मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक आणि पराक्रमी कामगिरीने पावन झालेल्या गड किल्ल्यांवर नव्याने विशिष्ट अशी प्रार्थनास्थळे उभारण्याच्या कृतीत दिवसेंदिवस नवनवीन भर पडत आहे. या प्रकाराने कुलाबा किल्ल्यावर झालेल्या प्रकाराने पुढची मजल गाठली आहे. अलिबागच्या समुद्रात उभा असलेल्या आणि हिंदवी स्वराज्याची सागरी राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्या कुलाबा किल्ल्यावर प्रार्थनास्थळ उभारण्यात आले आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून शिवभक्तांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अवघ्या दिवसांपूर्वी रायगड किल्ल्यावर अचानकपणे एक प्रार्थनास्थळ उभारण्यात आल्याची बाब भाजपचे राज्यसभा खासदार आणि छत्रपती घराण्याचे वंशज संभाजी छत्रपती यांनी उघड केली होती. या संदर्भात त्यांनी पुरातत्व विभागाच्या अधिकार्यांना पत्र पाठवून याबाबत माहिती कळवली होती. संभाजी छत्रपती यांनी तक्रार केल्यानंतर पुरातत्व खात्यातर्फे रायगडावरील 'ते' वादग्रस्त प्रार्थनास्थळ उद्ध्वस्त करण्यात आले होते. मात्र, आश्चर्यकारक बाब म्हणजे या घटनेला अवघा आठवडा देखील उलटत नाही त्या पूर्वीच कुलाबाच्या हिराकोट किल्ल्यात प्रार्थनास्थळ उभारण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.
या प्रकारामुळे महाराष्ट्रात एकच संताप व्यक्त होऊ लागला आहे. याच किल्ल्यात माघी गणेश जयंतीच्यानिमित्ताने मंडपाचे खांब उभारण्यात आले तेव्हा आक्षेप घेणारे पुरातत्व खात्याचे अधिकारी किल्ल्याच्या तटबंदीवर अनधिकृत बांधकाम होत असताना काय करत होते, असा सवाल केला जात आहे.
यासंबंधी रघुजीराजे आंग्रे यांनी फेसबुकवर पोस्ट करत पुरातत्व विभागाच्या अधिकार्यांची झोप उडवली आहे. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये रघुजीराजे यांनी म्हटले आहे की, 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील शेवटचे बांधकाम असलेल्या किल्ल्यात कोणाचीही समाधी असल्याचा कागदोपत्री उल्लेख अथवा नोंद नाही. असे असताना अचानक त्याठिकाणी प्रार्थनास्थळ अथवा समाधी कोणी बांधली ? याच प्रकारे अलिबाग शहरातील हिराकोट किल्ल्याच्या समोरच रस्त्याच्या मध्यभागी एक अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. हिंदू-मुस्लीम समाजातील अनेक जण स्वराज्यासाठी लढले. त्यांचा आदरच आहे. मात्र, किल्ल्यावर आणि किल्ल्याच्या परिसरात अशा प्रकारे अनधिकृतपणे बांधकामे, अतिक्रमण करणे चुकीचे आहे. याप्रकरणी पुरातत्व विभागाच्या मुंबई कार्यालयात पुराव्यासहित तक्रार दाखल करण्यात आली आहे. कुलाबा किल्ल्यावरील अतिक्रमणाबाबतच्या या तक्रारींवर येत्या ७ दिवसात कारवाई झाली नाही तर या प्रकरणाची तक्रार थेट केंद्रीय पुरातत्व विभागाकडे करण्यात येईल, असा इशारा रघुजीराजे आंग्रे यांनी 'दै. मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिला आहे.
'सत्यपूर्ण इतिहास शाबूत राखण्याची मागणी'
महाराष्ट्रातील शिवकालीन गडकिल्ल्यांवर धर्मस्थळांची बेकायदेशीर बांधकामे करून, खोटा इतिहास पसरवण्याच्या घटना सर्रास घडत आहेत. या घटनांना तसेच बांधकामांवर त्वरित कारवाई लावण्यात यावी व सत्यपूर्ण इतिहास शाबूत राखावा ही मागणी घेऊन भाजप खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे, भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर आणि महाराष्ट्र मंडळ, दिल्लीचे वैभव डांगे आज मंगळवार दि. ११ जानेवारी रोजी केंद्रीय संस्कृति राज्य मंत्री अर्जुन राम मेघवाल यांची भेट घेणार आहेत.