समाजसेवेचा ‘संकल्प’

20 Aug 2021 20:01:14
 
Mahendra Patil_1 &nb
 

केवळ कोरोनाकाळातच नव्हे, तर ‘आपण समाजाचे देणे लागतो’ या भावनेने दर महिन्याला २५ हजार रुपये विविध समाजघटकांतील गरजूंना देण्याचे काम निळजे येथील महेंद्र वसंत पाटील करीत आहेत. त्याशिवाय विविध सामाजिक उपक्रमांमध्ये ते अग्रेसर असून ग्रामीण भागात तळागाळात त्यांनी आपल्या सेवाकार्याने मदतीचा झरा प्रवाहित केला आहे. तेव्हा कायम गरजूंच्या मदतीला धावणार्‍या महेंद्र पाटील यांच्या सेवाकार्याचा आढावा घेणारा हा लेख...
 
 
महेंद्र पाटील यांनी १९९९मध्ये ‘मास्टर ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग’चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर विविध अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतनमध्ये प्राध्यापक म्हणून कार्य केले. ते सध्या महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामध्ये साहाय्यक अभियंता श्रेणी-१ या पदावर स्थापत्य बांधकामे परिरक्षण विभाग, मेरी नाशिक येथे कार्यरत आहेत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शिक्षकी पेशाची आवड असल्याने त्यांनी विद्यादानाचे कार्य सुरू केले. महेंद्र हे शाळेत असताना त्या भागात केवळ सातवीपर्यंत शिक्षणाची सोय होती, तर पुढील शिक्षणासाठी मुलींना गावाबाहेर पाठविण्यास विरोध होता. त्यामुळे तेव्हापासूनच त्यांच्या मनात एखादी शिक्षण संस्था उभारण्याचा मानस होता. प्रथम त्यांनी ‘संकल्प बहुउद्देशीय सामाजिक संस्थे’ची २००३ मध्ये स्थापना केली. सुरुवातीला विविध सामाजिक कार्यांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला.
 
रक्तदान शिबिरासारखे उपक्रमही त्यांनी हाती घेतले. त्यानंतर २००४ मध्ये संस्थेची अधिकृतपणे नोंदणी केली. ‘संकल्प’ या संस्थेचे कार्यकारी संचालक म्हणूनही ते सध्या कारभार सांभाळत आहेत. त्याचबरोबर संस्थेच्या वतीने ते ‘आर्किटेक्ट’, ‘स्ट्रक्चरल डिझायनर’, ‘सर्व्हेअर’ म्हणूनही काम पाहतात. या माध्यमातून येणारी मिळकत आणि नोकरीच्या माध्यमातून येणारी मिळकत यावर संस्थेच्या कार्याचा डोलारा उभा आहे.लहानपणापासूनच महेंद्र वडिलांसोबत विविध सामाजिक कार्यात हिरिरीने सहभाग घेत होते. ‘संकल्प बहुउद्देशीय सामाजिक संस्थे’अंतर्गत त्यांनी ‘सर्वोदय बालविकास मंदिर’, ‘सर्वोदय प्राथमिक मराठी शाळा’, ‘सर्वोदय माध्यमिक विद्यालय’, ‘रवींद्रनाथ टागोर माँटेन्सरी’, ‘रवींद्रनाथ टागोर न्यू इंग्लिश स्कूल’, ‘सुमनताई वसंत पाटील कनिष्ठ महाविद्यालय (कला, वाणिज्य व विज्ञान)’, ‘संकल्प व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र’, ‘संकल्पसिद्धी महाविद्यालय कला व वाणिज्य’ची स्थापना केली आहे. तसेच या ‘संकल्प’ संस्थेच्या माध्यमातून विविध आरोग्य व रक्तदान शिबिरे घेण्यात येतात. सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रोत्सवही मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. महेंद्र यांनी शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांसाठी आपल्या मासिक वेतनातील प्रति महिना २५ हजार रुपये देणगी देण्याचा निर्णय घेतला आहे.
 
 शहापूर तालुक्यातील डोळखांबनजीक असलेल्या गांडूळवाड गावात ‘शोषित मुक्ती सेवा संघ’ संचालित आश्रमशाळा चालविली जाते. आपल्या मासिक मदतकार्य उपक्रमाची सुरुवात महेंद्र यांनी या आश्रमशाळेला एक धनादेश देऊन केली होती. यातून छोटा शिशू ते बारावीपर्यंतच्या १०० बालकांना मोफत शिक्षण देणे, तसेच आश्रमशाळेने विद्युत सोलर वॉटर हिटर, विद्युत वायरिंग नूतनीकरण, हायमास लॅम्प बसविले होते. विद्यार्थ्यांच्या पोषण आहारावरही खर्च केला होता. महेंद्र यांच्या गरजा कमी असल्याने त्या भागवून उरलेल्या पगाराची रक्कम सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी खर्ची करण्याच्या उद्देशाने त्यांनी २५ हजार रु. रक्कम देण्यास सुरुवात केली. या देणगी रकमेचा उपयोग सार्वजनिक वाचनालय, बालवाड्या, शाळा, व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र, महिलांसाठीचे उद्योग साहित्य व गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी केला जात आहे.
 
महेंद्र यांनी २००८ मध्ये सामाजिक वनीकरणाचा प्रकल्प हाती घेतला. त्याअंतर्गत माळरानावर अनेक झाडांची त्यांनी लागवड केली. केवळ ही झाडे लावलीच नाही, तर ती झाडे त्यांनी जगविलीही. अनेक वेळा समाजकंटकांनी ती झाडे तोडली, तसेच जाळण्याचाही प्रयत्न केला होता. तरीही त्यांनी आपले काम कायम सुरूच ठेवले. संस्थेच्या संरक्षक भिंती तोडणे, संस्थेच्या जागेत टेनिस-क्रिकेटच्या मैदानाच्या नावाने अतिक्रमण करणे, अशा विविध प्रकारचा त्रास महेंद्र यांना सहन करावा लागला. पण, या सर्व संकटांवर मात करीत आणि वेळप्रसंगी संघर्ष करीत, त्यांनी संस्थेच्या जागेत गोशाळा, गावातील होतकरू तरुणांकरिता कुक्कटपालन व मत्स्यपालन केंद्र उभे करून दिले. तसेच निळजे गावातील होतकरू तरुणांना सेंद्रिय शेतीकरिता जागाही त्यांनी उपलब्ध करून दिली.
 

Mahendra Patil 1_1 & 
 
 
महेंद्र पाटील ग्रामस्थांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतात. पण, कोरोनाच्या संकटामुळे अनेकांच्या हातचा रोजगार गेला. अनेकांवर उपासमारीची वेळ आली. या काळातही महेंद्र यांनी नागरिकांना मदत करीत सामाजिक जाणिवेचे दर्शन घडविले. गावातील लोकांना त्यांनी अन्नधान्याच्या किटचे वाटप केले. आर्थिक मदतही काही लोकांना केली. निळजे, काटई, कोळे, घेसर, निळजेपाडा, दिवा, खिडकाळी, देसाई, डायघर या परिसरातदेखील सामाजिक संस्था आणि वैयक्तिक पातळीवर मदतकार्य केले. मित्रपरिवार खासकरुन प्रदीप पाटील यांचीदेखील मदत झाल्याचे महेंद्र सांगतात. महेंद्र यांच्या मनात खूप काही करण्यासारखे आहे. पण, ते सांगण्यापेक्षा करून दाखविणे त्यांना जास्त चांगले वाटते. डोंबिवलीत एक मेडिकल महाविद्यालय असावे, हे त्यांचे स्वप्न आहे व त्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत.
 
 
कोरोनाकाळात गरजूंपर्यंत पोहोचल्याचा आनंद झाल्याचेे महेंद्र पाटील सांगतात. शिवाय गरजूंना मदत केल्यानंतर त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहून मनाला समाधान मिळाल्याची भावनाही ते व्यक्त करतात. पण, कोरोनाकाळात मदत करताना त्यांच्यासमोर अनेक आव्हाने होती. पण, त्यावर मात करून महेंद्र पाटील व त्यांची टीम गरजूंपर्यंत पोहोचत होती. सर्वात मोठे आव्हान तर या काळात कार्यकर्ते हाताशी असण्याचे होते. म्हणूनच प्रत्येक भागातील स्थानिक कार्यकर्त्यांशी संपर्क करून तेथील भागातील गरजूंची पाटील यांनी माहिती घेतली व त्या स्थानिक कार्यकर्त्यांसोबत जाऊन घरोघरी मदतीचे वाटप केले. या सगळ्या कामाची प्रेरणा आपले वडील वसंत पाटील आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असल्याचे महेंद्र अभिमानाने सांगतात.
 
 
 
कोरोनाकाळातील मदतकार्याविषयी बोलताना पाटील सांगतात की, “कोरोनाकाळात साहजिकच फार कोणी घराबाहेर पडत नव्हते. पण, मी गरजूंना मदत करण्यासाठी घराबाहेर पडत होतो. माझ्या कुटुंबीयांनी मला कधीच अडविले नाही. गरजूंना मदत करण्यासाठी घराबाहेर पडल्यामुळे अनेक लोकांच्या संपर्कात येत होतो. त्यामुळे कोरोना होण्याची भीती जास्त होती. कुटुंबातील कोणीही कोरोना होईल, अशी भीती मनात बाळगली नाही. याउलट हे काम भाग्याचेच आहे. आपल्याकडून जितके होईल तेवढे काम करीत राहावे. या कामात त्यांचे वडील वसंत, आई सुमन, भाऊ वीरेंद्र, बहीण सुजाता व पत्नी प्रियांजली यांनी चांगला पाठिंबा दिला.”
 
 
 
Powered By Sangraha 9.0