ठाण्यातल्या ‘विद्यादान साहाय्यक मंडळ’ या संस्थेने देशसेवेपासून रुग्णसेवा करणारे अनेक विद्यार्थी घडवले.गेल्या १३ वर्षांपासून सुरू झालेली ही प्रक्रिया आजही निरंतर सुरू आहे. कोरोना महामारीच्या काळात संस्थेच्या वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी ‘फ्रंटलाईन’वर काम करत विविध दवाखान्यांत सेवा बजावली. यामध्ये संस्थेची विद्यार्थिनी डॉ. नम्रता तळेकर हिने ‘कोविड’काळात केलेले काम कौतुकास्पद आहे. नुकतीच तिने वैद्यकीय क्षेत्रातील ‘एमबीबीएस’ पदवी प्राप्त केली. सध्या ती सायन हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप करते आहे. आजवरचा तिचा जीवनप्रवास अनेकांसाठी आदर्शवत असून, विशेषतः आपल्या कामाप्रति आपण कसे व किती एकनिष्ठ असावे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे नम्रता होय. तिच्या नावाप्रमाणेच ती आपल्या रुग्णसेवेच्या कामात नम्र आहे. म्हणूनच ऐन‘कोविड’काळात घरच्यांचा विरोध पत्करून तिने ‘कोविड’सेवेला अविरत वाहून घेत आपले कर्तव्य बजावले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील भोसे, करकंब गावांतून अर्ध्या रात्री एका टेम्पोतून प्रवास करत तिने मुंबई गाठली होती. आपल्या ध्येयाशी एकरूप आणि प्रामाणिक असल्याशिवाय मनात असा विचार येणे शक्य नाही. गेल्या दोन वर्षांपासून डॉ. नम्रता तळेकर ‘कोविड’ रुग्णांची अविरत सेवा बजावत आहे.नम्रताचे वडील भारतीय सैन्यात अधिकारी पदावर कार्यरत होते. त्यामुळे तिचे बालपण आणि शालेय शिक्षण हे श्रीनगर, बडोदा, नाशिक येथे गेले. लहान वयातच आपल्याला डॉक्टर होऊन रुग्णांची सेवा करायची आहे, असा चंग तिने बांधला होता. त्यामुळे त्या पद्धतीनेच तिची पावलंही पडू लागली. बारावीत चांगल्या मार्काने आणि ‘सीईटी’तही उत्तम गुण मिळवत तिने सायन रुग्णालयाच्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश पक्का केला. मुंबई तिच्यासाठी तशी नवीन नव्हती. त्यामुळे इथे मन रमवत तिच्या स्वप्नपूर्तीचा प्रवास सुरू झाला. काही स्वप्नं अवघड वाटली, तरी आपल्याला वाटत असणारा विश्वास आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी आपण झपाटून करत असलेली मेहनत कधीच वाया जात नाही. याचा प्रत्यय नम्रताला येत गेला. गावाला तिचं कुटुंब मोठं आहे, वडील निवृत्त होऊन शेती करू लागले होते. त्यामुळे काहीशा कौटुंबिक व आर्थिक अडचणीमुळे शिक्षणात खंड पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. अशा वेळी ठाण्यातील ‘विद्यादान साहाय्यक मंडळा’ने तिला केलेले सहकार्य तिच्या स्वप्नपूर्तीला गवसणी घालणारे होते. ती शिकत असलेल्या कॉलेजच्या सहकार्याकडून तिला या संस्थेची माहिती मिळाली. तिने रीतसर अर्ज करून, संस्थेनेही विहित निवडप्रक्रियेतून तिची निवड केली.
मुळातच ती गुणवंत, होतकरू होती. याची झलकही तिने वेळोवेळी दाखवल्याने ती यशस्वी ‘कोविड देवदूत’ बनली आहे. गेला काही काळ सर्वत्र सुरू असलेला ‘कोविड’ संसर्ग तिच्यासाठी आव्हानात्मक ठरला आणि ती तिच्या वैद्यकीय पेशाशी कितपत प्रामाणिक आहे, याचीच चाचणी करणारा होता. संपूर्ण जगामध्ये कोरोना प्रादुर्भावाने थैमान घातले असल्याने देशात वैद्यकीय सेवा अपुरी पडताना दिसत होती. अनेक ठिकाणी वैद्यकीय अधिकारी कोरोनाग्रस्तांवर भीतीपोटी उपचार करण्यास टाळाटाळ करत होते, असे दारुण चित्र पाहायला मिळत होते. अशावेळी गावाला असणारी नम्रता आपल्या कर्तव्याला जागत, कुटुंबाचा विरोध पत्करून थेट ‘कोविड’ रुग्णाची सेवा करायला मुंबईत दाखल झाली. कामाप्रति असणारे समर्पण माणसाला कोणत्याही संकटाशी लढायला बळ देते,हेच यातून अधोरेखित होते. सुरुवातीला ती मुंबई महापालिकेत ‘मेडिकल ऑफिसर’ म्हणून रुजू झाली. त्यानंतर ड्युटी करत ती मालाड येथील‘थर्मल स्क्रीनिंग कॅम्प’मध्ये सहभागी झाली. त्यानंतर ‘बीकेसी जम्बो कोविड सेंटर’मध्ये ‘मेडिकल ऑफिसर’म्हणूनही तिने काम केले. आठ तासांची ड्युटी असतानाही दहा ते १२ तास ‘कोविड’ग्रस्तांसाठी ती अविरत झटत होती. शिवाय, ड्युटी करीत असताना ‘एमबीबीएस’च्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेचा अभ्यास, ‘ऑनलाईन लेक्चर्स’ही तिने नेटाने पूर्ण केले आणि मागील वर्षी ‘एमबीबीएस’च्या शेवटच्या वर्षाची परीक्षा देऊन अंतिमतः आपले डॉक्टर बनण्याचे स्वप्न तिने साकार केले. डॉ. नम्रता जयवंत तळेकर हे नाव आता ती अभिमानाने मिरवते! ही पदवी मिळवण्यासाठी तिने उपसलेले कष्ट किंबहुना, तिचे ध्येयवादी धोरण खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. लहानपणापासूनच वडिलांकडून देशसेवेची प्रेरणा मिळाली, त्यामुळेच रुग्णसेवेचे हे क्षेत्र निवडल्याचे ती सांगते. भविष्यात ‘आर्मी मेडिकल ऑफिसर’ म्हणून काम करण्याचा मनोदय ती व्यक्त करते. सध्या ती सायन हॉस्पिटलमध्ये सेवा देत आहे. अतिवृष्टी झालेल्या चिपळूण, महाड पूरग्रस्त भागातील वैद्यकीय शिबिरात तिचा सक्रियसहभाग होता. आई-वडिलांनाही तिने दाखवलेल्या धाडसाचे आता कौतुक वाटते. मध्यंतरी सुट्टीत गावी गेली असताना तर गावकर्यांनीही आपल्या धाडसी कन्येचे मोठ्या जल्लोषात कौतुक केले. डॉक्टर म्हणून सेवा देतादेता ती निर्सगातही रमते, ट्रेकिंग करते आणि नम्रपणे जगण्याचा उत्सवही साजरा करते.
अशा या रुग्णसेवेतील ‘नम्रता’ला भावी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!