जग पुन्हा महायुद्धाच्या दिशेने?

03 Sep 2021 22:19:17
zenda_1  H x W:
 
 
९९१ साली सोव्हिएत रशिया आर्थिक हलाखीने कोसळला आणि शीतयुद्ध संपलं. जगभरच्या जाणत्या लोकांनी सुटकेचा श्वास टाकला. पण, त्या घटनेला आता कुठे ३० वर्षं होतायत, तर पुन्हा एकदा महायुद्धाच्या काळ्या छाया भेडसावू लागल्या? पुन्हा एकदा १९१४ पूर्वीसारखी स्थिती राजकीय बुद्धिबळाच्या पटावर दिसू लागली? असं झालं तरी काय?
 
 
 
शितयुद्ध संपून ३० वर्षे होत असताना, जगभरच्या राजकीय निरीक्षकांना पुन्हा एकदा १९१४ ते १९१८च्या महायुद्धपूर्व काळातल्या आठवणी होत आहेत. बुद्धिबळाच्या खेळामध्ये काही ठरावीक चाली किंवा खेळ्या पुन:पुन्हा खेळल्या जातात, खेळाडू वेगळे असतात, ठिकाणं वेगळी असतात, प्रतिस्पर्धी वेगळे असतात. पण, चाली-प्रतिचाली, शह-काटशह तेच असतात. अनुभवी खेळाडू आणि अनुभवी प्रेक्षक दोघांनाही त्याची जाणीव असते, तसं संपूर्ण जग पुन्हा एकदा १९१४ सालापूर्वीच्या राजकीय स्थितीकडे जात आहे की काय, असं राजकीय निरीक्षकांना वाटत आहे.आता मी, जगभरचे राजकीय निरीक्षक असे शब्द वापरले, तरी त्याचा अर्थ युरोपीय देश आणि अमेरिका एवढाच घ्यायचा बरं का! कारण, आशिया आणि आफ्रिका खंडात राजकीय निरीक्षक आहेतच कुठे! आणि असलेच, तर त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर विचारतोय कोण? कारण, आशिया, आफ्रिकेतले राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र इत्यादीतले अगदी उच्चातले उच्चशिक्षित लोक शिकलेले कुठे असतात? तर ऑक्सफोर्ड, केंब्रिज, हार्वर्ड नाहीतर कोलंबिया अशा विद्यापीठात. त्यामुळे ते काय मांडणी करणार हे युरोप-अमेरिकेतल्या विद्वानांना अगोदरच माहिती असतं. किंबहुना, त्यांनी पढवलेली विद्याच तर हे इथे पोपटासारखी बोलत असतात.
 
 
 
 स्वतःच्या देशातल्या परिस्थितीचा या लोकांचा प्रत्यक्ष अभ्यास शून्य असतो. मग पाश्चिमात्यांनी तुम्हाला का किंमत द्यावी? असो. तर युरोपीय आणि अमेरिकन राजकीय निरीक्षकांना असं वाटतंय की, १९१४ सालापूर्वीची स्थिती पुन्हा निर्माण होतेय, त्यामुळे पुन्हा एकदा महायुद्धाचा धोका संभवतो आहे. १९१४ ते १९१८ या कालखंडात झालेल्या युद्धात एका बाजूला अ‍ॅग्लो-फ्रेंच-रशिया-अमेरिका होते, तर दुसर्‍या बाजूला जर्मनी-तुर्कस्तान होते. या युद्धात एक कोटी सैनिक आणि एक कोटी नागरिक ठार झाले. इतका भीषण संहार आधुनिक जगाने यापूर्वी अनुभवला नव्हता म्हणून या युद्धाला ‘वर्ल्ड वॉर - महायुद्ध’ अशा संज्ञेने ओळखलं जाऊ लागलं. या युद्धाला धार्मिक आयाम नव्हता, ते पूर्णपणे व्यापारी, राजकीय आणि सैनिकी वरचश्म्यासाठी लढलं गेले होतं, त्यामुळे एका बाजूला प्रोटेस्टंट कॅथलिक आणि ग्रीक ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन, तर विरुद्ध बाजूला कॅथलिक आणि मुसलमान अशी लढाई झाली.या युद्धात जर्मनी पराभूत झाला, त्यामुळे खवळून जाऊन त्याने पुढच्या २१ वर्षांत पुन्हा नवं युद्ध छेडलं.
 
 
 
१९३९ ते १९४५ अशी तब्बल सहा वर्षे चाललेल्या या युद्धाला मग साहजिकच ‘दुसरं महायुद्ध’ असं म्हटलं जाऊ लागलं. हे युद्ध तर इतकं भीषण आणि सर्वंकष होतं की, त्यात दोन कोटी सैनिक आणि चार कोटी नागरिक ठार झाले. शिवाय आणखी किमान दीड कोटी नागरिक वांशिक कत्तली, रोगराई आणि भूकबळी यांची शिकार झाले.म्हणजेच जगभरातले एकूण साडेसात कोटी मनुष्यप्राणी पृथ्वीतलावरून कायमचे अंतर्धान पावले. हे सगळे अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले आकडे आहेत बरं का! खरे आकडे फक्त देवच जाणे?प्रत्यक्ष रणांगणावरचं युद्ध थांबलं. पण, त्याहीपेक्षा जीवघेणं असं अदृश्य युद्ध लगेचच सुरू झालं. अणुबॉम्ब हे एका तडाख्यात लाखो माणसांची राखरांगोळी करू शकणारं अतिसंहारक अस्त्र अमेरिकेने शोधलं. ते गुपित सोव्हिएत रशियाने त्यांच्याकडून पळवलं. रशियन नेत्यांना आपलं विशिष्ट तत्त्वज्ञान साम्यवाद, हे जगभरच्या सर्व देशांमध्ये पसरवायचं होतं.
 
 
 
त्यासाठी त्यांचा खास शब्द होता - लाल क्रांतीची निर्यात. आपण ज्याप्रमाणे रशियामध्ये झार राजांची राजेशाही आणि नंतर अलेक्झांडर केरेन्स्कीची लोकशाही उलथून टाकून श्रमिक-शोषित-वंचित-कष्टकर्‍याचं साम्यवादी राज्य आणलं, तसंच जगभरच्या सर्व देशांमध्ये कामगारांचं राज्य यावं, अशी त्यांची भव्य कल्पना होती. ब्रिटन-फ्रान्स-अमेरिकेला हे नको होतं. त्यांना त्यांची संसदीय लोकशाहीच प्रिय होती, त्यामुळे सोव्हिएत रशियाने युरोपीय देश आणि अमेरिका यांच्या दिशेने अक्षरश: शेकडो आण्विक क्षेपणास्त्र रोखून, सज्ज करून ठेवली. साहजिकच अमेरिकेनेही तसंच केलं. अमेरिका आणि रशियाचे राष्ट्रध्यक्ष फक्त एक बटण दाबून, दोन मिनिटांमध्ये, आपल्या प्रतिस्पर्धी देशाची संपूर्ण राखरांगोळी करू शकतात, असं वर्णन केले जाऊ लागलं. ही वस्तुस्थिती होती. कांदबरी किंवा चित्रपटातली विज्ञान काल्पनिका नव्हे, यालाच नाव मिळालं ‘कोल्ड वॉर - शीत युद्ध’. १९४६ ते १९९१ अशी ४५ वर्षे अवघं जग या सुप्त ज्वालामुखीच्या अक्षरश: तोंडावरच बसलेलं होतं.
 
 
 
हे युद्ध जर खरंच झालं, तर दोन्ही बाजूच्या शेकडो अण्वस्त्रांच्या मार्‍याने संपूर्ण पृथ्वीवरची केवळ मानवजात नव्हे, तर एकंदर सजीवसृष्टीच नष्ट होऊन जाईल, हे ज्यांना नीट कळत होतं, त्यांना अन्न गोड लागत नव्हतं, ज्यांना कळतच नव्हतं, ते मजेत होते. अज्ञानासारखं सुख नाही!१९९१ साली सोव्हिएत रशिया आर्थिक हलाखीने कोसळला आणि शीतयुद्ध संपलं. जगभरच्या जाणत्या लोकांनी सुटकेचा श्वास टाकला. पण, त्या घटनेला आता कुठे ३० वर्षं होतायत, तर पुन्हा एकदा महायुद्धाच्या काळ्या छाया भेडसावू लागल्या? पुन्हा एकदा १९१४ पूर्वीसारखी स्थिती राजकीय बुद्धिबळाच्या पटावर दिसू लागली? असं झालं तरी काय?
इसवी सनाच्या १५व्या शतकापासून पश्चिम युरोपातील इंग्लंड, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल, हॉलंड आणि इटली हे देश विज्ञान आणि तंत्रज्ञानात पुढारू लागले. आधुनिक नौकानयन उपकरणांच्या जोरावर त्यांनी दर्यावर्दीपणात अरबांना मागे टाकलं, त्यांचा व्यापार जगभर सुरू झाला. व्यापारापाठोपाठ आधुनिक शस्त्रास्त्रांच्या जोरावर साम्राज्यविस्तारही सुरू झाला.
 
 
 
 
लगेच धर्मविस्तारही सुरू झाला. इंग्लंड, फ्रान्स, पोर्तुगाल आणि स्पेन या पश्चिम युरोपीय देशांनी जगात अनेक भूमी जिंकून तेथे आपलं राज्य स्थापन केलं. त्यासाठी त्यांनी तिथल्या स्थानिकांना लुटलं, बाटवलं, गुलाम केलं, ज्यांनी बाटायला नकार दिला, त्यांच्या कत्तली केल्या.पुढे या चौघांच्या आपापसातही लढाया झाल्या, त्यात पोर्तुगाल आणि स्पेन थोडे माघारले आणि इंग्लंड, फ्रान्स भलतेच पुढारले. त्या दोघांच्या वसाहती म्हणजे गुलाम देश सर्वत्र पसरले होते. सन १८१५ साली इंग्लंडने फ्रान्सच्या नेपोलियनचा कायमचा बंदोबस्त केला. आता इंग्लंड किंवा गे्रट ब्रिटन ही जगभरातली एकमेव महासत्ता उरली. ब्रिटन हा स्वतः अगदीच छोटा असला, तरी त्याचं राजकीय, आर्थिक, व्यापारी, लष्करी, नाविक सामर्थ्य फारच मोठं आणि अत्याधुनिक होतं. त्यामुळे नेपोलियन नंतरचा फ्रान्स हा ब्रिटनचा मित्रदेश बनला.या काळात जगात आणखी दोन मोठी साम्राज्य होती. एक तुर्कांचं उस्मानी साम्राज्य किंवा ऑटोमन एम्पायर. हे आशिया आणि आफ्रिकेतला फार मोठा भूभाग व्यापून होतं. पण, विज्ञान आणि तंत्रज्ञानात नौकायनात शेती, उद्योगधंदे इत्यादीत तुर्क इतके मागास होते की, ब्रिटनला त्याचं भय वाटण्याचं काहीच कारणं नव्हतं.
 
 
 
दुसरं मोठं साम्राज्य होतं, रशियाच्या झारचं. पूर्वेला पॅसिफिक महासागरापासून पश्चिम मध्य युरोपातल्या प्रशियापर्यंत अवाढव्य पसरलेल्या रशियन साम्राज्यात नेमकी किती भूमी आहे, याचा स्वतः झारलाही पत्ता नव्हता. पीटर-द-ग्रेट (सन १६७२ ते १७२५) या झारने रशियाला आधुनिक बनवलं. पण, ब्रिटनच्या तुलनेत रशिया अजून मध्ययुगातच होता. हे सगळं हेरलं प्रशियाच्या प्रिन्स बिस्मार्कने. त्याने १८७१ साली प्रशिया हा देश आणि त्याच्या अवतीभवती ३९ छोटी-मोठी संस्थानं यांना भाषेच्या मुद्द्यावर एकत्र आणलं. हे सगळे जर्मन भाषा बोलणारे होते. त्यामुळे या नव्या देशाला नाव मिळालं, जर्मनी! बिस्मार्कने प्रशिया आणि ३९ जर्मनभाषी संंस्थानांना जर्मनी ही एक राष्ट्रीय अस्मिता दिली. पुढचा इतिहास आधीच सांगितला आहे.आता सध्याच्या राजकीय परिस्थितीकडे पाहा. १९८५ साली मिखाईल गोर्बाचेव्ह सोव्हिएत राष्ट्राध्यक्ष झाले. त्यांनी सोव्हिएत साम्राज्य विसर्जित केलं. १९८९ साली बर्लिन भिंत पाडून जर्मनी एकवटला. १९८९ ते १९९१ पर्यंत सोव्हिएत संघराज्यातील अनेक प्रजासत्ताक राज्ये स्वतंत्र देश बनले. १९९१ साली खुद्द सोव्हिएत रशियातील कम्युनिस्ट राजवट संपवून तो ‘रशियन फेडरेशन’ या नावाने लोकशाही देश झाला. त्याच वर्षी अमेरिकेने सद्दाम हुसैनच्या इराकवर प्रत्यक्ष आक्रमण करून कुवेत मुक्त केला.
 
 
 
जणू काही, कम्युनिष्ट रशिया खलास झाल्यामुळे एकमेव महासत्ता असलेल्या ख्रिश्चन अमेरिकेने मुसलमानी जगताच्या भानगडींमध्ये निःशंकपणे नाक खुपसलं. पण, अमेरिकेला एका गोष्टीचा विसर पडला. १९८९ मध्ये बर्लिन भिंत आणि तिच्यासह देशोदेशींच्या कम्युनिस्ट राजवटी कोसळत असताना चीननध्ये वेगळं घडलं. तिआनानमेन चौकातलं विद्यार्थी आंदोलन चीनने रणगाडे घालून साफ चिरडून टाकलं आणि मग चिनी राज्यकर्ते रशियाची पोकळी भरून काढण्यासाठी वेगाने कामाला लागले. कम्युनिझमचं लेबल तसंच ठेवून त्यांनी त्यासाठी हुकूमशाही भांडवलदारी चालवली आणि गेल्या ३०-३२ वर्षांत चीन कुठल्या कुठे गेला. जपान, कोरिया आणि खुद्द रशिया यांना मागे टाकून चीनने आज सर्वार्थाने अमेरिकेसमोर तगडं आव्हान उभं केलं आहे. पहिल्या महायुद्धापूर्वी ज्याप्रमाणे जर्मनीला ब्रिटन या तत्कालीन एकमेव साम्राज्याला नमवून, निदान बरोबरीचा तह करून, एक जागतिक महासत्ता बनायचं होतं; हे करताना तो फ्रान्स आणि रशिया यांना मोजीतच नव्हता, तर इस्लामी तुर्कस्तानला मित्र बनवून त्याने जगातल्या सगळ्या मुसलमानांना मनाने तरी आपल्या अनुकूल बनवलं होतं; अगदी तीच पावलं आज चीन उचलतो आहे.या निरीक्षकांच्या मते, चीनची पुढची महत्त्वाकांक्षा अशी आहे की, २०४९ साली माओच्या चिनी राज्यक्रांतीला १०० वर्षं होतील. तेव्हा तोपर्यंत आपण एकमेव महासत्ता बनून, अमेरिकेला एखाद्या दक्षिण अमेरिकन देशाप्रमाणे शेती-कारखानदारी वगैरे करणारा सुखवस्तू देश बनवून सोडायचं. स्वप्न तर मोठं आहे, बघू पुढे काय होतं ते!
 
 
 
Powered By Sangraha 9.0