कलेच्या माध्यमातून संवेदना व्यक्त करणारा डॉक्टर

17 Aug 2021 22:50:18

rajiv pathak_1  


वैद्यकीय व्यवसाय सांभाळत कलोपासना करणार्‍या नाशिक येथील डॉ. राजीव पाठक यांच्याविषयी...
वैद्यकीय व्यवसाय म्हणजे सेवाभावी व्यवसाय नक्कीच आहे. मात्र, या व्यवसायात मानवी वेदनांवर उपचार करत असता संवेदना कुठेतरी हरवली जात असल्याचे काहीवेळा जाणवते. मात्र, कलासक्त व्यक्तिमत्त्व जेव्हा वैद्यकीय पेशात असते आणि या पेशात राहत आपली कलासाधना जोपासते, तेव्हा ते व्यक्तिमत्त्व निश्चितच वेगळेपण निर्माण करणारे असते.

नाशिक येथील कान, नाक, घसातज्ज्ञ डॉ. राजीव पाठक हे त्यापैकीच एक. त्यांचे शालेय शिक्षण व ज्युनियर कॉलेज सटाणा येथे पदवी व पदव्युत्तर शिक्षण बी. जे. मेडिकल कॉलेज पुणे येथे झाले. साहित्य, नृत्य, क्रीडा अशा सर्वच कलाप्रकारांत ते निपुण आहेत. ‘अमेरिकन कॉलेज ऑफ एक्झरसाईज’ची ‘एसीई’ ही ‘एरोबिक्स’ची पदवी त्यांनी प्राप्त केली असून ५५ अर्धमॅरेथॉनमध्ये त्यांनी सहभाग नोंदविला आहे. सातारा मॅरेथॉनमधील सहभागाने ‘गिनीज बुक’मध्ये त्यांची नोंद झाली आहे. गिर्यारोहण करत त्यांनी शंभरांहून अधिक डोंगरांची भ्रमंती केली असून नाशिक जिल्ह्यातील सर्व किल्ल्यांवर त्यांनी भेटी दिल्या आहेत. एका प्रतिष्ठित समूहातर्फे आयोजित ‘डी-३’ या ‘रिअ‍ॅलिटी’ नृत्यस्पर्धेत सलग दोन वर्षे पत्नी डॉ. राजश्री समवेत त्यांनी विजेतेपद पटकाविले आहे. कविता सादरीकरण, नाट्यलेखन यातदेखील त्यांचा कायमच सक्रिय सहभाग असतो. त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

त्यात डॉ. पाठक यांना वैद्यकीय सेवेतील सामाजिक जाणिवेसाठी २०१३ चा ‘डॉ. वसंतराव गुप्ते पुरस्कार’, अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे ‘सापेक्ष’ या नाटकाच्या लेखनासाठी ‘उत्कृष्ट नाटककार’ पुरस्कार, ‘बन बांबू’चे या नाटकाच्या लेखनासाठी ‘पंचरस’ हा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार, ‘घर’ कवितेसाठी काव्यलेखन राज्यस्तरीय पुरस्कार, ‘फिरोदिया करंडक, पुणे’ स्पर्धेत ‘प्रायोगिकता पुरस्कार’ आदींसारख्या अनेकविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
साहित्य आणि वैद्यकीय पेशाबाबत डॉ. पाठक यांचे अंतरंग जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ते सांगतात की, “सटाणा येथे असलेल्या वाचनालयामुळे त्यांना लहानपणीच वाचनाची गोडी लागली आणि वैद्यकीय शिक्षण घेताना वाढत गेली.” कवी ग्रेस यांचे ’संध्याकाळच्या कविता’ हे पुस्तक त्या काळी केवळ पाच रुपये किमतीला त्यांनी घेतले आणि तिथूनच त्यांचा वाचनप्रवास समृद्ध होण्यास सुरुवात झाली. कधी एकांत रेखावा, कधी लोकांताची रीत, हे या कवीकडून आपण शिकल्याचे ते सांगतात. तो एकांत, तो लोकांत, ते पाच रुपयांचे कर्ज मला लिहिण्यासाठी उद्युक्त करत असल्याची भावना ते व्यक्त करतात.

जन्म, जगणे आणि मृत्यू या माणसाच्या प्रवासातील नेमक्या आपत्ती प्रसंगात सहयात्री म्हणून कुठल्याही डॉक्टरला सहभागी व्हावे लागत असते. अशा क्षणी मानवी स्वभावातील एरवी व्यक्त न होणारे कंगोरे डॉक्टरांदेखत लख्खपणे उजळून निघतात. सगळेच डॉक्टर हे अनुभवतात. काहीजण ते अभिव्यक्त करतात. जगण्यातील हा संघर्ष म्हणजेच तर नाटक असल्याचे डॉ. पाठक सांगतात. त्यामुळे नाटक हा माझ्या दृष्टीने व्यक्त होण्याचा पट असल्याचे ते नमूद करतात. त्यांच्या सगळ्या नाटकांत वैद्यकीय संदर्भ असण्याचे कारण तेच असावे, अशी त्यांची धारणा आहे. प्रत्येक माणसाचे आयुष्य म्हणजे कहाण्यांचे एक गाठोडे असते. ते उलगडून पाहण्याची आवड आणि सवड दोन्ही असतील, तर जगण्यातले नाटक सहज सापडते.
 
 
अनुभवांची पुनर्निर्मिती ही कलावंतांची रंगभूमी मानली जाते. गोळीबंद ‘क्राफ्टिंग’ करण्याची कसरत हा त्यांना आवडणारा भाग. सृजननिर्मितीचा आनंद तर आहेच, पण त्या पुढचे नाटक हे ‘टीमवर्क’ असते. आपल्या चमूसमवेत होणार्‍या चर्चा, नाटक उभे राहण्यातले ‘हॅपनिंग’ हा त्यासोबत मिळणारा ‘बोनस’ आहे, अशीच भावना डॉ. पाठक यांची आहे. ’चरनवै मधु विन्दति’नुसार निसर्ग भटकंती जीवनातील मध वेचण्याच्या प्रयत्नांचा एक भाग असल्याचे डॉ. पाठक सांगतात.कोरोनामुळे आज अनेक कलाकार अडचणीत आहेत. रंगभूमीवर अजूनही असलेली बंदी, तर आश्चर्यकारक असल्याचे ते सांगतात. या काळात कलेला मिळणारा प्रतिसाद, लोकमान्यता, राजमान्यता यापुढेही आकुंचित होण्याची भीती व वाटत असल्याची भावना ते व्यक्त करतात.
 
 
“वैद्यकीय क्षेत्रातदेखील कला ओतप्रोत समाविष्ट असते. केवळ उपचार नव्हे, तर रुग्णसंवाद हीदेखील एक कला आहे. प्रत्येकाला ती जमतेच असे नाही. उलट विद्यार्थीदशेत कलेची जाण असणारे कलाकार शिक्षण घेऊन वैद्यकीय क्षेत्रात आले, तर चांगले डॉक्टर बनू शकतात,” असे मत डॉ. पाठक व्यक्त करतात.‘स्पिरीट’चा दर्प, मोघम आणि मुद्द्याचे बोलणे, आजाराशी संबंधित असणारी अवघड भाषा अशी काही अंगे ही वैद्यकीय सेवेची असतात. त्यात राहूनदेखील डॉ. पाठक यांची कलासक्ती ही निश्चितच वाखणण्याजोगी आहे, असेच वाटते. त्यांच्या आगामी कार्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा...!







 
 
 
 

 
Powered By Sangraha 9.0