सण संक्रांतीचा, विविधतेत एकतेचा...

14 Jan 2022 12:04:16

MAKAR SANKRANTI



संक्रांतीचा ( makar sankranti )  सण साजरा करण्यात प्रचंड विविधता दिसते. पदार्थांमध्ये, गोधनाच्या सेवेमध्ये, उपासनेमध्ये आणि खेळांमध्ये ही विविधता दिसते. असे म्हणता येईल की, या सणाचे तत्त्व एक आहे - तीळगूळ, गोसेवा आणि सूर्योपासना आणि भारतभर तेच एक तत्त्व विविध प्रकारांनी प्रकट केले जाते. ही एकातून प्रकट झालेली विविधता आहे आणि खोलात गेले की, वरवर दिसणार्‍या विविधतेत एकता दिसते.


विविधतेत एकता दिसणे हे प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान. या उदात्त विचाराचा पाया वेदांनी घालून दिला आहे. ऋग्वेदात दीर्घतमा औचथ्यः ऋषींनी सूर्याची स्तुती करतांना म्हटले आहे-


इन्द्रं मित्रं वरुणमग्निमाहुरथो दिव्यः
स सुपर्णो गरुत्मान्।
एकं सद् विप्रा बहुधा वदन्त्यग्निं यमं मातरिश्वानमाहुः ॥ ऋग्वेद 1.164.46॥



ज्ञानी जन वेगवेगळ्या प्रकारे तुझ्या एकाचे वर्णन करतात. ते एकाच सत् वस्तूला ‘इंद्र’, ‘मित्र’, ‘अग्नी’, ‘वरुण’ आणि ‘सूर्य’ म्हणतात. ‘परमात्मा’ हे एकच तत्त्व आहे. ते जेव्हा ऐश्वर्यवान होते, तेव्हा त्याला ‘इंद्र’ म्हटले आहे, हितकारी होते तेव्हा त्याला ‘मित्र’ म्हटले आहे, श्रेष्ठ होते तेव्हा ‘वरुण’ म्हटले आहे, पृथ्वीवर प्रकाश देणारे होते तेव्हा त्याला ‘अग्नी’ म्हटले आहे आणि आकाशात प्रकाश देणारे होते तेव्हा त्यालाच ‘सूर्य’ म्हटले आहे!
हाच विचार पुढे नेत उपनिषदांनी परमात्म्याबद्दल म्हटले आहे -


॥ स एकाकी न रमते ॥
तो परमात्मा एकटाच होता, पण त्याला एकट्याने करमेना, म्हणून तो एकाचा अनेक झाला -

॥ एकोऽहं बहुस्यां॥



अर्थात, एकाचेच अनेक होणे आणि अनेकात एक पाहणे ही वृत्ती अंगी बाणल्याने भारतीय जीवनाच्या प्रत्येक अंगात आपल्याला एकच तत्त्व विविध प्रकारे नटतांना दिसते आणि त्या विविधतेत पुन्हा एक तत्व पाहाण्याची शक्ती आपल्या दृष्टीला वेदांनी दिली आहे. औदार्यमूर्ती असलेल्या वेदांनी विविधतेला प्रोत्साहन दिले.

विविधतेतील एकता जाणण्यासाठी मकरसंक्रांतीचा सण एक उत्तम उदाहरण आहे. या सणाचे तत्त्व आहे - सूर्याचा मकर राशीत प्रवेश. पूर्वी हे संक्रमण दि. 21 डिसेंबरला होत असे, आता दि. 14-15जानेवारीला होते. सूर्याचा मकर राशीत प्रवेश होणे, हे उत्तरायण सुरु झाल्याचे सूचित करणारी आकाशातील अलौकिक घटना होती. थंडी आणि अंधाराचे राज्य संपून प्रकाशाचे आणि उबेचे राज्य सुरु होणार असल्याची ही नांदी आहे! सूर्याचे मकर राशीतील आगमन आता दिवस मोठा होत जाणार, अधिक उजेड, अधिक उब घेऊन येणार असल्याचा संकेत आहे.



पण, अजून थंडी संपली नाहीये... म्हणून थंडीसाठी उपयुक्त असलेले तीळ व गूळ आहारात घ्यायला हवेत, या काळात खूप भाज्या पिकत असल्यामुळे भरपूर भाज्या खाव्यात. वैदिक यज्ञव्यवस्थेने उत्तरायणाला आणि दक्षिणायनाला गुरांची विशेष करून बैलांची सेवा/पूजा करण्यास सांगितले आहे. उत्तरायण व दक्षिणायन दि. 21 जून व 21 डिसेंबरला असते. पण, आपण प्राचीन परंपरेला अनुसरून ते श्रावण अमावस्येला आणि मकरसंक्रांतीला साजरं करतो. सूर्याची पूजा, अग्नीची पूजा, बैलांचा उत्सव आणि आहारात तीळगुळाचा समावेश हे एक तत्त्व भारताच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळे नाम व रूप घेऊन नटलेले दिसते. ते वैविध्यपूर्ण रूप पाहू.


सूर्य पूर्ण वर्षात 12 राशींमध्ये प्रवास करत असल्याने, प्रत्येक महिन्यात एक संक्रांत असते. पण, शिशिर ऋतूमधली मकर राशीतली संक्रांतीला विशेष महत्त्व आहे. जम्मू-काश्मीरमध्ये मकरसंक्रांतीला‘शिशुरसंक्रांत’ नाव आहे, शिशिर ऋतूमधली संक्रांत म्हणून. स्थानिक कॅलेंडरमधील महिना अमावस्येला संपतो की पौर्णिमेला, त्यानुसार मकर राशीतली संक्रांत पौष महिन्यात किंवा माघ महिन्यात येते. उत्तरेकडे माघ महिन्यात मकरसंक्रांत येत असल्याने तेथील संक्रांतीच्या नावात ‘माघ’ येते. नेपाळमध्ये ‘मागे संक्रांत’, पंजाबमध्ये ‘माघी’, हिमाचलमध्ये ‘मागी साजी’ आणि आसाममध्ये ‘माघ बिहू’ अशी नावे दिसतात.


बंगालमध्ये आणि बांगलादेशमध्येया सणाला ‘पौष संगक्रांती’ म्हणतात. सिंध (पाकिस्तान) मध्ये संक्रांतीला ‘उत्रान’ (उत्तरायण) म्हणतात, राजस्थान व गुजरातमध्ये ‘उत्तरायण’ म्हणता, उत्तर प्रदेश व बिहारमध्ये ‘खिचडी’ म्हणतात. महाराष्ट्र, ओडिशा व आंध्रमध्ये ‘मकरसंक्रांती’ म्हणतात. कर्नाटकमध्ये ‘मकरसंक्रमण’ आणि केरळमध्ये‘मकरविल्लाक्कू.’ तामिळनाडू, श्रीलंका, सिंगापूर, मलेशियामध्ये ‘पोंगल’ अशा अनेकविध नावांनी सूर्याचा मकर राशीतला प्रवेश साजरा केला जातो.

संक्रांतीला गंगास्नानाला विशेष महत्त्व आहे. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये गंगास्नान, बंगालमध्ये गंगासागर स्नान पुण्याचे मानले आहे. प्रयाग येथील कुंभमेळ्याचे पहिले स्नान मकरसंक्रांतीला सुरु होते. या दिवसात पंजाबपासून तामिळनाडूपर्यंत सूर्य आणि अग्नीची पूजा केली जाते. काही ठिकाणी विष्णूची पूजा पण केली जाते. संक्रांतीला दानाला विशेष महत्त्व आहे. एका गरजू कुटुंबाला एका जेवणाला पुरेल इतके तांदूळ, तूप, फळे, तीळ, खीर या गोष्टी दान करण्यास सांगितल्या आहेत.


संक्रांतीचा सण एक दिवसाचा नसून माघ शुद्ध सप्तमीपर्यंत म्हणजे रथसप्तमीपर्यंत चालणारा सण आहे. अनेक ठिकाणी पहिले तीन-चार दिवस महत्त्वाचे असतात. महाराष्ट्रात भोगी, संक्रांत हे दोन दिवस महत्त्वाचे आहेत. या दरम्यान गायी-बैलांची पूजा आंध्रमध्ये संक्रांतीच्या दुसर्‍या दिवशी, गोधनाची पूजा करतात आणि तिसर्‍या दिवशी रेड्यांची झुंज, कोंबड्यांची झुंज लावली जाते. तामिळनाडूमध्ये तिसर्‍या दिवशी म्हणजे ‘माट्टू पोंगल’च्या दिवशी गुरांना सजवून त्यांच्या अंगावर झूल घालून, शिंगांना सोनेरी कवच घालून मिरवणूक काढतात. बैलांना गोडधोड करून खाऊ घालतात. चौथ्या दिवशी बैलांचा ‘जल्लीकटू’चा खेळ रंगतो! कर्नाटकात संक्रांतीच्या दुसर्‍या दिवशी, गायी, बैलांना सजवून त्यांची मिरवणूक काढतात.


संक्रांत हा एकत्र येऊन वेगवेगळे खेळ खेळण्याचा, आप्तेष्टांना भेटण्याचा सण. पंजाबमध्ये संक्रांतीला रात्री शेकोटी पेटवून भांगडा नृत्य करतात. गुजरातमध्ये, पंजाबमध्ये शेजारीपाजारी एकत्र जमून पतंग उडवतात. आजकाल गुजरातमध्येसंक्रांतीला ‘पतंग उत्सव’ आयोजित केला जातो. महाराष्ट्रात आणि कर्नाटकात आप्त स्वजनांच्या घरी जाऊन तीळगूळ देण्याची पद्धत आहे. तसेच संक्रांतीपासूनरथसप्तमीपर्यंत घरोघरी हळदीकुंकू करून वाण लुटण्याची पद्धत आहे.


संक्रांतीनिमित्त भारतभर तीळगुळाचे विविध पदार्थ केले जातात. पंजाबमध्ये ‘तिल चावली’ म्हणजे तीळगूळघालून पुलाव आणि ‘रस्से का खीर’ म्हणजे उसाच्या रसात तांदळाची खीर केली जाते. उत्तराखंडमध्ये ‘घुगुतीमाला’ करतात म्हणजे उसाच्या रसात कणिक मळून त्याच्या छोट्या छोट्या तलवारी, ढाली तळून त्या खाऊच्या तलवारींची माळ मुलांच्या गळ्यात घालतात. राजस्थानमध्ये तिळाचे विविध प्रकार करतात - तीळपट्टी, तीळाचे लाडू, खीर, घेवर आणि पकोडी. मध्यप्रदेशची तीळगुळाची पातळ चिक्की ‘गजक’ तर प्रसिद्धच आहे. बिहारमध्ये संक्रांतीला ‘तीलवा’ म्हणजे तीळ, गुळ, तांदूळ आणि पोहे घालून तीळगूळ करतात.



आसाममध्ये ‘तीळपीठा’ म्हणजे तांदळाच्या आंबवलेल्या पीठाचे लहानसे धिरडे करून त्यात तीळ, गुळ, नारळाचे सारण भरून रोल करतात. याशिवाय ‘कोट पीठा’, ‘शुंग पीठा’, ‘घीला पीठा’ आणि ‘पोडा पीठा’ असे अनेक गोड पदार्थ संक्रांतीला करतात. ओडिशामध्ये ‘मकर चौला’ म्हणजे तांदूळ, केळी, नारळ, गूळ आणि तीळ घालून गोड खीर करतात. बंगालमध्ये गोकुल पीठे म्हणजे - गूळ, खवा आणि नारळाचे सारण भरून, तुपात तळून, पाकात घोळलेला कणकेचा मोदक!



गुजरातमध्ये तीळ, गूळ व दाणे घालून चिक्की करतात. महाराष्ट्रात तीळगुळाचे लाडू आणि तीळगुळाची पोळी करतात. कर्नाटकात ‘एल्लू बेळ्ळा’ म्हणजे पांढरे तीळ, दाणे, खोबरे आणि गूळ याचा कोरडा तीळगूळ करतात. आंध्रमध्ये संक्रांतीला ‘अरीसेळू’ करतात. हा प्रकार फार जिकीरीचा आहे, आपल्या अनारश्यासारखा! दोन दिवस तांदूळ भिजवून वाळवून पीठ करायचं. ते गुळाच्या पाकात तीळ घालून मळायचं आणि त्याच्या पुर्‍या तळायच्या. तामिळनाडूमध्ये ‘पोंगल’ला नवीन पातेल्यात खीर करून सूर्याला नैवेद्य दाखवतात.

संक्रांतीच्या काळात विविध भाज्यासुद्धा केल्या जातात. जसे गुजरातमध्ये उंधियो. महाराष्ट्रात भोगीला - खिचडी, वांग्याची भाजी आणि तीळ लावून बाजरीची भाकरी करतात. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये संक्रांतीला खिचडी म्हणतात आणि जेवायलासुद्धा खिचडी करतात. बंगालमध्ये खिचडी चोखा म्हणजे खूप भाज्यांची भाजी, पापड, तूप आणि लोणचे. ओडिशामध्ये ‘खिचुरी’ म्हणजे खिचडी करतात.


एकूण संक्रांतीचा सण साजरा करण्यात प्रचंड विविधता दिसते. पदार्थांमध्ये, गोधनाच्या सेवेमध्ये, उपासनेमध्ये आणि खेळांमध्ये ही विविधता दिसते.असे म्हणता येईल की, या सणाचे तत्त्व एक आहे - तीळगूळ, गोसेवा आणि सूर्योपासना आणि भारतभर तेच एक तत्त्व विविध प्रकारांनी प्रकट केले जाते. ही एकातून प्रकट झालेली विविधता आहे आणि खोलात गेले की, वरवर दिसणार्‍या विविधतेत एकता दिसते. शेवटी ज्ञान काय आहे तर, या जगाच्या अफाट पसार्‍यात वरवर दिसणार्‍या विविधतेत असलेले एक ब्रह्म तत्त्व जाणणे!






Powered By Sangraha 9.0