गणपती ही आबालवृद्धांपासून सर्वांना आपलीशी वाटणारी देवता. लडिवाळ भक्ती जिची केली जाते अशी देवता म्हणजे गणपती. प्रत्येक देवतेला एक इतिहास, उगमस्थान असते, पुढे पंथ-संप्रदाय असतो. त्याला गणपती देवता अपवाद नाही. आज अनंत चतुर्दशीनिमित्त बाप्पाला निरोप देतानास गणपतीच्या अशाच काही कथा या लेखातून जाणून घेऊया...
गणपती
गणपती म्हणजे गणांचा स्वामी. ही शैव परिवारातील एक प्रमुख देवता आहे. शरीर मानवाचे आणि शिर हत्तीचे असे या देवतेचे रूप आहे. प्रथमत: गणपतीची गणना ही शंकराच्या गणांमध्ये होऊ लागली. पुढे तो शिवगणांचा पती झाला. गणपती ही आर्येतर देवता असल्याचे अनेक संशोधकांचे मत आहे. वैदिक काळामधील या देवतेचा विचार केला, तर ब्रह्मणस्पती या देवाला ऋग्वेदात ‘गणपति’ हे विशेषण वरील अर्थी योजले आहे. ब्रह्मणस्पती हा स्वतंत्र देव इंद्रादिकांसारखा ऋग्वेदात वर्णिला आहे. वेदांच्या संहिता व ब्राह्मणग्रंथ यांमध्ये गणपती ही स्वतंत्र देवता म्हणून कोठेही निर्देशिलेली नाही. गणपतीच्या मूर्तीचे वर्णन, ‘तत्पुरुष’, ‘वक्रतुंड’ व ‘दंति’ या विशेषणांनी मैत्रायणी संहितेत आणि तैत्तिरीय आरण्यकातील ‘नारायणोपनिषद’ नामक अखेरच्या विभागात आले आहे. मूर्तिपूजकांच्या गरूड, दुर्गा, स्कंद इ. देवतांचाही त्याच संदर्भात निर्देश व वर्णन आले आहे.
गणपतीच्या जन्मकथा
गणपती हा शिव-पार्वतीचा पुत्र असला तरी तो अयोनिज आहे, असे ब्रह्मवैवर्त पुराणात सांगितलेले आहे. गणपतीच्या कथांबाबत पुराणकारांची एकवाक्यता नाही.प्रथम कथा अशी की, गणपती हा केवळ शिवाचा पुत्र होय. शिवाने आपल्या तपःसामर्थ्याने एक सुंदर पुत्र निर्माण केला. पार्वतीने त्यास पाहिले व ती क्रुद्ध झाली. एकट्या शिवाने आपणास वगळून पुत्र निर्माण केला, हे तिला आवडले नाही. तिने त्या बालकास शाप देऊन बेडौल व गजमुख बनविले.
दुसरी कथा ही शिवपुराणात आली आहे. एकदा पार्वती स्नानगृहात स्नान करत होती. आपल्या अंगचा मळ काढून त्यातून तिने एक पुरूष बनविला व स्नानगृहाचा द्वाररक्षक म्हणून उभा केला. थोड्याच वेळात शिव तेथे आले. त्यांना द्वाररक्षकाने अडविले. तेव्हा शिवाने क्रुद्ध होऊन त्याचे मस्तक उडविले. पार्वती दुःखी झाली. तिच्या सांत्वनार्थ शिवाने इंद्राच्या हत्तीचे मस्तक आणून या द्वाररक्षकाच्या धडाला जोडले तोच गणपती होय.
एकदा शिव-पार्वती हिमालायात विहार करत होते. तिथे एक हत्तीचे जोडपे रतिक्रीडा करताना त्यांना दिसले. मग, शिव-पार्वतीनींही गजरूप घेऊन रतिक्रीडा केली आणि त्या क्रीडेतून त्यांना गणपती हा गजमुख पुत्र प्राप्त झाला. या कथांत गणपती हा शिवपार्वतीचा पुत्र असला, तरी तो ‘अयोनिज’ आहे, हे सूचित होते. गणपतीला आणि शिवाला पुराणांत ‘रुद्र’, ‘शिव’, ‘विनायक’, ‘गणेश’, ‘त्रिपुरांतक’, ‘लंबोदर’ इ. समान विशेषणे लावलेली आढळतात.
गणपती ही देवता विघ्नकर्ता देवता असल्याचे उल्लेख आढळतात. गुप्तकाळात ती शुभदेवता बनली व त्याच सुमारास ती ‘क्रूर-ग्रह’ म्हणून पूर्वी जे वर्णन येत होते, त्याच्याऐवजी त्याचा ‘शुभदेवता’ म्हणून महिमा वाढला. गुप्तकाळ हा त्याचा ऐतिहासिकदृष्ट्या पहिला उत्कर्ष बिंदू होय. या काळातच तो भारताबाहेरही म्हणजे तिबेट, चीन, जपान, कोरिया इ. पूर्वेकडील आशिया खंडात पूजेस पात्र झाला. ‘गणेशपुराण’ आणि ‘मुद्गल पुराण’ असी दोन स्वतंत्र उपपुराणे, गणपतीचे महात्म्य वर्णन करणारी, महाराष्ट्रात गणेशभक्तांनी रचली, असे काही संशोधकांचे मत आहे. गणपत्यथर्वशीर्षात परब्रह्म हे तात्त्विक स्वरूप त्यास देण्यात आले. मुळात तो रानटी लोकांचा रक्तवर्ण देव असावा. पशुपूजेच्या संप्रदायात त्याला महत्त्व असावे. रानटी लोक व्याघ्रदेवाची जशी अजून पूजा करतात, तशीच ही गजदेवाची पूजा, मुळात होत असावी. लाल शेंदूर, रक्त वस्त्र, रक्त पुष्प, दूर्वांकुर, मोदक अथवा लाडू इ. त्याच्या पूजेची सामग्री होय. त्याला प्राथमिक स्थितीमध्ये रक्ताचा अभिषेक होत असावा, असे काही पश्चिमी संशोधकांचे मत आहे. परंतु, गज हा शाकाहारी प्राणी असल्यामुळे प्राण्यांचे बलिदान त्याच्या बाबतीत प्रथमपासूनच वर्ज्य असणे शक्य आहे. शिव, भैरव, पार्वती किंवा देवी यांनाच प्राण्यांचे बलिदान करण्याची प्रथा आतापर्यंत चालू आहे. बिहारमध्ये शिवाच्या (वैद्यनाथाच्या) मंदिरात अजूनही बोकडांचे बलिदान चालते.
शिव, रुद्र आणि गणपती
सध्या आपण गणपतीला शिव परिवारातील किंवा शिवपुत्र मानतो. परंतु, पाश्चात्य संशोधकांची अशी कल्पना आहे की, शिव आणि गणेश या देवता पूर्वी एकरूपच होत्या. म्हणजे जो शिव तोच गणपती जो गणपती तोच शिव होय. अथर्वशीर्षातही गणपतीला उद्देशून ‘त्वं ब्रह्मा, त्वं विष्णुस्त्वं रुद्र:’ असे म्हटले आहे. हे केवळ सर्वस्व गणपती आहे, या तात्त्विक अर्थानेच नव्हे, तर दैवतशास्त्रानुसारही खरे असले पाहिजे. गणेश आणि शिव यांच्यातील साधर्म्य ठळकपणे दिसून येते. भालचंद्र, तृतीय नेत्र आणि नागभूषणे ही शिवाची तीन वैशिष्ट्ये गणपतीमध्येही आढळतात. गणेशाला ‘भालचंद्र’ असेही नाव आहेत. ‘गजवदनमचिन्त्यम्’या गजाननाच्या ध्यानश्लोकात त्याला ‘त्रिनेत्र’ही म्हटले आहे. गणपतीच्या कमरेभोवती नागबंध आहे. शंकराने हलाहल प्राशन केल्यावर त्याचा दाह शमवण्यासाठी त्याने सूर्यभूषणे व चंद्र धारण केला. ही कथा गणपतीच्या बाबतीतही गणेश पुराणात आढळते. अनलासुर जेव्हा अग्नीने जग जाळत निघालेला तेव्हा गणेशाने त्याला धारण केले आणि त्याचा दाह शांत करण्यासाठी सर्प, चंद्र असे शीतलोपचार करण्यात आले.
डॉ. संपूर्णानंद यांनीदेखील शिव आणि गणेश यांचे अभिन्नत्व सिद्ध केले आहे. तैत्तिरीय आरण्यकात रुद्रगायत्री आणि गणेशगायत्री यांच्याशी साधर्म्य असलेला एक मंत्र आहे. ‘तत्त्पुरुषाय विद्महे वक्रतुण्डाय धीमही। तन्नो दंती प्रचोदयात्।’ या मंत्रातील ‘तत्त्पुरुष’ हे रुद्राचे नाव आहे. ‘वक्रतुंड’ आणि ‘दंती’ ही सांप्रतकाळात गणेशाची नावे म्हणून ओळखली जातात. म्हणजे आरण्यक काळात ही नावे रुद्राची असण्याची शक्यता नाकरता येत नाही. तैतिरीय संहितेत उंदीर हे रुद्राचे वाहन असल्याचे उल्लेख आढळतात आणि गणेश विज्ञानात उंदीर गणपतीचे वाहन असल्याचा उल्लेख आहे.
पुराणांमध्येही गणपती आणि शिवाच्या अभिन्नत्वाचे उल्लेख आहेत.
आध्यात्मिक गणपती
गणपतीचे ऐतिहासिक रूप हे भिन्न, तार्किक अंगांनी मांडले जाते. परंतु, गणेशभक्तांना भावतो तो आध्यात्मिक गणेश. गणपत्यथर्वशीर्षात गणपतीस्वरुपाचे सार आले आहे-हे गणेशा, तू तत्त्व आहेस, तू प्रत्यक्ष ब्रह्म आहेस, तू आत्मा आहेस, तू ज्ञानमय आणि विज्ञानमय आहेस, तू सर्व काही आहेस.वेदान्ती आणि तत्त्वचिंतकांनी गणपतीला वाड्.मयाच्या, नादाच्या मूळस्थानी नेऊन बसवले आहे. योगविद्येत तो जसा मूलाधारचक्रावर अधिष्ठित आहे, तसा तो वाक्विद्येत ओंकारस्वरुप आहे. ओंकार हे सर्व शब्दांचे मूळ असून ते गणेशाचे विशेष नाव आहे. प्रणवोपासना ही गणेशोपासना आणि गणेशोपासना ही ब्रह्मविद्या मानली आहे.
चिंतामणी हे गणपतीचे एक नाव. क्षिप्त, मूढ, विक्षिप्त, एकाग्र आणि निरोधक या चित्ताच्या पाच भूमिका आहेत. त्यांना प्रकाशित करणारा चिंतामणी होय. चिंतामणीच्या भजनाने चिंतपंचकांचा नाश होऊन शांती लाभते, असे मुद्गल पुराणात दिलेले आहे. गणपतीच्या विविध नावांचे अर्थही आध्यात्मिक अंगांनी लावलेले दिसतात.गणपतीला रक्तवस्त्र, रक्तपुष्प, रक्तचंदन याची आवड आणि तो रक्तवर्ण का आहे, याचीही आध्यात्मिक उत्त्पती दिसते. ज्या मूलाधार चक्राचा तो स्वामी, ते चक्र आणि तेथील कमल दोन्हीही लाल आहेत. गणपतीचे ज्योति:स्वरुप पाहिले तर उदयारुढ सूर्य आणि अग्नी यांच्या लालरंगाप्रमाणे आहे. गणपती सृष्टिकर्ता असल्याने रजोगुणी असून रजाचा रंग लाल आहे. तसेच अनेक दंतकथाही या संदर्भात सांगितल्या जातात, ज्याचे उल्लेख गणेश पुराण व मुद्गल पुराणात आहेत.
गाणपत्य संप्रदाय
गणपती हे प्रमुख उपास्य दैवत असणार्या हिंदूंच्या एका संप्रदायास ‘गाणपत्य संप्रदाय’ ही संज्ञा असून या संप्रदायाच्या अनुयायांना ‘गाणपत्य’ म्हणतात. हिंदूंच्या पाच प्राचीन प्रमुख संप्रदायांत या संप्रदायाचा अंतर्भाव होतो. इसवी सनाच्या पाचव्या ते नवव्या शतकांच्या दरम्यान केव्हा तरी हा संप्रदाय उदयास आला असावा, असे रा. गो. भांडारकरांचे मत आहे. याच कालखंडात रचलेल्या भवभूतीच्या ‘मालतीमाधव’ नाटकात गणपतीचे स्तवन आहे. सुमारे चौथ्या शतकातील ‘याज्ञवल्क्यस्मृती’तही महागणपतीची पूजा करण्यास सांगितले आहे. आठव्या व नवव्या शतकांतील काही कोरीव लेखांतही गणपती व गाणपत्यांचे उल्लेख आढळतात. सर्वसाधारणत: याच काळात गाणपत्यांच्या सांप्रदायिक ग्रंथांचीही रचना झाली असावी. त्यांत ‘गणेशपुराण’, ब्रह्मवैवर्तपुराणातील ‘गणेशखंड’, ‘मुद्गलपुराण’, ‘गणपत्युपनिषद’, ‘गणेशसंहिता’, ‘गणेशगीता’, ‘गणेशकल्प’, ‘गणपतिरहस्य’, ‘गणेशसहस्रनाम’, ‘गणेशमाहात्म्य’ इत्यादींचा अंतर्भाव होतो.
गाणपत्य संप्रदायातील सहा भेद किंवा उपसंप्रदाय आनंदगिरीने आपल्या शंकरदिग्विजयामध्ये तसेच धनपतीने माधवाचार्यांच्या शंकरदिग्विजयावरील भाष्यात नमूद केले आहेत. ते असे : (1) महागणपती, (2) हरिद्रागणपती, (3) उच्छिष्टगणपती, (4) नवनीतगणपती, (5) स्वर्णगणपती आणि (6) संतानगणपती. आनंदगिरीने शेवटच्या तीन भेदांची ‘नवनीत’, ‘स्वर्ण’ आणि ‘संतानगणपती’ अशी जी नावे दिली आहेत, त्यांचे अनुक्रमे ‘ऊर्ध्व’, ‘पिंगल’ आणि ‘लक्ष्मीगणपती’ असेही प्राचीन पर्याय आहेत, तथापि आनंदगिरीने दिलेली नावेच विशेष रूढ आहेत. यांतील काही गणपतिनामांचा संबंध ज्या द्रव्यांपासून गणपतीची मूर्ती बनवत असत, त्या द्रव्यांशी असावा, असे दिसते. उदा. ‘हळद-हरिद्रा’, ‘लोणी-नवनीत’, ‘सुवर्ण-स्वर्ण.’
गाणपत्य संप्रदायात गुप्त व प्रगट अशा दोन्हीही प्रकारे उपासना होत असे. संप्रदायात गणपती हा शिवाचा प्रतिस्पर्धी आणि इतर सर्व देवांहून श्रेष्ठ मानला जातो. संकटसमयी इतर देवही त्याचे साहाय्य घेऊ लागल्याच्या कथा सांप्रदायिक ग्रंथांत आहेत. सर्वश्रेष्ठ देवता म्हणून गणपतीच्या उपासनेची ही नवी लाट निर्माण होताच संप्रदायातील सहा भेदांचे पुनरुज्जीवन झाले. टी. ए. गोपीनाथ राव आणि एच. डी. भट्टाचार्य यांनी आपल्या ‘हिस्टरी अॅण्ड कल्चर ऑफ दि इंडियन पीपल’ या ग्रंथात पुढील पाच उपसंप्रदायांचा अंतर्भाव ‘शक्तिगणपती’ या वर्गात केला असून त्यांचे मूर्तीविशेषही प्रमाणभूत प्रतिमाविद्याविषयक ग्रंथांच्या आधारे तपशिलांसह दिले आहेत: (1) उच्छिष्टगणपती : लालवर्ण, चतुर्भुज. (2) महागणपती : रक्तवर्ण, दशभुज. (3) ऊर्ध्वगणपती : सुवर्णपीतवर्ण, षड्भुज. (4) पिंगलगणपती : पिंगटवर्ण, षड्भुज. (5) लक्ष्मीगणपती : शुभ्रवर्ण, चतुर्भुज वा अष्टभुज. प्रतिमाविद्याविषयक विविध ग्रंथांत या पाचही मूर्तींच्या तपशिलांबाबत थोडीफार तफावत आढळते. तथापि, या मूर्ती शक्तिदेवीसमवेत असल्याबाबत मात्र सर्वांतच एकवाक्यता आढळते. यांव्यतिरिक्त ‘हरिद्रागणपती’ नावाने ओळखला जाणारा (पीतवर्ण, चतुर्भुज) सहावा भेद असून त्यात गणपती हा सर्वश्रेष्ठ देव म्हणून उपास्य होता. या उपसंप्रदायाचे अनुयायी गणपतीचे मुख व एक दंत आपल्या दोन्ही दंडांवर गोंदवून घेत.
शिवापासून गूढ स्वरूपात गणपतीची उत्पत्ती झाली, असे दाखविण्याचे प्रयत्न देवोत्पत्तिशास्त्राच्या सैद्धांतिक पातळीवर झाले, तर तंत्रमार्गात गणपतीची उत्पत्ती विविध फलप्राप्तीच्या यंत्रापासून आणि मंत्रापासून झाल्याचे म्हटले आहे. गाणपत्यातील सहाही भेदांत उपास्य देवतेचे रूप, नाम, उपासनेचे शब्द व मंत्र तसेच अनुयायांना द्यावयाचा उपदेश यांबाबत भिन्नता आढळते. तथापि गणपती हाच सर्व देवांचे आणि सृष्टीचे आदिकारण आहे. शिव नव्हे, तसेच तो अनादी-अनंत असून त्याच्या मायेनेच ब्रह्मादी सर्व देव व हे विश्व निर्माण झाले आहे. याबाबत मात्र या सर्वांचेच एकमत आहे. डब्ल्यू. वॉर्ड यांच्या मते, बंगालमधील ज्या हिंदूंनी गणपतीची ‘विघ्नकर्ता’ अशा रूपाऐवजी ‘विघ्नहर्ता’ अशा रूपात उपासना केली, तेच ‘गाणपत्य’ म्हणून स्वतंत्र संप्रदायाने ओळखले जाऊ लागले.
‘उच्छिष्टगणपती’ या संप्रदायभेदाचा विशेष म्हणजे त्यात वाममार्गी उपासनापद्धतीचा अवलंब केला जातो आणि देवी ही शिवाऐवजी गणेशाची शक्ती मानली जाते. या भेदातील उपास्य गणपतीचे नाव ‘हेरंब’ आहे. सर्वच कर्मकांड, जातिभेद आणि विवाहाची बंधने या उपसंप्रदायास मान्य नाहीत. त्यांच्या मते, स्त्री-पुरुषातील मुक्त व स्वैरसंभोग हाच उपासनेचा सर्वोत्तम प्रकार असून, पुरुष उपासक हे हेरंबरूपच होत. एच. टी. कोलब्रुकच्या मते, या संप्रदायाचे उपासक आपल्या कपाळावर शेंदराचा लाल टिळा लावतात, तसेच तोंडात तोबरा भरून उष्ट्या तोंडाने आपल्या उपास्य देवतेची प्रार्थना करतात. यावरूनच या भेदास ‘उच्छिष्टगणपती’ असे नाव पडले असावे.
आज गाणपत्य संप्रदाय इतर काही वैष्णव व शैव पंथांप्रमाणेच फारसा प्रचारात असल्याचे दिसत नाही. सांप्रदायिक स्वरूपात नसली, तरी वैयक्तिक देवतास्वरूपात मात्र गणपतीची उपासना सर्व हिंदूंमध्ये भारतभर आजही प्रचलित आहे. विशेषत: दक्षिण भारतात व महाराष्ट्रात गणपतीची उपासना विशेष प्रमाणात केली जाते. काही उल्लेखांनुसार सांप्रदायिक दीक्षा घेतलेल्या गाणपत्यांना वैदिक ब्राह्मणवर्गात मानाचे स्थान नव्हते. वैदिक विधींमध्ये त्यांना ब्राह्मणांसमवेत बसवू नये, अशी प्रवृत्ती होती. केरळमध्ये गणपतीची अनेक स्थाने व मंदिरे असून त्यांना ‘होमपुरे’ म्हणतात आणि तेथे गणपतीला नित्य होमही होतो. महाराष्ट्रातील अष्टविनायकांची स्थाने प्रख्यात आहेत, तसेच इतर अनेक ठिकाणीही गणेशमंदिरे आहेत. पुण्याजवळील चिंचवड येथील गणेशस्थानही ‘मोरया गोसावी’ या गणेशोपासकामुळे विशेष प्रसिद्ध आहे. सांप्रदायिक ग्रंथांतून ऋग्वेदातींल सूक्ताचा ‘एकद्रष्टा ऋषी गृत्समद’ हा आद्य गाणपत्य मानला जातो. तसेच मुद्गल, भृशुंडी, वरेण्य, गणेशयोगी हे ‘महागाणपत्य’ मानले जातात.
गणपतीचे विविध अवतार
उपपुराण मानल्या जाणार्या व गाणपत्य संप्रदायाचे मुख्य ग्रंथ असलेल्या ‘गणेश पुराण’ व ‘मुद्गल पुराण’ या दोन ग्रंथांत गणपतीच्या अनुक्रमे चार व आठ अवतारांचा उल्लेख आहे.गणेश पुराणात गणपतीचे चार अवतार अनुक्रमे सत्य, त्रेता, द्वापर व कलियुगात झाले असा उल्लेख आहे.महोत्कट विनायक : हा दशभुजाधारी व रक्तवर्णी अवतार. वाहन सिंह असून कश्यप-अदिती यांचे संतान आहे म्हणून हा विनायक ‘काश्यपेय’ नावाने प्रसिद्ध झाला. या अवतारात त्याने ‘नरान्तक’ आणि ‘देवान्तक’ नावाच्या दोन असुर भावांचा व ‘धूम्राक्ष’ नावाच्या दैत्याचा वध केला.
मयुरेश्वर : हा सहा भुजांचा व श्वेतवर्णी अवतार आहे. याचे वाहन मोर आहे. त्रेतायुगात शिव-पार्वतींचा पुत्र म्हणून हा जन्मला. या अवतारात ‘सिंधू’नामक दैत्याचा त्याने वध केला. अवतारसमाप्तीच्या वेळी आपले वाहन असलेला मोर त्याने त्याचा भाऊ कार्तिकेयला दान केला, अशी आख्यायिका आहे. मोरगाव येथे मोरेश्वराचे मंदिर आहे.गजानन : हा चतुर्भुज व रक्तवर्णी अवतार असून वाहन उंदीर आहे. द्वापार युगात शिव-पार्वतींचा पुत्ररूपात गजानन अवतारित झाले. या अवतारात ‘सिंदूर’नामक दैत्याच्या वध केला. अवतार समाप्तीच्या वेळेस राजा वरेण्य यास ‘गणेश गीता’ सांगितली.धूम्रकेतू : द्विभुज अथवा चतुर्भुज व धूम्रवर्णी अवतार असून याचे वाहन निळा घोडा आहे. हा अवतार कलियुगाच्या शेवटी अवतीर्ण होईल व अनेक दैत्यांचा नाश करेल, असे सांगितले जाते. विष्णूच्या ‘कल्की’ अवतारावरून हा कल्पित केलेला आहे.
मुद्गल पुराणानुसार गणपतीच्या आठ अवतारांचे वर्णन सापडते.
वक्रतुंड : हा प्रथम अवतार असून याचे वाहन सिंह असून या अवतारात मात्सर्यासुराचा (अर्थात मत्सराचा) वध त्याने केला, अशी आख्यायिका आहे.
एकदंत : आत्मा व परमब्रह्माचे प्रतीक म्हणून हा अवतार ओळखला जातो. हा मूषकवाहन असून अवताराचा उद्देश मदासुराचा (अर्थात, मद/मी-पण) वध त्याने केला, अशी आख्यायिका आहे.
महोदर : वक्रतुंड व एकदंताचे सम्मिलित रूप. ब्रह्माच्या प्रज्ञेचे प्रतीक. मोहासुर (अर्थ मोह) याचा वध केला. हा अवतारही मूषकवाहन आहे.
गजक्त्र वा गजानन : महोदर अवताराचे अन्यरूप. लोभासुर (लोभ) याचा वध केला.
लंबोदर : ब्रह्माच्या शक्तीचे प्रतीक असून वाहन मूषक आहे. क्रोधासुराचा वध केला.
विकट : सूर्याचे प्रतीक असून कामासुराचा वध केला. या अवताराचे वाहन मयूर आहे.
विघ्नराज : हा अवतार विष्णूचे प्रतीक असून ममासुराचा (अहंकार) वध हा या अवताराचे प्रयोजन होते.
धूम्रवर्ण : शिवाचे प्रतीक असून वाहन घोडा आहे. या अवतारात त्याने अभिमानासुराचा नाश केला.
कलामय गणेशरूपे
भारतीय शिल्प व चित्रकलेत गणपती एक अत्यंत महत्त्वपूर्ण व लोकप्रिय देवता आहे.गणपतीच्या नाना रूपांचे वर्णन जे पुराण व इतिहासात मिळते, ते भारतीय उपखंडात व भारताबाहेरही विविध रूपांत आविष्कृत झाले आहे. गणपतीच्या विविध रूपांतील मूर्ती आहेत. कुठे उभा, कुठे नृत्य करत, कुठे असुरवधकारक, कुठे शिशू, तर कुठे पूजक रूपातील गणपती दिसतो. भारतीय शिल्पकलेमध्ये सप्त मातृकांच्या जोडीने गणपतीचे शिल्प अंकित केलेले दिसते.भारतीय शिल्पकलेत प्रथमपासूनच गणेश, गजानन, एकदंत व लंबोदर रूपात आहे. गणेशाच्या ध्यान, प्रार्थना व मंत्रही असेच रूपवर्णन करतात.
सर्वं स्थूलतनुं गजेन्द्रवदनं लम्बोदरं सुन्दरं प्रस्यन्दन्मद्गन्धलुब्धमधुपब्यालोलगण्डस्थलम्।
दन्ताघातविदारितारिरुधिरैः सिन्दूरशोभाकरं वन्दे शैलसुतासुतं
गणपतिं सिद्धिप्रदं कामदम्॥
सुरुवातीच्या काळापासूनच गणपती एकदंत रूपात शिल्पबद्ध आहे. गुप्तकाळातील गणेशमूर्तीही लंबोदर आहेत. ब्रह्मांड पुराणात या उदरात सारे जग सामावू शकेल, असे म्हटले आहे. गणपतीच्या हातांच्या व अस्त्रांच्या संख्येत मतांची विविधता दिसते. गणपती चतुर्भुज, द्बिभुज, षड्भुज अशा अनेक रूपात दिसतो. हातात साधारणपणे पाश-अंकुश, वरदहस्त व मोदक असे रूप असते.भारतात व बाहेर गणपतीच्या रूपात अनेक फरक दिसतो. रूपभेदानुसार ध्यान व पूजाविधी बदलतो. गुप्तयुगातील गणेशमूर्ती अष्ट ते दशभुज आहेत. तंत्रमार्गी ग्रंथ तंत्रसारात, काश्मीर-नेपाळमध्ये व अफगाणिस्तानमध्ये आढळणार्या मूर्तींमध्ये गणपतीचे वाहन सिंह दाखवले आहे. येथील गणपती नेहमीप्रमाणेच प्रसन्न रूपात दाखवला आहे.
सांप्रत स्वरूप
गणपती देवतेचे सांप्रत स्वरूप हे अथर्वशीर्षाच्या रचनाकाळी निश्चित झाले. पुराणकर्त्यांनी पुढे त्याच्या स्वरूपात काही प्रमाणात भर घातली, तरी ‘एकदन्तं चतुर्हस्तं’ हे रूप आसेतूहिमाचल प्रसिद्ध ठरले. इ. स. सहाव्या शतकाच्या प्रारंभापासून गणेशमूर्ती आढळतात. पण, गणेशस्वरूपाची जडणघडण कित्येक शतके चालू होती. याबाबत पु. रा. बेहेरे म्हणतात, “गृत्सांचा गृत्सपती, गणांचा गणपती, व्रातांचा व्रातपती, विरुपांचा विरूप अशा सर्वांचा वैदिक ब्रह्मणस्पतीमध्ये समावेश होऊन गणेशाचे आजचे विशाल रूप बनले असले पाहिजे.”
ही एकीकरणाची प्रक्रिया हजारो वर्षे चालत आली असेल. अथर्वशीर्षाच्या पूर्वीच्या वाङ्.मयामध्ये गणपतीची अनेक रूपे आढळतात. गणपतीच्या बाह्य स्वरूपाची चिकित्सा करताना आध्यात्मिक स्वरूपाचीही चिकित्सा केली आहे. महाभारताच्या लेखनासाठी श्रीगणेश व्यासमहर्षींचा लेखनिक झाला. तंत्रशास्त्रात गणपतीची विविध प्रकारे उपासना सांगितली आहे. ‘त्वं प्रत्यक्षं ब्रह्मास्मि’ या मंत्राद्वारे अथर्वशीर्षात गणपतीला ब्रह्मस्वरूप दिले आहे. स्रांप्रत गणपती हा मंगलमूर्ती असून प्रत्येक कार्यारंभी त्याचे पूजन केले जाते.
अशाप्रकारे गणपतीची ‘विघ्नकर्ता देवता’ ते ‘विघ्नहर्ता देवता’ असा प्रवास झाला असून या देवतेच्या भक्तीला अनेक तात्त्विक अंगे आहेत. या गणेश चतुर्थी काळात गणेशतत्त्व जाणून अंधभक्तीऐवजी अभ्यासपूर्ण भक्ती करूया...
- वसुमती करंदीकर