संघर्षमय ‘मुशाफिरी’

08 Sep 2021 21:16:48

1 _1  H x W: 0  



 
 हलाखीचे आयुष्य जगताना आपल्या संघर्षमय जीवनाची मुशाफिरी काव्यातून व्यक्त करणारे विद्रोही कवी दत्ता कोकरे यांच्याविषयी...


 
’मानेवरच जू द्या फेकून अन् सूर्याच तेज घ्या लपेटून!’ अशा भावना चेतवणारे कवी दत्ता कोकरे सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील जांभुळणी गावचे रहिवासी. दत्ता यांचा जन्म माण तालुक्यातीलच हिंगणी या गावी झाला. आई-वडील अशिक्षित असल्याने घरात शिक्षणाची तशी आबाळ. आई-वडिलांना वाटायचे की, मुलांनी खूप शिकावे मोठे व्हावे. पण, खडतर परिस्थितीमुळे मुलांचे संगोपन आणि शिक्षण या दोन्ही गोष्टींचा मेळ घालणे कठीण होते. हलाखीचे जीवन असल्याने त्यांच्या कष्टाला आराम नव्हता. परिस्थितीही साथ देत नव्हती, तरीही त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी काही कमी पडू दिले नाही. साधी राहणी आणि त्यांचा प्रामाणिकपणा मनाला दिलासा देऊन जायचा.
 
 
 
या परिस्थितीला सामोरं जाऊन दत्ताने एमए, बी.एडपर्यंत शिक्षण दत्ता यांनी पूर्ण केले. भावानेसुद्धा दोन कवितासंग्रह प्रकाशित करून मराठी साहित्याची वाट धरली. स्वरचित कवितांचे कार्यक्रम शब्दांचे फटकारेच्या माध्यमातून शाळा, कॉलेज आणि मिळेल त्या व्यासपीठावर आमच्या कविता झळकू लागल्या. उच्चशिक्षण घेतल्याने कुटुंबातच नव्हे तर समाजातही कोकरे या नावाला भारदस्तपणा आला, दत्ता सांगत होते.घरच्यांना हातभार म्हणून मिळेल ते काम करायला त्यांनी सुरुवात केली. जगण्याचे रोज नवनवीन अनुभव येऊ लागले. परंतु संघर्षमय जगण्याला दिशा मिळत नव्हती. अशातच दत्ता यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. कारणही तसेच होते.
 
 
 
दत्ता यांना महाविद्यालयीन जीवनापासूनच कविता लिहिण्याचा छंद होता. मुंबईत रोजच कुठे ना कुठे साहित्य संमेलने असायची. तेव्हा कामातून वेळ काढून दत्ता नियमितपणे अशा संमेलनांना हजेरी लावू लागले आणि तिथूनच त्यांच्यातील कवी जागृत होऊ लागला. आपबीती रेखाटताना स्फुरण चढल्याप्रमाणे शब्दांची शस्त्रे करून दत्ता पेटून उठले अन् बघता बघता त्यांचे ’आभास अनावर ’आणि ’आता पेटून उठा’ हे दोन कवितासंग्रह प्रकाशित झाले.ज्येष्ठ लेखक उत्तम कांबळे आणि कवी आमदार लहू कानडे यांनी त्यांच्या कवितासंग्रहाला शुभेच्छा दिल्या. कवी गीतकार प्रा. प्रवीण दवणे यांचाही शब्दरूपी आशीर्वाद मिळाला, तसे पाहिले तर दत्ता आणि ठाण्याचे नाते खूप जवळचे. कारण, दत्ता यांच्या लेखनाची तळमळ पाहून ठाण्यानेच त्यांना पहिला पुरस्कार दिला.
 
 
 
‘आभास अनावर’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह. यात त्यांनी प्रेमातील भावनांच्या सहभागाची उधळण करून सार्‍यांना मोहवून टाकले. पण का कुणास ठाऊक दत्तांचा हा खेळ दैवालाच मान्य नसावा, म्हणून त्यांना साहित्यातील विद्रोही प्रकारात धाडले. राजकारण, समाजकारण यामध्ये चाललेली खळबळ, फसवे डावेपच, ‘मी’पणाचा अतिरेक, अहंकार, गर्व आणि स्वार्थीवृत्ती यात झिंगलेल्यांना कळतं फक्त वर्चस्व. मग ते आपण कोणत्या मार्गाने मिळवतोय याच्याशी त्यांना काही देणंघेणं नसतं. अशा विपरित परिस्थितीत सर्वसामान्य जनतेची होणारी मानसिक पिळवणूक, शारीरिक दगदग त्यांना अस्वस्थ करू लागली. स्वतःत बदल करून समाजात बदल घडवण्यासाठी समाजव्यवस्थेची बंधने धुडकावून ‘जुने करार’ लिलावात काढण्यासाठी पेटून उठलेल्या दत्ता यांनी मग या जगण्याचे प्रतिबिंबच कवितेतून मांडले. तो त्यांचा ’आता पेटून उठा’ हा दुसरा कवितासंग्रह प्रकाशित झाला. त्यामुळे अनेक मराठी सारस्वतांनाही दत्ता यांची दखल घ्यावी लागली.
 
 
 
सध्या दत्ता ‘पेंटिंग’चे कॉन्ट्रॅक्टर (रंगारी) म्हणून काम करतात. मुंबई, ठाणे व पुणे येथील अनेक वास्तूंना त्यांच्या काव्यमय कुंचल्याचे फटकारे लागल्याचे दत्ता सांगतात. महाविद्यालयीन जीवनापासून ‘पार्ट टाईम’ म्हणून रंगार्‍याचे काम करत असल्यामुळे कामाचा त्यांना खूप अनुभव आला आहे. त्यामुळे पदव्यांचे बाड गुंडाळून ठेवत दत्तांनी या कामातही स्वतःला झोकून दिले आहे. त्यामुळे रंगकामासाठी त्यांना अनेक ठिकाणांहून फोन येत असल्याचे सांगतात.साहित्य, सांस्कृतिक चळवळीशी सोबत अविरतपणे सुरूच ठेवली असून भविष्यात एक प्रथितयश कवी म्हणून मराठी साहित्यविश्वात आपले नाव करून माझ्या गावाचे आणि माझ्या आई-वडिलांचे नाव एका वेगळ्या उंचीवर घेऊन जायचे असल्याच्या भावना दत्ता व्यक्त करतात.
 
 
 
एक कवी म्हणून जीवनात खूप अनुभव आले. ‘कवितेने का कुणाचे पोट भरते?’, ‘कशाला असल्या फंद्यात पडायचे!’ कविता लिहितो म्हणून काही लोक थट्टाही करायचे. पण, ही वाट सोडायची नव्हती. कवितेतील मुशाफिरीची वाटचाल त्यांनी सुरूच ठेवली आहे. मी घडत गेलो, मी पडत गेलो, येणारी आव्हाने तुडवत गेलो! त्यामुळेच आजही माझा हा कवितेचा प्रवास तितक्याच जोमाने सुरू असल्याचे दत्ता सांगतात.मतदानासारखा बहुमूल्य अधिकार आपल्याला संविधानाने दिला, तेव्हा कर्तव्याने तो पार पाडला पाहिजे.
 
पैसा, दारू पार्ट्या तसेच छोट्या-मोठ्या आमिषाला, आश्वासनाला आपण पिढ्यान्पिढ्या बळी पडतोय. याचे आपल्याला काहीच का वाटत नाही? आपण महासत्तेकडे वाटचाल करणार्‍या भारताचे जबाबदार नागरिक आहोत. आपण मनात आणले तर एखाद्याला खुर्चीवर बसवूही शकतो आणि खुर्चीतून उठवूही शकतो, याची जाणीव होईल. तो सर्वासाठी सुदिन असेल, अशा भावना कवितेच्या माध्यमातून मांडणार्‍या या विद्रोही कवीला भविष्यातील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
 
 
 
Powered By Sangraha 9.0