देवभाषेचा ‘अतुल’नीय सेवाव्रती

24 Aug 2021 22:56:26

manse_1  H x W:
नुकताच श्रावण पौर्णिमेला आपण संस्कृत दिन साजरा केला. त्यानिमित्ताने संस्कृत भाषेसाठी कार्यरत असणार्‍या नाशिकच्या प्रा. अतुल तरटे यांच्या कार्याविषयी...
भारताची प्राचीन भाषा, देवांची भाषा म्हणून संस्कृतची ओळख. मात्र, असे असले तरी संस्कृत ही एक अवघड भाषा असल्याचा समज अनेकांच्या मनात आजही कायम दिसतो. लोकांच्या मनातील हा समज कसा गैर आहे, हे आपल्या कार्यातून नाशिक येथील प्राचार्य अतुल अरविंद तरटे हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. देवभाषा असलेल्या संस्कृतची ओळख सर्वसामान्यांना व्हावी, यासाठी त्यांनी अतुलनीय कार्य नाशिकमध्ये केले आहे.तरटे यांचे शिक्षण ‘एमए’ (संस्कृत), ‘नेट’-‘सेट’ उत्तीर्ण असून त्यांची ओळख योग शिक्षक, संगणक तज्ज्ञ म्हणूनदेखील आहे. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक यांच्याशी संलग्न असलेल्या श्रीराम संस्कृत अध्ययन केंद्र, नाशिकमार्फत तरटे यांचे कार्य सुरू आहे. या संस्कृत महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून ते सध्या दायित्व सांभाळत आहेत. तत्पूर्वी तरटे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नऊ वर्ष पूर्णवेळ प्रचारक म्हणून दायित्व सांभाळत होते. या काळात त्यांनी पुण्यात हडपसर भागात प्रचारक, बार्शी तालुका प्रचारक, सोलापूर जिल्हा प्रचारक व अभ्यासिका प्रकल्पप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली. विविध महाविद्यालयांत व्याख्याने देत त्यांनी विद्यार्थी हितगुज साधत आपले विचार मांडण्याचे कार्यदेखील केले आहे.

‘श्रीराम संस्कृत अध्ययन केंद्रा’च्या माध्यमातून कालिदास संस्कृत विद्यापीठाचे विविध अभ्यासक्रम शिकविले जात आहेत. ज्यात प्रतिवर्षी ‘श्रीराम संस्कृत’चे विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकत आहेत. ‘संस्कृत आगम पदविका’ या अभ्यासक्रमात ‘श्रीराम संस्कृत’च्या विद्यार्थ्यांना २०१८ ते २०२०  अशी सलग तीन वर्षे कालिदास विद्यापीठाची सुवर्णपदकं प्राप्त झाली आहेत. याशिवाय, अनेक विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत. संस्कृत ‘आगम पदविका’, ‘बी.ए. संस्कृत विशारद’, ‘एम.ए. संस्कृत साहित्य स्पोकन संस्कृत प्रमाणपत्र अभ्यासक्रम’, ‘श्रीमद्भगवद्गीता प्रमाणपत्र अभ्यासक्रम’ या सर्व अभ्यासक्रमांत सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे कार्य तरटे करत आहेत. वय वर्ष १६ ते ६०वयोगटातील कोणत्याही व्यक्तीस संस्कृतच्या पूर्वज्ञानाशिवाय कोणत्याही अभ्यासक्रमात श्रीराम संस्कृत महाविद्यालयात प्रवेश घेता येऊ शकतो. विशेष म्हणजे नोकरदार, गृहिणी, अभियंता, वकील, डॉक्टर, ‘सी.ए.’, शिक्षक अशी कोणतीही व्यक्ती अथवा विद्यार्थी मुळापासून संस्कृत शिकण्यासाठी श्रीराम संस्कृत महाविद्यालयात प्रविष्ट होत असतात. अनेक व्यक्ती जे आपल्या शैक्षणिक आयुष्यात संस्कृत शिकू शकलेले नाहीत, अशा सर्वांना अत्यंत सुलभ व सोप्या पद्धतीने ‘ऑनलाईन’ किंवा ‘ऑफलाईन’ पद्धतीने संस्कृत शिकण्याची संधी ‘श्रीराम संस्कृत अध्ययन केंद्रा’च्या मार्फत निर्माण करून देण्यात आली आहे. ‘लॉकडाऊन’च्या काळात दोन हजारांपेक्षा अधिक लोकांना व्यवहारी संस्कृत व्हाट्सअ‍ॅप समूहाच्या माध्यमातून शिकविण्यात आले आहे. या निःशुल्क उपक्रमाचा लाभ भारतातीलच नाही, तर जगभरातील २० देशांतील संस्कृत शिकू इच्छिणार्‍या नागरिकांनी घेतला आहे. याशिवाय, दोन वर्षांपासून निःशुल्क स्तोत्र वर्ग सुरू असून, ज्यात वैदिक व लौकिक स्तोत्र शिकविण्यात येत असते. याचा लाभ अनेक नागरिकांनी घेतला आहे.

नवीन शैक्षणिक धोरणानुसार याही काळात संस्कृत भाषा वाढवण्यासाठी भविष्यात अधिक प्रयत्न करावे लागणार असल्याचे तरटे सांगतात. मुख्य म्हणजे, सरकारने विविध क्षेत्रात संस्कृत पदवीधर व उच्चशिक्षित व्यक्तीकरिता नोकरीच्या संधी निर्माण केल्यास संस्कृतकडे विद्यार्थ्यांचा कल वाढेल. प्राथमिक शिक्षणापासून संस्कृतचा अंतर्भाव करणे अत्यावश्यक असल्याचे तरटे आवर्जून नमूद करतात. प्राथमिक शिक्षणापासून संस्कृत अनिवार्य केल्यास समाजाच्या सर्वस्तरात संस्कृतची लोकप्रियता वाढीस तर लागेलच, याशिवाय समाजाचा नैतिक स्तर सुधारेल, येणार्‍या काळात गुन्ह्यांचे प्रमाण कमी होईल, अशी धारणा संस्कृतचा प्रसार व प्रचार होणे का आवश्यक आहे, हे सांगताना तरटे व्यक्त करतात. जसे प्राथमिक शिक्षणापासून संस्कृत अनिवार्य करणे आवश्यक आहे, तसेच संस्कृत पदवीधरांना करिअरच्या अधिकाधिक संधी सरकारने निर्माण करणे आवश्यक असल्याचे तरटे आवर्जून नमूद करतात. संशोधन क्षेत्रात संस्कृत-संगणक, संस्कृत-विज्ञान, संस्कृत-योग, संस्कृत-आरोग्य, संस्कृत- शेती, अर्थशास्त्र अशा क्षेत्रात नवनवीन संधी निर्माण करणे आवश्यक असल्याचे ते सांगतात. आगामी काळात संस्कृतला उत्तम दिवस यावेत म्हणून ‘श्रीराम संस्कृत’ कसोशीने प्रयत्नरत असणार असल्याची ग्वाहीदेखील ते देतात. प्रत्येक तरुणाने आपल्या आवडत्या विषयांत करिअर नक्कीच करावे. पण, ते करताना संस्कृतही शिकून आपल्या करिअरच्या विषयाशी संस्कृतचा संबंध कसा जोडता येईल, हेही पाहावे. संपूर्ण विश्व भारतीय तरुणांनी जगास संस्कृत-योग-आयुर्वेद या त्रिकुटाचे ज्ञान द्यावे म्हणून भारतीय तरुणांकडे आशेने बघतो आहे, असा संदेश तरटे युवकांना देतात.

 
संस्कृत ही भारताची प्राचीन भाषा आहे. मात्र, आपल्याच देशात ती आज कुठेतरी मागे पडत आहे. अशा स्थितीत तरटे यांचे कार्य हे नक्कीच अतुलनीय असेच आहे. त्यांच्या कार्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!



 
 




 
Powered By Sangraha 9.0