नृत्यकलेत ठसा उमटविणारी स्मिता

26 Sep 2021 20:17:09

Smita _1  H x W


भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाची सुरूवात होत असताना भारत सरकारच्या सांस्कृतिक विभाग आणि संगीत नाटक अकादमी, डोंबिवली यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘वंदे मातरम्’ या कार्यक्रमात डोंबिवलीतील प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना स्मिता बागुल-मोरे यांचा समावेश होता. यावेळी त्यांनी ४० मिनिटांत विविध कला आपल्या कलाकारांसह सादर केल्या. स्मिता यांच्या नृत्य कारकिर्दीवर टाकलेला प्रकाश.
 
 
 
स्मिता बागुल-मोरे या मूळच्या जळगावच्या. लग्नानंतर १९९५ साली त्या डोंबिवलीकर झाल्या. मोरे या शास्त्रीय कथ्थक नृत्यांगना आहेत. स्मिता यांच्या नृत्याचा प्रवास वयाच्या सातव्या वर्षापासून सुरू झाला. स्नेहसंमेलन, सार्वजनिक गणेशोत्सव येथून त्यांनी नृत्य करण्यास सुरूवात केली. खरंतर त्यांना नृत्याची आवड घराशेजारी असणार्‍या तमाशा कलावंताचे घर व त्यांचा रोज सराव सुरू असणार्‍या तबला-ढोलकीच्या व नृत्य-पैंजणांच्या आवाजामुळे निर्माण झाली. त्या तमाशा मंडळीचा सराव पाहण्यासाठी त्या दररोज जात असत.
 
 
त्यातूनच त्यांना आपल्यालाही नृत्य आले पाहिजे, असे वाटू लागले. त्यांनी आपली इच्छा घरी बोलून दाखविली आणि तिथूनच त्यांच्या नृत्यप्रवासाला सुरूवात झाली. यामध्ये त्यांची आई शालिनी बागुल आणि शाळेच्या मुख्याध्यापिका चतुर यांचा मोलाचा वाटा आहे, असे स्मिता सांगतात. स्मिता यांची नृत्याची आवड पाहून त्यांच्या आईने त्यांना जळगावचे कथ्थकगुरू देवेंद्र लंभाते यांच्याकडे कथ्थक नृत्य शिकण्यास पाठवले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्मिता नृत्याचे धडे गिरवत होत्या. त्याचबरोबरीने गुरू बबनराव भावसार यांच्याकडे त्यांनी तबल्याचे प्रशिक्षण घेतले.
 
 
अखिल भारतीय गांधर्व महामंडळ, मिरज येथून कथ्थक नृत्य आणि तबला या दोन्ही विषयांत ‘विशारद’ पदवी प्राप्त केली. त्याचप्रमाणे प्राचीन कला केंद्र, चंदिगढ येथून कथ्थक नृत्य विषयात ‘एमए’ अर्थात ‘भास्कर’ हे पदव्युतर शिक्षण पूर्ण केले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथून संगीत विषयात पदवी घेतली. मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमी येथून पारंपरिक लोककला विषयात पदवी घेतली. १९९० ते १९९५ या कालावधीत त्यांनी नवी दिल्ली येथे भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कथ्थक’ या संस्थेतून कथ्थक नृत्याचा पाच वर्षाचा ‘पोस्ट डिप्लोमा’ अभ्यासक्रम लखनऊ घराण्याचे गुरू पद्मविभूषण गुरूवर्य पंडित बिरजू महाराज आणि त्यांचे भाचे पंडित मुन्नालाल शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केला. या पाच वर्षांसाठी भारत सरकारची ‘टॅलेंट स्कॉलरशिप’ही स्मिता बागुल-मोरे यांना मिळाली होती.
 
 
 
स्मिता यांनी डोंबिवलीकर झाल्यानंतर ‘आराधना फाईन आर्ट’ ही संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी कथ्थकनृत्य आणि लोककलेच्या प्रचार आणि प्रसाराचे कार्य सुरू केले. या संस्थेला सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई येथून ‘एसएससी बोर्ड’च्या ‘रजिस्ट्रेशन’ची मान्यता मिळाली. ‘मिनिस्ट्री ऑफ कल्चर डिपार्टमेंट ऑफ फायनान्स’तर्फे ‘गंगा अवतरण’ आणि ‘मीरा’ या त्यांच्या नृत्य नाटिकेला आर्थिक साहाय्यदेखील मिळाले. स्मिता यांनी आजवर अनेक विद्यार्थी घडविले आहेत. त्यापैकी काही विद्यार्थिनींची नावे सांगायची झाली, तर त्यात सोनाली खरे, सुकन्या काळण या आहेत. या विद्यार्थिनीच संस्थेचा अभिमान असल्याचे ही स्मिता सांगतात.
 
 
चंद्रकात पाटकर ट्रस्टच्या अंतर्गत गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना तसेच मूकबधिर विद्यार्थ्यांना कथ्थक नृत्याचे मोफत प्रशिक्षण देण्याचे कार्य त्या करीत आहेत. गेली पाच वर्षे त्या हे काम करीत आहेत. विविध नृत्य स्पर्धेसाठीपरीक्षक म्हणूनदेखील त्या काम पाहतात. मुंबई विद्यापीठाच्या ‘युथ फेस्टिवल’साठी गेल्या सहा वर्षांपासून सातत्याने परीक्षक म्हणून त्या काम पाहत आहेत. भारताच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त झालेल्या कार्यक्रमात देशातील ६५ ठिकाणांहून ७५ वेगवेगळ्या कलाकारांना आमंत्रण देण्यात आले होते. त्यावेळी ४० मिनिटांत त्यांनी विविध कला सादर केल्या होत्या. या कार्यक्रमाची सुरूवात ‘शिववंदने’ने झाली.
 
 
 
मानसिक शांतता आणि समाधान देण्यासाठी भारतीय संगीतातील शास्त्रीय नृत्याचासुद्धा फायदा होतो. कला ही कायम कलाकारांसोबत इतरांनाही आनंद देणारी असते. भारतात आठ शास्त्रीय नृत्य प्रकार असून त्यात कथ्थकचाही समावेश होता. कथ्थक उत्तर भारतातील प्रमुख नृत्यप्रकारांपैकी आहे. भावप्रधान आणि चमत्कारप्रधान तत्त्वाचा समावेश हे या शैलीचे वैशिष्ट्य आहे. शास्त्रीयदृष्ट्या या शैलीत गत, तोडे, नायक, नायिका भेद, तत्कार, घुंगरांचा आवाज, तालवादकांसह नर्तकींची जुगलबंदी अशा प्रकारांचा समावेश असतो, असे त्या सांगतात.
 
 
भारत सरकारतर्फे आयोजित होणार्‍या नृत्य महोत्सवात महाराष्ट्राचे नेतृत्व त्यांनी केलेले आहे. त्यात महाराष्ट्र सरकार, ‘सतरीया’ नृत्य महोत्सव आसाम, ‘जागतिक नृत्य दिन महोत्सव’ दिल्ली, ‘कालाघोडा फेस्टिवल मुंबई’, ‘शिल्पग्राम फेस्टिवल’, ‘उदयपूर फेस्टिवल’, ‘गोवा कला अकादमी’ यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे स्मिता यांना ‘समाजभूषण पुरस्कार’ जळगाव, ‘आदर्श डोंबिवलीकर सन्मान’, ‘विदर्भ कलारत्न पुरस्कार’, ‘संत शिरोमणी नरहरी महाराज कलासन्मान’ धुळे, अशा विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. अशा या हरहुन्नरी नृत्यांगनेला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा...!




Powered By Sangraha 9.0