‘पुलित्झर’ पारितोषिक विजेत्याची हत्या

07 Aug 2021 00:05:02

Danish Siddiq_1 &nbs
 
जुलै २०२१ मध्ये दानिश सिद्दिकी ‘रॉयटर’चा प्रतिनिधी म्हणून ‘अफगाण नॅशनल आर्मी’सोबत अफगाणिस्तानात, कंदाहार परिसरात, स्पिन बुलदाक या गावात गेला होता. तिथे अफगाणी सैन्य आणि तालिबान यांची चकमक झाली, त्यात सैनिकांबरोबर सिद्दिकीसुद्धा जखमी झाला. या जखमी लोकांनी गावातल्या एका मशिदीत आश्रय घेतला. पण, तेवढ्यात तालिबानी गनीमही तिथे पोहोचले. दानिश हा पत्रकार आहे, हे कळूनही तालिबान्यांनी इतर सैनिकांसह त्यालाही गोळ्या घातल्या.
 
 
दानिश सिद्दिकी हा भारतीय पत्रकार होता. ‘रॉयटर’ या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेसाठी तो काम करत होता. अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य जसजसं बाहेर पडत आहे, तसतशी तिथली मूळ यादवी उफाळून येते आहे. अफगाणिस्तानात राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी अहमदझाई यांचं सरकार २०१९ पासून सत्तारूढ आहे. ११ सप्टेंबर, २००१ या दिवशी इस्लामी अतिरेक्यांनी न्यूयॉर्कचं ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’ पूर्णपणे उद्ध्वस्त केलं. अमेरिकन संरक्षण मंत्रालयाची इमारत पेंटेगॉन हीदेखील उद्ध्वस्त करण्यात येणार होती. पण, पेंटेगॉन या पंचकोनी इमारतीचा एक कोन उद्ध्वस्त होण्यावर निभावलं. अमेरिकेला आता तातडीने हालचाल करणं आवश्यकच बनलं. पहिल्यांदा कुणावर हल्ला करायचा? ‘तालिबान’ की ‘अल् कायदा’? एवढाच प्रश्न होता. अमेरिकेने तुलनेत कमी शक्तिमान असलेल्या तालिबानचा पहिला क्रम लावला. १९७८ ते १९८५ पर्यंत सोव्हिएत फौजा अफगाणिस्तानात ठाण मांडून बसल्या होत्या. त्या बाहेर पडल्यावर अफगाणिस्तानची सत्ता मिळवण्यासाठी अनेक अफगाणी अतिरेकी संघटना अखंड आपापसात लढत होत्या. साधारण १९९६ मध्ये इतर सर्व संघटनांचा पराभव करून ‘तालिबान’ या संघटनेने जवळपास संपूर्ण अफगाण भूमीवर कब्जा मिळवला होता. ऑक्टोबर २००१ मध्ये अमेरिकन सेना अफगाणिस्तानात उतरवल्या. प्रचंड धुमश्चक्री माजली. अत्याधुनिक शस्त्रास्त्रं आणि अत्याधुनिक युद्धतंत्र यांच्या जोरावर ऑक्टोबर ते डिसेंबर २००१, एवढ्या तीन महिन्यांच्या कालावधीत अमेरिकन सैन्याने तालिबानची गठडी वळली. एवढ्या झटपट अमेरिकेला विजय मिळेल असं कुणालाच वाटलं नव्हतं. कारण, पठाणी गनिमांनी सोव्हिएत सेनांची केलेली फजिती सर्वांच्या आठवणीत ताजी होती. पण, अमेरिकेने तालिबानसकट सगळ्या पठाणी संघटनांना नामोहरम करून, अफगाणिस्तानात चक्क निवडणुका घेऊन लोकशाही सरकार आणलं.
 
 
 
२००२ सालच्या डिसेंबर महिन्यात या नव्या लोकनियुक्त अफगाण सरकारने आपल्या अधिकृत सैन्यदलाची स्थापना केली. एक लाख ८० हजार सैनिक आणि अधिकारी असलेल्या या सैन्यदलाचं नाव आहे ‘अफगाण नॅशनल आर्मी.’ सध्या या दलाचे सर्वोच्च प्रमुख आहेत लेफ्टनंट जनरल माझीन झिया. या सैन्यदलाचं सगळं शिक्षण-प्रशिक्षण अर्थातच अमेरिकन सैन्यदलांच्या धर्तीवर झालेलं आहे. अमेरिकन सैन्याच्या रेट्याने तालिबान नामोहरम झालेली असली, तरी संपलेली नाही, हे पुढे लवकरच स्पष्ट झालं. गेली २० वर्षं तिचे घातपाती गनिमी हल्ले, आत्मघाती बॉम्बस्फोट वगैरे प्रकार चालूच आहेत. प्रत्यक्ष रणांगणावर अमेरिकन सैन्याने झटपट विजय मिळवले खरे; पण या छुप्या, निरंतर चालू असलेल्या युद्धाचा अमेरिकन सेनाश्रेष्ठी, राजकारणी नि जनता सगळ्यांनाच आता कंटाळा आलेला आहे. म्हणून अमेरिकेने अफगाणिस्तानातून आपलं सैन्य काढून घ्यायला सुरुवात केली आहे. अमेरिकेकडून प्रशिक्षण घेतलेल्या ‘अफगाण नॅशनल आर्मी’ने आता आपल्या लोकनियुक्त सरकारचं, म्हणजेच पर्यायाने अफगाणी जनतेचं, तालिबान किंवा अन्य अतिरेकी संघटनांपासून रक्षण करावं, असं अर्थातच अपेक्षित आहे. पण, प्रत्यक्षात असं घडताना दिसतंय की, जसजसं अमेरिकन सैन्य मायदेशी परत जातंय, तसतशी तालिबान संघटना पुढे सरसावून अधिकाधिक अफगाणी भूमी व्यापते आहे. तालिबानचं राज्य येणं याचा अर्थ पुन्हा ‘शरिया’चे मध्ययुगीन कायदे लागू होणं. स्त्रियांची घरात रवानगी, आधुनिक शिक्षण, आधुनिक विचार यांची मुस्कटदाबी आणि याविरुद्ध उभे राहतील त्यांची बेछूट कत्तल.
 
 
 
‘अफगाण नॅशनल आर्मी’ कार्यरत तर आहे. पण, ती तालिबान्यांशी प्राणपणाने झुंज देते आहे, तसूतसू भूमीसाठी झगडते आहे, असं येणार्‍या बातम्यांवरून वाटत तरी नाही. अशातच दानिश सिद्दिकीच्या हत्येची घटना घडली. युद्धामध्ये प्रत्यक्ष रणांगणावर हजर राहून घटनांची वार्तापत्रे पाठवणे, हा पत्रकारितेचा प्रकार पार अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धापासून म्हणजे सन १७७५ पासून सुरू आहे. वार्तापत्रांमध्ये वार्ताचित्रे म्हणजे प्रत्यक्ष रणांगणावरील छायाचित्रे पाठवणे, ही भर सन १८६१च्या अमेरिकन यादवी युद्धापासून पडली. त्यानंतर कॅमेरे आणि छायाचित्रण तंत्र यात वेगाने सुधारणा होत गेली. पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धात नि नंतरच्या प्रत्येक लहान-मोठ्या संघर्षात युद्ध वार्ताहर आणि छायाचित्रकार प्रत्यक्ष रणांगणावर हजर राहून वार्तांकन करतात. ज्याप्रमाणे, रुग्णसेवा करणार्‍या ‘रेड क्रॉस’ किंवा तत्सम संघटनांच्या लोकांवर गोळी चालवू नये, असा संकेत, लढणारे दोन्ही पक्ष पाळतात; तसाच संकेत या वार्ताहरांबाबतही शक्यतो पाळला जातो. ‘शक्यतो’ हा शब्द मुद्दाम वापरला, कारण लढाईच्या ऐन धुमश्चक्रीत दरवेळी हे जमतंच असं नाही आणि त्यामुळे तोफा-बंदुकांच्या अग्निवर्षावात हे वार्ताहरही कित्येकदा ठार होतात. त्यांना स्वत:लाही याची कल्पना असतेच आणि तरी जीव धोक्यात घालून ते रणांगणावर जात असतात. यामागे युद्धाचा थरार प्रत्यक्ष अनुभवणं, तो शब्द आणि छायाचित्रांद्वारे शक्य तितक्या प्रभावीपणे नि वेगाने वाचकांपर्यंत पोहोचवणं, या मूळ पत्रकारी प्रेरणा जशा असतात, तशाच भरपूर प्रसिद्धी, कीर्ती आणि पैसा मिळवणं, अशा भैतिक प्रेरणाही असतात.
 
 
 
आता दानिश सिद्दिकीची वाटचाल पाहा. तो जामिया मिलिया इस्लामियाचा विद्यार्थी. जामिया मिलिया मूळचं अलिगढचं. १९२० साली ते अलिगढहून दिल्लीला आलं. १९३५ साली ते दिल्लीत सध्याच्या ओखला परिसरात आलं. हे सगळं ब्रिटिश कृपाछत्राखाली झालं. पुढे काँग्रेसी कृपाछत्र तर आणखीच उदार. त्यामुळे १९६२ साली जामिया मिलिया अभिमत विद्यापीठ (डीम्ड युनिव्हर्सिटी) बनलं, तर १९८८ साली ते पूर्णपणे केंद्रीय विद्यापीठ बनलं. दानिश सिद्दिकीचे वडील जामिया मिलियामध्ये प्राध्यापक होते, त्यामुळे त्याने तिथूनच पदवी आणि पदव्युत्तर पत्रकारिता अभ्यासक्रम पूर्ण करून ‘हिंदुस्थान टाईम्स’मध्ये पत्रकारितेला सुरुवात केली. लवकरच तो नुसत्या पत्रकारितेकडून ‘फोटो जर्नालिझम’कडे वळला. शब्दांपेक्षा दृश्य अधिक प्रभावी असतं. एखाद्या मोठ्या लेखापेक्षा एखादं नेमकं छायाचित्र आणि त्याखालचे मोजके प्रभावी शब्द हे वाचकांवर जास्त परिणाम करतात. याचं अलीकडचं उदाहरण म्हणजे, सीरियातून भूमध्य समुद्रमार्गे काही अरब मुसलमान निर्वासित चोरून एका युरोपीय देशात घुसत आहेत नि त्या प्रयत्नांत त्यांच्यातला एक पाच-सहा वर्षांचा कोवळा पोरगा पाण्यात बुडाला आहे. त्याचं प्रेत किनार्‍यावर पालथं पडलं आहे. हे चित्र बघून जगभरातले लोक हळहळले होते नि त्याचा फायदा घेऊन अरब घुसखोर आणखी जोराने युरोपीय देशांमध्ये घुसले होते. असो. तर दानिश सिद्दिकी ‘फोटो जर्नालिस्ट’ म्हणून ‘रॉयटर’ या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेत कामाला लागला.
 
 
 
आज घडीला जगभरात चार वृत्तसंस्था या अग्रगण्य मानल्या जातात. ‘एजन्स फ्रान्स-प्रेस’ उर्फ ‘एएफपी’ ही फे्रंच वृत्तसंस्था जगातली सगळ्यात जुनी आहे. १८३५ साली हिची स्थापना पॅरिसमध्ये झाली. दुसरी ‘असोसिएटेड प्रेस’ उर्फ ‘एपी.’ हिची स्थापना १८४८ साली अमेरिकेत झाली. तिसरी ‘रॉयटर.’ हिची स्थापना १८५१ साली लंडनमध्ये झाली. चौथी ‘युनायटेड प्रेस इंटरनॅशनल’ उर्फ ‘युपीआय.’ हिची स्थापना १९०७ साली अमेरिकेत झाली. या सर्व वृत्तसंस्था पूर्णपणे व्यावसायिक आहेत. त्या कोणत्याही देशातल्या, कोणत्याही पक्षाला, मताला बांधील नाहीत. पण, त्यांचा एकंदर कल हा मात्र ‘उदारमतवादी लिबरल’ असतो. आता यावरून दानिश सिद्दिकीची वाटचाल लक्षात घ्या. इंग्रज आणि काँग्रेसच्या छत्राखालील जामिया मिलियामध्ये शिक्षण, ‘हिंदुस्थान टाईम्स’ या लिबरल वृत्तपत्रात उमेदवारी आणि मग ‘रॉयटर’ या आंतरराष्ट्रीय लिबरल वृत्तसंस्थेत ‘फोटो जर्नालिस्ट’ म्हणून नोकरी. २०१५ मध्ये नेपाळमधील भूकंप, त्याच वर्षी रोहिंग्या निर्वासित समस्या, २०१६-१७ मध्ये इराकी सेना आणि ‘इसिस’ यांच्यातील मोसूलची लढाई, २०१९-२० मध्ये हाँगकाँगमधील निदर्शन, २०२० मध्ये दिल्लीतला दंगा आणि ‘कोविड’ महामारी अशा कामगिर्‍या त्याला मिळाल्या. त्याने त्या चांगल्याच यशस्वी केल्या. म्हणजे अधिकाधिक खोडसाळपणे छायाचित्रे टिपून वाचकांना उचकवणे, हे जे अपेक्षित कार्य, ते त्याने उत्तम पार पाडलं. रोहिंग्या निर्वासितांच्या कामगिरीबद्दल तर त्याला २०१८ साली अमेरिकेचं ‘पुलित्झर’ हे प्रख्यात पारितोषिक मिळालं.
 
 
 
जुलै २०२१ मध्ये दानिश सिद्दिकी ‘रॉयटर’चा प्रतिनिधी म्हणून ‘अफगाण नॅशनल आर्मी’सोबत अफगाणिस्तानात, कंदाहार परिसरात, स्पिन बुलदाक या गावात गेला होता. तिथे अफगाणी सैन्य आणि तालिबान यांची चकमक झाली, त्यात सैनिकांबरोबर सिद्दिकीसुद्धा जखमी झाला. या जखमी लोकांनी गावातल्या एका मशिदीत आश्रय घेतला. पण, तेवढ्यात तालिबानी गनीमही तिथे पोहोचले. दानिश हा पत्रकार आहे, हे कळूनही तालिबान्यांनी इतर सैनिकांसह त्यालाही गोळ्या घातल्या. १५ जुलै, २०२१ रोजी ही घटना घडली. कंदाहारच्या मिरवाईज रुग्णालयात त्याचा मुडदा आला, तेव्हा त्यावर १२ गोळ्यांच्या खुणा आणि छाती नि चेहरा ट्रकच्या टायरखाली चेचून टाकल्याच्या खुणा होत्या. १८ जुलै, २०२१ ला सिद्दिकीचा देह दिल्लीच्या जामिया मिलिया विद्यापीठाच्या स्मशानभूमीत दफन करण्यात आला. खरं पाहता ही दफनभूमी फक्त विद्यापीठ कर्मचारी आणि त्यांचे नातलग यांच्यासाठी आहे. पण, सिद्दिकीसाठी हा नियम शिथिल करण्यात आला. एक खोडसाळ उदारमतवादी अखेर भारताच्या उदार भूमीतच विसावला.
 
 
 
Powered By Sangraha 9.0