कुठे धडाडा पाणकळा, तर कुठे उन्हाच्या तीव्र झळा!

17 Sep 2021 22:50:40

sa_1  H x W: 0  
 
 
अरब देशांमध्ये मुळातच पाण्याचं दुर्भिक्ष आहे. पण, जे काही पाणी उपलब्ध आहे, त्याचं योग्य नियोजन केलं, तर दुष्काळ नक्कीच सुसह्य होऊ शकेल.
 
 
जरा जगाच्या नकाशाकडे पाहा. भारताच्या वायव्येला पाकिस्तान, त्याच्या पलीकडे अफगाणिस्तान, त्याच्या पलीकडे इराण आणि त्याच्याही पलीकडे इराक. तिथून अरब वंशीय देश सुरू होतात. इराकच्या पश्चिमेला सीरिया, लेबेनॉन, जॉर्डन आणि इराकच्या दक्षिणेला भला प्रचंड सौदी अरेबिया, यमन (येमेन), उमान (ओमान), कुवेत आणि संयुक्त अरब अमिराती. ही सगळी ‘अरब’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मानव वंशाची मूळ भूमी.
 
 
सौदी अरेबिया किंवा मूळ नाव अरबस्तानच्या पश्चिम, नैऋत्य आणि दक्षिण दिशांना आशिया खंड संपतो आणि आफ्रिका खंडाची हद्द सुरू होते. इजिप्त, लिबिया, ट्युनिशिया, अल्जीरिया आणि मोरोक्को असे सलग देश थेट अटलांटिक समुद्रापर्यंत पसरलेले आहेत. त्यांना म्हणतात ‘उत्तर आफ्रिकन देश.’ इसवी सनाच्या सहाव्या शतकापर्यंत या देशांमध्ये तिथल्या स्थानिक लोकांचं राज्य होतं. उदा. इजिप्तमध्ये न्युबियन नामक वंशाचे लोक होते, तर अल्जीरियामध्ये बर्बर वंशाचे लोक होते. सातव्या शतकात अरबस्तानात इस्लाम नामक नव्या संप्रदायाचा उदय झाला. हे लोक भलतेच महत्त्वाकांक्षी होते. पुढच्या फक्त ५०० वर्षांत त्यांनी पूर्वेकडे थेट मंगोलियापर्यंत धडक मारली, तर पश्चिमेकडे इजिप्तपासून थेट मोरोक्कोपर्यंत दौड मारत, भूमध्य समुद्र ओलांडत त्यांनी स्पेनवर आक्रमण केलं. या घालमेलीत, त्यांनी मध्य आशियातले तुर्क वंशीय, इराणमधले पारशी वंशीय यांना पूर्णपणे इस्लाममय करून सोडलं. तीच गत उत्तर आफ्रिकी देशांची झाली. पण, तुर्क किंवा इराणी मुसलमान झाले म्हणून त्यांचा वंश संपला नाही. उलट काही काळाने गुलाम तुर्कांनी मालक अरबांनाच जिंकून टाकलं. इराणची भाषा आणि संस्कृती मुळातच इतकी श्रेष्ठ होती की, तुर्कांनी तीच आपली म्हणून स्वीकारली. म्हणून तर बाबरापासून औरगंजेबापर्यंतच्या तुर्क बादशहांची अधिकृत राज्यकारभार भाषा फारसी होती, तुर्की किंवा अरबी नव्हे. जगभरच्या मुसलमानांचे आवडते नायक, रुस्तम आणि सोहराब हे इस्लामपूर्व काळातले फारसी होते, अरब किंवा तुर्क नव्हे.
 
 
उत्तर आफ्रिकेतल्या देशांबाबत मात्र असं घडलं नाही. त्यांची मूळ न्युबियन, बर्बर वगैरे संस्कृती, वंश हे नाममात्र उरले आहेत. इजिप्तचे आजचे नागरिक हे पूर्णपणे अरब वंशीय मुसलमान आहेत. त्यांना ते पिरॅमिडस् त्यातल्या राजे-राण्यांच्या मम्या, गीझाची स्फिंक्स मूर्ती वगैरेबद्दल काडीचाही आपलेपणा वाटत नाही. कारण, ही सगळी अचाट बांधकामं करणारे ते रामसीस वगैरे राजे आपले कुणीही नव्हते, हे त्यांना पुरेपूर माहीत आहे. हा, त्यांना हे सगळं आवडतं एकाच कारणासाठी, ते म्हणजे पर्यटक. इजिप्तचं हे सगळं प्राचीन वैभव पाहण्यासाठी जगभरातून पर्यटकांचे लोंढे इजिप्तमध्ये लोटत असतात. त्यामुळे इजिप्तला पर्यटन आणि संबंधित क्षेत्रांमधून मोठाच महसूल मिळत असतो.
 
 
असो. तर इराकपासून यमनपर्यंतचे आशिया खंडातले आणि इजिप्तपासून मोरोक्कोपर्यंतचे उत्तर आफ्रिकेतले असे सगळेच अरब देश सध्या दुष्काळाच्या तडाख्यात सापडले आहेत. मुळात हे सगळे देश वाळवंटीच आहेत. थेट बायबल काळापासून म्हणजे किमान इसवीसन पूर्व दीड हजार वर्षांपासून हा सगळा प्रदेश उष्ण, शुष्क, वाळवंटी, गरम वाऱ्यांचा म्हणूनच प्रसिद्ध आहे. पण, त्यातही निसर्गाने जिथे दिलंय तिथे भरभरून दिलंय. इराकचंच उदाहरण पाहा. त्याचा बराचसा भाग वाळवंटी असला, तरी तैग्रिस आणि युफ्रेटिस या दोन महान नद्या जिथून वाहतात तो दुआब अत्यंत समृद्ध आहे. इजिप्तचं उदाहरणं पाहा. स्वत: इजिप्त आणि त्याचा शेजारी सुदान हे देश वाळवंटी आहेत. पण, युगांडा देशात ‘किलिमांजारो’ नामक पर्वतावर बर्फ पडतं. तिथल्या ‘लेक व्हिक्टोरिया’ नावाच्या अवाढव्य सरोवरातून नाईल ही अतिविशाल नदी उगम पावते नि ती युगांडा, इथियोपिया, सुदान यांचे प्रदेश पार करत इजिप्तच्या वाळवंटाला उभा छेद देत अखेर भूमध्य समुद्राला मिळते. खुद्द अरबस्तानात एकही मोठी किंवा नाव घेण्याजोगीसुद्धा नदी नाही. पण, अनेक ठिकाणी प्राण्याचे प्रवाह आहेत. त्यांनाच ‘वादी’ असं म्हटलं जातं. लेबेनॉनमध्ये ‘लेबेनॉन’ याच नावाच्या पर्वतरांगा आहेत, त्यांच्यावर बर्फ पडतं. त्यातून जॉर्डन ही नदी उगम पावते. तिच्या एका काठावर सीरिया आणि जॉर्डन हे अरब देश आहेत, तर दुसऱ्या काठावर इस्रायल आहे.
 
 
हे सगळं जरा विस्ताराने सांगण्याचं कारण एवढंच की, अरब देशांमध्ये मुळातच पाण्याचं दुर्भिक्ष आहे. पण, जे काही पाणी उपलब्ध आहे, त्याचं योग्य नियोजन केलं, तर दुष्काळ नक्कीच सुसह्य होऊ शकेल. बरं, आता सगळे अरब देश तेलाच्या पैशामुळे चांगले श्रीमंत आहेत. समुद्राच्या पाण्यापासून पिण्यायोग्य पाणी बनवण्याची यंत्रणा आता विज्ञानाने अगदी स्वस्तात उपलब्ध करून दिलेली आहे आणि सुदैवाने समुद्र कितीही उपसला तरी संपणार नाहीय. मग समुद्रजलाचं पेयजल बनवण्याचे प्रकल्प वाढवा. १०० नि २०० मजल्यांची हॉटेल नंतर बांधा. पहिल्यांदा प्रत्येक गावासाठी किमान एक ‘डि-सॅलिनेशन प्लांट’ जलशुद्धीकरण प्रकल्प बांधा. माणसांना प्रथम प्यायला पाणी द्या, इतर गोष्टी नंतर करा. इस्रायल तेच करतोय. दुष्काळ पडलाय आणि जॉर्डन नदीचं पाणी पुरेसं नाही म्हणून तो कुणाच्याही नावाने बोटं मोडत बसलेला नाही. तो जॉर्डन नदीतूनही पाणी उचलतो आणि मृत समुद्र नि भूमध्य समुद्र याचं खारं पाणी शुद्ध करून घेतो.
 
 
पण, असं बिनबोभाट आणि अतिशय सुनियोजितपणे पाणी वापरून मोकळे होतील, तर ते अरब कसले! प्रत्येक बाबतीत आक्रस्ताळा आरडाओरडा, राजकारण, भ्रष्टाचार आणि नियोजनाची संपूर्ण बोंब ही खास अरबांची किंवा एकूणच इस्लामाची वैशिष्ट्यं असावीत. आता इजिप्तचंच पाहा. जगातली सर्वात लांबीची नाईल नदी तुमच्या देशातून वाहतेय. तुम्ही तिच्या पाणी वापरावर आजपर्यंत कसलेही निर्बंध घातले नव्हते.
 
 
नाईलच्या दोन्ही बाजूंच्या काठावरच्या शेतकऱ्यांना आजही पाणी फुकट आहे. कितीही मोठा पंप लावा आणि पाणी खेचा. आजवर हे चालून गेलं. पण, आता इजिप्तच्या आधीचा इथियोपिया देश, त्यांच्या भूभागात, त्यांच्या जनतेच्या भल्यासाठी, त्यांच्या प्रदेशातून वाहणाऱ्या नाईलच्या प्रवाहावर एक मोठं धरण बांधू पाहतोय म्हटल्यावर इजिप्त भडकलाय. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्दल फतह अल् सिसी यांनी इथियोपियाला जाहीर धमकी दिलीय की, “आमचं पाणी तोडलंत तर सैनिकी शक्ती वापरून तुमचा प्रकल्प उद्ध्वस्त करू.”
 
 
याहीपेक्षा गलिच्छ राजकारण ‘इसिस’ या ‘अल कायदा’ची वारसदार म्हणवणाऱ्या इस्लामी अतिरेकी संघटनेने केलंय. युक्रेटिस ही महानदी सीरियामधून इराकमध्ये प्रवेश करते. सीरिया-इराकच्या सीमेवर तिच्यावर एक धरण बांधायचं आणि इराकला पाणी-पाणी करायला लावून वठणीवर आणायचं, असा त्यांचा मोठा प्रयत्न चालू आहे. आता धरण बांधणं नि तेदेखील युक्रेटिसवर, हे विमानं पळवणं, युद्धकैद्यांची मुंडकी उडवणं, या इतकं सोपं नाही. त्यापेक्षा तुर्कस्तानने सोपा मार्ग निवडलाय. तुर्कस्तानचा दक्षिण भाग आणि सीरियाचा उत्तर भाग या प्रदेशात कुर्द नावाचे बंडखोर लोक राहतात, हे आपल्याला माहीतच आहे. मागे सद्दाम हुसैनने त्यांच्यावर विषारी गॅस सोडून त्यांची वांशिक कत्तल केली होती, हे आपल्या आठवणीत असेलच. तुर्कस्तानने यापेक्षा सोपा उपाय शोधला. कुर्दिस्तानी बंडखोरांना पिण्याचं स्वच्छ पाणी पुरवणारा जलशुद्धीकरण प्रकल्पच तुर्कांनी बंद पाडला म्हणजे आता अशुद्ध पाणी प्या आणि ‘नैसर्गिकपणे’ मरा!
 
 
इराण हा अरब वंशीय नाही आणि त्याचा पंथही शिया आहे, अरबांप्रमाणे सुन्नी नव्हे. त्यामुळेच १९८०च्या दशकात इराकच्या सद्दाम हुसैनने इराणवर आक्रमण करून आबादान शहरातील त्यांचं तेलशुद्धीकरण केंद्र ताब्यात घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. हे आबादान शहर ज्या प्रांतात आहे, त्या प्रातांचं नाव कुझेस्तान. करुना नावाची एक नदी कुझेस्तान प्रांतातून लगेच इराकमध्ये प्रवेश करते आणि युफ्रेटिस या महानदीला मिळते. इराकच्या सीमेजवळ असल्यामुळे की काय, कुझेस्तान प्रांतात गेल्या कित्येक शतकांपासून सुन्नी अरबांची खूप मोठी जनसंख्या आहे. आता इराण सरकार करुना नदीवर एक मोठं धरण बांधत आहे. त्याचा परिणाम कुझेस्तान प्रांताला मिळणारं पाणी कमी होणार. त्याबद्दल असंतोष व्यक्त करणाऱ्या अरबांना इराण सरकार सांगतंय की, “कमी पाण्यात तुमचं भागत नसेल, तर तुम्ही तुमच्या देशात निघून जा.”
 
 
इराकमध्ये जलशुद्धीकरणाचा एक मोठा प्रकल्प सरकारने जाहीर तर केला. पण, सद्दाम राजवट उलथवून अमेरिकेने इराकमध्ये आणलेली लोकशाही राजवट अजूनही स्थिर झालेली नाही. परिणामी, दुष्काळाचं संकट भेडसावत असतानाही इराक सरकारमधले मंत्री आणि नोकरशाही, प्रकल्पाचं कंत्राट कोणाला द्यायचं, यावरून भांडत बसले आहेत.
 
 
अगदी हीच स्थिती उत्तर आफ्रिकेतल्या अल्जीरिया देशाची आहे. सरकारने तब्बल ५०० लाख डॉलर्स खर्चून देशभरात जलशुद्धीकरणाचे ११ प्रकल्प उभारले. आज २० वर्षांनंतर त्यातला फक्त एक प्रकल्प कार्यरत आहे. उरलेले प्रकल्प बंद आहेत, कारण त्यांच्या देखभालीचं कंत्राट कुणाला द्यावं, यावरून मंत्री आणि नोकरशाही यांच्यात सुंदोपसुंदी चालू आहे.
 
 
या सर्व गोंधळात इस्रायलप्रमाणेच शहाणपणाचा मार्ग निवडला आहे तो कुवेत, कतार आणि संयुक्त अरब अमिरातीतल्या शारजा, दुबई, अबू धाबी इत्यादी संस्थानांनी. त्यांनी इस्रायलसारखेच समुद्रजलाचे पेयजल बनवणारे जलशुद्धीकरण प्रकल्प उभे केलेत. अर्थात, त्यामुळे दुष्काळ आणि भाजून काढणारं उन्ह टळत नाहीय. पण, पिण्याचं पाणी तरी भरपूर उपलब्ध आहे.
 
 
यंदा आपल्या देशात सर्वच बदाबदा पाऊस कोसळतोय. नद्यांना पूर येतायत. आपल्या भ्रष्ट राजकारण्यांनी आणि बिल्डर लॉबीने संगनमत करून नद्यांच्या पूरक्षेत्रात नि नाले बुजवून बांधलेल्या आपल्या घरांमध्ये पाणी शिरतंय. पण, या अरबांप्रमाणे निदान पिण्याच्या पाण्याची तरी कमतरता नाही.
 
 
नियती किती विचित्र थट्टा करते पाहा! तेलाचा पैसा अमाप आहे. पण, प्यायला पाणी नाही. कारण नियोजन नाही. शिस्त नाही. मुळात प्रत्येक तहानलेल्या नागरिकाला पाणी मिळालंच पाहिजे, ही इच्छाच नाही!
 
 
Powered By Sangraha 9.0