जागतिक मदतीच्या प्रतीक्षेत अफगाणिस्तानातील पंजशीर

11 Sep 2021 23:49:38
Afganistan ` _1 &nbs




आता अमरुल्लाह सालेह कोणती भूमिका घेणार? ते तालिबानसमोर पुन्हा आव्हान उभे करू शकतील का? असे प्रश्न उभे राहत आहेत. लष्करी नेता अहमद मसूद आणि राजकीय नेता अमरुल्लाह सालेह हे ताजिकिस्तानमध्ये सुरक्षित आहेत. त्यांच्यामध्ये हा लढा पुढे चालवण्याची क्षमता आहे. परंतु, त्याकरिता त्यांना सेंट्रल रिपब्लिकच्या देशांचा पाठिंबा आणि मदत मिळणे गरजेचे आहे. याशिवाय एक महाशक्ती म्हणजे अमेरिका किंवा रशिया यांच्याकडून मदत अपेक्षित आहे. मात्र, ही मदत सध्या मिळताना दिसत नाही. त्यामुळे सध्या चाललेला धडा किती दिवस चालेल, यावर प्रश्नचिन्ह आहे.
 
 
 
सर्वसमावेशक सरकार स्थापनेमध्ये अडचणी
 
तालिबानने नुकतीच काळजीवाहू मंत्रिमंडळाची घोषणा केली. यात प्रामुख्याने अमेरिका आणि अफगाण सरकारविरुद्धच्या २० वर्षांच्या संघर्षाचे नेतृत्व करणार्‍या ज्येष्ठ नेत्यांना सर्वोच्च पदे देण्यात आली आहेत. जागतिक दहशतवादी असलेल्या मुल्ला हसन अखुंदझादा याची अफगाणिस्तानचा पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली आहे, तर अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांसाठी असलेला ‘मोस्ट वॉण्टेड’ दहशतवादी सिराज हक्कानी गृहमंत्री असणार आहे. अमेरिकेने त्याच्यावर ३६ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. ‘हक्कानी नेटवर्क’ दहशतवादी गट असून, आत्मघाती हल्ल्यांमध्ये या गटाचा समावेश होता. तालिबान सरकारच्या प्रमुख पदांवर दहशतवादी, दहशतवादाचे आरोप असणार्‍यांची वर्णी लागली आहे. जगात पहिल्यांदाच दोनहून अधिक जागतिक दहशतवादी एखाद्या सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे या दहशतवाद्यांवर निर्बंध घातलेले देश तालिबानला मान्यता कशी देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
 
पाकिस्तानकडून ‘हक्कानी नेटवर्क’ला झुकते माप
 
सरकार स्थापनेच्या मुद्द्यावरून तालिबानमध्ये अंतर्गत संघर्ष पेटला आहे. तालिबान आणि ‘हक्कानी नेटवर्क’च्या नेत्यांमध्ये गोळीबार झाला. संघर्षादरम्यान ‘हक्कानी गटा’कडून झालेल्या गोळीबारात मुल्ला बरादर जखमी झाल्याचे वृत्त आहे. तालिबान सरकार स्थापन करण्यासाठी असलेले मतभेद दूर करण्यासाठी पाकिस्तान ‘आयएसआय’ प्रमुखांनी अफगाणिस्तानचा दौरा केला आहे. पाकिस्तानची ‘आयएसआय’ ही गुप्तचर संघटना. ‘आयएसआय’च्या मदतीमुळेच तालिबान अफगाणिस्तानात अल्पावधीत परतू शकली, असे पाश्चात्त्य माध्यमांनी म्हटले आहे.
 
 
पाकिस्तान, कतार, तुर्की, चीन, रशिया, इराणला आमंत्रण
 
तालिबानने सरकार स्थापनेच्या सोहळ्यासाठी पाकिस्तान, कतार, तुर्की, चीन, रशिया, इराण या देशांना आमंत्रण दिले आहे. यामागचं कारण नेमके काय काय? पाकिस्तान आणि चीन हे तालिबानला कशी मदत करतात, हे जगजाहीर आहे. तालिबानला वाटते की, आर्थिक मदत मिळण्याकरिता चीन आणि रशिया यांची मोठी मदत होऊ शकते. जर रशिया तालिबानच्या बाजूने आला, तर तो ‘नॉर्दन अलायन्स’ला मदत करणार नाही आणि त्यांचा लवकर पराभव होईल.तुर्कस्तानकडून लष्करी मदतीची अपेक्षा आहे. इराणकडून सर्वात महत्त्वाचे म्हणजे तेल आणि इंधन सुरक्षा प्रदान केली जाऊ शकते.
 
 
 
पंजशीरच्या संघर्षात पाकिस्तानकडून तालिबान्यांना मदत पुरवण्यात आली. लढाईचे पूर्ण नियोजन पाकिस्तानी सैन्याने केले, ज्यामध्ये सैन्याचा कमांड कंट्रोल, लढाईचे प्लॅनिंग, चीनच्या मदतीने इंटेलिजन्स गोळा करणे, दारुगोळ्याची मदत, पाकिस्तानमधून आणलेले काही कडवे दहशतवादी आणि सर्वात महत्त्वाचे की, तालिबानच्या लढणार्‍यांचे नेतृत्व पाकिस्तानी सैन्याच्या स्पेशल फॉर्सेसचे अधिकारी आणि जवानांनी केले. पाकिस्तानी गुप्तचर संस्था ‘आयएसआय’ने तालिबानला पंजशीरवर हल्ल्यासाठी समन्वय केला आहे.
 

तालिबानविरोधातील संघर्ष सुरूच राहीलः नॉदर्न अलायन्स
 
 
पंजशीर प्रांतावर निर्णायक ताबा मिळवल्याचा दावा तालिबानने केला असला तरी दुसरीकडे, तालिबानविरोधातील संघर्ष सुरूच राहील, असे ‘नॉदर्न अलायन्स’ने (उत्तर आघाडी) म्हटले आहे. अमरुल्ला सालेह , अहमद मसूद ताजिकिस्तानमध्ये असल्याचे वृत्त आहे. ‘रेझिस्टन्स फोर्स’चे प्रवक्ते आणि अहमद मसूद यांचे निकटवर्तीय समजले जाणारे फहीम दश्ती हे ठार झाले आहेत. या मोहिमेचे नेतृत्व ‘नॉर्दन अलायन्स’चे प्रवक्ते फहीम दश्ती यांनी केले होते, जे नंतर मारले गेले. अफगाणिस्तानातील पंजशीर असा एकमेव प्रांत आहे, जिथं अजूनही तालिबान्यांना कब्जा मिळवता आलेला नाही.
 
अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केलेल्या देशातील ३४ प्रांतांपैकी पंजशीर प्रांताने तालिबान्यांना आव्हान दिले होते. पंजशीरमधील ‘नॉर्दन अलायन्स’ने प्रतिहल्ला करत तालिबान्यांचे मोठे नुकसान केले होते. यावेळी झालेल्या चकमकीत सुमारे ६००हून अधिक तालिबानी ठार झाले होते, तर एक हजारांहून अधिक जणांनी शरणागती पत्करली होती. तालिबान्यांचा पंजशीर विरुद्धचा संघर्ष खूप जुना आहे.
 
पंजशीर ताब्यात घेण्याचा तालिबानचा प्रयत्न
 
 
१५ ऑगस्टला काबूलवर कब्जा करून अफगाणिस्तानवर सत्ता गाजवू पाहणार्‍या तालिबानला पंजशीर खोर्‍यातून ‘नॅशनल रेझिस्टन्स फोर्सेस’च्या लढवय्यांनी दिलेले जबरदस्त आव्हान मोडून काढण्यासाठी तालिबानने सध्या आकाशपाताळ एक केले आहे. काबूलच्या उत्तरेस असलेले पंजशीरचे दुर्गम खोरे ताब्यात मिळवण्यावर घनघोर लढाई सुरू आहे. सरकार स्थापन करायच्याही आधी पंजशीर ताब्यात आणायचा तालिबानचा प्रयत्न आहे. अफगाणचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी तालिबानला ललकारले आणि पंजशीरमध्ये आश्रय घेतला, तेव्हापासून पंजशीर खोरे हे प्रकाशझोतात आहे. अहमद मसूदच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानातील काही तालिबानविरोधी शक्ती तेथे एकवटल्या आहेत व लढत आहेत.
 
 
अफगाणिस्तानमधील सोव्हिएत आक्रमणाच्या काळात अहमदशहा मसूद यांनी पंजशीरमध्ये त्यांना पाऊलही ठेवू दिले नव्हते. तालिबान्यांनी जेव्हा सोव्हिएतांच्या गमनानंतर आपले क्रूर, शासन लागू केले, तेव्हाही पंजशीर विरोधात होता. ११ सप्टेंबरच्या जागतिक व्यापार केंद्रावरील हल्ल्याच्या दोनच दिवस आधी अहमदशहा मसूद यांची टीव्ही कॅमेर्‍यात ठेवलेल्या शक्तिशाली बॉम्बच्या स्फोटाद्वारे ‘अल कायदा’च्या दहशतवाद्यांनी हत्या केली. परंतु, आज मसूद यांचेच सुपुत्र अहमद मसूद आपल्या पित्याच्या पावलावर पाऊल टाकत तालिबानसमोर बंडाचे निशाण घेऊन ठामपणे उभे आहेत.
 
 
पंजशीरला मदत गरजेची!
 
 
तालिबानने पंजशीर खोर्‍याची कोंडी केलेली आहे. तुंबळ लढाईमध्ये ६००हून अधिक तालिबान्यांना यमसदनी पाठविल्याचे वृत्त रशियाच्या वृत्तसंस्थेने दिलेले आहे. त्यामुळे पंजशीरमधील प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे आणि कोण विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे, हे सध्या तरी समजणे कठीण आहे. परंतु, ज्या निर्धाराने आणि प्रखरपणे अहमद मसूद आणि त्याच्या लढवय्यांनी तालिबान्यांच्या विरोधात संघर्ष पुकारला आहे, तो महत्त्वपूर्ण आहे.
 
 
पंजशीर सर करण्यासाठी तालिबानने ‘अल कायदा’चीही मदत घेतली आणि पाकिस्तानी सैन्यही तालिबानच्या मदतीला धावून आले. पाकिस्तानी सैनिकांची ओळखपत्रेही ‘रेझिस्टन्स फोर्सेस’च्या हाती लागली आहेत. रावळपिंडीच्या पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयातून पंजशीरमधील लढाईवर नजर ठेवली जात आहे आणि पाकिस्तानी लष्कराने आपले ‘ड्रोन’ आणि इतर युद्धसामग्री तालिबानच्या मदतीस तेथे तैनात केली आहे. तालिबानशी असलेले पाकिस्तानचे साटेलोटे तर जगजाहीर आहेच. पण, ‘आयएस खोरासान’ आणि ‘अल कायदा’च्या निःपातासाठी पाकिस्तानने पुढाकार घ्यावा, यासाठी अमेरिका पाकिस्तानवर दबाव आणत असल्याची बातमी आहे. पंजशीर सर करण्यासाठी तालिबान ‘अल कायदा’पासून पाकिस्तानपर्यंत सर्वांची मदत घेताना दिसते आहे. मात्र, अहमद मसूद यांना फारशी मदत मिळाली नाही.
 
 
पंजशीरचा पराभव का होत आहे?
 
विविध गट एकत्र नसल्यामुळे हे असे घडले का? खरे म्हटले तर ‘नॉर्दन अलायन्स’ अजून पूर्णपणे तयार झालेले नाही. उझबेकी आणि तुर्कमेनिस्तानी यांचा या लढाईमध्ये फारसा वाटा दिसत नाही. याशिवाय पाकिस्तानी सैन्याने लढाईमध्ये हेलिकॉप्टर, ‘फायटर एअर क्राफ्ट’, स्मार्ट शस्त्रांचा वापर करून तालिबानला मदत केली. जिथे जिथे गुप्तहेर माहिती मिळाली होती, तिथे तिथे ‘नॉर्दन अलायन्स’च्या सैन्याचा पराभव झाला. सालेह यांच्या घरावर हल्ला करण्यात आला आणि अनेक नेत्यांना ठार मारण्यात आले. चीनकडे असलेल्या ‘सॅटेलाईट टेक्नोलॉजी’चा वापर करून मसूदचे सैन्य कुठे आहे, याची नेमकी माहिती तालिबानला दिली गेली. ‘ड्रोन’चा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला. आर्मेनिया आणि अझरबैजानच्या लढाईमध्ये तुर्कस्तानच्या ‘ड्रोन्स’ विजयामध्ये फारच मोठा वाटा होता. तशाच प्रकारे ‘तुर्कस्तान ड्रोन्स’चासुद्धा वापर इथे करण्यात आला.
 
 
 
आता अमरुल्लाह सालेह कोणती भूमिका घेणार? ते तालिबानसमोर पुन्हा आव्हान उभे करू शकतील का? असे प्रश्न उभे राहत आहेत. लष्करी नेता अहमद मसूद आणि राजकीय नेता अमरुल्लाह सालेह हे ताजिकिस्तानमध्ये सुरक्षित आहेत. त्यांच्यामध्ये हा लढा पुढे चालवण्याची क्षमता आहे. परंतु, त्याकरिता त्यांना सेंट्रल रिपब्लिकच्या देशांचा पाठिंबा आणि मदत मिळणे गरजेचे आहे. याशिवाय एक महाशक्ती म्हणजे अमेरिका किंवा रशिया यांच्याकडून मदत अपेक्षित आहे. मात्र, ही मदत सध्या मिळताना दिसत नाही. त्यामुळे सध्या चाललेला धडा किती दिवस चालेल, यावर प्रश्नचिन्ह आहे. पंजशीर अजेय राहिले तर हा काटा आपल्या वाटेत सलत राहील, याची तालिबानला कल्पना आहे. या घडीला उर्वरित जग पंजशीरच्या लढ्याकडे त्रयस्थपणे नुसते बघत बसणार आहे का? हाच खरा प्रश्न आहे. पंजशीरला आज मदतीची जरुरी आहे.
 
Powered By Sangraha 9.0