गोल्डफेक...

07 Aug 2021 22:35:08

olympic_1  H x
नाज क्या इस पे जो बदला हैं जमाने ने तुम्हे,
मर्द हैं वो जो जमाने को बदल देते हैं...!

महान शायर अकबर इलाहाबादींनी हा शेर जेव्हा लिहिला तेव्हा नीरज चोप्राचा जन्मही झाला नव्हता. त्याने हा शेर ऐकलाही नसेल, पण आपल्या सुवर्ण भालाफेकीने इलाहाबादींच्या या शब्दांत त्याने जान फुंकलीय. इतिहास घडवण्यासाठी काय लागते, असे मी त्याला विचारले, त्यावर त्याचे नम्र उत्तर होते, “कुछ नहीं जी आपको अपने आप पे भरोसा होना चाहिये...” नीरजला स्वतःवर ‘भरोसा’ होता, पण इतरांना होता का? अगदी मिशन टोकियो ‘ऑलिम्पिक’ सुरू होऊन संपायच्या आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत नीरज चोप्रा फारसा कुणाच्या चर्चेत नव्हता, पण त्याला त्याची फिकीर नव्हती.
 
‘हम भी वो हैं जो कभी किसी के पीछे खड़े नहीं होते, जहाँ खड़े हो जाते हैं लाईन वहीं शुरु होती हैं...” कालिया सिनेमातील अमिताभ बच्चनचा हा ’डायलॉग’ नीरजने अशरक्षः खरा खरून दाखविला. तो आला... त्याने पाहिले... त्याने जिंकले... नीरजने या टोकियो ‘ऑलिम्पिक’च्या ‘फायनल’मध्ये भालाफेकीतील पहिल्याच प्रयत्नात ८७.०३ मीटरची दूर भालाफेक केली आणि जागतिक क्षितिजावर नव्या शहेनशाहची ‘एंट्री’ झाल्याची जणू त्याने वर्दी दिली. त्याचा हा पहिला प्रयत्नसुद्धा स्पर्धेत सहभागी इतर ११ खेळाडूंना पुढील सहा प्रयत्नांत पार करता आला नाही. अगदी या स्पर्धेत सहभागी विद्यमान जगज्जेता जर्मनीच्या जोहान्स वेट्टरलाही नाही.
 
दुसर्‍या प्रयत्नात नीरजने आपली कामगिरी ८७.५८ मीटर अशी अजून उंचावली. आणि मग स्टेडियममध्ये उपस्थित आम्ही मोजक्या भारतीयांनी ‘भारतमाता की जय’चा जयघोष सुरु केला तो अगदी त्याच्या गळ्यात ‘गोल्ड मेडल’ची माळ पडेपर्यंत कायम होता. स्टेडियममध्ये आपल्या देशाच्या राष्ट्रगीताच्या धूनमध्ये सूर मिसळून अभिमानाने राष्ट्रगीत गाताना उर भरून आला होता. डोळ्यातील अश्रूंनी कधीच पापण्यांची साथ सोडली होती. डोळ्यांत अश्रू दाटल्यामुळे धुसर होत जाणार्‍या नजरेत फक्त उंचच उंच जाणारा डौलदार तिरंगा सामावण्याचा प्रयत्न सुरु होता.
अभिनव बिंद्राने बीजिंगमध्ये जेव्हा ‘गोल्ड मेडल’ जिंकले तेव्हा नीरज अवघ्या ११ वर्षांचा होता. अभिनवने जे शूटिंगमध्ये करून दाखवले ते भारतातील एकाही ‘अ‍ॅथलिट’ला ‘ऑलिम्पिक’च्या गेल्या १२५नवर्षांत करता आले नव्हते. याआधी महान धावपटून मिल्खासिंग आणि पी. टी. उषा ‘ऑलिम्पिक’च्या ’फायनल’मध्ये चौथे आले होते. हीच काय ती भारताची आजवरची सर्वोत्तम कामगिरी होती. नीरजने भारताला ‘अ‍ॅथलेटिक्स’मधील नुसते ‘मेडल’ नव्हे तर शंभर नंबरी ’गोल्ड मेडल’ जिंकून दिले. अवघा भारत यासाठी त्याचा ऋणी राहील. मागे दिल्लीतील ‘कॉमनवेल्थ’वेळी मिल्खासिंग भेटले होते. माझ्या मुलाखतीत ते म्हणाले होते, “बेटा मरने से पहले ‘ऑलिम्पिक अ‍ॅथलेटिक्स’ में देश का तिरंगा लहराते हुए देखने की आखरी ख्वाहीश हैं...” ‘ऑलिम्पिक’च्या आधी काही महिन्यांपूर्वीच मिल्खा सिंग यांचे निधन झाले. आज नीरजने आपले हे ‘गोल्ड मेडल’ मिल्खासिंग यांना समर्पित केले. “ते आज हे यश पाहायला हवे होते. ते जेथे कुठे असतील तेथून माझे यश पाहत असतील,” असे सांगताना काही क्षण नीरज भावनिक झाला.
अभिनव बिंद्राने विजयानंतर त्याला इंग्लिशमधून शुभेच्छा पाठवल्यात. तुझी त्यावर काय प्रतिक्रिया आहे. यावर त्याने प्रांजळपणे सांगितले, “माझे इंग्लिश काही तितकसे चांगले नाही. मी जरा कुणाकडून समजून घेतो आणि मग त्यावर बोलतो.” नीरजला भलेही आज इंग्लिश येत नाही, पण त्याच्या कामगिरीचे हे यश टीपण्यासाठी २०७ देशांचे पत्रकार स्टेडियममध्ये हजर होते. एक अमेरिकन पत्रकार नीरज चोप्रा हा अभिनेत्री प्रियांका चोप्राचा कोण लागतो, असं मला विचारायला आला. मी त्याला सांगितले, “अहो कुणीही नाही. तो एका शेतकर्‍याचा मुलगा आहे.” यावर तो उत्साहाने म्हणाला, “ग्रेट, अवघे जग उद्यापासून आता प्रियांका चोप्राला विचारेल की, तू नीरजची कोण लागते.”
नीरजने आज पहिल्या दोन प्रयत्नांत ‘ऑलिम्पिक’च्या ’गोल्ड मेडल’वर आपला हक्क सांगितला. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या जागतिक ‘ऑलिम्पिक’ स्पर्धेत ‘गोल्ड मेडल’ जिंकणारा जगज्जेता जर्मनीचा जोहान्स वेट्टर नीरज सोबत आज खेळत होता. यंदाच्या वर्षात वेट्टरने तब्बल सात वेळा ९० मीटर पेक्षा जास्त दूर भालाफेक केली आहे. ९६.२९ मीटर ही त्याची जगज्जेतेपदाची कामगिरी. पण आज त्याला फक्त ८५.५२ मीटर दूर भालाफेक करता आली. स्पर्धेच्या अंतिम आठ खेळाडूंतही त्याला स्थान मिळवता आला नाही आणि येथेच नीरजच्या ’गोल्ड मेडल’ची पहिली चाहूल लागली. एकामागोमाग एक खेळाडू भाला फेकत होते. पण नीरजच्या जवळपासही कुणी पोहोचू शकला नाही. आणि अखेर तो क्षण आला ज्याची भारत गेली १२५ वर्षे वाट पाहत होता. नीरजने भारताला ‘गोल्ड मेडल’ जिंकून दिले. त्याच्या या ‘गोल्ड मेडल’ने भारतीय ‘अ‍ॅथलेटिक्स’मध्ये नवी सुवर्ण पहाट उगवली आहे. भारतीय ‘अ‍ॅथलेटिक्स’ला नीरजने नवी उंची गाठून दिली. नीरजच्या या भाल्याने भारतातील प्रत्येक उदयोन्मुख खेळाडूच्या हृदयाचा ठाव घेतला आहे. त्यातून उद्याचे असंख्य नीरज उदयास येतील. जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हणतात. याच उगवत्या सूर्याच्या देशात नीरजने भारतीयांना नवी सुवर्णपहाट आणली आहे. धन्यवाद नीरज. तुझे आभार मानायाला आम्हाला शब्द अपुरे पडतायत.
Powered By Sangraha 9.0