चीनची माघार!

17 Aug 2021 19:00:45

China  _1  H x


गेल्याच आठवड्यात भारत-चीन चर्चेची १२वी फेरी पार पडली. गलवान खोर्‍यातील सैन्याच्या झटापटीनंतर ही फेर्‍यांची तीव्रता वाढलेली दिसते. या चर्चेअंती असे ठरवण्यात आले की, गोग्रा हॉटस्प्रिंग या भागातून दोन्ही फौजा मागे जाणार असल्याचे ठरले होते. कारण, याच जागेवर दोन्ही फौजा अगदी जवळ आहेत.
 
 
जराशीही हिंसाचाराची चाहूल लागली तरीही उभय देशांतील संबंध पुन्हा ताणले जाऊ शकतात. त्यामुळे असा प्रकार होऊ नये, असे दोन देश मानतात. पण, चर्चेचे गुर्‍हाळ सुरूच ठेवायचे, अशी चिन्यांची ख्याती आहे. पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा पंतप्रधान होते, त्यावेळी अशीच रणनीती चीनने अवलंबली. ज्यावेळी चीनचा कांगावा लक्षात आला, तेव्हा खूप उशीर झाला होता. आपण नेमक्या कारवाया करत राहायच्या आणि एका बाजूला चर्चा चर्चा सुरू ठेवायची, ही जुनी पद्धत आहे. 2014 पासून ही पद्धत बदलत भारताने चीनबद्दल थोडी सावधगिरी बाळगण्यास सुरुवात केली.
 
 
मोदी सरकारच्या काळात तातडीने सीमेवर बांधकामे प्रगतिपथावर आली आहेत. यापूर्वीच्या सरकारांवर चीनचा दबदबा कायम असल्याने ही बांधकामे होत नव्हती. कारण, जर लडाख आणि सीमावर्ती भागात बांधकामे झाली आणि पुन्हा चीनने तिथे फौजफाटा तैनात केला तर पंचाईत नको म्हणून या विषयाला हातच घातला नाही. पण, तुम्ही बांधकाम केले नाही म्हणून चीन तिथे बांधकाम करणार असे नाही, चीन एक एक पाऊल पुढे टाकतच होता. मात्र, लडाखचा भाग विकसित व्हावा, यासाठी मोदी सरकारतर्फे विशेष प्रयत्न करण्यात आले. लडाखमध्ये अनेक रस्ते बांधण्यात आले. विकासकामे झाली. लडाखला पूर्व भारताला जोडण्याचे मोठे काम करण्यात आले.
 
 
लडाखला स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश घोषित करून तिथे एक वेगळी संरक्षण सज्जता देण्यात आली. ही बाब कळाल्यानंतर चीनच्या कुरापती सुरू झाल्या. गलवान खोर्‍यात झालेल्या झटापटीत चीनला एव्हाना कळून चुकले की, भारतीय सैन्याशी मुकाबला करणे तसे शक्य नाही. चीनमध्ये 20 वर्षे ‘वन चाईल्ड पॉलिसी’ असल्याने तिथे लोकसंख्या वृद्धत्वाकडे झुकलेली आहे. चिनी लोक हे समुद्रसपाटीपासून उंचावर राहत नाहीत. चीनचे सैनिक दक्षिण चीनहून येतात. दर दहा दिवसांनी तिथून बदली होते. कारण, त्यापेक्षा जास्त ते तग धरू शकत नाहीत.
 
 
विमान वाहतुकीबद्दलही भारत एक पाऊल पुढे आहे. उंचीवर विरळ हवेत जास्त वजन वाहून नेण्याची क्षमता त्यांच्या विमानांमध्ये नसते. चीनची विमाने दोन तास प्रवास करून येतात. याउलट भारतीय विमाने ही शस्त्रसज्ज असतात, जास्तीत जास्त वजन वाहून नेण्याची त्यांची क्षमता आहे. ‘राफेल’ आल्यानंतर ही परिस्थिती आणखी सुधारली आहे. त्यामुळे तशी चीनची भौगोलिक परिस्थिती पाहता आणि सध्याची सैन्य सज्जता पाहता तशी लढाईची वेळ चीनलाच नको आहे. भारतीय सैनिकांच्या शरीराची तंदुरुस्तता ही चिनी सैनिकांपेक्षाही अधिक आहे. विशेष म्हणजे, भारतीय सैनिकांशी लढण्याची चीनची तितकीशी मानसिकता नाही.
 
पण, सध्याची परिस्थिती पाहता चार तासांत पुन्हा चीन यापूर्वी होता त्या जागेवर येऊ शकतो, अशी स्थिती आहे. त्यामुळे चीनपासून गाफील राहता येत नाही. भौगोलिक रचनेचा विचार केला, तर भारताला सीमारेषेकडील भागात पोहोचण्यासाठी ‘राफेल’ने 20 मिनिटे लागतात. याउलट तिबेटमध्ये तैनात असलेल्या चिनी विमानांना येण्यासाठी दोन ते तीन तास लागतात. विमानतळ उंचीवर असल्याने विरळ हवेतून जास्त शस्त्रसाठा आणता येत नाही, अशी सध्या चीनची अडचण आहे. याउलट भारताची स्थिती फार मजबूत आहे. त्यामुळे वाटाघाटीच्या मार्गाचा पर्यायच चीनला बरा वाटू लागतो.
 
 
डेप्सांगमधून चीन मागे हटलेला नाही. त्यामुळे या चर्चेच्या फेर्‍या कायम राहतील त्यात दुमत नाहीच. पण, जेव्हा चीनशी लढाईची वेळ येते किंवा झटापटीसारख्या घटना घडतात, तेव्हा भारतीय सैनिकांचे मनोबल हे फार जास्त असते. आपले सैनिक सार्वभौमत्वासाठी लढत असतात. पण, चीनच्या विस्तारवादी मनसुब्यामुळे त्यांचे सैनिक जिथून आणले जातात, त्यांना इथे येण्यात स्वारस्य नसतं. लडाखचा भाग हा चीनचा नाहीच आहे, त्यामुळे देश राखण्याची भावना त्यांच्या मनात नाहीच, त्यामुळे जेव्हा जेव्हा अशी वेळ येईल, तेव्हा चीनची माघार ही अटळ ठरेल.




Powered By Sangraha 9.0