निद्रेचे प्राकृत अवस्थेतील (नॅचरल स्लीप) मनुष्य शरीराला व आरोग्याला किती गरज आहे, हे आपण या पूर्वीच्या लेखांमधून वाचले. एवढी महत्त्वाची झोप जर येईनाशी झाली किंवा तुटक लागू लागली किंवा अचानकपणे कमी झाली, तर त्याचा शरीर-मनावर काय परिणाम होतो व त्यावर आयुर्वेदशास्त्रात कारणे व उपाय सांगितलेले आहेत, ते आज जाणून घेऊया.
मनुष्याच्या आयुष्यातील महत्त्वाच्या तीन अवस्था असतात. बालकावस्था, तारुण्यावस्था व वृद्धावस्था. बाल्यावस्थेत स्वाभाविकत: झोप अधिक असते. नवजात बालक दिवसाचे २०-२२ तास झोपते. हळूहळू जशी बाळाची वाढ होते, तसतशी त्याची झोप कमी होते. मग त्याला कमी तासाचीही झोप पुरते. शाळकरी मुलांमध्ये रात्रीची सात-नऊ तास झोप व दिवसा थोडी झोप लागते. मैदानी खेळ, व्यायाम, हालचाल जास्त असल्यास अशी झोप तर गरजेचीच. तारुण्यावस्थेत व चाळीशीत दररोज सहा-आठ तास झोप पुरते. त्यानंतर झोपेच्या पद्धती व वृद्धापकाळात चार ते पाच तास झोप पुरेशी होते, असा झोपेतील बदल वयपरत्वे असल्यास तो स्वाभाविकच आहे, यात काही अपाय नाही.पण, काही वेळेस शारीरिक-मानसिक-भावनिक ताणतणावांमुळे झोपेचे जे नियमित तंत्र असते, ते अचानक बिघडते. झोप कमी लागणे, पूर्वीपेक्षा तुटक लागणे, झोपेचे तास व दर्जा खालावल्यास त्याला ‘निद्रानाश’ असे म्हटले जाते. फक्त कमी तास झोप लागणे, (स्वाभाविक झोपेपेक्षा) यालाच ‘निद्रानाश’ म्हणत नाही, पण झोप गाढ न लागणे, वारंवार जाग येणे, शांत झोप न लागणे इत्यादीलाही ‘निद्रानाश’ म्हणतात. यालाच ‘अनिद्रा’, ‘अस्वप्न’, ‘जागरण’, ‘निद्रा विघात’ इ. पर्यायी नावे ही आहेत.
अचानक होणार्या निद्रानाशाची काही कारणे आहेत, त्यांची माहिती करुन घेऊया.
मानसिक कारणे : अतिचिंता, अतिक्रोध, मनस्ताप, खूप विचार करणे, संतापणे, चित्त विचलित होणे, मन सैरभैर होणे इ.मुळे मन उद्विग्न होते. मनाची चंचलता वाढल्याने मन लवकर शांत होत नाही. नकारात्मक किंवा सतत विचार केल्याने मनाचे कार्य सुरुच राहते. अशात शरीर व मन दोन्ही थकलेले असले, तरी झोप काही लगेच येत नाही.
शारीरिक कारणे : वातवृद्धी, पित्तवृद्धी, धातुक्षय, अतिविचार केल्याने शरीरात वात दोष वाढतो. तसेच चिडचिड, त्रागा, आरडाओरडा, चडफड केल्याने पित्त वाढते. वात व पित्ताची अस्वाभाविक पुष्टी झाल्यास यासाठी खानपानाचेदेखील विविध घटक अवलंबून आहेत. स्वाभाविक निद्रा विचलित होते. झोपेच्या दर्जावर व प्रमाण-तास दोन्हींवर त्याचा परिणाम होताना दिसतो. अन्य कारणे - पंचकर्माचा अतियाग अभिघात
पंचकर्म : शरीरशुद्धीसाठी सांगितलेले विविध कर्म, थेरपीज् आहेत. यांचा उत्तम योग आल्यास ‘पंचकर्म शोधन’ अपेक्षेप्रमाणे झाल्यास शरीर निरोगी व मन प्रसन्न होते. पण, क्वचितप्रसंगी पंचकर्माचा अतियोग झाल्यास त्याचा परिणाम अन्य शारीरिक संस्थांवर तर होतोच, पण त्याचबरोबर झोपेचे तंत्रही बिघडते, निद्रानाशही होतो.
अभिघात : मार लागणे, इजा होणे म्हणजेच शरीरावर अनपेक्षित दुखापत होणे. हा आघात छोटा किंवा मोठा असू शकतो. तसेच एकांगावर किंवा सर्वांगावर त्याच्या खुणा/जखमा दिसू शकतात. क्वचितप्रसंगी एखाद्या दुर्घटनेचे आपण फक्त साक्षी असतो. ते होताना बघितले असते, पण त्याच्या मनावर एवढा मोठा आघात होतो की, मन त्याचविषयी सतत विचार करत राहते, चिंतीत राहते. यामुळेही झोपेचे तंत्र बिघडते.
धातुक्षय : एखादा मोठा आजार होऊन गेला किंवा लहानसाच आजार पण तो बरा होण्यास बराच कालावधी लागला, तर शरीरातीलसातही धातूची पुष्टी अधिक प्रमाणात घडते. धातूंचे संपूर्ण पोषण व वृद्धी होत नाही व धातुशय ही अवस्था निर्माण होते. अशा वेळेसही निद्रानाश होऊ शकतो.मनुष्याला होणार्या विविध आजारांपैकी सुमारे ७० - ८०टक्के आजार हे मनोकायित स्वभावाचे असतात, म्हणजेच त्या आजाराचापरिणाम मनावर व शरीरावर दोन्हींवर होतो. काही आजार शारीरिक असतात. पण, त्याचे पडसाद मनावर उमटतात, तर काही विपरित घडते. म्हणजे मनाच्या अस्थितरतेमुळे अतिचिंता विचार इ. मुळे शरीरावरदेखील या सर्व गोष्टींचा नकारात्मक परिणाम होतो.
याचबरोबर निद्रानाशाची अजून काही कारणे शास्त्रात नमूद केलेली आहेत. जसे अतिभूक लागली असल्यास (यामुळे डोळे चुरचुरतात, डोळे वाहू लागतात व तमभावाचा आणि कफाचा अंश कमी झाल्याने ताडकन जाग आल्यासारखी अवस्था होते) अतिमैथुनामुळे शरीरात स्वाभाविकतः वाताची वृद्धी होते.जागरणही त्याबरोबर होत असल्यास पित्तही वाढते व झोपेचे तंत्र बिघडते, निद्रानाश होतो. अतिभय- यामुळे सतत नकारात्मक विचार व चंचलत्व वाढते. मन उद्विग्न व वाताची वृद्धी होते. यामुळे निद्रानाश घडू शकतो.
सध्याची परिस्थिती अतिभय, अतिमैथुन, अतिचिंता इत्यादीचे प्रमाण वाढलेले दिसून येते. मित्र, आप्त, नातलग किंवा वर्तमानपत्रातली जरी काही नकारात्मक बातमी वाचली तर मनुष्याचा स्वभाव असा होत चालला आहे की, ‘मला जर काही झाले तर...?’ सततचीभीती व चिंता बर्याच रूग्णांमध्ये सध्या बघायला मिळते व मनाला शांत करण्यासाठी विषयासक्ती वाढत चालली आहे. या सर्व गोष्टींचा परिणाम झोपेच्या पॅटर्नवर नक्कीच झाल्याचा दिसून येतो. रूक्षान्न सेवन, अतिउपवास, शारीरिक हालचाल कमी व वजन वाढू नये, या दोन कारणांनी षड्र्सात्मक पोषक आहार न खाता कोरडे अन्न (लाईट स्नॅक्स) खाण्याकडे हल्ली लोकांचा कल जास्त असल्याचे आढळते. यामुळे शरीरात वाताची अतिरिक्त वृद्धी होते.
असुखशय्या : गादी/अंथरूण जर आरामदायी नसेल तरीदेखील झोप शांत व गाढ लागत नाही. गादी बदलली, झोपेची जागा बदलली, उशी बदलली इ. पैकी काहीही कारणाने झोपेमध्ये बदल होतो. खूप काळ तिच गादी वापरल्यानेही त्या शय्येचा ‘कम्फर्टेबलनेस’ कमी होतो.
रजःदोष : स्त्रियांमध्ये जेव्हा मासिक स्राव सुरू असतो, अशा वेळेस जर रजः प्रवृत्तीमध्ये काही तक्रारी असतील, दुखणे, स्राव अधिक असणे इ. तरीदेखील त्या काळात निद्रानाश क्षय होऊ शकतो, यावरील उपायपुढील भागात/लेखात...
क्रमश:
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मेटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)