नवचैतन्याची नांदी...

28 Aug 2021 23:19:51

indian olymic_1 &nbs
‘टोकियो ऑलिम्पिक’मध्ये भारतीयांनी केलेल्या कामगिरीनंतर आता ‘टोकियो पॅरालिम्पिक’कडे बघण्याचा सर्वांचा दृष्टिकोन बदलला आहे. ‘राष्ट्रीय क्रीडादिना’निमित्त जाणून घेऊया काय आहे भारत आणि पॅरालिम्पिकचा इतिहास...
आज राष्ट्रीय क्रीडा दिन. देशाच्या वाटचालीत मोलाचा वाटा असणार्‍या क्रीडा प्रकारात भारताने आतापर्यंत खूप मोठी प्रगती केली आहे. भारतीय खेळाडूंचे नाव जगातील सर्वोच्च याद्यांमध्ये घेतले जाते. नुकतीच भारतीय खेळाडूंनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून देशाची मान उंचावली आहे. तसेच, क्रिकेटसारख्या ग्लॅमरस खेळाची सावली सोडत भारतीयांनी ‘ऑलिम्पिक’कडे लक्ष केंद्रित केले. त्याचे फलित म्हणजे भारतीयांनी त्यानंतर होणार्‍या ‘पॅरालिम्पिक’कडेही पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. आता टोकियो येथे सुरू असलेल्या ‘पॅरालिम्पिक २०२० ’मध्ये भारतीय खेळाडू किती पदके देशासाठी मिळवतात, याकडेही सर्वांचा लक्ष लागले आहे. योगायोग म्हणजे राष्ट्रीय क्रीडा दिनादिवशीच ‘पॅरालिम्पिक’मध्ये भारताची सर्वोच्च कामगिरी व्हावी, हीच आपल्या सगळ्यांची भावना आहे. यानिमित्ताने जाणून घेऊया ‘पॅरालिम्पिक’ आणि भारताचा इतिहास, सद्यःस्थिती आणि येत्या काळात ‘पॅरालिम्पिक’मध्ये कसे असेल भारताचे भविष्य...

असा आहे ‘पॅरालिम्पिक’चा इतिहास
अनेक वर्ष हजारो खेळाडू चार वर्षांतून एकदा येणार्‍या ‘पॅरालिम्पिक’ स्पर्धेसाठी तयारी करत असतात. या स्पर्धांमध्ये पदक मिळवणे म्हणजे देशासाठी आणि देशातील प्रत्येक खेळाडूसाठी एक अभिमानाची गोष्ट असते. शेकडो देशातून हजारो स्पर्धक आपले नशीब आजमावण्यासाठी या स्पर्धेत येतात. पण, या ‘ग्लोबल इव्हेंट’ची सुरुवात मात्र दुसर्‍या महायुद्धादरम्यान होणार्‍या एका छोट्याशा कार्यक्रमापासून झाली असून, सध्या २१ व्या शतकातील ही सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा मानली जाते. युद्धादरम्यान जखमी सैनिकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या स्पर्धेची सुरुवात झाली. दिव्यांग खेळाडूंचे मानसिक संतुलन व्यवस्थित राहावे यासाठी या स्पर्धेची खूप मोठी मदत झाली. युकेमधील स्टोक मंडेविले हॉस्पिटलमध्ये न्यूरोलॉजिस्ट डॉ. लुडविग गुट्टमन यांनी ‘रिहॅब्लिटेशन’ कार्यक्रमासाठी क्रीडा हा विषय निवडला होता. त्यावेळी या स्पर्धेला व्हीलचेअर गेम्सचे नाव दिले गेले होते. दिव्यांग सैनिकांचे मनोबल वाढावे म्हणून एक छोटी स्पर्धा सुरू करण्यात आली होती.

१९४८ मध्ये लंडनमध्ये ‘ऑलिम्पिक’चे आयोजन केले होते. याचवेळी डॉ. गुट्टमन यांनी इतर रुग्णालयासोबत ‘व्हीलचेअर गेम्स’चे आयोजन केले होते. ही संकल्पना अनेक जणांना आवडली. बघता बघता इतर रुग्णालयांनीदेखील या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला.लंडनमध्ये प्रसिद्धी मिळाल्यानंतर या स्पर्धेची आंतरराष्ट्रीय दखल घेण्यात आली. १९६० मध्ये रोममध्ये पहिल्या ‘पॅरालिम्पिक’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी सैनिकांसोबतच सामान्य नागरिकांनादेखील या खेळांमध्ये भाग घेण्याची परवानगी देण्यात आली. यामध्ये तब्बल २३ देशांमधील ४०० खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला होता.सध्या ‘पॅरालिम्पिक २०२० मध्ये तब्बल १६३ देशांनी भाग घेतला आहे. तर तब्बल चार हजारांहून अधिक स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला आहे.

‘पॅरालिम्पिक’मध्ये भारत
१९६० मध्ये ‘पॅरालिम्पिक’ला आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरुवात झाल्यानंतर १९६८ मध्ये इस्रायलमधील तेल अवीव येथे आयोजित स्पर्धांमध्ये भारताने पदार्पण केले. यावेळी फक्त दहा खेळाडूंनी सहभाग घेतला होता. मात्र, एकही पदक भारताला जिंकता आले नव्हते. त्यापाठोपाठ १९७२ मध्येही पश्चिम जर्मनीमधील हायडेलबर्ग येथे आयोजित स्पर्धेमध्ये भारताने सहभाग घेतला होता. यावेळीही दहा खेळाडू स्पर्धेसाठी पाठवण्यात आले होते. यावेळेस भारताने पदकाचा पहिला नारळ फोडला आणि मुरलीकांत पेटकर यांनी भारतासाठी ५० मीटर ‘फ्री स्टाईल स्वीमिंग’मध्ये पहिले सुवर्ण पदक पटकावले. हे या स्पर्धेचे पहिले आणि एकमेव पदक ठरले. हा क्षण सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा ठरला. त्यानंतर भारताने १९८४ मध्ये ‘पॅरालिम्पिक’ स्पर्धेत भाग घेतला. यानंतर प्रत्येक स्पर्धेमध्ये भारताने सलग आपला सहभाग दाखवला आहे. १९८४ साली झालेल्या ‘पॅरालिम्पिक’मध्ये भारताकडून चार पदकांची कमाई केली. यामध्ये दोन रौप्य आणि दोन कांस्य पदक भारतीय खेळाडूंनी पटकावले होते. यावेळी 54 सहभागी देशांपैकी भारताने पदक तालिकेत ३७ वे स्थान पटकावले होते.

या स्पर्धेनंतर प्रत्येक ‘पॅरालिम्पिक’ स्पर्धांमध्ये भारताने सहभाग घेतला. मात्र, तब्बल चार ‘पॅरालिम्पिक’ स्पर्धांमध्ये भारताला एकही पदक पटकावता आले नाही. २००४ साली ग्रीसच्या अथेन्स येथे झालेल्या ‘पॅरालिम्पिक’ स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पदकांचा दुष्काळ संपवला. यावेळी १२ खेळाडू या स्पर्धेसाठी पात्र ठरले होते. यामध्ये भारतीय भालाफेकपटू देवेंद्र झाझारिया यांनी सुवर्ण पदक पटकावले, तर दुसरीकडे पॉवरलिफ्टिंग प्रकारात ५६ किलो वजनी गटामध्ये भारताच्या राजिंदर सिंग यांनी कांस्य पदक पटकावत इतिहास रचला. यावेळी भारत हा १३६ सहभागी देशांपैकी ५३ व्या स्थानावर होता. या स्पर्धेनंतर जगाचा ‘पॅरालिम्पिक’ स्पर्धांमध्ये भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला होता.

२०१६‘रियो पॅरालिम्पिक’ भारतासाठी ठरला टर्निंग पॉईंट
२००८ मध्ये बीजिंग येथे झालेल्या ‘पॅरालिम्पिक’ स्पर्धांमध्ये भारताला एकही पदक मिळाले नाही. तर, २०१२ मध्ये लंडन येथे झालेल्या ‘पॅरालिम्पिक’ स्पर्धेमध्ये फक्त एकमेव रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींमध्ये काहीसे निराशेचे वातावरण होते. विशेष म्हणजे, ‘ऑलिम्पिक’ आणि ‘पॅरालिम्पिक’ या दोन्हीही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताला चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे समाजमाध्यमांतून अनेक प्रश्न विचारले जात होते. मात्र, २०१६ साली ब्राझीलच्या रियो इथे झालेल्या ‘पॅरालिम्पिक’ स्पर्धेमध्ये भारताची कामगिरी सर्वोत्कृष्ट ठरली. हे वर्ष भारतीय पॅरा खेळाडूंसाठी आशादायी, एका नवी उमेद निर्माण करणारे ठरले.

ब्राझील येथील रियोमध्ये आयोजित ‘पॅरालिम्पिक’ स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंनी तब्बल चार पदके पटकावली. यामध्ये तब्बल दोन सुवर्ण पदक, एक रौप्य आणि एक कांस्य पदकांचा समावेश होता. ही चारही पदके ‘अ‍ॅथलेटिक्स’ या प्रकारात आली होती. यावेळी पाच विविध खेळांमध्ये १९ खेळाडूंची निवड या स्पर्धेसाठी करण्यात आली होती. मरियप्पन थंगावेलू या भारतीय खेळाडूने उंच उडी प्रकारात पहिले ऐतिहासिक सुवर्ण पदक पटकावले. त्यानंतर भारतीय भालाफेकपटू देवेंद्र झाझरिया याने स्पर्धेतले दुसरे सुवर्ण पदक पटकावत इतिहास रचला. यामुळे ‘पॅरालिम्पिक’ स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूही चांगली कामगिरी करू शकतात, याची जाणीव जगाला करून दिली. त्यानंतर दीपा मलिक यांनी शॉट पुट प्रकारात रौप्य, तर वरुण सिंग भाटी यांनी ‘हाय जम्प’मध्ये कांस्य पदक पटकावले. ‘पॅरालिम्पिक’ स्पर्धांच्या इतिहासात ही भारताची सर्वोच्च कामगिरी ठरली.

‘पॅरालिम्पिक’मध्ये नवचैतन्याची नांदी
 
२०१६ मध्ये ‘पॅरालिम्पिक’ स्पर्धेत भारतीयांची कामगिरी ही सध्या सुरू असलेल्या ‘पॅरालिम्पिक २०२० ’ आणि पुढे भविष्यात होणार्‍या स्पर्धांकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्यास मदत करते. यावेळी ‘ऑलिम्पिक’ आणि ‘पॅरालिम्पिक’मधील खेळाडूंचे प्रोत्साहन वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील विशेष काळजी घेतली. याचा सकारात्मक परिणाम जसा ‘ऑलिम्पिक’मध्ये सात पदके मिळवून झाला, तसाच परिणाम आता ‘पॅरालिम्पिक’ स्पर्धांमध्येही दिसेल, अशी अपेक्षा सर्व भारतीय करत आहेत. यावेळी भारताकडून नऊ विविध प्रकारांमध्ये ५४ खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. चांगली सुरुवातदेखील झाली असून, आता निकाल 5 सप्टेंबरपर्यंत काय लागतो? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 
विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारने ‘ऑलिम्पिक’ आणि ‘पॅरालिम्पिक २०२०’साठी राबवलेल्या नवनव्या धोरणांमुळे या खेळाडूंचे मनोबल वाढण्यास तर मदत होतेच. याशिवाय या खेळांकडे बघण्याचा दृष्टिकोनदेखील बदलेल, तसेच येत्या काळामध्ये अधिकाधिक पदके पटकावून भारत एक दिवस पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावेल, असे स्वप्न नक्कीच प्रत्येक भारतीय बघेल. या राष्ट्रीय क्रीडा दिनादिवशी ‘पॅरा’ खेळाडूंचे भारतीय क्रीडाविश्वातील योगदान अधोरेखित करण्याचा हा छोटासा प्रयत्न...





 
Powered By Sangraha 9.0