भारताच्या इतिहासाचा जर विचार केला, तर ९०चे दशक हे अनेकार्थाने भारतासाठी महत्त्वाचे ठरले. याच काळात विदेशात शिक्षणासाठी जाणार्या विद्यार्थ्यांचा एक वर्ग उदयास आला. भारतीय बुद्धिमत्ता परदेशात जात असल्याने या काळात ‘ब्रेनड्रेन’ नावाच्या संकल्पनेचा उदय झाला.
सध्याच्या घडीला हीच संकल्पना क्रिकेटसारख्या खेळातदेखील उदयास येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक भारतीय क्रिकेटपटूंनी भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत अमेरिकेतील ‘लीग’ स्पर्धेमध्ये खेळण्यास प्राधान्य दिले आहे. २०१२मध्ये अंडर १९ विश्वचषक स्पर्धा जिंकून देणार्या संघाचा कर्णधार उन्मुक्त चंद याने भारतीय क्रिकेटला रामराम ठोकून अमेरिकेतील एका स्थानिक ‘लीग’तर्फे खेळण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. याच संघातील एक गोलंदाज हरमन सिंग यानेही अशाच प्रकारचा निर्णय जाहीर केला आहे.
याशिवाय मनन शर्मा, भूषण द्विवेदी, मिलिंद कुमार अशा अनेक खेळाडूंनी गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन अमेरिकेतील ‘लीग’सोबत खेळण्याचा निर्णय घेतला आहे. ‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळा’ने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. मात्र, या ब्रेनड्रेनचा त्यांना आगामी काळात विचार करावाच लागणार आहे. भारतात गुणवत्ता आहेच, क्रिकेटसाठी सुविधादेखील आहेत. मात्र, तरीही काही खेळाडूंना भारतातील सुविधा पुरेशा वाटत नसतील तर मात्र नक्कीच विचार करावा लागणार आहे.
जगाच्या पाठीवर आजवर अशा अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, भारताच्या बाबतीत असे होताना पहिल्यांदाच दिसत आहे. पाकिस्तानमधील अनेक खेळाडू तेथे क्रिकेटचे वातावरण पोषक नसल्याने इंग्लंडसारख्या देशात स्थलांतरित झाल्याच्या घटना घडल्या आहेत. दक्षिण आफ्रिका आणि ‘वेस्ट इंडिज’मधील अनेक खेळाडूही ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड किंवा इंग्लंडकडून खेळताना दिसतात. अशीच परिस्थिती आता भारतासाठी होताना दिसत आहे का? हाच प्रश्न आहे. एकीकडे भारतीय क्रिकेटच्या राखीव फळीचे कौतुक होत असताना ही दुसरी बाजूही समोर येत आहे.
उन्मुक्तसारख्या गुणवान खेळाडूंची अनेक वर्षे वाया गेल्याने अखेर वयाच्या २८व्या वर्षी त्याने हा निर्णय घेतला. भारतात गुणवान क्रिकेटपटूंना संधी देण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तरीही अशा प्रकारच्या घटना का घडत आहेत, याचा विचार आता करण्याची वेळ आली आहे. विविध प्रकारचे ‘रणजी संघ’, ‘आयपीएल क्रिकेट स्पर्धा’ यानिमित्ताने अनेक क्रिकेटपटूंना भारतात खेळण्याची संधी मिळत आहे. भारतीय खेळाडूंनी या संधीचे सोने केल्यास त्या खेळाडूंनादेखील राष्ट्रीय संघात स्थान मिळू शकते.
याचे उत्तम उदाहरण म्हणजे सूर्यकुमार यादव. सूर्यकुमार यादव यालाही उशिराच संधी मिळाली. पण, चिकाटी असल्याने अखेर त्याने केलेल्या परिश्रमाचे चीज झाले. भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये खेळत असताना भारताचा दुसरा क्रिकेट संघ श्रीलंकेच्या दौर्यावर गेला होता. एकाच वेळी किमान ३० जणांना राष्ट्रीय क्रिकेट संघात स्थान मिळाले असले, तरीही अद्याप तेवढेच गुणवंत खेळाडू बाहेर वाट पाहत उभे आहेत, हेदेखील एक वास्तव आहेच.
काही वर्षांपूर्वी भारतीय संघातर्फे त्रिशतकी खेळी करणारा करुण नायर गुणी खेळाडू सध्या कोठे आहे? हादेखील एक प्रश्नच आहे. अनेक गुणी खेळाडू केवळ योग्य संधी न मिळाल्याने निवृत्ती तरी स्वीकारत आहेत किंवा एखाद्या परदेशातील ‘लीग’तर्फे खेळण्याचा पर्याय निवडताना दिसत आहेत. जे खेळाडू अंडर १९ संघातर्फे भारताचे प्रतिनिधित्व करतात, त्यापैकी अनेकांना भारतीय क्रिकेट संघामध्ये स्थान मिळाले आहे.
हे आतापर्यंत विराट कोहली, महंमद कैफ, शिखर धवन, युवराज सिंग यासारख्या खेळाडूंनी सिद्ध केले आहे. पण, उन्मुक्त चंदसारखे अनेक खेळाडू संधीपासून वंचित का आहेत, याचादेखील आगामी काळात शोध घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. भारतीय क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणावर गुणवत्ता भरली आहे. सर्वच खेळाडूंना योग्य वेळी योग्य संधी द्यायची असेल, तर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला एखाद्या विशिष्ट धोरणाची रचना करावी लागणार आहे. ज्याप्रमाणे इंग्लंडमध्ये कोटा सिस्टीमने काही खेळाडूंना संधी दिली जाते. त्या कोटा सिस्टीमचा वापर आता भारतासाठीही करण्याची वेळ आली आहे का? याचाही विचार यानिमित्ताने होणे आवश्यक आहे.