एक हात मदतीचा...

19 Aug 2021 21:49:32

Shyam Agarwal _1 &nb




रा. स्व. संघाचे संस्कार लहानपणापासून मनावर रुजल्याने भिवंडीच्या श्याम अग्रवाल यांचा सामाजिक कामात नेहमीच पुढाकार असायचा. त्यामुळे साहजिकच कोरोनासारख्या भीषण संकटातही नागरिकांच्या मदतीला धावून जात, त्यांना एक हात मदतीचा देण्याचे काम भिवंडीचे भाजपचे नगरसेवक श्याम अग्रवाल यांनी केले आणि गरजूंसाठी ते सर्वार्थाने ‘देवदूत’ ठरले. त्यानिमित्ताने त्यांच्या समाजकार्याचा परिचय करुन देणारा हा लेख...
 
 
श्याम अग्रवाल हे लहानपणापासूनच रा. स्व. संघाचे स्वयंसेवक. संघासोबतच विद्यार्थीदशेत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचेही त्यांनी काम केले. ‘भारतीय गोवंश रक्षण संरक्षण परिषद’ आणि ‘राजस्थान सेवा संघ’ या संस्थांचे श्याम अग्रवाल हे विश्वस्त आहेत. तसेच ‘नर्मदा देवी मनसुखराय अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्ट’चे अध्यक्षपद ते सध्या भूषवित आहेत. भाजपचा झेंडा त्यांनी अकरा वर्षांपूर्वी हाती घेतला आणि खर्‍या अर्थाने राजकारणात त्यांचा प्रवेश झाला.
 
 
मार्च २०२० मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या मंत्र्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सगळ्यांनाच मदत करण्याचे आवाहन केले होते. त्याअंतर्गत श्याम अग्रवालदेखील कोरोनाच्या पहिल्या लाटेपासूनच समाजकार्यात अग्रेसर होते.
 
 
‘लॉकडाऊन’ जाहीर झाल्यानंतर तब्बल नऊ हजार कुटुंबांना अन्नधान्य आणि मसाल्याच्या पदार्थांचे त्यांनी वाटप केले. त्यामुळे हातावर पोट असणार्‍या कुटुंबांना मोठा आधार मिळाला. ‘लॉकडाऊन’चा फटका बसलेल्या साडे तीन हजार कुटुंबांना प्रतिदिन तयार जेवणाचे डब्बेही त्यांनी पुरविले. यामध्ये कधी व्हेज पुलाव, तर कधी बिर्याणी यांचा समावेश होता. त्यांनी ५५ दिवस हा उपक्रम राबविला. ‘लॉकडाऊन’मुळे रोजीरोटी बंद झालेल्या काही मजुरांनी, कर्मचार्‍यांनी आपआपल्या गावी जाणे पसंत केले होते. त्यांच्यासाठी वाहतुकीची कोणतेही साधन व्यवस्था नसताना त्यांनी पायी आपले गाव गाठण्याचा प्रयत्न केला. अशा पायी गावी निघालेल्या मजुरांच्या एकवेळेच्या जेवणाची व्यवस्थासुद्धा श्याम अग्रवाल यांनी केली. त्याचबरोबर या मजुरांना फळांचे वाटपही केले.
 
 
भिवंडी शहराच्या बाहेर रांजणोली नाक्यावर असंख्य मजुरांना टरबूज, जेवणाची पाकिटे आणि पाण्याच्या बाटल्यांची त्यांनी मदत केली. केवळ अन्नदान न करता, त्यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याचीही पुरेपूर काळजी घेतली. नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढावी, यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी प्रभागातील नागरिकांना च्यवनप्राश, मध आणि ज्यूसचे वाटप त्यांनी परिसरात केले. प्रभागात १५ हजार मास्क आणि सॅनिटायझरचीही मदत पुरवली. सुरुवातीला कोरोनाची ‘आरटीपीसीआर’ चाचणी करण्याबाबत नागरिकांच्या मनात संभ्रम असायचा.
 
 
‘कोविड’ चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आली तर... या भीतीने लोक तपासणी करून घेत नसत. त्यामुळे नागरिकांमध्ये कोविड चाचणी संदर्भात जनजागृती करण्याचे काम त्यांनी केले. ‘कोविड’ काळात अनेकांना ‘ऑक्सिजन’ची कमतरता भासत होती. काही लोकांना बेडची सुविधा उपलब्ध होत नव्हती. इंजेक्शनही मिळत नव्हते. ‘लॉकडाऊन’मुळे अनेकांचा रोजगार बंद झाल्याने त्यांच्याकडे उपचारासाठी पैसेदेखील नव्हते. आरोग्य विमाही नव्हता. त्यामुळे ‘कोविड’मध्ये गरिबांना जेवण आणि उपचारही मिळण्यात अडचणी होत्या. त्यामुळे रुग्णांना ‘ऑक्सिजन’ आणि बेड मिळवून देण्याचे कामही अग्रवाल यांनी केले.
 

Shyam Agarwal _2 &nb

 
‘कोविड’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण हा प्रभावी उपाय असल्याने लसीकरणासाठी त्यांनी पुढाकार घेतला. दोन हजार नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घेतला. श्याम अग्रवाल यांच्या सामाजिक कामात त्यांना ‘ग्लोबल इंडियन फाऊंडेशन, दिल्ली पथ’ या सहयोगी संस्थेची खूप मदत झाली. कोरोना काळात महापालिकेचे संपूर्ण लक्ष कोरोना रोखणे आणि त्यांच्या उपचाराकडे लागले होते. त्यामुळे विकासकामांसाठी त्यांच्याकडे निधी नव्हता. ‘लॉकडाऊन’च्या काळात श्यामजींच्या प्रभागातील रस्त्यांची कामे बाकी होती. पावसाळ्याच्या आधी ड्रेनेजचे काम होणे अपेक्षित होते. पण, ते काम पूर्ण झाले नाही. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. रस्त्यांची ही कामे मार्गी लावण्यासाठी श्याम अग्रवाल हे सातत्याने पाठपुरावा करीत होते. आयुक्त आणि महापौरांच्या आदेशानुसार त्यांनी रस्ता तयार करून घेतला. मानसरोवर परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर कर भरतात. त्यामुळे लोकांना कर भरून ही सुविधा का मिळत नाही, असे त्यांना वाटत होते.
 
 
अशाप्रकारे श्याम अग्रवाल यांनी ‘लॉकडाऊन’ काळात केवळ नागरिकांना मदतीचा हात न देता, त्यांना चांगल्या सुविधाही दिल्या. मानसरोवरमध्ये प्रशासन ‘एसटीपी प्लांट’ आणत आहे. त्याला स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. तसेच श्याम अग्रवाल यांनीदेखील या प्लांटला विरोध केला. भिवंडीतील फेणा गावात पाण्याची मोठी समस्या होती. एकूणच लोकसंख्या वाढली, पण तेथील सुविधा त्याप्रमाणात वाढल्या नाहीत. नागरिकांची पाण्याची लाईन असावी, अशी मागणी होती. महापालिकेला करभरणा करुनही त्यांना पाणी विकत घ्यावे लागत होते. याकडे श्याम अग्रवाल यांनी विशेष लक्ष दिले. महापालिकेच्या माध्यमातून पाण्याची लाईन त्यांनी या परिसरात टाकली. त्यामुळे नागरिकांच्या चेहर्‍यावर आनंद दिसून आला. तसेच शौचालयही बांधून दिले.
 
 
श्याम अग्रवाल यांच्याकडून गरजूंना अन्नवाटप करण्यासाठी ‘किचन सेवा’ चालविली जात होती. त्यावेळी ‘कोविडचे नियम पाळले जात नाही’ असे म्हणत स्थानिक प्रशासकीय यंत्रणेकडून त्यांना त्रास दिला जात होता. पण, त्यांना या कामाचे महत्त्व समजून सांगितल्यानंतर त्यांना ते पटले. त्यानंतर त्यांच्याकडून कोणाताच त्रास झाला नाही. श्याम अग्रवाल यांना या कामात सचिन वेळेकर, प्रकाश चौधरी, राजेश पाटील यांची मोलाची साथ लाभली. श्यामजींच्या पत्नी सौ. पिंकी अग्रवाल यांनी त्यांना या सामाजिक कामात मोलाची साथ दिली. कोविड काळात श्याम अग्रवाल हे प्रभागातील नागरिकांना मदत करण्यासाठी सातत्याने घराबाहेर पडत होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनाही कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. पण, श्याम यांच्या कुटुंबीयांनी त्यांना कधीही सामाजिक काम करण्यापासून रोखले नाही. अशा या कोविड योद्ध्याच्या कामगिरीला दै. ‘मुंबई तरुण भारत’चा सलाम!


Powered By Sangraha 9.0