लहानपणी घरातील बिघडलेली उपकरणे उघडून दुरुस्तीचा खटाटोप करण्याच्या अफलातून छंदामुळे पुढे ‘टेक्नोसॅव्ही’ बनलेल्या ठाण्यातील पुरुषोत्तम पाचपांडे यांची यशोगाथा...
बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील खरबडी हे पुरुषोत्तम पाचपांडे यांचे जन्मगाव. ३० सप्टेंबर, १९८६ रोजी जन्मलेल्या पुरुषोत्तम यांचे बालपण तसे खडतर गेले. त्यांचे आई-वडील दोघेही शेतात राबणारे. घरची परिस्थिती तशी बेताची असल्याने पुरुषोत्तम यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण मूळगावी घेतले. नंतर औरंगाबाद येथे मामाकडे आश्रय घेऊन ‘डिप्लोमा इंजिनिअरिंग’ करून ‘आयआयटी’ मुंबईशी संलग्न कंपनीमध्ये ‘रिसर्च इंजिनिअर’ म्हणून रुजू झाले. २००७ पासून ते ठाण्यात वास्तव्यास आहेत.‘मुलाचे पाय पाळण्यात दिसतात,’ असं नेहमीच म्हटलं जातं. पुरुषोत्तम यांच्याबाबतही तोच प्रत्यय आला. लहानपणी घरातील बिघडलेली उपकरणे कोणतेही तंत्रशुद्ध ज्ञान नसताना पुरुषोत्तम उघडून दुरुस्त करण्याचे प्रयत्न करायचे. पुढे हा छंदच जडल्याने त्यांनी तंत्रज्ञानाशी सलगी वाढवली. जग वेगाने बदलत असून विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रांत वेगाने बदल घडत आहेत. हे लक्षात घेत पुरुषोत्तम यांनी ‘सोलर टेक्नोलॉजी मेडिकल इन्स्ट्रुमेंटेशन’ अशा विविध क्षेत्रांमध्ये संशोधन केले असून, आता पूर्णवेळ ते शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाची गोडी निर्माण करत आहेत.
जर संगीत, नृत्य, चित्रकला असे छंद असू शकतात, तर मग आजच्या एकविसाव्या शतकातील तंत्रज्ञान हा छंद म्हणून का बरं नसावा, अशा विषयाने प्रेरित होऊन २०१२ मध्ये पाचपांडे यांनी ‘चिल्ड्रेन टेक सेंटर’ची स्थापना केली. दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा अभ्यास केला, तर त्यांचे अकरावीनंतरचे ज्ञान आणखी वाढेल. अशा छंदाचा फायदा करिअरसाठी होईल. त्यासाठी मूलभूत ‘इलेक्ट्रॉनिक’ व ‘इलेक्ट्रिकल’, ‘रोबोटिक्स’, ‘सोलर एनर्जी’, रिमोट कंट्रोलवरील खेळणी, सुरक्षितता, व्होल्टेज, वीज आदींची माहिती दिली जाते. सुसंवाद साधून चर्चा, परिसंवाद होतात, तसेच चित्रे, ग्राफिक्स, अॅनिमेशन, मॉडेल माहिती वगैरेंद्वारेही विषय शिकवला जातो. त्याखेरीज ‘सायबर’ सुरक्षेवरही या उपक्रमात प्रकाशझोत टाकण्यात येतो.सध्या काळ बदलत असून शिक्षणाच्या पद्धतीदेखील बदलत आहेत. ‘ऑक्सफोर्ड’च्या एका अभ्यासानुसार आजकालच्या निम्म्या नोकर्या या पुढील २० वर्षांत स्वयंचलित होतील. म्हणजे ‘जॉब’ अस्तित्वातच नसतील, यामुळे मुलांना शालेय अभ्यासक्रमाबरोबरच आधुनिक कौशल्य शिकणे, ही काळाची गरज बनली आहे. पुढील दहा वर्षांत तंत्रज्ञान खूप सार्या क्षेत्राचा कायापालट करून टाकेल, यात काही शंका नाही.‘रोबोटिक्स’, ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’, ‘आयओटी’, ‘मशीन लर्निंग’, ‘थ्रीडी प्रिंटिंग’, ‘स्मार्ट होम उपकरणे’, ‘गुगल होम’, ‘अॅमेझॉन’, ‘अलेक्सा’ असे नवनवीन तंत्रज्ञान कळत-नकळत आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत चालले आहे. तेव्हा, भविष्यात यशस्वी व्हावयाचे असल्यास तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्यक्रम करायचे असो, अथवा नसो, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान मुलांना असणे अतिशय गरजेचे असणार असल्याचे मत पुरुषोत्तम व्यक्त करतात. याचे महत्त्व ओळखून गेल्या नऊ वर्षांपासून ‘चिल्ड्रेन टेक सेंटर’ हे शालेय विद्यार्थ्यांना आधुनिक विषयाशी अवगत करत आहेत. ‘रोबोटिक्स’, ‘इलेक्ट्रॉनिक्स’, ‘थ्रीडी प्रिंटिंग’, ‘गेम डिझाईनिंग’ असे वैविध्यपूर्ण अभ्यासक्रम छंद म्हणून विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. आजवर लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी ‘चिल्ड्रेन टेक सेंटर’च्या विविध उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवला आहे, तर महाराष्ट्रात ७५ हून अधिक ठिकाणी ‘चिल्ड्रेन टेक सेंटर’च्या लॅब असल्याचे पुरुषोत्तम यांनी सांगितले.
पुरुषोत्तम पाचपांडे यांनी २०१२ मध्ये या संस्थेची स्थापना केली असून, ठाण्यातील या नावीन्यपूर्ण उपक्रमाचा गौरव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थांनी केला असून, अनेक पुरस्कारदेखील प्राप्त केलेेत. २०१७ मध्ये थोर शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम याच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून ‘हाऊस ऑफ कलाम’, रामेश्वरम येथे डॉ. कलाम यांच्या घरी ‘चिल्ड्रेन टेक सेंटर’ची लॅब उभी करण्याची संधी मिळाल्याचे पुरुषोत्तम आवर्जून नमूद करतात. या लॅबचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. ही संस्थेसाठी नव्हे, तर समस्त ठाणेकरांसाठी अभिमानाची गोष्ट ठरल्याचेही त्यांनी सांगितले.‘चिल्ड्रेन टेक सेंटर’च्या विद्यार्थ्यांनी केलेले संशोधन हे नेहमीच कौतुकाचा विषय राहिले आहे. ज्यामध्ये ‘रोबोटिक सॅण्डल’, बोलणारा आकाशकंदील, झाडांना पाणी घालणारा रोबोट, घराचे संरक्षण करणारा रोबोट नंदी, वृक्षतोडीला आळा घालणारा रोबोट अशा बर्याच संशोधनाचा समावेश आहे. ज्या महिलांना गुणवत्ता असूनही पुढे शिकता आले नाही, त्यांच्यासाठी ‘एडिसन क्लब’ सुरू केला, तर विद्यार्थ्यांमधील प्रयोगशीलतेला चालना देण्यासाठी डॉ. अब्दुल कलाम कल्पकता केंद्रासारखे उपक्रम पुरुषोत्तम यांनी सुरू केले.
पुरुषोत्तम यांच्या ‘चिल्ड्रेन टेक सेंटर’च्या आधुनिक लॅब देशातील गावागावांत उभ्या करता याव्यात, यासाठी ‘सीएसआर’च्या माध्यमातून देशातील खेड्यापाड्यांत लॅब उभ्या करत आहोत, जिथे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मोफत घेता येणार असल्याचा विश्वास पुरुषोत्तम पाचपांडे व्यक्त करतात. बुलढाणा ते ठाणे व्हाया ‘आयआयटी’ झेप घेऊन विद्यार्थ्यांना वैज्ञानिकतेची कास धरायला लावणार्या पुरुषोत्तम यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून जन्मदिवसाच्या शुभेच्छा...