जनसेवा परमो धर्म:!

20 Aug 2021 20:08:41

smita  kale_1  
 

कोरोना महामारीच्या या संकटात डॉक्टरांना ‘देवदूत’ म्हणून नेमके का संबोधले जाते, त्याचे अक्षरश: प्रत्यंतर आले. कारण, या डॉक्टरांनीच देवदूताप्रमाणे कित्येकांना जीवनदान दिले. पण, त्याही पलीकडे जात ही डॉक्टरमंडळी केवळ उपचारांपुरती मर्यादित न राहता, त्यांनीही रस्त्यावर उतरुन गरजूंना सर्वप्रकारे मदतीचा हात दिला. त्यापैकीच एक म्हणजे मुंबईच्या डॉ. स्मिता काळे-बंडगर. त्यांच्या कोरोनाकाळातील कार्याचा परिचय करुन देणारा हा लेख...
 
 
महाराष्ट्रात गेल्या वर्षी आणि यंदाही कोरोनाची दाहकता दिसून आली. सर्व जगालाच अनभिज्ञ असणारा हा आजार सर्वत्र हाहाकार माजवून गेला. मात्र, वर्ष-दीड वर्षाच्या काळानंतर आता आपण सर्वच या आजाराशी लढण्यात काही अंशी यशस्वी ठरले आहोत. आज आपल्याकडे या आजारावर लसीदेखील उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे लवकरच देशावरचे कोरोनाचे संकट टळेल. मात्र, या संकटाशी खर्‍या अर्थाने दोन हात केले ते डॉक्टर, परिचारिका, आरोग्यसेवक, पोलीस, प्रशासकीय कर्मचारी यांनीच! आपल्यातील रुग्णसेवेचा वसा जपत वेळकाळ कशाचेही भान न बाळगता, कोरोनाकाळात भरीव सामाजिक कार्य डॉ. स्मिता काळे यांनी केले. आपल्या दोन सामाजिक संस्था आणि भाजप वैद्यकीय आघाडीच्या मुंबई संयोजकपदाची जबाबदारी त्या चोखपणे बजावत आहेत.
 
 
कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण होते. डॉक्टर असल्यातरी कोरोनासमान विषाणू त्यांनीही फक्त पुस्तकांत वाचला होता. मात्र, हे संकट येताच पहिली मागणी होती ती ‘पीपीई किट’ची. त्याशिवाय वैद्यकीय सेवा देणे शक्यच नसल्याचे स्मिता सांगतात. अशावेळी जनकल्याण समितीच्या आणि ‘निरामय संस्था’ यांच्या मदतीने डॉ. स्मिता यांनी यावर मार्ग शोधला. छोट्या क्लिनिक, मोठ्या रुग्णालयांच्या याद्या तयार करून या सर्वांना ‘पीपीई किट’ उपलब्ध करून दिले. भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय आघाडीच्या मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारीही असल्याने स्मिता यांनी स्वतःचे क्लिनिक आणि भाजपच्या माध्यमातून मदतकार्य सुरु केले. डॉ. स्मिता म्हणतात, “या काळात जरी मी भाजपचे काम करत असले तरी आम्ही सर्वांनी आपले राजकीय मतभेद बाजूला ठेवत एकत्र येत रुग्णसेवा केली. आम्ही डॉक्टर म्हणून जी शपथ घेतो ती पूर्ण करण्याची हीच ती वेळ, हे डोळ्यासमोर ठेवून आम्ही सर्व काम करत होतो.” जनकल्याण समिती आणि ‘निरामय फाऊंडेशन’च्या माध्यमातून उपलब्ध बेड, ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शन, प्लाझ्मा याची आवश्यकता भासताच ते उपलब्ध करून देण्यावर भर दिल्याचे डॉ. काळे सांगतात.
 

या काळात सर्वाधिक रुग्णालयांत रुग्णसेवाच नाही, तर डॉ. स्मिता यांनी गरजूंना मोठ्या प्रमाणात अन्नधान्य आणि जीवनावश्यक सामग्रीचे वाटपही केले. अनवाणी परगावी निघालेल्या मजुरांना चप्पल वाटप, पाणी व अन्नाचे वाटप करत डॉ. स्मिता यांनी रुग्णसेवेबरोबरच जनसेवेचा वसाही जपला. रस्त्याच्या कडेला राहणार्‍या, फिरणार्‍या गरिबांना अन्नधान्याचे वाटप काळे यांनी केले. दिवसाला ३० ते ४० हजार रुग्णांना मदत पुरवली. या काळात डॉ. स्मिता यांनी कोरोना विषाणूची माहिती देणारे व आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओ बनवत नागरिकांशी संवाद साधला.डॉ. स्मिता आणि नागरिक यांच्यामध्ये सतत होणार्‍या संवादातून हळूहळू कोरोनाविषयी सर्वसामान्यांमध्ये जागरूकता आली. नागरिक काळजी घेऊ लागले. याचबरोबर डॉक्टर सांगतील त्या सर्व गोष्टींचे पालनही करू लागले. डॉ. स्मिता आणि रणजित काळे यांची ‘काळेज ऑक्युपेशनल हेल्थ सेंटर’ ही स्वतःची कंपनीदेखील आहे. या कंपनीच्या माध्यमातून सहा जिल्ह्यांमध्ये ‘हेल्थ केअर सर्व्हिसेस’ पुरविल्या जातात. त्याचप्रमाणे प्रथमोपचार वैद्यकीय सुविधांबाबत प्रशिक्षण देण्याचे कामही या कंपनीच्या माध्यमातून केले जाते. हा सर्व अनुभव आणि सोबत असलेली टीम याच्या जोरावरच डॉ. स्मिता यांनी कोरोना लढ्यात योगदान दिले. स्वतःच्या संस्था आणि भाजप वैद्यकीय आघाडी मिळून २५० स्वयंसेवकांची टीम या काळात स्मिता यांच्यासोबत या सेवाकार्यात कार्यरत होती. फक्त मुंबईच नाही, तर पुणे, नाशिक आणि महाराष्ट्राच्या कानोकोपर्‍यातून येणार्‍या प्रत्येक फोनला प्रत्येक गरजूला आम्ही मदत पोहोचवली, असे डॉ. स्मिता सांगतात.
 
smita kale_1  H
 
या काळात नागरिक संभ्रमावस्थेत होते. ‘कोविड’व्यतिरिक्त आजार असणारे, गर्भवती महिलांना घरी जाऊन उपचार देण्याचे काम या काळात स्मिता यांनी केले. ‘ऑक्सिजन’चा तुटवडा हे सर्वात मोठे आव्हान होते. मात्र, जी ‘कोअर टीम’ बनवली होती, त्यांनी या काळात स्मिता यांना उत्तम सहकार्य केले. डॉ. स्मिता कोरोना काळातील एक अनुभव असा सांगतात, “मी वैद्यकीय आघाडीचे मुंबईत काम करत असताना मला नागपूरमधूनही मदतीसाठी फोन आला. रुग्ण गंभीर अवस्थेत होता, ते हॉस्पिटलच्या खाली कित्येक वेळ उभे होते. विकास महात्मे यांना संपर्क साधण्याचा मी प्रयत्न केला. मात्र, तोही होऊ शकला नाही. मी महात्मे सरांना फक्त एक मेसेज पाठवून ठेवला की, “माझ्या परिचयातील व्यक्तीला तत्काळ मदत हवी आहे. मला १५ मिनिटांनी त्या रुग्णाच्या नातेवाईकांचा फोन आला की, आम्हाला बेड मिळाला आहे. तुमचे खूप आभार. मला विकास महात्मेंचे खूप आभार मानायचे की, ही सर्व लोक देवदूतांप्रमाणे रात्रंदिवस सेवाकार्यात झोकून देऊन काम करत होती. खरे देवदूत आम्ही नाहीत, तर ही सर्व लोक आहेत.”
 
 
या काळात डॉ. स्मिता काळे आणि त्यांचे पती डॉ. रणजित काळे यांना रुग्णसेवा देत असताना कोरोनाची लागण झाली. यावरही त्यांनी यशस्वीपणे मात केली. कुटुंबानेही डॉ. स्मिता यांना या सेवाकार्यात साथ दिली. या काळात स्मिता यांना आपली मुले आणि सासू-सासरे यांना संसर्ग होऊ नये म्हणून कित्येक महिने त्यांच्यापासून दूर राहावे लागले. मात्र, स्मिता यांचा आठ वर्षांचा मुलगा अविस्वर आणि १७ वर्षीय मुलगी कुंजम यांनी एकमेकांची उत्तम काळजी घेत या काळात दाखवलेला समजूतदारपणा अत्यंत कौतुकास पात्र आणि प्रेरणादायी होता. ज्यावेळेस स्मिता यांचे पती कोरोना ‘पॉझिटिव्ह’ आले, तेव्हा त्यांना, स्वतःला सावरत या संपूर्ण कुटुंबाची काळजी घेत वैद्यकीय आघाडीची जबाबदारीही पार पाडायची होती. ती कुटुंबीय आणि मुलांनी दाखविलेल्या विश्वासामुळे पार पाडू शकल्याचे डॉ. स्मिता अभिमानाने सांगतात. कोरोनाकाळात भाजप वैद्यकीय आघाडी असेल किंवा स्वतःच्या सामाजिक संस्थेतील सहकार्‍यांच्या माध्यमातून आणि आपल्या जनसंपर्काच्या जोरावर डॉ. स्मिता काळे यांनी रुग्णसेवेत स्वतःला झोकून दिले. त्यांच्या या कार्याला दै. ‘मुंबई तरुण भारत’चा सलाम आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!
 
Powered By Sangraha 9.0