मुंबई : मुंबईमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा धुमाकूळ माजवण्यास सुरुवात केली आहे. महापालिका क्षेत्रामध्ये मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्येचा स्फोट होत होता. पण सोमवारी रुग्णसंख्येत कमतरता आल्यानंतर मंगळवार, दि. ११ जानेवारी रोजीही रुग्णसंख्या काहीशी कमी दिसून आली. पालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी मुंबईत 11 हजार 647 नवे कोरोनाबाधित सापडल्याने काहीसा दिलासा मुंबईकरांसह पालिका प्रशासनाला मिळाला आहे. तसेच मंगळवारी शहरात केवळ दोन जणांचा कोरोनावर उपचार घेताना मृत्यू झाला आहे.
मुंबई महापालिका प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत मंगळवारी तब्बल 14 हजार 980 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 87 टक्क्यांवर कायम राहिला असून मंगळवारी दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या मुंबईतील नागरिकांची संख्या 16 हजार 413 झाली आहे. मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत होणाऱ्या वाढीला २ ते ३ दिवसांपासून काहीसा ब्रेक लागण्याचे चित्र कमी होत असलेल्या आकडेवारीवरून दिसू लागले आहे.