अमेरिका का अयशस्वी झाली?

01 Sep 2021 21:04:56
 pho_1  H x W: 0
 
 

प्रारंभीपासूनच अमेरिकेची मनःस्थिती गोंधळाची राहिली. आपल्याला काय साध्य करायचे आहे आणि ते अमेरिकेच्या राजकीय संरचनेच्या माध्यमातून कसे करायचे, याचे चित्र स्पष्ट नव्हते. लष्करी उद्दिष्टे ही जुनाट आणि प्रत्यक्षात साध्य न होणारी होती आणि राजकीय उद्दिष्टे दुबळी आणि फसवी होती. यांची एकमेकांशी सांगड घालण्यात अपयश आल्यामुळे एकमार्गी योजना करता आलेली नाही.
 
 
अफगणिस्तानातून अमेरिकेची माघार आणि जलदगतीने तालिबानींचा अफगाणिस्तानावर कब्जा, याविषयाची चर्चा सध्या भरपूर चालू आहे. अफगाणिस्तान तालिबान्यांच्या हातात, आता पुढे काय, या प्रश्नाचीदेखील तेवढ्याच गंभीरपणे चर्चा रंगली आहे. जागतिक शांततेवर तालिबानी राजवटीचे कोणते परिणाम होतील आणि जिहादी दहशतवाद्यांचे जगात विशेषकरून युरोपियन देशात आणि अमेरिकेत कुठे कुठे हल्ले होतील, हा विषयदेखील कायम चर्चेत असतो. अफगाणिस्तानातून अमेरिकेने माघार घेऊन आपल्या मित्रांना फसविले आहे, जागतिक शांततेचा विचार केलेला नाही, असेही आरोप अमेरिकेवर करण्यात येतात.
यापैकी सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, अमेरिका अफगाणिस्तानात अयशस्वी का झाली? ‘९/११’च्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेने दहशतवादाविरुद्ध युद्ध घोषित केले. तेव्हा अध्यक्ष होते जॉर्ज बुश. अमेरिकन हल्ल्यानंतर तालिबानी राजवट कोसळली. तालिबानी पळाले. त्यांना पाकिस्तानात आश्रय मिळाला. अमेरिकेने अफगाणिस्तानच्या पुनर्बांधणीचे काम सुरू केले, ते २० वर्षे चालले. या पुनर्बांधणीच्या काळात अमेरिकेने अफगाणिस्तानात दोन ट्रिलियन डॉलर खर्च केले. त्यातील ७३ कोटी डॉलर अफगाणिस्तानचे सैन्य उभारण्यात खर्च केले. अमेरिकेच्या मनुष्यहानीचे आकडे असे आहेत - २४४७ सैनिक ठार झाले. चार हजार नागरिक, कंत्राटदार ठार झाले आणि ६६ हजार अफगाणी ठार झाले. एवढी प्रचंड किंमत मोजूनही अमेरिकेला यश मात्र मिळाले नाही.
 
 
२० वर्षांत अमेरिकेने अफगाणिस्तानात लोकशाही राजवट आणण्याचा प्रयत्न केला. निवडणुका घेऊन अहमद करझाई यांना अध्यक्षपदावर बसविले. त्यानंतर अशरफ घनी हे अध्यक्ष झाले. शाळा सुरू झाल्या. शाळेत मुले येऊ लागली. बालमृत्यूचे प्रमाण कमी झाले. स्त्रियांना स्वातंत्र्य मिळू लागले. त्या शिक्षण घेऊ लागल्या आणि नोकरी-व्यवसाय करू लागल्या. अमेरिकेने अफगाणिस्तानला ‘आधुनिक राज्य’ (स्टेट) निर्माण करण्याचा प्रयत्न केला. भूभागाचे राज्य होण्यासाठी १) स्थिर सरकार हवे. २) संरक्षण व्यवस्था हवी. ३) कायदेमंडळ हवे. ४) न्यायपालिका हवी. ५) शांतता, सुरक्षा प्रस्थापित होण्यासाठी पोलीसदल हवे. ६) राज्य चालविण्यासाठी मंत्रिमंडळ हवे. ७) या सर्वांना जनतेचा पाठिंबा हवा. अमेरिकेने पैसा ओतून आणि शस्त्रे उगारून हे साध्य करण्याचा प्रयत्न केला खरा, पण तो पूर्णपणे फसला.हा प्रयोग का फसला, याबद्दल हेन्री किसिंजर (वय वर्षे ९४, अमेरिकेचे अनेक वर्षे परराष्ट्रमंत्री, परराष्ट्र व्यवहारातील जागतिक स्तरावरचे तज्ज्ञ, परराष्ट्र नीतीसंबंधी त्यांची अनेक पुस्तके आहेत.) जे म्हणाले, त्याचा सारांश असा - “प्रारंभीपासूनच अमेरिकेची मनःस्थिती गोंधळाची राहिली.
 
 
आपल्याला काय साध्य करायचे आहे आणि ते अमेरिकेच्या राजकीय संरचनेच्या माध्यमातून कसे करायचे, याचे चित्र स्पष्ट नव्हते. लष्करी उद्दिष्टे ही जुनाट आणि प्रत्यक्षात साध्य न होणारी होती आणि राजकीय उद्दिष्टे दुबळी आणि फसवी होती. यांची एकमेकांशी सांगड घालण्यात अपयश आल्यामुळे एकमार्गी योजना करता आलेली नाही. तालिबान्यांना पराभूत करण्यात यश आल्यानंतर अफगाणिस्तानात आधुनिक लोकशाही संस्था उभ्या करण्याचा आणि अफगाणिस्तानला ‘आधुनिक राज्य’ बनविण्याचा प्रयत्न झाला, त्यात यश आलेले नाही. अफगाणिस्तानला या राजवटीची सवय नाही, ते वरून लादण्याचा प्रयत्न झाला आणि तो अयशस्वी झाला.”हेन्री किसिंजर यांचा हा घरचा आहेर आहे. सर्व राज्यकर्ते सामन्यतः एका मनःस्थितीत असतात. त्यांना दुसर्‍या कुणी केलेला उपदेश आवडत नाही. जगातील सर्वकाही आपल्यालाच समजते, अशा मनःस्थितीत ते असतात. स्वपक्षातील उपदेश करणारा जर कुणी असेल, तर त्याला घरी बसविले जाते. म्हणून अमेरिकेतील आजचे राज्यकर्ते हेन्री किसिंजर यांचे म्हणणे किती गंभीरपणे घेतील, हा प्रश्न आहे. एकूणच अमेरिकेचा विचार करता, अमेरिकेतील राजकीय समुदायाने काही प्रश्नांचा फार गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. तो जर त्यांनी केला नाही, तर त्याचे फार भयंकर परिणाम त्यांना भोगावे लागतीलच; पण जगालादेखील भोगावे लागतील.
 
 
अमेरिका समृद्ध आहे, अमेरिका अत्यंत शक्तिमान आहे, अमेरिका ज्ञानसमृद्ध आहे, या सर्व गोष्टी खर्‍या; पण या सर्वांचा माज चढतो. तो अमेरिकेचा स्वभाव झालेला आहे. इंग्रजीमध्ये ‘ढहश थहळींश The White Man's Burden"‘ असा वाक्प्रचार आहे. त्याचा अर्थ होतो, जगाला सुधारायची जबाबदारी गोर्‍या माणसाच्या खांद्यावर येऊन पडलेली आहे. अमेरिका तिचे नेतृत्व करते. अमेरिकेच्या राष्ट्र्रीय जीवनाची तीन मूल्ये आहेत. जीवन जगण्याचा अधिकार, स्वातंत्र्य आणि स्वसुखाचा शोध. ही तीन मूल्ये अमेरिकन लोकशाहीचा आधार आहेत. अमेरिका जगावर त्यांची ही मूल्ये लादण्याचा प्रयत्न करते.



ज्याप्रमाणे एकच औषध एकसारखा विकार झाला असता, सर्वांना लागू पडत नाही, तसे समाजजीवनाचे आहे. जे एका समाजाला सुखकारक असेल, ते दुसर्‍या समाजाला सुखकारक होण्याची शक्यता नाही. प्रत्येकाची संस्कृती वेगळी, जगण्याची पद्धती वेगळी, जीवनमूल्ये वेगळी असतात.अफगाणिस्तानमध्ये यापूर्वी कधीही अमेरिकन पद्धतीची लोकशाही नव्हती. लोकांच्या सहमतीने आणि संमतीने राज्यकर्ते निवडले जात. टोळ्यांत जगणारा अफगाणिस्तान, टोळीप्रमुखाची सभा बोलवितो, त्याला ‘लोया जिग्र’ म्हणतात. ते एकत्र बसून राज्याविषयीचे काही निर्णय करतात. त्यांना पार्लमेंट, त्यातील चर्चा यांची सवय नाही.
 
 

आपल्या पद्धतीने आपला देश चालवितात, अमेरिकेने ज्या ज्या देशात हस्तक्षेप केला, त्या त्या देशात अमेरिका अब्जावधी डॉलर खर्च करूनही पूर्णपणे अयशस्वी झालेली आहे. थोडा इतिहास बघूया. अमेरिकेने व्हिएतनामवर हल्ला केला. अमेरिकेपासून व्हिएतनाम हजारो मैल दूर आहे. तो अत्यंत गरीब देश होता. अमेरिकेच्या सुरक्षेला त्याच्यापासून काहीही धोका नव्हता. उद्या ससाण्याला असे वाटले की, चिमण्यांची संख्या वाढत आहे. त्या माझ्या जीवाला धोका ठरतील, तर ही गोष्ट हास्यास्पद ठरेल. तसे अमेरिकेचे आहे. पावसासारखे व्हिएतनामवर त्यांनी बॉम्ब टाकले. ३५ हजार अमेरिकन सैनिक गमावले आणि शेवटी हेन्री किसिंजर यांच्या शिष्टाईमुळे व्हिएतनाममधून माघारही घ्यावी लागली.अमेरिकेने इराणमध्येही असाच हस्तक्षेप केला. लोकशाही मार्गाने मोझाडेक पंतप्रधान झाले होते. त्यांनी तेलशुद्धीकरण कारखान्यांचे राष्ट्रीयीकरण करून टाकले. अमेरिका आणि ब्रिटनला त्यामुळे फटका बसला. ‘सीआयए’ने इराणमध्ये कारवाया करून मोझाडेक यांचे सरकार पाडले, त्यांना ठार केले आणि रेझा शहा पेहलवी या राजाला गादीवर बसविले. त्याने इराणची धुळधाण केली. त्यातून जन्म झाला, आयातुल्ला खोमेनीचा आणि इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली.
 
 
अमेरिकेने इराकवर हल्ला केला. सद्दामचे सरकार पाडले. त्याला पकडला आणि फासावर लटकविला. इराकमध्ये यादवी माजली, त्यातून ‘इसिस’चा जन्म झाला आणि ‘इसिस’चे युद्ध इराक आणि सीरियात सुरू झाले. सीरियातून ४० लाख नागरिक निर्वासित बनून युरोपात आले. एका ठिकाणी लोकशाही आणण्याचा प्रयत्न, एका ठिकाणी लोकशाही सरकार पाडण्याचा प्रयत्न आणि दुसर्‍या ठिकाणी लष्करी सत्ता उलथून पाडण्याचा प्रयत्न, असे अमेरिकेचे धंदे आंतरराष्ट्रीय स्तरावर चालू असतात. त्याचा निष्कर्ष असा की, जिथे जिथे अमेरिका हस्तक्षेप करेल, तिथे तिथेे विनाश होईल, अशांतता निर्माण होईल आणि नवीन भस्मासुर उदयाला येईल.अमेरिकेचे अफगाणिस्तानातील युद्ध, खर्‍या शत्रूंविरुद्ध झालेच नाही. अमेरिकेचे राजनीतितज्ज्ञ आणि लष्करप्रमुख स्वतःला फार हुशार समजतात, ते आहेतही. पण, या हुशार लोकांना हे लक्षात आले नाही की, अफगाण युद्धात पाकिस्तान ‘डबल गेम’ खेळत आहे. तो अमेरिकेचा मित्रदेखील झाला आहे.
 
 
पण, त्याचवेळी तो तालिबान्यांचा संरक्षकही झाला आहे. ज्या तालिबानींना आणि ‘अल कायदा’ येथील लोकांना नष्ट करण्यासाठी अमेरिका युद्धात उतरली, त्या दोघांचे संरक्षण ‘अ‍ॅकल सॅम’च्या टोपीखालून पाकिस्तानने केले. हा ‘डबल गेम’ बुशला लक्षात आला नाही आणि ओबामाला जेव्हा लक्षात आला, तेव्हा काबूल नदीतून खूप पाणी वाहून गेले होते.सर्व तालिबानी सेनापती त्यांची शस्त्रे आणि सैनिक यांना पाकिस्तानने सुरक्षितपणे पाकिस्तानात आणले. अफगाणिस्तानचा शासक मुल्ला ओमर आणि ओसामा बिन लादेन याला पाकिस्तानात लपवून ठेवले. लपून राहिलेल्या जागेतून त्यांनी अफगाणिस्तानात तालिबानी हल्ले चालू ठेवले. अमेरिकन सैनिक त्यात मरू लागले. तालिबानींची लढाई ही गनिमी काव्याची लढाई आहे. गनिमी काव्याची लढाई यशस्वी होण्यासाठी दोन मुख्य गोष्टी लागतात. पहिली गोष्ट स्थानिक जनतेचा पाठिंबा आणि दुसरी गोष्ट प्रतिहल्ला झाल्यास पळून-लपून राहण्यासाठी सुरक्षित स्थान. गनिमी युद्धाचे हे सर्वसामान्य सिद्धान्त आहेत. त्यात नवीन काही नाही.
 
 
अमेरिकेने हे सिद्धान्तही लक्षात घेतले नाहीत, याचे खूप आश्चर्य वाटते. शस्त्रबळाची आणि धनबळाची मस्ती दोन्ही डोळ्यांना आंधळेपण कसे आणते, याचे हे उदाहरण आहे.तालिबानींना संपवायचे अमेरिकेने ठरविले. पण, ते संपले नाहीत. त्यांची निर्मिती पाकिस्तानातून होत राहिली. त्यांची निर्मिती करणार्‍या पाकिस्तानी तळांवर अमेेरिकेने हल्ले करणे आवश्यक होते. त्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणे आवश्यक होते. अमेरिकेने हे केले नाही, उलट पाकिस्तानला आर्थिक मदत अमेरिका करीत राहिली. शस्त्रास्त्रांची मदत करीत राहिली. आपल्या शत्रूंना आश्रयस्थान देणारा आपला शत्रूच असतो, हा राजनीतीचा आणखी एक सामान्य सिद्धान्त, त्याकडे अमेरिकेने लक्ष दिले नाही. आजही त्यांना अफगाणिस्तानात शांतता निर्माण करायची असेल आणि तिथल्या लोकांना सुखाने जगू द्यायचे असेल तर तालिबानींचा पाकिस्तानी मार्ग अमेरिकेने बंद केला पाहिजे. तो केला नाही तर पाकिस्तान हे संकट अमेरिकेच्या दाराशी येऊन उभे राहील.
 
 
पाकिस्तानची निर्मिती ब्रिटन आणि अमेरिकेने त्यांचे हितसंबंध जपण्यासाठी केली. जिनांना पाकिस्तान बनवू दिले. ज्यांनी पाकिस्तान बनविले, ते पाकिस्तानला आर्थिक आणि लष्करी सामर्थ्य देत राहतील, हे जिनांना माहीत होते. हा पकिस्तान ‘इस्लामिक स्टेट’ झाला. तो ‘तालिबानी स्टेट’ बनविण्याचे काम जनरल झियाने सुरू केले आणि तालिबानी म्हणजे जिहादी मानसिकता असणारे दहशतवादी. सैन्य सैन्याशी लढू शकते. परंतु, जो आत्मघातकी बनून येतो, त्याच्याशी लढणार कसे? तो आत्मघातकी बनून आला आहे, हे समजणारदेखील कसे? म्हणून सैन्य कितीही प्रशिक्षित असले, आधुनिक शस्त्रास्त्राने सुसज्ज असले तरी ते आत्मघातकी दहशवाद्यांशी लढू शकत नाही. असे दहशतवादी निर्माण करण्याचे कारखाने पाकिस्तानमध्ये आहेत. अमेरिका त्याच्याकडे लक्ष देणार की, आपण निर्माण केलेल्या अपत्याचे संगोपन करणार?
 
 
 
 
भारताला या सर्वांपासून धोका आहे. परंतु, तो आजचा नाही. सातव्या शतकापासून मोहम्मद बीन कासीमच्या स्वार्‍यांपासून ते नादीर शहा, अहमद शहा अब्दाली यांच्या स्वार्‍यांपर्यंत, या दहशतवादाचा अनुभव भारत घेत आहे, आजही घेत आहे. त्यांच्याशी पूर्वीही आपण लढलो आहोत आणि आज पूर्वीपेक्षाही अधिक सामर्थ्यवान बनून लढत आहोत. त्यांच्याशी सांस्कृतिकदृष्ट्या, धार्मिकदृष्ट्या आणि लष्करीदृष्ट्या कसे लढायचे, हे आम्हाला माहीत आहे. अमेरिकेला ते भारतापासून शिकावे लागेल. आकाशातून बॉम्बवर्षाव करून आणि लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे सोडून माणसे मारता येतात, माणसांची मने जिंकता येत नाहीत. वेगळ्या विचाराला आणि जीवनपद्धतीला काही काळ नमविता येते. पण, आत्मसात करता येत नाही. अमेरिकेला हे शिकावे लागले. आकाशातील पिता त्यांना ही बुद्धी देवो, एवढेच आपण म्हणू शकतो.
 
 
Powered By Sangraha 9.0