टोकियो (संदीप चव्हाण) : आजच्या दिवशी २३८ वर्षांपूर्वी जपानमधील ‘माऊंट असामा’ ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. हजारो जपानी नागरिक त्यात मृत्युमुखी पडले होते. अनेक स्वप्नांचा त्यात चुराडा झाला होता. आज पुन्हा एकदा जपानच्या ओई हॉकी स्टेडियममध्ये बेल्झियमरुपी ज्वालामुखीचा उद्रेक झाला. कोट्यवधी भारतीय हॉकी शौकिनांच्या सुवर्ण स्वप्नांची त्यात राखरांगोळी झाली. विद्यमान जगजेत्या बेल्झियमने संपूर्ण स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक ३४ गोल केलेत. तुलनाच करायची झाली, तर गटात भारत एकूण पाच सामने खेळला आणि एकूण १५ गोल झळकावले. बेल्झियमचा धडाकेबाज खेळाडू अलेक्झांडर हेंड्रिक्सने एकट्याने या स्पर्धेत आतापर्यंत १५ गोल केलेत. आज भारताविरुध्द त्याने तीन गोल ठोकले. ही मॅच भारतविरुध्द हेंड्रिक्स अशीच होती. भारत ती हरला. आजवर बेल्झियमला हॉकीत गोल्ड जिंकता आले नाही. गेल्या ‘रिओ ऑलिम्पिक’मध्ये त्यांना ‘सिल्व्हर मेडल’वर समाधान मानावे लागले होते. पण यंदा हॉकीतील हा जागृत ज्वालामुखी ‘गोल्ड मेडल’ जिंकल्याशिवाय शांत होणार नाही इतके नक्की.
‘ऑलिम्पिक’ हॉकीमध्ये भारताला सिंहाची उपमा दिली जायची. या खेळाचे महाराजापद भारताला बहाल केले गेले होते. त्याला कारणही तसेच होते. १९२८ ते १९६० असे तब्बल सलग सहा ‘ऑलिम्पिक’मध्ये भारताने हॉकीचे ‘गोल्ड मेडल’ जिंकले होते. त्यातही विशेष म्हणजे, १९२८ आणि १९५६ साली भारताने एकही गोल न स्वीकारता ‘गोल्ड मेडल’ जिंकले होते, असा हा सिंह मध्यंतरी जर्जर झाला होता. पण गेल्या काही वर्षांत या सिंहाने पुन्हा गर्जना करत आपल्या अस्तित्वाची जगाला दखल घ्यायला भाग पाडले. गेल्या ४१ वर्षात ऑलिम्पिकची पहिली सेमी ‘फायनल’ खेळणार्या भारताने आज बेल्झियमविरुध्द सुरुवातही दणक्यात केली होती. मध्यंतरास भारताने बेल्झियमला २-२ असे बरोबरीत रोखले होते. पण खेळाच्या तिसर्या सत्रात भारताचा कर्णधार मनप्रित सिंगला धुसमुसळ्या खेळासाठी पंचानी ‘ग्रीन कार्ड’ दाखवले. त्यामुळे त्याला दोन मिनिटे संघाबाहेर बसावे लागले आणि येथेच घात झाला. दहा खेळाडूनिशी खेळणार्या भारतीय संघावर विद्यमान विश्वविजेते बेल्झियमने जोरदार हल्लाबोल केला आणि ३-२ अशी आघाडी घेतली. भारताचा सेनापती मनप्रित दोन मिनिटांसाठी मैदनाबाहेर गेला आणि भारताचा घात झाला. भारताचा मनप्रितरुपी सिंहतर मैदनाबाहेर गेलाच, पण भारताचा गडही उर्वरित खेळाडूंना राखता आला नाही. भारताचा सिंहही गेला आणि गडही गेला. आता भारताला ‘ब्राँझ मेडल’साठी शर्थीचे प्रयत्न करावे लागतील.
भारताने ‘ऑलिम्पिक’मध्ये शेवटचे मेडल जिंकले होते ते १९८० च्या मॉस्को ‘ऑलिम्पिक’मध्ये. तेही गोल्ड. त्यानंतर गेली ४१ वर्ष भारत ‘मेडल’पासून वंचित आहे. १९६४ साली याच जपानमध्ये जेव्हा ‘ऑलिम्पिक’ झाले होते तेव्हा भारताने ‘गोल्ड मेडल’ जिंकले होते. साखळीत तेव्हा बेल्झियमचा २-१ असा पराभव केला होता. पण गेल्या ५६ वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेय, नव्हे अख्खा पूलच वाहून गेलाय. त्यावेळी हॉकी ही गवतावर खेळली जायची. कलात्मक मनगटी खेळ खेळण्यात भारतीय वाक्बगार. चेंडू भारतीयांच्या हॉकी स्टीकला चुंबकासारखा चिकटून राहायचा. पण हॉकी टर्फवर आली आणि नजाकतीला वेगाने मागे टाकले. आजही मैदानी गोल करण्यात भारतीय आघाडीवर आहेत. पण ‘पेनल्टी कॉर्नर’मध्ये आपण काठावर उत्तीर्ण होतो, घात येथेच होतोय.
भारतीय महिला संघाची उपांत्य फेरीची लढत बुधवारी अर्जेंटिनाशी होणार आहे. पुरुष हॉकी संघाचे अपूर्ण राहिलेले ‘गोल्ड मेडल’ जिंकण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे मिशन आता महिला संघाकडे असेल. असेही रिओ ‘ऑलिम्पिक’प्रमाणे या टोकियो ‘ऑलिम्पिक’मध्येही भारतीय महिला या कामगिरीत पुरषांपेक्षा वरचढ ठरल्यात. आतापर्यंतची वेटलिफ्टिंग, बॅडमिंटन आणि बॉक्सिंगमधील तिन्ही ‘मेडल’ही अनुक्रमे मीराबाई, सिंधू आणि लवलिना या महिला खेळाडूंनी जिंकलेली आहेत.
मॅच संपल्यानंतर नॉर्वेच्या एका पत्रकार मित्राने अचंबितपणे मला विचारले की, “भारतासारख्या धर्म आणि परंपरेच्या जोखडात अडकलेल्या देशांत महिला एवढी सातत्यपूर्ण कामगिरी कशा करतायत...” मी त्याला झाशीच्या राणीपासून सुरुवात केली. “भारतीय महिला चूल आणि मूल याच्यापलीकडे जाऊन स्वत:चे करिअर स्वत: निवडत आहेत आणि आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत,” हे सांगत होतो. तो अनामिक श्रद्धेने ते ऐकत होता. त्याला त्यातले किती कळले हे माहीत नाही, पण २०१६ च्या रिओ ‘ऑलिम्पिक’मध्ये जगातील २९ देश असे होते, जेथे महिलांनी पुरुषांपेक्षा जास्त मेडल जिंकले होते. या देशात आमेरिका, चीन आणि रशियासोबत भारताचाही समावेश होता. फक्त आपल्याकडे रिओमध्ये भारताच्या फक्त महिलांनीच मेडल जिंकले होते आणि टोकियोतही सध्यातरी हेच चित्र आहे. भारताचे सिंह हरत असताना या सिंहिणींनी टोकियोत तिरंगा फडकावला आहे. या तिन्ही खेळाडूंना त्रिवार मानाचा मुजरा...!