‘करायला गेले एक अन् झाले भलतेच’ अशी अवस्था सध्या पाकिस्तानच्या क्रिकेट संघाची झाली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सुरक्षेच्या मुद्द्यावर बोट ठेवत न्यूझीलंडच्या संघाने काढता पाय घेतल्याने पाकिस्तानला मोठी चपराक बसली. आपल्या देशात आता दहशतवादी हल्ले होत नसून, आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणे सुरक्षित असल्याचे ढोल बडवणार्या पाकिस्तानचे पितळ अख्ख्या जगासमोर पुन्हा उघडे पडले. नियोजित वेळापत्रकाप्रमाणे न्यूझीलंडचा संघ मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये दाखल झाला खरा.
परंतु, प्रत्यक्ष सामना सुरू होण्याच्या अवघ्या काही तासांपूर्वी न्यूझीलंडच्या चमूने आपण येथे सुरक्षित नसल्याचे म्हणत, पाकिस्तानसोबत खेळण्यास नकार दिला. दहशतवादी हल्ले होण्याच्या भीतीने आणि येथे सुरक्षेचा अभाव जाणवत असल्याचे नमूद करत न्यूझीलंडने पाकिस्तानसोबत खेळण्यास नकार दिला. ही मालिका खेळविण्यासाठी पंतप्रधानस्तरावरही हस्तक्षेप करण्यात आला. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्यासोबत पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाने अनेक विनवण्या केल्यानंतरही न्यूझीलंडच्या संघाने मात्र पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यास काही तयारी दर्शविली नाही. पाकिस्तानचे सर्व प्रयत्न निष्फल ठरले. न्यूझीलंडने काढता पाय घेतल्याने पाकिस्तानमधील क्रिकेटच्या भवितव्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्वदेशात मालिकांचे आयोजन न झाल्यास आर्थिक चणचण कशी भागवायची, हा प्रश्न ‘पाकिस्तान क्रिकेट बोर्डा’ला भेडसावत आहे. २००९ साली श्रीलंकेच्या खेळाडूंवर दहशतवादी हल्ला झाला. २००९ ते २०१५ या सहा वर्षांमध्ये पाकिस्तानमध्ये एकाही क्रिकेट मालिकांचे आयोजन होऊ शकले नाही. स्वदेशी सर्व मालिका पाकिस्तानला संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) आयोजित कराव्या लागल्या. यामुळे पाकिस्तानला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला. २०१५ पासून ते आतापर्यंत झिम्बॉब्वे, बांगलादेश, वेस्ट इंडिज यांसारख्या लहानग्या देशांनी पाकिस्तानच्या धर्तीवर क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. मात्र, यामुळे काही फार मोठा आर्थिक लाभ झाला नाही. खेळाडूंचे पगारही वेळेवर काढणे पाकिस्तानला शक्य होत नव्हते. न्यूझीलंडसारख्या मोठ्या देशाच्या दौर्यानंतर काहीसा आर्थिक लाभ होईल, अशी आशा पाकिस्तानला होती. मात्र, न्यूझीलंडने काढता पाय घेतल्याने पाकिस्तानची पुरती नाचक्की झाली आहे.
अन् झाले भलतेच!
न्यूझीलंडसोबत मालिकेचे आयोजन करून अप्रत्यक्षपणे भारताला डिवचण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला होता. मात्र, तसे झाले नाही. कूटनीतीचा हाच प्रयत्न पाकिस्तानच्या अंगाशी आला, असे म्हटल्यास ते अतिशयोक्तीचे ठरणार नाही. ‘आयपीएल’च्या उर्वरित सामन्यांचे आयोजन ‘बीसीसीआय’ने संयुक्त अरब अमिरातीमध्ये करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ‘पाकिस्तान क्रिकेट बोर्डा’ने याच काळात न्यूझीलंडसोबत क्रिकेट मालिकेचे आयोजन करत भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. या मालिकेचे आयोजन झाल्यास न्यूझीलंडचे खेळाडू ‘आयपीएल’च्या सामन्यांना मुकतील आणि याचा परिणाम या स्पर्धेवर होईल, असा कयास पाकिस्तानने बांधला होता. मात्र, नेमके झाले उलटेच! पाकिस्तानसोबत मालिका खेळण्यास नकार देत ‘आयपीएल’च्या नेमक्या एका दिवस आधी न्यूझीलंडच्या खेळाडूंनी मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. परंतु, या खेळाडूंनी न्यूझीलंडला न परतताच संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणार्या ‘आयपीएल’ स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. मुंबई आणि चेन्नईविरुद्ध झालेल्या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडच्या संघातील अनेक खेळाडू सहभागी झाले. उर्वरित सर्व सामन्यांमध्ये हे सर्व खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे,
पाकिस्तानसोबत मालिका रद्द केल्यानंतर न्यूझीलंडच्या संघाने भारतासोबत मालिका खेळविण्यात रस दाखविला आहे. व्यस्त वेळापत्रकामुळे अद्याप या दौर्याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मालिकेचे आयोजन झाल्यास पाकिस्तानला मिरच्या झोंबणार यात काही शंका नाही. खरंतर ‘आयपीएल’मध्ये खेळू दिले जात नसल्याच्या द्वेषातून पाकिस्तानने भारताला डिवचण्याच्या उद्देशाने आणि ‘आयपीएल’चे महत्त्व कमी करण्यासाठीच हा डाव पाकिस्तानने रचला होता. मात्र, तो आपल्याच अंगाशी आला आहे, हे कळल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंनी यामागे भारताचाच हात असल्याचा आरोप करण्यास सुरुवात केली आहे. ‘आयपीएल’दरम्यानच मालिकांचे आयोजन करण्याची पाकिस्तानची ही काही पहिली वेळ नाही. दरवर्षी पाकिस्तानकडून हाच कित्ता गिरवला जातो. यात काही नवे नाही. मात्र, कटकारस्थानचा डाव आपल्यावरच कसा उलटतो, हे पाकिस्तानला चांगलेच कळून चुकले आहे. यातून धडा घेतला तर ठीक, नाहीतर पुन्हा ‘जैसे थे’ अवस्था असल्यास याहीपेक्षा पुढील परिणाम आणखीन गंभीर असतील, हे काही नव्याने सांगायला नको.
- रामचंद्र नाईक