कोरोनाकाळातील टाळेबंदीमुळे मुंबई महानगर क्षेत्रातील उपनगरीय रेल्वेची विकासकामे देखील काहीशी मंदावली होती. परंतु, रेल्वे प्रशासनाने आता युद्धपातळीवर बरेचसे प्रकल्प पूर्णत्वास आणण्यासाठी कंबर कसली आहे. त्यानिमित्ताने उपनगरीय रेल्वेच्या विकासकामांचा घेतलेला हा आढावा...
सर्वांची जीवनदायिनी अशी मुंबईतील उपनगरीय रेल्वेसेवा कोरोनामुळे बंद पडल्यापासून महामुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. तरी दि. १५ ऑगस्टपासून कोविड प्रतिबंधात्मक लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या प्रवाशांना रेल्वे प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. पण, या टाळेबंदीच्या काळात मुंबई उपनगरीय रेल्वेचे चार महिन्यांत तब्बल ५३९ कोटी रुपयांचे (पश्चिम रेल्वेचे २८९ कोटी व मध्य रेल्वेचे २५० कोटी उत्पन्न बुडाले आहे.) नुकसान झाले आहे आणि पुढेही होत राहणार आहे.मान्सूनच्या काळात रेल्वेरुळांवर पाणी साचण्यामुळे ठप्प होणारी वाहतूक आणि अतोनात गर्दीची समस्या तर उपनगरीय रेल्वेच्या अगदी पाचवीला पूजलेली. पण, एकूणच रेल्वे सुधारणेसाठी गाड्यांचा वेग वाढवणे, वेळापत्रकाचे काटेकोर पालन करणे, प्रवाशांना विविध सुविधा पुरविणे व प्रवासी सुरक्षेकडेही तितकेच लक्ष द्यायला हवे. पण, कोरोना काळात नेमकी रेल्वेसमोर नेमकी कोणकोणती संकटे उभी राहिली, त्याचा आढावा घेऊया.
सर्वप्रथम कोरोनामुळे मजुरांची संख्या रोडावल्याने विकासकामे व तांत्रिक बाबतीत विकासकामांना विलंब झाला. तसेच पावसाळ्यामुळेही अनेक विकासकामे रेंगाळली आहेत. रुळावर पाणी साचू नये म्हणून, झाडाच्या फांद्या, ओव्हरहेड वायर्स रुळावर पडून उपनगरीय रेल्वेसेवा कोलमडू नये म्हणून रेल्वेकडून खटपट सुरू आहे. रेल्वे रुळांजवळील बंदिस्त नाले साफ करण्याची व्यवस्था पालिकेच्या अधिकार्यांबरोबर चर्चा करून प्रशासनाला करावी लागली. तसेच पावसाचे पाणी रुळांवर आल्याने जुलै महिन्यात कल्याणसह काही रेल्वे स्थानके जलमय झाली होती. हिंदमाताच्या ठिकाणचे पाणी रोखण्यासाठी दादर व प्रभादेवी स्थानकामध्ये पर्जन्यजल वाहिन्यांचे काम बोगद्यातून टाकण्याचे काम पालिकेच्या अधिकार्यांबरोबर सुरू झाले आहे, ते आगामी दोन महिन्यांत पूर्ण होईल. रेल्वेमार्गातील पूरस्थितीवर ‘ड्रोन’ कॅमेर्याद्वारे टेहळणी करण्याचे कामदेखील सुरू आहे. प्रवाशांना जलमय अवस्थेतून सुरक्षित ठिकाणी पोहोचविण्याचे काम आता बोटपथके करणार आहेत. मध्य रेल्वेमार्गावरील गाड्यांवर आता इलेक्ट्रिक वायपर बसविले जाणार आहेत, ज्यामुळे मोटरमनना रुळ अगदी स्पष्टपणे दिसतील.पण, एकूणच टाळेबंदीच्या काळात मजुरांची संख्या रोडावल्याने रेल्वेची विकासकामे मंदगतीने सुरु होती. याच काळात रेल्वे रुळांवर पडलेले स्क्रॅप साफ करण्याचे कामदेखील मंदावले. मान्सूनपूर्व कामाची गतीदेखील काहीशी खुंटली. दादर व इतर काही स्थानकांतील छतगळतीची कामे अजूनही सुरु आहेत. तसेच आता रेल्वे स्थानकांतील गर्दी वाढल्यामुळे गर्दीच्या नियमनाचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
मध्य व पश्चिम रेल्वेवरील १५ ते २० टक्के महिला प्रवाशांसाठी रेल्वेसेवेत (म्हणजे घुसखोरी, गर्दुल्ल्यांचा उपद्रव, अश्लील हावभाव, विनयभंग इत्यादी) भीतीयुक्ततेत वाढ झाली आहे. २०१९ ते जुलै २०२१ या काळात मध्य व पश्चिम रेल्वेवर एकूण २७० गुन्हे नोंदले गेले आहेत. त्यामुळे रेल्वेला प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे विशेषत्वाने लक्ष द्यावे लागणार आहे. त्यातच लोकल गाड्यांमधील गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत महिलांना तत्काळ मदत मिळावी म्हणून ‘सीसीटीव्ही’बरोबर टॉकबॅक यंत्रणा बसविण्याचे काम धीम्या गतीने पुढे सरकत आहे.कोरोनाकाळातील निर्बंधांमुळे ठाणे-दिवा मार्गाचे कामदेखील लांबणीवर पडले आहे. मुंबई रेल्वे विकास मंडळातर्फे पाचव्या व सहाव्या मार्गाचे काम ठाणे खाडीवर सुरू आहे. तसेच हार्बरवरील अत्याधुनिक सिग्नल यंत्रणांची कामेदेखील टाळेबंदीमुळे खोळंबली आहेत. कल्याणपुढील कसार्यापर्यंत १५ डबे गाड्यांचा विस्तार करण्याच्या सुकर प्रवासाचे स्वप्न पूर्णत्वास येण्यासाठी आणखीन काही कालावधी जावा लागणार आहे. दुसरीकडे प्रवाशांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने पूर्ण वातानुकूलितऐवजी अर्धवातानुकूलित लोकल पर्यायाबाबतचे काम गेल्या तीन महिन्यांपासून रखडले आहे. स्थानकातील प्रवेशद्वारांवर सुरक्षा व्यवस्था ढिसाळ झाली आहे. फेरीवाले व गर्दुल्ल्यांचा वावर जवळपास सर्वच स्थानकांबाहेर वाढलेला दिसतो. तसेच पनवेल-कर्जत रेल्वेमार्गाचे काम कूर्मगतीने सुरू आहे. जोडणीसाठी भूसंपादन प्रक्रिया रखडल्याने कामाचा खोळंबा झाला आहे.
उपनगरीय रेल्वेकरिता विविध सुविधा दृष्टिपथात येत आहेत. गर्दी व संपर्क टाळण्याच्या नियोजनाविषयी बोलताना रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल म्हणाले की, “कोरोनाबाधितांच्या वाढीव संख्येमुळे रेल्वेने ‘आयसोलेशन’ डबे सज्ज ठेवले आहेत. यात ‘ऑक्सिजन’ पुरविण्याचीही सोय केलेली आहे. राज्य शासनाने मागणी केल्यावर २४ तासांच्या आत हे डबे उपलब्ध करून देता येतील. पश्चिम रेल्वेने असे ४१० डबे तयार करून रेल्वेच्या स्थानक परिसरात १२८ डबे पार्क करून ठेवले आहेत. विशेष लांबपल्ल्याच्या गाड्यांकरिता ९१ डबे तयार ठेवले आहेत.”गर्दी लवकर कमी व्हावी म्हणून दादर स्थानकात प्रवेशद्वारात वाढ, स्कायवॉकशी जोडणी केली आहे. अन्य स्थानकांना अंधेरी, ‘सीएसएमटी’, कल्याण, ठाकुर्ली येथेही अशा सुविधा केल्या आहेत.
रेल्वे स्थानकात चेहरे ओळखणारे (फेस रेकग्निशन) कॅमेरे ठेवले आहेत. पश्चिम रेल्वे स्थानकात असे २७० नवीन कॅमेरे आहेत. या ‘सीसीटीव्ही’ कॅमेर्याने गर्दीचे नियोजनही शक्य होते. कॅमेर्यांची संख्या वर्षभरात २,७२९पर्यंत वाढवण्याचेही नियोजन आहे.
पुढील वर्षी मध्य रेल्वेवरील सरकत्या जिन्यांची संख्या १००हून अधिक होईल. एका मिनिटात या जिन्यावरून ५०० ते एक हजार जण चढू-उतरु शकतील. वृद्ध, अपंग आणि गर्भवती महिलांकरिता विविध ठिकाणी ४० उद्वाहकांचीही सोय केली आहे. मार्च २०२२ पर्यंत आणखी १०० उद्वाहक बसविले जातील.
मध्य रेल्वेच्या २०८ गाड्यांमध्ये प्रशासनाने ‘सीसीटीव्ही’ बसविले आहेत, तर १२० गाड्यांमध्ये पॅनिक बटने बसविली आहेत. २४ अधिक गाड्यांना लवकरच ती बसविली जातील. पश्चिम रेल्वेच्या ८७ गाड्यांना पॅनिक बटने बसविली आहेत, त्यातील २७ महिलांच्या गाड्यांकरिता आहेत. तसेच १९० गाड्यांमध्ये ‘सीसीटीव्ही’ बसविले आहेत, त्यापैकी १३० महिला गाड्यांना आहेत. २०८ जादा गाड्यांना बसविण्याचे काम सुरू आहे.अंधेरी ते विरार रेल्वे गाड्यांना १५ डबे जोडून १२ डब्यांच्या गाडीत तीन हजार प्रवासी तर गर्दीच्या वेळी ५,५०० प्रवासी प्रवास करु शकतील. १५ डब्यांच्या गाडीत ४,२०० प्रवासी असतील, तर गर्दीच्या वेळी सात हजार प्रवाशांना सामावून घेण्याची त्यांची क्षमता असेल. या १५ डब्यांच्या प्रकल्पाला ५९.५८ कोटी खर्चाचा अंदाज आहे. फलाट विस्तारीकरण २७ ठिकाणी दहा मीटर ते १८० मीटरपर्यंत करावे लागणार व सिग्नल २८ जागेत व सहा पुलांचे बदल करावे लागणार आहेत.रेल्वेमार्गाखालून ४१५ मी. लांबीच्या पर्जन्य जलवाहिनीचे काम चार महिन्यांत पुरे होणार. त्यामुळे सॅण्डहर्स्ट रोड स्थानक या कामानंतर जलमय भीतीतून मुक्त होईल. तसेच ग्रँट रोड, महालक्ष्मी, चर्नी रोड, कल्याण, वांद्रे टर्मिनस, गोरेगाव, मुंबई सेंट्रल, कांदिवली, बोरिवली, अंधेरी स्थानकांमध्ये सुधारणा करून या स्थानकांना नवी झळाळी दिली जाणार आहे. मुंबई सेंट्रल स्थानकात प्रतीक्षालय व दादर व अन्य स्थानकांवर फॅमिली मॉलची उभारणी करण्यात येणार आहे. परळ व महालक्ष्मी स्थानकांरिता खासगी कंपनीच्या मदतीने खेळांच्या सुविधा पुरविल्या जाणार आहेत.
सध्या मध्य रेल्वेतील १६५ सेवेतील गाड्यांपैकी दहा गाड्यांमध्ये करमणुकीच्या व सलून सेवा प्रवाशांसाठी पुरविल्या जाणार आहेत. अशी सेवा पश्चिम रेल्वेवरही सुरू होणार आहे. कल्याण व गोरेगाव स्थानकात वायफायचा अधिक वापर झाला आहे. एप्रिल २०२१ पर्यंत सहा लाखांहून अधिक जणांनी रेल्वे स्थानकांवर वायफायचा वापर केला. मार्च २०२१ पासून मात्र सुरुवातीला ३० मिनिटे मोफत व पुढील काळाकरिता वायफायच्या वापरासाठी शुल्क भरावे लागणार आहे.पनवेल ते कर्जत नवीन दुहेरी उपनगरीय रेल्वेमार्गावर तीन बोगदे उभारण्यात येणार आहेत. एक बोगदा २.६ किमी, दुसरा व तिसरा २५० मी. लांबीचा असणार आहे. ही सेवा सुरू होण्याकरिता चार वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. याकरिता १०१ हेक्टर जमीन लागणार आहे. त्यापैकी २९ हेक्टर जमीन मिळणे बाकी आहे. कोरोनामुळे या कामाला विलंब झाला. या मार्गात उन्नत मार्गिका, बोगदा, फलाट, पादचारी पूल इत्यादी कामे करावी लागणार आहेत. पादचारी व अन्य कामांना सुरुवात झाली आहे.अशा तर्हेने उपनगरीय सेवा कामे विविध ठिकाणी सुरू आहेत. सर्व जणांना ही उपनगरीय रेल्वेसेवा लवकर सुरू होण्याची अपेक्षा आहे. पण, प्रवाशांना संपर्क टाळण्यासाठी शिस्तीचे प्रशिक्षण द्यावे लागणार आहे.