केरळ राज्यामध्ये ‘इसिस’शी संबंधित ३२०० छुपे गट कार्यरत आहेत. एका गटामध्ये दहा जण कार्यरत असल्याचे लक्षात घेता, अशा गटातील सदस्यांची संख्या ३२ हजार इतकी होते. एवढ्या मोठ्या संख्येने या छुप्या गटातील सदस्य अंतिम ‘जिहाद’ची तयारी करीत आहेत.
केरळमध्ये फार पूर्वीपासूनच इस्लामी दहशतवाद फोफावत चालला आहे. केरळमध्ये या दहशतवादाने आता किती खोलवर पाळेमुळे रुजविली आहेत, त्याची माहिती ‘अॅण्टिटेरर सायबर विंग’ने आपल्या वृत्तांकनाद्वारे दिली आहे. केरळमधील ‘जन्मभूमी’ दैनिकाने ही माहिती दिली आहे. या माहितीनुसार, केरळ राज्यामध्ये ‘इसिस’शी संबंधित ३२०० छुपे गट कार्यरत आहेत. एका गटामध्ये दहा जण कार्यरत असल्याचे लक्षात घेता, अशा गटातील सदस्यांची संख्या ३२ हजार इतकी होते. एवढ्या मोठ्या संख्येने या छुप्या गटातील सदस्य अंतिम ‘जिहाद’ची तयारी करीत आहेत. या वृत्तात दिलेल्या माहितीनुसार, या छुप्या गटांमध्ये ४० टक्के महिला कार्यरत आहेत. या गटातील बहुतांश सदस्य धर्मांतरित आहेत. या छुप्या गटातील सदस्यांना, समाजमाध्यमांवर कशाप्रकारे चर्चा करावी, ‘जिहाद’च्या विचाराचा प्रसार कसा करावा, याचे प्रशिक्षण देण्यात येत असते. तसेच दहशतवादी कारवायांकडे बाकीच्यांना कसे आकृष्ट करता येईल, याबाबतचे प्रशिक्षणही दिले जाते. त्याशिवाय शस्त्रास्त्रे चालविण्याचे, बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षणही या गटातील सदस्यांना देण्यात येते. या छुप्या गटाने समाजातील महत्त्वाच्या क्षेत्रांत आपले हातपाय पसरले आहेत. चित्रपट, करमणूक या क्षेत्रांसह अन्य क्षेत्रांमध्येही हे गट कार्यरत आहेत. आपल्या गटात इतरांना सहभागी करून घेण्यासाठी विविध प्रकारची प्रलोभने दाखवून आपले संख्याबळ वाढविण्याचा प्रयत्न या गटांकडून सुरू असतो.
केरळमधील छुप्या गटांकडून अंतिम ‘जिहाद’ची तयारी केली जात असतानाच, केरळमधील एका ख्रिस्ती धर्मगुरूने ‘नार्को जिहाद’ नावाचा ‘जिहाद’चा नवा प्रकार समाजापुढे आणला आहे. आतापर्यंत ‘लव्ह जिहाद’ची चर्चा आणि त्यास प्रतिबंध करण्यासाठी काही राज्यांनी उचललेली पावले याची आपणास माहिती होती. आता या ‘नार्को जिहाद’ची चर्चा होत आहे. केरळमधील एक बिशप जोसेफ कल्लारगंट यांनी या ‘नार्को जिहाद’च्या संकटाकडे समाजाचे लक्ष वेधले आहे. ‘केरळ बिशप काऊंसिल’नेही दहशतवाद आणि अमली पदार्थांची उलाढाल यांचा निकटचा संबंध असल्याकडे लक्ष वेधले आहे. बिशप जोसेफ कल्लारगंट यांनी केवळ सावधगिरीचा इशारा दिला नसून ‘लव्ह जिहाद’ आणि अमली पदार्थ यांच्या सेवनाने समाजातील तरुण कसे बळी पडतात, याकडे लक्ष वेधले आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते टॉम वडक्कन यांनी एका पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे. मात्र, केरळ सरकारला या विषयाचे गांभीर्य अजून लक्षात येत नाही, असे दिसते. बिशप जोसेफ कल्लारगंट यांनी केलेल्या वक्तव्यानंतर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी, वरिष्ठ पदावर कार्य करणाऱ्या व्यक्तीने जबाबदारीने बोलावे, समाजासमाजात दुही निर्माण होईल अशी वक्तव्ये करू नयेत, असे म्हटले आहे. मुख्यमंत्री विजयन यांना या ‘लव्ह जिहाद’ आणि ‘नार्को जिहाद’चे गांभीर्य अजून लक्षात कसे येत नाही? का ते मुद्दाम त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत? बिशप जोसेफ कल्लारगंट या प्रकारांसंदर्भात चिंता व्यक्त करताना म्हणतात की, “भारतासारख्या लोकशाही देशांमध्ये ‘जिहादीं’ना त्यांचे नेहमीचे मार्ग हाताळून आपली उद्दिष्टे साध्य करता येत नाहीत. त्यामुळे आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी त्यांच्याकडून अशा (लव्ह जिहाद/नार्को जिहाद) मार्गांचा अवलंब करण्यात येतो. केरळमधील ‘जिहादी’ कारवायांबद्दल ख्रिस्ती समाजाकडूनही तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली आहे. पण, असे असूनही केरळमधील डाव्या आघाडीचे सरकार मात्र डोळ्यांवर पांघरूण ओढून झोपण्याचे सोंग करीत आहे.
श्रीनगरमध्ये गणेश मंदिरात पुन्हा पूजाअर्चा
जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर शहरात गेली कित्येक वर्षे श्रीगणेशाचा जयजयकार कानावर पडला नव्हता. पण, यंदाच्या गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीनगर शहरातील पुरातन गणपती मंदिरात गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीचा जयजयकार ऐकण्यास मिळाला. यंदाच्या गणेश चतुर्थीच्या दिवशी या मंदिरात हिंदू मोठ्या संख्येने पूजाअर्चा करण्यास आले होते. काश्मीर खोऱ्यात दहशतवाद आणि फुटीरतावाद नांदत होता, त्यामुळे तेथे राहणारा हिंदू समाज मंदिरांमध्ये जाण्यास घाबरत होता. अशा सर्व मंदिरांमध्ये भाविक आता मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी करत आहेत. येथे ज्या गणेश मंदिराचा उल्लेख करण्यात आला आहे, त्या गणेश मंदिरामध्ये गेली ३१ वर्षे कसलीही पूजाअर्चा होत नव्हती. पण, आताच्या ‘नवीन काश्मीर’मुळे येथील मंदिरे भक्तांसाठी मुक्त झाली आहेत. काश्मीर खोऱ्यातील मंदिरे भाविकांसाठी खुली झाल्याने त्याबद्दल हिंदू समाज आनंद व्यक्त करीत आहे. एक काळ असा होता की, हिंदू समाज अतिरेक्यांच्या भीतीने मंदिरांमध्ये जाण्यास घाबरत होता. पण, आता हिंदू समाज न घाबरता मंदिरांमध्ये दर्शनासाठी जाऊ लागला आहे, असे एका श्रद्धाळू भाविकाने सांगितले. श्रीनगरच नव्हे, तर काश्मीर खोऱ्यातील अन्य काही भागांतही भाविकांनी गणेशाची पूजाअर्चा केली. जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश निर्माण केल्यानंतर काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती सुधारत असल्याचेच द्योतक म्हणजे हिंदू समाजाकडून साजरे होणारे सण-उत्सव. ‘कलम ३७०’ आणि ‘३५ अ’ रद्द झाल्यानंतर काश्मीर खोऱ्यातील परिस्थितीत लक्षणीय बदल झाला आहे. श्रीनगरमधील गणेश मंदिरात गणेश चतुर्थीच्या दिवशी झालेली पूजाअर्चा हे त्याचेच द्योतक आहे.
ममता सरकारबाबत ‘एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया’ चिडिचूप!
‘एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया’ ही संस्था माध्यमांवर कोणी अन्याय करीत असल्यास त्याची तातडीने दखल घेऊन, ज्यांनी अन्याय केला त्यांना खडसावून जाब विचारत असल्याचा आतापर्यंत समज होता. पण ‘एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया’ तसे वागत नसल्याचे आणि पक्षपाती भूमिका घेत असल्याचे अलीकडेच एका घटनेवरून आढळून आले आहे. प. बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या सरकारकडून ‘ऑप इंडिया’ हे न्यूज पोर्टल आणि त्या न्यूज पोर्टलच्या संपादक नुपूर जे. शर्मा यांना जो त्रास दिला जात आहे, त्याबद्दल ‘एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया’ने निषेधाचा चकार शब्द काढलेला नाही. या न्यूज पोर्टलविरुद्ध प. बंगाल सरकारने चार ‘एफआयआर’ दाखल केले असतानाही ‘एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया’ला निषेध करावासा वाटला नाही. प. बंगाल सरकारकडून दिला जात असलेला त्रास लक्षात घेऊन ‘ऑप इंडिया’ न्यूज पोर्टलच्या संपादक नुपूर जे. शर्मा यांनी कोलकाता शहरास रामराम ठोकून आपला मुक्काम नवी दिल्लीला हलविण्याचा निर्णय घेतला आहे. एवढे घडूनही ‘एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया’ला त्या महिला संपादकाची बाजू घेऊन लढावेसे वाटले नाही. ‘एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया’ ही संस्था सातत्याने केंद्रातील मोदी सरकारविरुद्ध भूमिका घेत आले आहे. मध्यंतरी प्राप्तिकर खात्याने ‘न्यूजक्लीक’ आणि ‘न्यूजलाउंड्री’ या संस्थांच्या कार्यालयांना भेट दिली असता, ‘एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया’ला एकदम त्यांचा पुळका आला आणि त्या संस्थेने केंद्र सरकारला लक्ष्य करणारे निवेदन प्रसुत केले. याचाच अर्थ ही संस्था नि:पक्ष भूमिका घेऊन वागत नसल्याचेच दिसून येते. मोदी सरकारने एखादी कृती केली की, त्या कृतीचा निषेध करायचा, पण एखाद्या ‘न्यूज पोर्टल’च्या संपादकांना प. बंगाल सरकार त्रास देत असेल, तर त्याबद्दल चकार शब्द काढायचा नाही, याला काय म्हणायचे? असे वागणारी ही संस्था कसली आली आहे वृत्तपत्र स्वातंत्र्याची कैवारी?