मनातील संवेदनेला प्रत्यक्ष कृतीची जोड देत, पशुधनाची सेवा करणार्या नाशिक येथील पुरुषोत्तम आव्हाड यांच्या कार्याविषयी...
मानवाला जीवनात आलेल्या समस्यांप्रति काही मनुष्य हे संवेदनशीलता दाखवत असतात. तसेच, काही नागरिक हे पशुधनाप्रतिही संवेदनशीलतेने आपले कार्य करत असतात. नाशिक येथील पुरुषोत्तम दगू आव्हाड हे त्यापैकीच एक. वाणिज्य शाखेचे पदवीधर असणारे आव्हाड अत्यंत आपुलकीने पशुधनाची सेवा करत आहेत. नाशिक जिल्ह्यात ‘मंगलरूप गोवत्स सेवा ट्रस्ट’च्या माध्यमातून मागील सात वर्षांपासून ते कार्य करत आहेत. मोरवाडी परिसरात गोशाळेचे कार्य सुरू होते. मात्र, वाढत्या कामामुळे रामशेज परिसरातून ते कार्य करत आहेत. ‘मंगलरूप गोवत्स सेवा ट्रस्ट’चे कार्यकर्ते नाशिक जिल्ह्यात कुठेही जखमी, अपघातग्रस्त, आजारी, बेवारस गोवंश किंवा इतरही कुठले पशुपक्षी आजारी असल्याचे समजल्यावर तत्काळ त्या ठिकाणी पोहोचून पशुवैद्यकीयांच्या देखरेखीखाली उपचार सुरू करतात. त्यांच्या वेदना कमी करून उर्वरित आयुष्य सुसह्य करण्याचा प्रयत्न संस्था करत असते. प्रसंगी त्यांच्यावर शस्त्रक्रियासुद्धा केली जाते, शिवाय त्यांच्या पुढील संगोपनाची जबाबदारी संस्था स्वीकारते. आजपर्यंत हजारो गोवंशावर तसेच इतर पशुपक्षी उपचार करून त्यांना जीवदान देण्यात आले आहे. संस्थेत जास्तीत जास्त अपघातग्रस्त, ‘कॅन्सर’, ‘टीबी’, ‘ट्युमर’, ‘फॉरनबॉडी’ (अखाद्य पोटात जाणे), असाहाय्य अशा प्रकारचेच गोवंश व पशुपक्षी दाखल झाले आहेत.
सध्या ‘मंगलरूप गोशाळा’मध्ये आजारी ३५ गोवंश असे आहेत की, त्यामध्ये एक अंध गोवंश, सात गोवंश हे अपघात आणि ‘कॅन्सर’सारख्या आजाराने ग्रस्त असून, त्यांचा एक पाय कायमस्वरूपी काढून टाकावा लागला आहे. गाठ असलेले तीन गोवंश असून, ‘फॉरनबॉडी’ असलेले अनेक गोवंश आहेत. संस्थेमध्ये १४ श्वान असून, त्यांच्यासुद्धा अशाच कथा आहेत. त्यातील चार श्वानांवर गंभीर स्वरूपाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. ते सुखकर जीवन व्यथित करत आहेत. हे सेवाव्रत आपणास हाती का घ्यावेसे वाटले, याबाबत आव्हाड यांना विचारले असता ते सांगतात की, “लहानपणापासून त्यांना पशुधनाबाबत कणव आणि प्रेम आहे. वाढत्या वयाबरोबर त्यांच्याबद्दल आत्मीयता अजूनच वाढत गेली,” असे ते सांगतात. अशाच वेळी त्यांना रूपाली जोशी यांच्या या क्षेत्रातील कार्याबद्दल माहिती मिळाली. त्या तपोवनमध्ये ‘कृषी गोसेवा ट्रस्ट’ या नावे गोशाळा चालवित होत्या. त्यांच्या कार्याने आव्हाड भारावून गेले. येथे फक्त कत्तलखान्यातून सोडवून आणलेल्या किंवा शेतकर्याने सोडून दिलेल्या गोवंशाचा सांभाळ होत असे. त्याचवेळी रस्त्यावर फिरणार्या पशुधनाबाबत कार्य करावे, असे आव्हाड यांनी ठरवले. त्यानंतर आव्हाड यांनी संस्था स्थापन करून रस्त्यावरील प्राण्यांकरिता काम करण्याचे ठरविले. मोरवाडी परिसरातील ३०० वाराच्या स्वतःच्या भूखंडावर त्यांनी कार्य सुरू केले.
“पाळीव नसलेले पशुधन हे आजाराने त्रस्त असल्यावर खूप उग्र होत असतात. त्यातच भटक्या जनावरांना बंदिस्त असण्याची सवय नसते. त्यामुळे ते खूप जीवघेणा हल्ला करण्याची शक्यता असते. अशावेळी त्यांच्यावर उपचार करणे जिकिरीचे असते. त्यामुळे त्यांना हाताळण्यापासून ते संभाळण्यापर्यंत मोठी कसरत करावी लागते. यात अनेक कार्यकर्ते गंभीररीत्या जखमी झाले,” असे आव्हाड सांगतात. “प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशी एक गोशाळा उभारल्यास जिच्या माध्यमातून रस्त्यावरील भाकड जनावरांना सांभाळणे शक्य होईल, त्यामध्ये सरकारने प्रामाणिकांना संधी देणे आवश्यक आहे. तसेच, त्या कार्यकर्त्यांना आवश्यक त्या सोयीसुविधा देणे आवश्यक आहे,” असे आव्हाड सांगतात. २०१३ साली एका गाईचा गोंदा या ठिकाणी अपघात झाला होता. या अपघातात गाईच्या पायाला मोठी दुखापत झाली. त्या गाईला प्लास्टर करावे लागले. पहिल्यांदा आक्रमक असणारी ती गाय नंतर आव्हाड यांच्या प्रेमाने आपुलकीने व्यवहार करू लागली. हा अनुभव अत्यंत हृद्य असल्याचे आव्हाड सांगतात.
समाजातील सर्व नागरिकांना आणि माणुसकी जपणार्यांनी पशुधनाच्या जागेवर अतिक्रमण करून सिमेंटचे जंगल उभे केले आहे. त्यांचा निवारा हिसकावून त्यांना बेघर करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक अबोल प्राणी हे हक्काच्या ठिकाणापासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांचे भोजन, निवारा यांची व्यवस्था करण्याची जबाबदारी नागरिकांनी घेणे आवश्यक आहे. तसेच, आपल्या वास्तव्याच्या ठिकाणी कोणी पशू आल्यास त्याला हाकलून न देता त्यास तेथे बसू द्यावे, अशीच विनंती आव्हाड सर्व नागरिकांना करतात. “अबोल प्राण्यावर प्रेम करावे, ते नक्कीच त्या बदल्यात जास्त प्रेम आपल्याला देतात. हे अनुभवावरून आपण सांगत आहोत,” असे आव्हाड आवर्जून सांगतात.
पशुधन हे नक्कीच महत्त्वाचे आहे. त्यांची होणारी हेळसांड ही थांबणेदेखील आवश्यक आहे. या कार्यासाठी आव्हाड झोकून देऊन काम करत आहेत. अनेक संकटांचा सामना त्यांना या काळात करावा लागला. अनेक जीवाची बाजी लावणार्या प्रसंगांना त्यांना सामोरे जावे लागले. मात्र, पशुधनाप्रति असणारी त्यांची कणव हीच त्यांच्या कार्याचे ऊर्जास्रोत आहे. मुक्या जनावरांच्या अबोल भावना, त्यांच्या वेदना समजण्यासाठी आवश्यक असते ती संवेदना, जी प्रत्येक मनुष्याच्या उरात मूलत: असते. आव्हाड यांनी त्या संवेदनेला कृतीची जोड दिली आहे. त्यांच्या आगामी कार्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!