चिपनिर्मितीत भारत-तैवान सहकार्य

30 Sep 2021 21:45:21

semiconductor cheap_1&nbs

वैश्विक ‘सेमिकंडक्टर चिप’च्या अनुपलब्धतेशी जग संघर्ष करत असतानाच, भारताने तैवानबरोबर ७.५ कोटी डॉलर्सचा ‘सेमिकंडक्टर चिप’निर्मितीचा प्रकल्प उभारण्यासाठी चर्चा सुरू केली आहे. लवकरच ही चर्चा पूर्ण होईल व दोन्ही देशांत ‘सेमिकंडक्टर चिप’निर्मितीसाठी करार केला जाईल, त्यात ‘फाईव्ह-जी’ मोबाईल फोनपासून ते इलेक्ट्रिक कारपर्यंतच्या उत्पादनांत वापरल्या जाणार्‍या ‘सेमिकंडक्टर चिप’चा समावेश असेल.


त्यानुसार चालू वर्षाच्या अखेरीस सदर प्रकल्पातून ‘सेमिकंडक्टर चिप’ची निर्मिती करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले असून, यामुळे ‘सेमिकंडक्टर चिप’च्या अनुपलब्धतेचे संकट बर्‍यापैकी दूर होईल. दरम्यान, वैश्विक ‘सेमिकंडक्टर चिप’ उद्योगाचे मूल्य ५२५ कोटी डॉलर्सपेक्षाही अधिक असून, यात दक्षिण कोरिया, तैवान आणि जपानचे वर्चस्व आहे. महत्त्वाचे म्हणजे हे तिन्ही देश भारताचे सहकारी असून आताच्या तैवानबरोबर होऊ घातलेल्या कराराने चीनच्या एकाधिकारशाहीवर तगडा प्रहार केला जाईल. तथापि, तैवानबरोबरील थेट संबंधाने चीन भारताचा विरोध करण्याची शक्यता आहे, कारण तो देश तैवानला आपल्या वर्चस्ववादी ‘वन चायना’ धोरणाचा भाग मानतो.तैवान ‘सेमिकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन’ जगातील सर्वात मोठी ‘सेमिकंडक्टर चिप’निर्मिती संस्था आहे. ‘क्वालकॉम’, ‘निद्विया’, ‘अ‍ॅपल’सारख्या कंपन्या या संस्थेचे ग्राहक असून, भारत व तैवानमधील करार प्रत्यक्षात आल्यास त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होईल. दरम्यान, ‘कोविड’ महामारीच्या काळात ‘इलेक्ट्रॉनिक’ वस्तूंच्या विक्रीतील वृद्धीमुळे ‘सेमिकंडक्टर चिप’ची मागणी वाढली व त्याचा पुरवठा मात्र कमी झाला. तसेच अमेरिका आणि चीनमधील तणावही ‘सेमिकंडक्टर चिप’च्या अनुपलब्धतेमागचे कारण आहे. अमेरिकन ‘सेमिकंडक्टर चिप’निर्मिती करणार्‍या कंपन्यांना पुरवठा करणार्‍या ‘हुवावे’ कंपनीला अमेरिकन सरकारने काळ्या यादीत समाविष्ट केले, त्यामुळे ‘सेमिकंडक्टर चिप’च्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला. ‘सेमीकंडक्टर चिप’च्या अनुपलब्धतेमुळे भारताच्या ऑटोमोबाईल क्षेत्रावर दुष्परिणाम झाला. ‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स’च्या माहितीनुसार ‘सेमीकंडक्टर चिप’च्या अनुपलब्धतेमुळे यंदाच्या ऑगस्टमध्ये ‘ऑटोमोबाईल’ ठोक विक्रीत ११ टक्क्यांची घट झाली. ‘सेमिकंडक्टर चिप’ची वैश्विक अनुपलब्धता व त्याच्या वस्तुनिर्मिती क्षेत्रावरील परिणामाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत नुकत्याच आयोजित केलेल्या ‘क्वाड’ समूहगटांच्या बैठकीत चर्चा झाली. हार्डवेअर, सॉफ्टवेअर व सेवाक्षेत्रासाठी लवचिक, विविध आणि सुरक्षित तंत्रज्ञानपुरवठा साखळी सामायिक हितांसाठी आवश्यक असल्याची पुष्टी यावेळी ‘क्वाड’ देशांनी केली.
तैवान आणि दक्षिण कोरियासारखे ‘सेमिकंडक्टर चिप’ उत्पादक देश ‘क्वाड’ समूहगटाचे मित्र, तर चीनचे विरोधक आहेत. या कारणानेच ‘क्वाड’ ‘सेमिकंडक्टर चिप’ पुरवठ्याला लोकशाही मूल्यांशी जोडण्याचा प्रयत्न करत आहे, कारण यामुळे चीन ‘सेमिकंडक्टर चिप’ची निर्मिती करणार्‍या देशांपासून थेट बाजूला पडतो. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिका दौर्‍यात ‘सेमिकंडक्टर चिप’निर्मितीच्या उत्पादन व्यवहार्यतेबाबत दिग्गज कंपनी ‘क्वालकॉम’चे ‘सीईओ’ क्रिस्टियानो अमोन यांच्याशी चर्चा केली होती. मोदींनी यावेळी अमोन यांना भारतातील व्यापक व्यावसायिक संधींची माहिती दिली व गुंतवणुकीचे आमंत्रण दिले. कोरोनामुळे वैश्विक स्तरावर वाढलेली मागणी, वैश्विक समूहाने चीनच्या आर्थिक निरंकुशतेवर लगाम लावण्यासाठी घेतलेला पुढाकार, ‘सेमिकंडक्टर चिप’ उत्पादकांचे ‘क्वाड’ आणि भारताविषयीचे प्रेम, भारताची भौगोलिक स्थिती, ‘पीएलआय’सारख्या योजनांनी भारतात या उद्योगाच्या समग्र विकासाचा पाया रचल्याचे दिसते, तर मोदी सरकारच्या राजकीय इच्छाशक्ती आणि लष्करी पराक्रमाने चीनच्या गलवान प्रकरणातून ‘सेमिकंडक्टर चिप’साठी आवश्यक स्वच्छ पाण्याच्या स्रोतावर नियंत्रण मिळवण्याच्या मनसुब्यावर पाणी फेरले आणि आता तैवानबरोबरील सहकार्याने त्याला जोरदार दणका दिला. सोबतच तैवान आणि ‘क्वाड’ देशांच्या सहकार्यामुळे भारत ‘सेमिकंडक्टर चिप’निर्मितीच्या क्षेत्रात येत्या काळात जगाचे नेतृत्व करू शकेल, अशी आशा वाटते.













Powered By Sangraha 9.0