याची उंची दोन फूट आहे. यज्ञावेळी गयासुराला उठवण्यासाठी भगवान शंकरांनी कुक्कुटाच्या रुपात बांग दिली. म्हणून या क्षेत्राला ‘कुक्कुटेश्वर’ असे म्हणतात. काहींच्या म्हणण्यानुसार हे शिवलिंग कुक्कुटरुपात दिसते, म्हणून ‘कुक्कुटेश्वर’ असे संबोधले जाते.
कुक्कुटेश्वर मंदिराजवळच कुंतीमाधवस्वामी मंदिर हे शहरातील आणखी एक मोठे मंदिर. कुंतीने माधवाची प्रतिमा स्थापन करून त्याची पूजा केली. म्हणून हे क्षेत्र ‘कुंतीमाधव’ म्हणून नावारुपास आले. या देवतेची पूर्वी व्यास, वाल्मिकी आणि अगस्ती ऋषींनी पूजा केली, असे म्हणतात. स्वयंभू श्री दत्तात्रेय स्वामीदेखील या मंदिर परिसरात आहेत. याच संकुलात श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या मूर्तीची स्वतंत्रपणे पूजा केली जाते. पीठापुरम क्षेत्री पुरुहुत्तिका देवीचे मंदिर आहे. भारतातील १८ शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ हे मंदिर आहे. एका आख्यायिकेनुसार ‘पीठापुरम’ हे नाव या देवीच्या नावावरून पडले आहे. या देवीची मूर्ती आनंदविलासिनी असून खालील डाव्या हातात सोन्याची वाटी, खालच्या उजव्या हातामध्ये फळे, वरील डाव्या हातात ड्रम आणि वरील उजव्या हातात धातूची काठी आहे. तिच्या पाठीमागे श्रीचक्र आहे. ती भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते. श्री श्रीपाद श्रीवल्लभ अनघादत्त मंदिर हे एकमेव असे पीठापुरममधील मंदिर आहे, जिथे श्रीदत्त अनघादेवी समवेत आहेत. या मंदिरासमोर भव्य असा पितळी स्तंभ आहे. तसेच पीठापुरममधील वेणुगोपाळ मंदिरही प्रेक्षणीय आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्मस्थान असणारे त्यांच्या मामाचे घर मूळ संस्थानापासून १००-१५० मी. अंतरावरच आहे. तिथे असणार्या औदुंबरवृक्षाखाली श्रीपाद ध्यानस्थ बसत. अनेक स्त्रिया रक्षाबंधनाच्या दिवशी या वृक्षाला राखी बांधून रक्षणाची प्रार्थना करतात.
श्री वीरव्यंकट सत्यनारायण स्वामी मंदिर
श्री क्षेत्र पीठापुरमवरून ३० किमी अंतरावर ‘अन्नावरम’ हे भारतातील सर्वात प्रसिद्ध पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक असून आणि आंध्र प्रदेशातील श्रीमंत देवस्थान आहे. हे मंदिर द्रविड शैलीत बांधलेले आहे. येथील मुख्य देवता श्री सत्यनारायण असून स्कंदपुराणाच्या रेवाखंडामध्ये भगवान सत्यदेवांच्या महिमेचे मोठ्या प्रमाणावर वर्णन आलेले आहे. भगवान सत्यदेवांनी आपल्या पत्नी श्री अनंतलक्ष्मीसह रत्नगिरीवर निवास केला. अन्नावरम येथे श्री सत्यनारायण स्वामींनापदस्पर्श करणारी पंपा नदीदेखील आहे. वैष्णव आणि शैवपंथीय दोघेही या मंदिरामध्ये दर्शनास येतात. ‘अन्नावरम’ या नावामागेही दोन व्युत्पत्ती सांगितल्या जातात. एक म्हणजे येथे अविरत अन्नदान केले जाते, ‘अन्नम वरम’ (विनामूल्य आहार) म्हणून या ठिकाणाला ‘अन्नवरम’ असे म्हणतात. दुसरी व्युत्पत्ती म्हणजे श्री सत्यनारायण देवता ‘अनिना वरम’ (म्हणजे इच्छित फळ, वर) देऊन आशीर्वाद देते म्हणून हे ‘अन्नावरम.’ अन्नावरम गावाच्या बाजूला एक टेकडी आहे. या टेकडीच्या संदर्भात एक कथा आहे. पर्वतांचा स्वामी मेरु आणि त्याची पत्नी मेनका यांनी येथे घोर तपश्चर्या केली. भगवान विष्णूच्या कृपेने त्यांना दोन पुत्र झाले. एकाचे नाव भद्रा आणि दुसर्याचे रत्नाकर. भद्राने भगवान विष्णूंना त्यांच्या भक्ती आणि तपश्चर्येने प्रसन्न केले आणि त्यांच्या कृपेने एका टेकडीचे नाव ‘भद्राचलम’ झाले, ज्यावर भगवान श्रीरामांनी वास्तव्य केले. रत्नाकरानेही आपल्या तपश्चर्येने वीर व्यंकट सत्यनारायणस्वामींना प्रसन्न करून त्यांना आपल्या टेकडीवर वसण्याची प्रार्थना केली आणि भगवान तेथे कायमचे स्थायिक झाले. श्री वीर व्यंकट सत्यनारायणस्वामी यांचे मंदिर हे रत्नगिरी टेकडीवरील मुख्य मंदिर आहे. जवळच श्रीरामाचे मंदिर आणि वनदुर्गा आणि कनकदुर्गा यांची तीर्थे आहेत. ग्रामदेवता नेरेल्लम्माचे मंदिर डोंगराच्या पायथ्याशी आहे. एका बाजूला बंगालचा उपसागर, मोहक निसर्ग आणि दुसर्या बाजूला पूर्वघाटांची रांग, टेकड्यांभोवती हिरवीगार शेतं आणि रत्नगिरीला वेढलेली पंपा नदी यामध्ये श्री वीर व्यंकट सत्यनारायणाचे मंदिर आहे. या मंदिराला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. ३०० दगडी पायर्या चढून या मंदिरात जाता येते आणि दुसरा मार्ग म्हणजे मंदिराच्या अगदी जवळ वाहनानेही जाता येते. पक्क्या रस्त्याचे बांधकाम येथे झालेले आहे.
१८९१ मध्ये श्री सत्यनारायण स्वामींची मूर्ती या टेकडीवर सापडली. तेव्हा लहानशी शेड बांधून या मंदिराचे लोकार्पण करण्यात आलेले. १९३३ मध्ये पुनर्बांधणी आणि २०१२ मध्ये जीर्णोद्धार करण्यात आला. मुख्य मंदिर चार कोपर्यांवर चार चाकांसह रथाच्या स्वरूपात बांधलेले आहे. मुख्य मंदिरासमोर आधुनिक वास्तुकलेने बांधलेला आणि सजलेला कल्याण मंडप आहे. अग्निपुराणातील ‘मंदिर’ संकल्पनेनुसार या मंदिराची निर्मिती झालेली आहे. मंदिराच्या पुढच्या बाजूला रथाचे कोरीव काम आहे. सूर्य आणि चंद्राचे चित्रण करणारी रथाची चाके आपल्याला आठवण करून देतात की, हे जग काळाच्या चाकांवर अनंतकाळ सुरू आहे. येथील प्रमुख सत्यनारायणाची मूर्ती दंडगोलाकार स्वरूपात सुमारे १३ फूट उंच आहे. असे म्हटले जाते की, या मूर्तीचा पाया भगवान ब्रह्माचे प्रतिनिधित्व करतो. मुख भगवान विष्णूचे रूप दर्शवतात आणि मूर्तीच मध्य भाग भगवान शिवाचे प्रतिनिधित्व करतो. या सत्यनारायण मंदिरात निर्माता (ब्रह्मा), रक्षक (विष्णू) आणि विनाशक (शिव) यांची एकाच वेळी पूजा केली जाते. या मंदिराची अंतर्गत रचनाही ‘पंचायतन’ पद्धतीची आहे. गणपती, सूर्यनारायणस्वामी, बाला त्रिपुरासुंदरी आणि महेश्वरस्वामी या चार देवता असून श्री सत्यनारायण मध्यभागी वसलेले आहे. पीठापुरम क्षेत्री सर्व मंदिरे बघायची आणि दत्तसेवा करायची असेल, तर किमान दीड दिवस लागतो. अत्यंत विलक्षण शांततेचा अनुभव पीठापुरमला येतो. अनेक मराठी भाविकही आपल्याला येथे भेटतात. संस्थानच्या समोरील चहाचे दुकानसुद्धा मूळच्या पुण्यातल्या एका माणसाचे आहे. भाषा, जेवण, राहाणे याचा कोणताच प्रश्न पीठापुरमला येत नाही. आंध्र प्रदेश आणि तेलंगणमधील ही काही महत्त्वाची मंदिरे. या एकूण दर्शन आणि प्रवासासाठी साधारण चार ते पाच दिवस लागतात. आयुष्यात एकदा तरी अनुभवावी अशी ही मंदिरे... त्यांची भव्यदिव्यता आणि आध्यात्मिक समृद्धी पाहून आपुसकच आपण म्हणतो... मंदिरं शरणं गच्छामि!
कसे जाल?
रेल्वेने जायचे असेल तर पीठापुरम रेल्वे स्थानक आहेच, तेथून मंदिर एक-दीड किमी अंतरावर आहे. तरीही १५०-२०० रु. रिक्षाचा खर्च येतो. पीठापुरमच्या आधीचे रेल्वे स्थानक सामलकोट आहे. तेथून पीठापुरम आठ किमी दूर असून सामलकोट-पीठापुरम अशा बससेवाही आहे. विमानाने जायचे असेल तर राजमुंद्री (राजमहेंद्री) हे जवळचे विमानतळ आहे, अन्यथा विशाखापट्टणमवरूनही पीठापुरमला जाता येते.
पीठापुरमजवळील अन्य प्रेक्षणीय स्थळे
गोदावरी महापुष्पकवनम, काकीनाडा बीच, श्री ऐश्वर्यादेवी मंदिर, भावनारायण मंदिर, श्री भीमेश्वरस्वामी मंदिर, त्रिवेणी संगम, कोरिंग अभयारण्य (Coringa)
- वसुमती करंदीकर