कोरोनाकाळात गोरगरीब, कामगार व अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांच्या पाठीशी उभे राहत भाजप नगरसेविका प्रतिभा राजेश मढवी यांनी माणुसकीच्या नात्याने अन्नदान, मास्क, सॅनिटायझर, औषधवितरण केले. ‘कोविड’ चाचणी शिबीर, तसेच लसीकरणाच्या मोहिमेत ज्येष्ठांसह सर्वच नागरिकांना मदत करून कर्तव्य तर बजावलेच; किंबहुना सामाजिक बांधिलकी जपत जणू त्या देवदूत ठरल्या. त्यांच्या या ‘प्रतिभा’शाली मदतकार्याचा लेखाजोखा...
कोरोना व ‘लॉकडाऊन’चा सर्वाधिक फटका बसला तो गरीब, मजूर, कामगार, रोजंदारीवर काम करणारे पुरुष-महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आदींना! त्यांच्या दोन वेळच्या भोजनाचाही प्रश्न निर्माण झाला. परिणामी, समाजकार्यासाठी सातत्याने धावणार्या नगरसेविका प्रतिभा राजेश मढवी यांनी ‘कोविड’काळातही मदतीचा हात पुढे केला. यात त्यांना पती डॉ. राजेश मढवी यांचीदेखील उत्तम साथ लाभली. सुरुवातीला गरजवंतांच्या दैनंदिन गरजा पूर्ण व्हाव्यात, यासाठी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यासह आरोग्य विषयक मदतीचा ओघ सातत्याने सुरूच ठेवला.
शक्य त्या आणि मागेल त्या प्रत्येकाला मदत करण्याचे निश्चित केल्याने प्रतिभा मढवी यांच्या सोबतीला त्यांचे सहकारीदेखील सज्ज झाले. अशाप्रकारे प्रतिभा यांच्यासह ‘ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठान’ व इतरांनी मिळून ‘लॉकडाऊन’ काळात हजारो कुटुंबांना रेशन किट व साहित्याचे वाटप केले. संपूर्ण नौपाडा प्रभागात प्रतिभा यांनी ही मदत पोहोचविण्याची दक्षता घेतली. मदत केलेल्यांमध्ये बहुतांश हातावर पोट असणारे, मोलमजुरी करणारे, वृत्तपत्र विक्रेते, ठाणे महापालिकेतील सफाई कर्मचारी, फवारणी कर्मचारी, डॉक्टर्स, बँक कर्मचारी आणि ठाणेकरांसह अन्य राज्यातील स्थलांतरित, झोपडीवासीयांचाही समावेश होता.
रेशनकिटचे वाटप करतानाच ज्येष्ठ नागरिकांसाठी फळांचे वाटप करण्याचेही नगरसेविका प्रतिभा मढवी यांनी ठरवले व त्यानुसार प्रभागातील घराघरांमध्ये फळांचे वाटप केले. तसेच सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टर्स व परिचारिकांनाही फळवाटप केले. हे करतानाच रुग्णालयांत जीव धोक्यात घालून काम करणार्या आरोग्य कर्मचार्यांची गैरसोय होऊ नये म्हणून परिसरातील आरोग्य कर्मचार्यांची सतत दोन महिने भोजनाची व्यवस्था ‘प्रतिभा महिला बचतगटा’च्या २० शाखांच्या माध्यमातून केली. वैद्यकीय क्षेत्रात आघाडीवर राहून कोरोनाशी दोन हात करणार्या ‘कोविड योद्ध्यां’च्या मदतीसाठी एक महिला असूनही डॉक्टर पतीसमवेत प्रतिभा या हिरिरीने सहभागी झाल्या.
अन्नधान्य-रेशन किटचे विनामूल्य वितरण करतानाच शेकडो गृहनिर्माण संस्थांना स्वस्त दरात भाजीवाटपाचे कामही प्रतिभा मढवी यांनी केले. ठाणेकरांच्या सोयीसाठी व सुरक्षेसाठी त्यांचे पती डॉ. राजेश मढवी यांनी ‘स्पोर्टिंग क्लब अध्यक्ष’ म्हणून पुढाकार घेतल्याने प्रतिभा यांनी भाजीविक्रेत्यांसाठी, भाजीमंडईसाठी सेंट्रल मैदानदेखील ठाणे महापालिकेला विनामूल्य दिले. सोबतच वाहतूक पोलीस, रेल्वे पोलीस, पोलिसांना चहा, बिस्कीट व नाश्त्याचे वाटपही त्यांनी केले.
कोरोनाविरोधात लढण्यासाठी हजारोंच्या संख्येने मास्कवाटप आणि बँक कर्मचार्यांना ‘फेसशिल्ड’, तर डॉक्टरांसाठी ‘पीपीई किट’चे वाटपही प्रतिभा मढवी यांनी केले. मास्कबरोबरच नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहावी, यासाठी प्रतिकारशक्तीवर्धक औषधवाटपाचा उपक्रमही त्यांनी राबविला. कोरोनाच्या पहिल्या लाटेत मढवी दाम्पत्याच्या वतीने ‘आर्सेनिक अल्बम-३०’ या होमियोपॅथिक औषधाचे मोफत वितरण करण्यात आले. तसेच कोरोना संशयितांची ओळख पटवण्यासाठी डॉ. राजेश मढवी, प्रतिभा मढवी व ‘ठाणे गौरव प्रतिष्ठान’च्या माध्यमातून अनेक आरोग्य तपासणी शिबिरांचेही आयोजन करण्यात आले. ‘ठाणे रेड क्रॉस सोसायटी’ येथे विनामूल्य वैद्यकीय सेवा दिली. तसेच, तब्बल ७०हून अधिक रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले व यातल्या रक्तसंकलनाने ‘कोविड’बाधितांसह इतर रुग्णांनाही रक्त उपलब्ध झाले.
सोबतच आपल्या प्रभागाचा परिसर रोगराईमुक्त, विषाणूमुक्त ठेवण्यासाठी नगरसेविका प्रतिभा मढवी यांनी जंतुनाशक फवारणीदेखील करवून घेतली. प्रभागातील गृहनिर्माण संस्थांना सॅनिटायझर स्टॅण्डचे वाटप केले, तर अनेक सोसायट्या व संस्थांना जंतुनाशक फवारणी मशीनचे वाटप केले. मुरबाड येथील ‘अवनी मूकबधीर शाळे’तील विशेष मुलांची काळजी घेत प्रतिभा मढवी यांनी डॉ. राजेश मढवी यांच्या माध्यमातून थर्मल गन, सॅनिटायझरसह आर्थिक मदतही केली. स्वच्छता अंगीकारावी यासाठी गृहनिर्माण संस्थांना कचरापेट्यांचेही वितरण केले. दक्ष नगरसेविका असलेल्या प्रतिभा मढवी स्वतः पुढाकार घेत प्रभागातील नाले, गटारे साफसफाई करून घेण्याचे काम चोख बजावले आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत प्रभागातील सुमारे २,५०० नागरिकांची आरोग्य तपासणी केली. शेकडो जणांना अत्यावश्यक कामासाठी ई-पास काढून देण्याचे कामही प्रतिभा यांनी, पती डॉ. राजेश मढवी यांच्या माध्यमातून केले. प्रतिभा मढवी यांना आपल्या सेवाकार्यात त्यांच्या सहकार्यांची, तसेच ‘प्रतिभा महिला बचतगटा’ची मोलाची साथ लाभली. त्यात सुरेंद्र हिर्लेकर, सचिन सकपाळ, राजेंद्र शहा, सुजित भट, रत्नेश मिश्रा, वर्षा महाडिक, जयप्रकाश मिश्रा, हेमंत सार्डेकर, नितीन लटके, सुनील कुलकर्णी, शिल्पा उतेकर यांचा सहभाग उल्लेखनीय. कार्यकर्ते काम करत असताना पक्षपातळीवर वरिष्ठांचे सहकार्य व मार्गदर्शन अत्यावश्यक असते, तसे ते प्रतिभा यांना वेळोवेळी लाभले. भाजप जिल्हाध्यक्ष आ. निरंजन डावखरे आणि आ. संजय केळकर यांच्यासह पती डॉ. राजेश मढवी यांनी वेळोवेळी सहकार्य व मार्गदर्शन केल्याने सेवाकार्यासाठी हुरूप आल्याचे प्रतिभा यांनी सांगितले.
जनतेचे पाईक असल्याची जाणीव ठेवून समाजसेवेत व्यस्त असताना नगरसेविका प्रतिभा मढवी यांचे कुटुंबाकडेही दुर्लक्ष झाले नाही. त्यांचे पती डॉ. राजेश हे मधुमेहाचे रुग्ण असतानाही कोरोनाकाळात त्यांनी केलेली जनसेवा अप्रतिम ठरली. याचे मोल दुसर्या लाटेत त्यांनाही चुकवावे लागले. डॉ. राजेश मढवी यांनाच कोरोनाने घेरले. पती रुग्णालयात भरती असतानाही खचून न जाता प्रतिभा या समाजासाठी एकखांबी तंबूप्रमाणे खंबीरपणे उभ्या ठाकल्या. त्यांची जनसेवा खंड न पडता अविरतपणे सुरूच होती.ज्येष्ठ नागरिक म्हणजे प्रतिभा मढवी यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय! ज्येष्ठ नागरिकांच्या मर्यादा लक्षात घेता, त्यांना संसर्गाचा धोका अधिक असल्याने प्रभागातील सर्वच ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी त्या आवर्जून घेतात. ‘लॉकडाऊन’च्या काळात एकट्या राहणार्या ज्येष्ठांना जीवनावश्यक वस्तू, तसेच औषधे त्यांना घरपोच करून देण्यासह प्रत्येकाच्या लसीकरणाची व्यवस्था त्यांनी केली. वेळप्रसंगी संबंधित ठिकाणी स्वतः जाऊन ज्येष्ठांची मदत आजही त्या करत असतात. त्यामुळेच, अनेक ज्येष्ठ नागरिक आपली व्यथा आणि आनंद हक्काने त्यांच्याजवळ व्यक्त करतात.
प्रतिभा मढवी यांनी आजवर नगरसेविका म्हणून विविध उपक्रम राबवले, याचेच संचित की त्यांचा लोकसंपर्क बळकट बनला आहे. महापालिका अधिकारी असो की सामान्य नागरिक, ज्येष्ठ असो की तरुणवर्ग, महिला असो की तृतीयपंथीय, तसेच दिव्यांग व वनवासी आश्रमशाळेतील बालक-बालिका, सफाई कामगार असो की वैद्यकीय अधिकारी, भाजी विक्रेते असो की व्यापारी वर्ग... आपल्या मितभाषी स्वभावामुळे ‘कोविड’काळात अत्यंत प्रभावी सेवा बजावल्याने त्या ‘प्रतिभा‘संपन्न देवदूत ठरल्या आहेत.
स्वभावाने मृदू व अबोल असल्या तरी प्रतिभा या कोरोनाकाळात मात्र प्रत्येक संकटाला सामोरे गेल्याने जणू रणरागिणीच भासल्या. प्रत्येक नागरिकाच्या, मग तो प्रभागातील असो वा अन्य कुठलाही, प्रत्येकाच्या संकटावेळी त्या धावून जात असल्याने त्यांना ‘कोविड’काळातील देवदूत म्हटल्यास वावगे ठरणार नाही.